Monday, November 19, 2012

सैनिकहो तुमच्यासाठी..

एखादा वटवृक्ष उन्मळून पडावा आणि त्याच्या सावलीत आश्रय घेणारे, आधार शोधणारे, दु:ख विसरणारे अशी सर्व माणसे, लहान-थोर बायाबापुडे, प्राणिमात्र यांची दाणादाण उडावी, सर्व जण हवालदिल व्हावेत असे काहीसे महाराष्ट्रात घडले. या राज्यातील जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे युगपुरुष होते. 

या युगपुरुषाचा अंत झाला. आपले सर्वाचे आवडते बाळासाहेब आपल्यातून निघून गेले. त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या लाडक्या शिवसैनिकांना आधार दिला, त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सुखदु:खात ते सहभागी झाले आणि जेव्हा त्यांची प्रकृती ढासळू लागली तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली. देवाला साकडे घातले. अंत:करणापासून त्यांनी केलेल्या प्रार्थनेचा परिणाम होतोय की काय असेच सर्वाना वाटत राहिले, कारण अधूनमधून त्यांची प्रकृती सुधारत होती. शिवसैनिकांना हायसे वाटत होते. प्रकृती सुधारत असल्याचा संदेश आला की बाळासाहेब जणू काही शिवसैनिकांना सांगताहेत, 'दु:ख करू नका, तुमच्यासाठी पुन्हा उभा राहीन, माझ्या शिवसैनिकांनो माझे आयुष्य तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी आहात,' असे बाळासाहेब म्हणायचे, तसे त्यांनी अखेरच्या भाषणातही सांगितले आहे. 

बाळासाहेबांची प्रकृती जास्त बिघडली तेव्हा 'मातोश्री'वर शिवसैनिकांची गर्दी वाढू लागली. त्याचबरोबर चित्रपट, नाटक, साहित्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर लोक 'मातोश्री'वर शिवसेनाप्रमुखांच्या भेटीला येऊ लागले. विविध वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी 'मातोश्री'वरचे सर्व प्रसंग, भेटीला आलेली मान्यवर मंडळी, त्यांच्या मुलाखती महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आणि जगभर पोहचवले. ती सर्व दृश्ये पाहून बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे किती आकर्षण होते याची प्रचिती आली आणि त्यांची अंत्ययात्रा पाहून आपले बाळासाहेब किती हिमालयाएवढे मोठे होते, महापुरुष होते याची जाणीव झाली. अभिमान वाटला. या महापुरुषाच्या मृत्यूबद्दल दु:ख तरी कसे व्यक्त करावे हे समजेनासे झाले. या महापुरुषाच्या, युगपुरुषाच्या म्हणजेच आपल्या बाळासाहेबांच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना सहन करण्याची शक्ती शिवसैनिकांना मिळो, अशी सद्भावना मनामनात जागी झाली असेल. 

या महाराष्ट्र राज्याने अनेकांचे मृत्यू पाहिले, मोठमोठय़ा नेत्यांचे मृत्यू पाहिले; पण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 6 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत निघालेली महाअंत्ययात्रा वगळता एवढी मोठी अंत्ययात्रा या राज्याने कधी पाहिली नाही. ही अंत्ययात्रा पाहून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असल्याचा प्रत्यय येत होता. लाखोंच्या डोळय़ांतून अव्याहतपणे वाहणारे अश्रू क्वचितच कोणा नेत्याच्या मरणानंतर पाहावयास मिळाले असतील. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून साश्रुनयनाने महाराष्ट्राच्या हृदयसम्राटाला अग्नी देण्यात आला आणि लाखो हृदये विदीर्ण झाली. बाळासाहेबांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर आणि नंतर अंत्यदर्शनासाठी सर्वपक्षीय लोक आले. सर्व जाती-धर्म-पंथाचे लोक आले. सर्वप्रकारचे मतभेद विसरून लोक आले. लोकाशाहीवर बाळासाहेब टीका करत आपली ठोकशाहीच योग्य आहे, असे ठामपणे सांगत; पण बाळासाहेबांची अंत्ययात्रा पाहताना तेव्हा लोकशाही जिवंत झाली आहे आणि जमलेले लाखो लोक बाळासाहेबांमध्ये असलेल्या माणुसकीला 'जय महाराष्ट्र' करत आहेत असे वाटले. बाळासाहेबांनी या राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण पार बदलून टाकले होते. बाळासाहेबांचा करिष्मा शिवसेनेत आज कोणत्याही नेत्याकडे नाही. राजकारण आणि समाजकारण ढवळून काढून संपूर्ण परिवर्तनाच्या दिशेने नेण्याचे नेतृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व आज कोणत्याही नेत्यामध्ये नाही. उद्धव असो की राज कोणामध्येही संपूर्ण परिवर्तन करण्याची ताकद नाही. बाळासाहेबांनी एकटय़ाने शिवसेना उभी केली आणि 45 वर्षे एकटय़ाच्या खांद्यावर ती पेलली. निधर्मी तत्त्वाने, समाजातील सर्व घटकांचा समावेश असलेली धोरणे घेऊन राज्य करणारे सर्वाना सारखा न्याय देत नाहीत, असे त्यांचे ठाम मत होते. त्यातूनच ते सत्ताधार्‍यांच्या ढोंगबाजीवर प्रहार करत. त्यांच्या ढोंगबाजीचा पर्दाफाश करत आणि नंतर त्यांची अशी काही खिल्ली उडवत की लोकांमध्ये एकापाठोपाठ हास्यस्फोट होत असत. अत्यंत प्रभावी वक्ते, कोटय़ा करत करत लोकांसमोर सत्य मांडण्याची त्यांची हातोटी, व्यंगचित्रकाराच्या चष्म्यातून हेरलेल्या ढोंगबाजीला चव्हाटय़ावर आणण्याचा भेदकपणा त्यांच्यामध्ये होता, तो थेट ऐकणार्‍याच्या हृदयाला भिडत असे. त्यामुळे त्यांचे भाषण अधूनमधून खटय़ाळ, खोडकर वाटे. द्वयअर्थी शब्द वापरून अश्लील वाटावेत असे विनोद करण्याबरोबरच सत्ताधार्‍यांच्या गैरकारभारावर आणि भ्रष्टाचारावर आसूड ओढताना ते शिव्याही हासडत असत. बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना राजकारणाचे धडे देण्यासाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी आक्रमकता त्यांच्यात आणण्यासाठी भाषणे दिली. दसरा मेळावा ही शिवसैनिकांमधील मरगळ झटकून त्यांच्यामध्ये देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी असायचा. 'हिंदूंच्या वाटेला जाल तर खबरदार' असा सणसणीत इशारा बाळासाहेबांनी दिला की शिवसैनिकांमधून उत्स्फूर्तपणे घोषणा सुरू व्हायच्या. 'जय भावानी, जय शिवाजी' 'शिवसेनाप्रमुखांचा विजय असो' आणि त्याबरोबरच फटाक्यांच्या माळा फोडल्या जायच्या. काही वेळ त्यांना थांबावे लागायचे. त्यांनी 'थांबवा' म्हटल्याबरोबर आदेशाचे पालन व्हायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवसैनिक यांच्यामध्ये फक्त एकच दुवा होता तो म्हणजे निष्ठेचा. बाळासाहेबांचे त्यांच्यावर प्रेम होते. त्या प्रेमावर निष्ठा, बाळासाहेबांच्या आदेशावर निष्ठा, त्यांच्या प्रत्येक शब्दावर निष्ठा. शिवसैनिकांची ही अगाध निष्ठा निर्माण करण्याची ताकद बाळासाहेबांमध्येच होती. आज कोणत्याही नेत्याने ही निष्ठा कमावलेली दिसत नाही. राजकीय कारणांसाठी शिवसेनेतून बाहेर पडलेले छगन भुजबळ असो, गणेश नाईक असो अथवा नारायण राणे असोत त्यांनीही बाळासाहेबांप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा व्यक्त केली आहे. बाळासाहेबांची प्रकृती खालावली असल्याचे कळताच भुजबळ, नाईक 'मातोश्री'वर त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले. नारायण राणेदेखील 'मातोश्री'वर जाऊ इच्छित होते; पण 'मातोश्री'हून त्यांना वेळ मिळाली नाही, असे सांगण्यात आले. शिवसेना सोडून गेलेल्या शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनाही बाहेर गेल्याचा पश्चाताप होतोय की काय असे वाटत होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी हिंदू धर्मातील जुनाट चालीरीती आणि जातीभेदावर आसूड ओढले, तर बाळासाहेबांनी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व आबाधीत राखण्यासाठी प्रहार केले. हिंदुत्व हा कोणता धर्म नव्हे तर आमचे राष्ट्रीयत्व आहे, असे बाळासाहेब सांगत. शिवसेनेत जातीभेद नाहीत ते केवळ हिंदुत्व आहे, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आणि हे कृतीने सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या शिवसेनेत समाजातील सर्व घटकांना स्थान दिले, सर्व जातींना सामावून घेतले, सर्व उपेक्षित घटकांना सत्तेत सहभागी करून घेतले, पक्षामध्ये अथवा सत्तेमध्ये स्थान देण्यासाठी 'गुणवत्ता' हा निकष मानला. त्यामुळेच दलित पॅँथरचे नामदेव ढसाळ अथवा रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी शिवसेनेबरोबर जाणे पसंत केले. बाळासाहेबांनी त्यांना सन्मानाने आपल्या सोबत घेतले. एकप्रकारे सामाजिक अभिसरण त्यांना अपेक्षित होते. सत्ताधार्‍यांच्या भ्रष्ट आचरणावर त्यांनी खास ठाकरी भाषेत टीकास्त्र सोडलेच; पण खेळाडू, कलावंत, साहित्यिक, लेखक, पत्रकार यांच्या भूमिकांवरदेखील त्यांनी अनेकदा हल्ले चढवून वाद ओढवून घेतले. जसेजसे दिवस गेले तसतसे बाळासाहेबांच्या भूमिकांचे वास्तव त्या लोकांनी समजून घेतले. ज्या पाकिस्तानविरुद्ध त्यांनी आगपाखड केली आणि पाक क्रिकेट टीमला भारतात पाऊल ठेवू देणार नाही, असे इशारे दिले त्याच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाळासाहेबांची प्रकृती गंभीर झाली तेव्हा त्यांनी लवकर बरे व्हावे म्हणून शुभेच्छा दिल्या. पाकिस्तान सरकारनेही त्यांच्याबद्दल सद्भावना व्यक्त केल्या. अतिरेक्यांवर वचक असलाच पाहिजे, या त्यांच्या भूमिकेचे एकप्रकारे स्वागतच करण्यात आले. शिवसैनिकांच्या साथीने बाळासाहेबांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. महाराष्ट्राची सत्ता घेण्यापर्यंत शिवसेनेची घोडदौड झाली, मात्र या सगळय़ा प्रवासात शिवसैनिकांची त्यांनी सतत काळजी वाहिली. मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब खूप खचले होते. गणेशोत्सवाच्या काळातच 6 सप्टेंबर 1995 रोजी मीनाताई गेल्याने विघ्नहर्त्यावर आपला विश्वास उरला नाही. सगळय़ाच गोष्टींवरचा विश्वास उडाला आहे, असे सांगून आता फक्त शिवसैनिकांवरच विश्वास आहे. शिवसैनिकांच्या प्रेमावरच पुढचे आयुष्य घालवणार, असे भावनोत्कट उद्गार बाळासाहेबांनी मीनाताईंच्या निधनानंतर दसरा मेळाव्यात काढले. त्यानंतर मात्र बाळासाहेब जगले ते केवळ त्यांनी बांधलेल्या शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठीच. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP