Monday, May 27, 2013

शरद पवारांचा मुस्लीम नारा!


१९९५ सालची विधानसभा निवडणूक पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली होती; पण मुस्लिमांनी त्यांना मते दिली नाहीत. उलट मुस्लिमांची वस्ती असलेल्या मुंबईतल्या अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार विजयी झाले होते. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी त्यांना विश्‍वास देणे गरजेचे आहे; पण विश्‍वास आणि शरद पवार हे समीकरण जुळत नाही, हे सर्वांना माहीत आहे.पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करणार्‍या शरद पवारांनी मुस्लीम अल्पसंख्याकांचे तारणहार असल्याचा संदेश देण्यासाठी मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनचा आधार घेतला आहे. कठीणसमयी माणसे मिळेल तो आधार घेत असतात. मुस्लीमबहुल मुंब्रा येथे जाऊन नागरिकांना सर्वसमस्यामुक्त करण्याचे आश्‍वासन देऊन त्यांनी तेथून स्लो लोकल पकडली आणि कळवा गाठले. दलित मुस्लीम ही काँग्रेसची व्होट बँक असून ही व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी सतत वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. 

शरद पवार जोरात कामाला लागले. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा आणि बैठका वाढल्या, दौरे वाढले की, त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. या वेळी तर 'इस पार या उस पार' या ईर्षेने ते निवडणूक रिंगणात उतरणार असे दिसते. वेगवेगळय़ा समाजाची विशेषत: अल्पसंख्याक मुस्लीम समाजाची मते भरभरून मिळाल्याशिवाय आपले काही खरे नाही, हे त्यांना समजून चुकले आहे. याचे कारण दलित मुस्लीम ही काँग्रेसची व्होट बँक असून काँग्रेसची परंपरागत २0 टक्के मते गृहित धरून मतमोजणी पुढे जाते. त्यामुळे इतर पक्षांना ही मते किमान २५ टक्के मिळाल्याशिवाय विजयी होता येत नाही. त्यामुळेच काँग्रेसची मते राष्ट्रवादीकडे वळवण्याचा पवारांचा प्रय▪सुरू झाला आहे. मुस्लिमांच्या मतांचा सुपरफास्ट ओघ राष्ट्रवादीकडे लागावा, यासाठी त्यांनी स्लो लोकल घेतली आहे. सुपरफास्ट मतांसाठी मध्य रेल्वेच्या स्लो लोकलमधून प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुंबईमध्ये बस्तान बसणे अवघड असल्यामुळे त्यांनी ठाण्याकडे मोर्चा वळवला आहे. खरे तर ठाण्यामध्ये राष्ट्रवादीची बाजू भक्कम असूनही ती अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी संपूर्ण एक दिवस ठाण्यासाठी दिला. विशेष म्हणजे दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये मुंब्रा हा त्यांनी केंद्रबिंदू म्हणून निवडला. मुस्लिमांचे मोठे वास्तव्य असलेल्या मुंब्य्राचा दौरा करून त्यांनी आपण मुस्लिमांसोबत असल्याचा संदेश दिला आहे. तत्पूर्वी, ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायची असेल, तर प्रथम नागरिकांचे पुनर्वसन करा, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. अनधिकृत बांधकामांसाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना खडे बोल सुनावण्याऐवजी पवारांनी सरळसरळ त्यांची पाठराखण केली. निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत बांधकामे पाडण्याचे धाडस कोणीही करणार नाही. त्यामुळे रहिवाशांची बाजू घेतल्याचा आव त्यांनी आणला. एलबीटीच्या विरोधात व्यापार्‍यांनी आंदोलन सुरू केले, तेव्हा देखील व्यापार्‍यांना दिलासा देण्यासाठी पवारच या प्रश्नी मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी प्राध्यापकांचा संप चालू असताना त्यांनी प्राध्यापकांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले; परंतु एलबीटी असो अथवा प्राध्यापकांचा संप असो, पवारांना त्यात फारसे वजन प्राप्त करता आले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 

शरद पवार जोरात कामाला लागले असले तरी त्यांनी हातात घेतलेले मुद्दे जोर धरत नाहीत, अशी काहीशी परिस्थिती दिसत आहे. गेल्या वर्षी दुष्काळाचे भाकित करण्यात आले तेव्हा पवारांनी दुष्काळ तर नाहीच; पण अन्नधान्य भरपूर आहे, असे सांगितले होते. त्यानंतर दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळासाठी भरपूर मदत करू, असे सांगितले; पण अपेक्षित मदत होऊ शकली नाही. राष्ट्रवादीतील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी वाढत असताना तसेच सर्वोच्च न्यायालयाने काही मंत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार दस्तुरखुद्द पक्षाध्यक्षांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या बांधकाम खात्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत देऊन संशयाची सुई भुजबळांच्या दिशेने दाखवली; मात्र पवारांनी सोमय्यांची खिल्ली उडवली. करोडोंची माया गोळा करणार्‍या भुजबळांच्या बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांबाबत अवाक्षरही त्यांनी काढले नाही. वस्तुत: किरीट सोमय्या चुकीचे असतील तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवल्यामुळे सर्वत्र नापसंती व्यक्त केली जात आहे. 

मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याआधी राष्ट्रवादीने दलित ओबिसींचा अनुनय सुरू केला होता. निवडणुकीसाठी रामदास आठवलेंचा वापर करून घेतला, मात्र निवडणुकीत त्यांच्यासाठी वजन वापरले नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या आठवलेंनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली आणि शिवसेना-भाजपा युतीच्या कळपात जाऊन बसले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राहणारच, अशी ग्वाही देणार्‍या राष्ट्रवादीने पडद्याआडून काँग्रेसलाच लक्ष्य केले आहे. निवडणूक एकत्र लढवायची, काँग्रेसच्या मतांचा लाभ घ्यायचा आणि काँग्रेसच्याच मतांवर डल्ला मारायचा, हा प्रकार करायचा असला तरी मुस्लिमांनी विश्‍वास ठेवला पाहिजे. 

१९९५ सालची विधानसभा निवडणूक पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली होती; पण मुस्लिमांनी त्यांना मते दिली नाहीत. उलट मुस्लिमांची वस्ती असलेल्या मुंबईतल्या अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार विजयी झाले होते. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी त्यांना विश्‍वास देणे गरजेचे आहे; पण विश्‍वास आणि शरद पवार हे समीकरण जुळत नाही, हे सर्वांना माहीत आहे. एकीकडे काँग्रेसची व्होट बँक राष्ट्रवादीकडे वळवण्याचा प्रय▪करताना दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारांना धोबीपछाड देण्याचा प्रय▪राष्ट्रवादीने चालवला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. दोन दगडांवर पाय ठेवून राजकारण करण्याची पवारांची जुनी चाल असून या वेळी त्याच प्रकारचे राजकारण खेळले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. खरे तर या वयात आणि प्रकृती साथ देत नसताना पवारांनी महाराष्ट्र घुसळून काढला, याची सहानुभूती मिळण्यासाठी विश्‍वासार्हता कमावण्याची अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते करत आहेत; परंतु जुन्या सवयी लवकर सुटत नाहीत, हेच खरे. मुस्लिमांचा नारा हा त्याचाच एक भाग आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP