Wednesday, July 11, 2012

ये आग कैसे बुझेगी..


जली को आग कहते है, बुझी को राख कहते है, मंत्रालय को जो आग लगी, उसीको पाप कहते है..

विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालय आगप्रकरणी दिलेल्या प्रस्तावावरील चर्चेची सुरुवातच या शायरीने केली. आगीसंबंधी विरोधी पक्ष काय भूमिका मांडणार, हेच जणू त्यांनी स्पष्ट केले. आग शॉर्टसर्किने लागली असली, तरी ती आपोआप नव्हे तर लावली आहे, असा थेट आरोप विरोधकांनी चर्चेदरम्यान केला. सत्ताधा-यांविरुद्धचा रोष ‘कॅश’ करण्याचे विरोधकांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. खोटे बोला पण रेटून बोला, असा त्यांचा पवित्रा होता.

वादग्रस्त प्रकरणांची कागदपत्रे जाळून टाकण्यासाठीच आग लावली असे सिद्ध करण्याचा प्रयत्न खडसेंनी केला. त्यांनी जळालेल्या कागदपत्रांची यादीच सभागृहासमोर ठेवली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मंत्रालयाच्या आगीची तुलना 26/11 च्या हल्ल्याशी केली. तसेच, प्रशासकीय चुकांचे पाढे म्हणण्यास सुरुवात केली. विद्युतीकरणाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही, मल्टीस्विचेस नाहीत. तसेच, एसी प्रमाणापेक्षा जास्त बसवण्यात आल्याचे सांगून मंत्रालयाला आग लावण्यात आल्याचा आरोप तावडे यांनी केला.

खासगीत बोलताना मात्र आग आपोआप लागल्याचे अनेक विरोधी सदस्य मान्य करत होते. सत्ताधा-यांविरुद्ध जनतेचा रोष असल्यामुळे आम्हाला आग लावली, असे म्हणणे भाग असल्याचे ते सांगत होते. त्यामुळेच मंत्रालयाच्या आगीवर बोलताना तावडे एकदम राजकारणावरच घसरले. विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मंत्रालयापेक्षाही मोठी आग भडकली आहे. ती आग कशी आटोक्यात आणणार, त्यातून कसे सावरणार, असा टोमणाही त्यांनी समोरच्या बाकावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना लगावला. तावडे बोलत असताना काँग्रेसचे भाई जगताप यांनी जागेवर बसूनच त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी समोर बसलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ या सर्व नेत्यांकडे निर्देश करून हे सगळे नेते असताना तुम्ही कशाला बोलता, असा प्रश्न केला. त्यावर भाई जगताप यांनी एकटे नारायण राणे उभे राहिले की, तुम्हालाच सर्वात जास्त त्रास होतो, असा टोमणा मारला. जगतापांनी रावतेंना मारलेल्या टोमण्याला तावडेंनी उत्तर देण्याची गरज नव्हती. पण, आ बैल मुझे मार, असा प्रकार झाला. तावडे म्हणाले नारायण राणे त्यांच्यापुरते राहिलेले नाहीत. त्यावर, भाई म्हणाले मग हा त्रास तुमच्यापर्यंत पण पोहोचला का? त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. नारायण राणेही त्यात दिलखुलासपणे सहभागी झाले. 

शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी मात्र अजित पवार यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे दालन सुरक्षित कसे राहिले, असे वक्तव्य केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याचा आधार घेऊन शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीतच या दालनाची बांधणी अतिशय सुरक्षितरीत्या करण्यात आल्याकडे रावतेंनी लक्ष वेधले आणि ही शरद पवार यांचीच दूरदृष्टी होती, असे सांगत एक द्रष्टा नेता काय करू शकतो, हे लक्षात घ्या अजितदादा, असा टोला लगावला आणि सभागृहात एकच हशा पिकला.


0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP