Monday, May 20, 2013

आकाश फाटलंय, ठिगळं कुठे लावणार?

कोणत्याही नेत्यावर आरोप झाले की राजकारणातल्या शहकाटशहाचा हा परिणाम असल्याचे निगरगट्टपणे सांगितले जाते; परंतु समाजहितासाठी, लोकांच्या करांमधून जमा झालेला सरकारी पैसा हडप करून तो स्वत:च्या लॉकरमध्ये ठेवायचा. पत्नी, मुलांच्या, नातेवाइकांच्या नावावर ठेवायचा. दागदागिने, जमीनजुमल्यात गुंतवायचा. अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शासन करण्याची भूमिका घेण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो, तेव्हाच धूर निघतो आणि कुठेतरी आग असल्याचा संशय वाढतो.




आजकाल देशातील सर्व क्षेत्रांमध्ये अतिरेक होऊ लागला आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, कला, संस्कृती अशा सर्व क्षेत्रांतून विवेक हरपला असून विवेकाची जागा अतिरेकाने घेतली असल्याचे चित्र दिसत आहे. व्यापार्‍यांनी एलबीटीबाबत अतिरेक केला असून एलबीटी पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी जनतेलाच वेठीस धरले आहे. प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरले. संजूबाबाला शिक्षा झाली. त्याची तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हा जणू काही एखाद्या देशभक्ताला विनाकारण आत जावे लागत असल्याचा देखावा प्रसारमाध्यमांनी उभा केला;पण संजूबाबालाही अल्पकाळातच छोट्या पडद्याआड जावे लागेल अशी आणखी भयानक आणि देशभर खळबळ उडवून देणारी आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगची घटना समोर आली. विश्‍वकरंडकाचा सन्मान मिळवणार्‍या भारताची आणि विश्‍वातील क्रिकेटप्रेमींची मान शरमेने खाली गेली. राजकारणात तर भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला आहे. कोलगेट आणि रेल्वे गेटप्रकरणी केंद्रातील काँग्रेसच्या कायदामंत्री अश्‍विनी कुमार आणि रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्रही यात मागे नाही. सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज वेशीवर टांगली जात आहेत;पण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अद्यापि राजीनामा दिल्याचे अथवा त्यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी लावून धरल्याचे ऐकिवात नाही. 

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झाली. सिंचन घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला होता;परंतु चौकशी समितीचा निकाल आल्यानंतर ते पुन:श्‍च मंत्रिपदावर कार्यरत झाले. भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेसचेच मंत्री गुंतलेले असल्यामुळे या पक्षात अस्वस्थता वाढू लागली आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा 'मिस्टर क्लीन' म्हणून पुढे येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची भ्रष्टाचारात गुंतलेल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. अजितदादा सर्वांना पुरून उरले; पण छगन भुजबळांचे काय ?



शिवसेनेतील आक्रमक, तडफदार नेता, शिवसेनेचा ढाण्या वाघ शिवसेनेतून बाहेर पडतो आणि ढाण्या वाघांच्या प्रमुखाला म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच आव्हान देतो, राष्ट्रवादीत गृहमंत्री झाल्यावर बाळासाहेबांना अटकेची जय्यत तयारी करतो. शिवसेनाप्रमुखांना गजाआड करण्याची स्वप्ने पाहतो. त्याच छगन भुजबळांवर पिंजर्‍यात अडकण्याची वेळ यावी, यापेक्षा वेगळा दैवदुर्विलास तो कोणता असेल? आपल्याच भुजबळामध्ये सगळे बळ एकवटले असल्याचे दात-ओठ खात दाखवणार्‍या वाघाचे अवसान गळून पडले, की तो पिंजर्‍यात अडकला, की लहानथोरांपासून वृद्धांपर्यंत सगळेच त्याला दगड मारू लागतात अशी भुजबळांची अवस्था झाली आहे. भुजबळांच्या जिल्ह्यातच कार्यकारी अभियंता असलेला सतीश चिखलीकर, शाखा अभियंता जगदीश वाघ आणि भुजबळांच्याच घरात म्हणजेच कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी असलेला संदीप बेडसे यांनी करोडोंचा बेहिशेबी माल गोळा केल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसचे मंत्री पवनकुमार बन्सलचा भाचा रेल्वेभरती लाच प्रकरणात अडकल्याचे स्पष्ट झाले. तसेच कायदामंत्री अश्‍विनीकुमार यांच्यापर्यंत कोळसाकांडाचा संबंध पोहोचत असल्याच्या चर्चेने जोर धरला, तेव्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लागल्याने मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात, असे सूतोवाच केले होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी तर काँग्रेसची प्रतिमा मलीन झाल्याचे वक्तव्य केले होते. हा न्याय त्यांनी राज्यातील भ्रष्टाचार प्रकरणांना लावलेला दिसत नाही. भुजबळांची मुंबई एज्युकेशन ट्रस्टपासून नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यापर्यंत भ्रष्टाचाराची मालिकाच उघड झाली आहे. राज्यभर पसरलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये ठिकठिकाणी कितीतरी चिखलीकर, वाघ आणि बेडसे पसरले आहेत. आभाळच फाटले आहे, ठिगळं लावणार कुठे? 

गृहमंत्री असताना बदल्या, बढत्यांमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सुरू झाले तेव्हा भुजबळांनी अधिकार्‍यांची बाजू घेतली. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तेलगीप्रकरणी जेव्हा वेळ आली, तेव्हा गृहमंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला; पण या वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा भ्रष्टाचार उघड केला तेव्हा या अधिकार्‍यांना आपण ओळखत नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले. एकेकाळी शिवसेनाप्रमुखांना आव्हान देणार्‍या भुजबळांना किरीट सोमय्यांचे आव्हान पेलवणे कठीण झाले आहे. त्यात ते कमी पडू लागले आहेत. किरीट सोमय्या तर हात धुऊन मागे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराची यादीच राज्यपालांना देण्यास निघाले आहेत. भुजबळांच्या घरात वावरणारे, कोट्यवधींची  माया जमवणारे अधिकारी त्यांच्या परिचयाचे नाहीत, मग काय साधूसंतांच्या परिचयाचे आहेत का? भुजबळांवर नेहमीच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. घरात आणि कार्यालयात लिलया वावरणार्‍या बेडसेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त लाखोंच्या जाहिराती दिल्या; पण भुजबळांना माहीत नाही, यावर कोण विश्‍वास ठेवणार? एवढा पैसा आला कुठून, अशी विचारणा त्यांनी केली नाही याचा अर्थ काय होतो? भ्रष्टाचाराचे आरोप झाले की पक्षांतर्गत विरोधकांची खेळी असल्याच्या बातम्या 

सोडल्या जातात. कोणत्याही नेत्यावर आरोप झाले की राजकारणातल्या शहकाटशहाचा हा परिणाम असल्याचे निगरगट्टपणे सांगितले जाते; परंतु समाजहितासाठी, लोकांच्या करांमधून जमा झालेला सरकारी पैसा हडप करून तो स्वत:च्या लॉकरमध्ये ठेवायचा. पत्नी, मुलांच्या, नातेवाइकांच्या नावावर ठेवायचा. दागदागिने, जमीनजुमल्यात गुंतवायचा. अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शासन करण्याची भूमिका घेण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो, तेव्हाच धूर निघतो आणि कुठेतरी आग असल्याचा संशय वाढतो.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP