Monday, June 10, 2013

शरद पवारांची स्वच्छता मोहीम

मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर राजकारणात यशस्वी होऊ शकतो, अशी राजकारण्यांची मनोधारणा बनली आहे. मतांसाठी जातींची गणिते जुळवायची, मतदारांसमोर पैसा ओतायचा आणि एकगठ्ठा मते निश्‍चित करून ठेवायची, त्यातून निवडून यायचे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र राजकारणात सुरू झाले आहे; परंतु त्यामुळे जे वैयक्तिक नुकसान होते ते न भरून निघणारे असेल. पवारांच्या पक्षात नेमके हेच झाले आहे. ते निस्तरण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंत्रिमंडळातील आपल्या वीस मंत्र्यांचे राजीनामे घेतले आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होईल, असे वातावरण तयार झाले. मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांची उचलबांगडी होऊन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नवे करकरीत सरकार उदयास येईल, इथपर्यंत सर्वप्रकारच्या चर्चेला उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसने बदल केले तर काँग्रेसमध्येही बदल व्हावेत, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी अनेकांनी दिल्लीला धाव घेतली. राज्यात नेतृत्व बदल व्हावा; पण नवा नेता शरद पवारांच्या मर्जीतला नको असे सोनियांना पटवून देण्याकरिता पवारविरोधी एक गट सक्रिय झाला.

प्रत्यक्षात त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. याचे कारण आघाडी सरकार असल्याने पवारांची संमती घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांची निवड होईल, अशी शक्यता नाही. राज्यात शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुती आणि महायुतीबाहेर असलेल्या मनसेला वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे महायुतीचे काही नेते त्यामुळे विरोधी पक्षात सगळा सावळागोंधळ झाला आहे. या सावळ्यागोंधळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोंधळाची भर पडल्यामुळे लोकांची चांगलीच करमणूक होणार आहे, मात्र पुढील काळात देशाच्या राजकारणात आपल्याला सक्रिय व्हायचे असेल तर आधी आपल्या घराची साफसफाई करणे किती आवश्यक आहे, हे पवारांना समजले नसेल, असे कोण म्हणेल?

राष्ट्रवादी काँग्रेसची घसरलेली पत आणि मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी पवारांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छता करायची तर पक्षातला केरकचरा हमरस्त्यावरून दूर लोटावा लागेल; पण तो लोटला तरी रस्त्याचा कडेला साचून राहील आणि आल्या गेल्याचे लक्ष तिकडे जाईल. त्यामुळे पवारांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उचलून बाजूला करण्याऐवजी आणि पक्षात असंतोष निर्माण करण्याऐवजी सर्वांचेच राजीनामे घेऊन टाकले. काहींना लोकसभेला उभे करणार, काहींवर पक्षकार्याची जबाबदारी टाकणार आणि काही नव्या चेहर्‍यांना संधी देणार अशा प्रकारची कसरत त्यांना करावी लागणार आहे. भाकरी पलटल्याने यादी बदलेल; पण अपेक्षित बदल घडणार आहे का? राष्ट्रवादी काही मंत्र्यांबाबत लोकांची जी मानसिकता बदलली आहे. त्यात बदल होणार आहे का? भाकरी उलटली पण भाकरी आधीच करपली तर उलटून उपयोग काय? अशा प्रकारचे प्रश्न उभे राहिले आहेत. पण म्हणूनच पक्षाची पडझड उघड्या डोळ्यांनी बघायची का? असा प्रश्न पवारांना पडला असावा. आणि पवारांसारख्या मुत्सद्दी आणि चाणाक्ष नेत्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली असावी. देशाच्या नेतृत्व पदासाठी शेवटचा प्रयत्न करेल, जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजेत, याकरिता ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेला उभे करावे आणि पक्षाची प्रतिमा सुधारावी या दोन अपरिहार्यतेत पवारांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहे. हे राजकारणातले फार मोठे धक्कातंत्र नाही. मंत्र्यांना लोकसभेला उभे करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस होत आहे. त्यात नवीन काहीच नाही.

शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांना विश्‍वासात घेवून सर्वांच्या राजीनाम्यांचे अस्त्र उगारले. आर.आर. आबा पाटील यांची महाराष्ट्रात नैतिक मूल्ये जपणारा स्वच्छ प्रतिमेचा सर्वसामान्य माणसांना जवळचा वाटणारा नेता अशी प्रतिमा बनली असून या त्यांच्या प्रतिमेची पक्षाला सर्वाधिक मदत होणार आहे. त्यामुळे शरद पवारांसमोर आबांचे वजन वाढले आहे. गृहमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'मिस्टर क्लीन' प्रतिमेसमोर राष्ट्रवादीचे 'मिस्टर क्लीन' म्हणून आबांना उभे करता येऊ शकते, एवढी एक पवारांसाठी दिलासादायक गोष्ट आहे.

ज्यांनी मंत्रीपदाचा वापर गडगंज मालमत्ता कमावण्यासाठी केला., अशा मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल आणि त्यांना जमवलेला पैसा निवडणुकीसाठी वापरावा लागेल. मोठमोठय़ा खात्यांची मंत्रीपदे घुसवून मालामाल झालेले सगळेच मंत्री मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले असून व्यक्तिगत स्वार्थापलीकडे त्यांना काहीच दिसू शकत नाही.

पैसा आणि मतदारसंघ या पलीकडे जाऊन पक्ष कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्यापाशीच खरेतर पवरांनी राजीनाम्याच्या शिस्तीचा बडगा उगारला आहे. एका बाजूने करोडो रुपयांचे भ्रष्टाचार करून उन्मत्त झालेले स्वपक्षीय आणि दुसरीकडे क्रिकेटच्या राजकारणात काँग्रेसने अप्रत्यक्षपणे मागे खेचण्यात पवारांना दिलेला शह यामुळे आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न पवारांना करावा लागणार आहे. त्याची स्वच्छता मोहीम ही एक झलक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी असे या पक्षाचे चारित्र्य आहे. त्यामुळे पक्ष अशा अवस्थेला येऊन पोहोचला आहे, याला पवार हे देखील जबाबदार आहेत. त्यांनी दिलेल्या निर्बंध स्वातंत्र्य परिपाक आहे. मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर राजकारणात यशस्वी होऊ शकतो, अशी राजकारण्यांची मनोधारणा बनली आहे. मतांसाठी जातींची गणिते जुळवायची, मतदारांसमोर पैसा ओतायचा आणि एकगठ्ठा मते निश्‍चित करून ठेवायची, त्यातून निवडून यायचे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र राजकारणात सुरू झाले आहे; परंतु त्यामुळे जे वैयक्तिक नुकसान होते ते न भरून निघणारे असेल. पवारांच्या पक्षात नेमके हेच झाले आहे. ते निस्तरण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP