Monday, November 26, 2012

मुंबई-पुण्यासह अयोध्येतही स्मारक व्हावे!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करायचे कुठे? यावरून वाद सुरू झाला आहे. स्मारक करण्यासाठी योग्य जागा कोणती, याबाबत मतमतांतरे होऊ लागली आहेत. शिवाजी पार्क मैदान, महापौर बंगला, कोहिनूर मिल तसेच त्यांची जन्मभूमी पुण्यनगरी या ठिकाणांसाठी मागण्या पुढे आल्या आहेत. याबरोबरच महाराष्ट्राबाहेर विशेषत: उत्तरेतील अयोध्येत बाळासाहेबांचे स्मारक का होऊ नये? कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करून बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घेण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली. त्याच रात्रीत ते कोटय़वधी हिंदूंचे हृदयसम्राट झाले. 

संसदेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्या बाळासाहेबांना मुंबई, पुण्यातच सीमित का ठेवायचे. स्मारक म्हणजे नेमके काय करायचे? पुतळा उभारायचा की त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी वास्तू उभारायची, हे अनेकांना उमगलेले नाही. बाळासाहेबांच्या विचारांची, शिकवणुकीची प्रेरणा घेण्यासाठी काय निर्माण करणार आहात, हे स्पष्ट करावे लागेल. शिवसैनिकांना मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारावा, असे वाटत आहे. बाळासाहेबांचा अंत्यविधी ज्या ठिकाणी झाला त्याचठिकाणी स्मारक झाले पाहिजे, असे विधान अंत्यविधीच्या दुसर्‍या दिवशी करून शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी वाद ओढवून घेतला. मग साहजिकच त्यांचा प्रतिवाद करीत लालनिशाण गटाने जोशींनी त्यांची कोहिनूर मिल स्मारकासाठी द्यावी, असा चिमटा काढला. तर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी महापौर बंगल्यालगतची जागा स्मारकासाठी द्यावी, अशी सूचना केली. पुणे येथे झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत बाळासाहेबांची जन्मभूमी पुणे असल्यामुळे पुण्यात स्मारक व्हावे, अशी मागणी केली. वास्तविक पाहता अफाट लोकप्रियता मिळविलेल्या लोकनेत्याच्या स्मारकावरून असा वाद होणे उचित नाही. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेत्याचे स्मारक सर्वसंमतीने झाले पाहिजे. हे स्मारक म्हणजे त्या नेत्याला खर्‍या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली असली पाहिजे. हे स्मारक म्हणजे आदराने नतमस्तक व्हावे, असे स्थान असले पाहिजे. पण स्मारकाला जागा मिळण्यापासूनच ते वादग्रस्त व्हावे, हे नेत्यांना शोभा देणारे नाही. 

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाच विचार होत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना नेते संकुचित वृत्तीने बाळासाहेबांना छोटे करीत आहेत. 'गर्व से कहो हम हिंदू है' असा नारा देणार्‍या बाळासाहेबांनी हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचे सांगत हिंदुस्थानवर भगवा फडकविण्याचे आवाहन केले होते. अयोध्येतील बाबरी मशीद पाडली पाहिजे, असे वारंवार सांगून शिवसैनिकांना बाबरी पाडण्याचा मंत्र दिला होता. बाळासाहेबांच्या डरकाळीने सरकारला घाम फुटत होता. 

'मंदिर वही बनायेंगे' असे नारे देऊन अयोध्येत जमलेल्या कार सेवकांनी बाबरी पाडल्यानंतर भगव्या झेंडय़ामागे तोंडे लपवली. पण शिवसेनाप्रमुखांनी कसलीही तमा न बाळगता बेधडकपणे प्रतिक्रिया दिली की, 'माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली, आता काशी, मथुरा पाडणारच' असा कडव्या हिंदुत्वाचा अंगार ओकणार्‍या हिंदुहृदयसम्राटाचे स्मारक मुंबई, पुण्यात व्हावेच, पण अयोध्येतही झाले पाहिजे. 

शंकराचार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍या या कडव्या हिंदुत्ववादी नेत्याचे स्मारक अयोध्या, वाराणसी, काशी, मथुरा या तीर्थक्षेत्री का होऊ नये, अशी मागणी पुढे येत आहे. अशा ठिकाणी स्मारक झाले तर, हिंदू बांधवांची छाती गर्वाने फुलून येईल. 'गर्व से कहो हम हिंदू है' असा नारा देऊन बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतल्यामुळे बाळासाहेबांना जगभर प्रसिद्धी मिळाली. हिंदुत्ववादी पक्ष संघटना असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यापेक्षाही बाळासाहेब श्रेष्ठ ठरले. विलेपार्ले येथील शिवसेनेचे उमेदवार रमेश प्रभू यांच्या निवडणूक प्रचारात कडव्या हिंदुत्वाच्या नावाने मते मागितल्यामुळे त्यांना सहा वर्षे मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला होता. लोकशाहीला विरोध करून ठोकशाहीचा उघड प्रचार करणार्‍या आणि हुकूमशहा हिटलरला गुरू मानणार्‍या या हिंदुहृदयसम्राटाला लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणार्‍या संसदेनेदेखील श्रद्धांजली अर्पण केली हे विशेष. लोकशाही राज्यव्यवस्थेची सर्व तत्त्वे, नियम, निकष बाजूला सारून बाळासाहेबांच्या लोकप्रियतेला संसदेने एकप्रकारे अभिवादन केले आहे. कम्युनिस्ट पक्षाने विरोध दर्शवला नसता तर श्रद्धांजलीचा प्रस्ताव संमत करून संसद स्थगित करण्याचा निर्णयदेखील घेतला असता एवढा शिवसेनाप्रमुखांचा प्रभाव होता. महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या स्मारकाची चेष्टा चालवली आहे, ती आधी थांबवली पाहिजे. स्मारकासंबंधात जी मुक्ताफळे उधळली जात आहेत त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर घेतलेला पहिलाच निर्णय चुकीचा ठरला आहे. 'स्मारकासंबंधात बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये मी येणार नाही' असे वक्तव्य करून शिवसैनिकांना पुतळे उभारण्यासाठी त्यांनी पूर्ण मुभा दिली आहे. आता पुतळ्यांच्या मागण्यांना मर्यादा राहणार नाही. पुतळ्यांसाठी पैसे जमा करण्याची जबाबदारी शिवसैनिक घेतील आणि ठिकठिकाणी पुतळे उभारतील. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायती अशा बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुतळ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकाचे श्रेय लाटण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. 


बाळासाहेबांच्या अध्र्या-पाव वयाचे नेते स्मारकासाठी आघाडीवर आहेत. जोशी सरांनी शिवाजी पार्कवर स्मारक करण्याचे सूतोवाच करताच प्रतिक्रिया उमटली. मनोहर जोशी आणि राज ठाकरे यांनी शिवसेना भवनासमोर असलेली कोहिनूर मिल विकत घेतली आहे. जोशी सर बाळासाहेबांना देवासमान मानतात. त्यांनी देवासाठी कोहिनूरची जागा द्यावी. तिथेच उचित स्मारक होईल, असे लालनिशाण गटाने म्हटले आहे. ते तर्कसंगत म्हणावे लागेल. सुनील प्रभू यांनी महापौर बंगल्याच्या ठिकाणी स्मारक करण्यास पुढाकार घेतला आहे. पण महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू असल्यामुळे तिथे अडचण होऊ शकेल आणि शिवाजी पार्क मैदानाचा वाद तर न्यायालयात गेला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील शिवाजी पार्क मैदान नियमानुसार देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मुख्यमंर्त्यांनी उद्धव ठाकरेंशी जमवून घेतल्याची चर्चा असतानाच त्यांनी अंत्यविधी शिवाजी पार्कवर करण्यास परवानगी दिली. तेव्हाच ते शिवसेनेचे मित्र असल्याची टीका झाली होती. पण त्यांनी शिवाजी पार्कबाबत ठोस भूमिका घेऊन शिवसेनेला अंतरावर ठेवले. त्यांच्या कॉँग्रेस पक्षाच्या दृष्टीने हा चांगला निर्णय झाला. पुणे येथे बाळासाहेबांचे स्मारक व्हावे, असे पुढे आले असले तरी जागेबाबत चर्चा झालेली नाही. शनिवारवाडय़ासमोर पटांगणात स्मारक करायला अथवा पुतळा उभारण्याला हरकत नसावी. स्मारक व्हावे यासाठी तीन महत्त्वाचे निकष आहेत. एकतर बाळासाहेबांचा जन्म या पुण्यनगरीत झाला आहे. दुसरे असे की, प्रबोधनकार ठाकरे यांचा 'खरा ब्राह्मण' नाटकावरून पुण्यात जो अपमान झाला होता त्या अपमानाची भरपाई करता येईल आणि तिसरे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मागणी झाल्यामुळे दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याप्रमाणे बाळासाहेबांचा पुतळा हलवण्याची हिंमत कोणी करणार नाही, केलीच तर भाजपाचे विकास मठकरी पहिला विरोध करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दलित जनतेने इंदू मिलच्या जागेची मागणी केलेली असताना मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी इंदू मिलच्या जागी बाळासाहेबांचे स्मारक करण्याची मागणी करून गोंधळ उडवला होता. पण राज ठाकरेंनी त्यावर पडदा टाकला, अन्यथा नवाच वाद निर्माण झाला असता. बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक इंदू मिलच्या जागेत होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉ. आंबेडकर आणि बाळासाहेब यांची तुलना करणे योग्य होणार नाही. ही दोन विरुद्ध टोकाची व्यक्तिमत्त्वे आहेत. डॉ. आंबेडकरांचे कार्य महान होते. विद्वत्तेबाबत त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. 

सर्वधर्मसमभाव, स्वातंर्त्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय यावर आधारित त्यांनी सखोल अभ्यासांती तयार केलेली भारतीय राज्यघटना दीपस्तंभासारखी देशाला मार्गदर्शन करीत आहे. हिंदू धर्मीयांच्या हितासाठी हिंदू कायद्यात सुधारणा, हिंदू स्त्रियांच्या न्याय्य हक्कासाठी हिंदू कोड बिल आणण्याचा निर्धार, ते संमत झाले नाही तेव्हा कायदेमंत्री पदाचा राजीनामा अशा प्रकारची प्रकांड विद्वत्तेची असंख्य उदाहरणे देता येतील, पण त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. तसा बाळासाहेबांच्या स्मारकावरून झालेला वादविवादही योग्य नाही. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यासाठी जीवाची बाजी लावणार्‍या शिवसेनाप्रमुखांचे स्मारक कोर्टबाजीत अडकणे हे मराठी मनाला क्लेशदायक आहे. ते कुठेही चांगल्या ठिकाणी व्हावे, महाराष्ट्रात व्हावे, महाराष्ट्राच्या बाहेर व्हावे, पण वादविवादाशिवाय व्हावे हीच सर्वाची इच्छा आहे.

1 comments:

Anonymous,  December 3, 2012 at 11:34 PM  

मॅडम तुमच्या लेखानंतर संजय राऊतांनी अयोध्याचा उल्लेख केला होता.

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP