Monday, June 3, 2013

आंबेडकरांची महाआघाडी, आठवलेंची महाबिघाडी

दलित, शोषित, वंचित, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि सत्तेपासून कायम दूर ठेवलेल्या समाज घटकांना एकत्र करून भारिप-बहुजन महासंघ त्यांनी स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष राजकीय ताकद मिळवून देऊ शकतो, हे त्यांनी अकोला पॅटर्नने सिद्ध केले आहे. इतर नेत्यांना कॉँग्रेसने वापरून घेतले आणि चळवळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आंबेडकर-आठवले वगळता अन्य गटातटांचे फारसे अस्तित्व उरलेले नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनातून राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी समविचारी समाजघटकांना बरोबर घेऊन रिपब्लिकन पक्ष स्थापन करणे अभिप्रेत होते. परंतु रिपब्लिकन पक्षाच्या या संकल्पनेचे आकलन त्यांच्या तथाकथित वारसदारांना झाले नाही. व्यक्तिगत स्वार्थासाठी त्यांनी बाबासाहेबांबरोबर रिपब्लिकन पक्षालाही एका जातीमध्ये बंदिस्त केले. रिपब्लिकन पक्षसुद्धा एकसंध ठेवला नाही, शकले केली, प्रत्येक गटाला स्वत:चे नाव देऊन पक्षाची गटातटांत विभागणी केली आणि मग एखाद्या आमदारकी खासदारकीसाठी मोठय़ा पक्षांच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी असेल तेवढी शक्ती वापरण्याचे राजकारण केले. अँड़ प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर, रा.सु. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, नामदेव ढसाळ, राजा ढाले, गंगाधर गाडे, टी. एम. कांबळे, सुलेखा कुंभारे, खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे चार-पाच गट अशी आणखी मोठी यादी असलेले रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आले. १९५६ साली बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेला गेल्या ५६ वर्षांत मूर्तस्वरूप तर आले नाहीच, पण त्या संकल्पनेचीच वाताहत झाली. जो तो स्वत:ला बाबासाहेबांचा वारस समजू लागला. आजची परिस्थिती पाहता प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकरांनी आपण केवळ रक्ताचेच नव्हे तर त्यांच्या विचारांचेही वारसदार असल्याचे दाखवून देण्याचा बर्‍याच अंशी यशस्वी प्रय▪केला आहे.

दलित, शोषित, वंचित, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि सत्तेपासून कायम दूर ठेवलेल्या समाज घटकांना एकत्र करून भारिप-बहुजन महासंघ त्यांनी स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष राजकीय ताकद मिळवून देऊ शकतो, हे त्यांनी अकोला पॅटर्नने सिद्ध केले आहे. इतर नेत्यांना कॉँग्रेसने वापरून घेतले आणि चळवळीमध्ये फूट पाडण्याचा प्रय▪झाला. आंबेडकर-आठवले वगळता अन्य गटातटांचे फारस अस्तित्व उरलेले नाही. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची वैचारिक भूमिका सोडलेली नाही आणि इतर रिपब्लिकन नेत्यांप्रमाणे मोठय़ा पक्षांना त्यांचा वापरही करू दिला नाही. मात्र त्यांच्यावर निवडणुकीत पडद्याआडून राजकीय तडजोडी केल्याचा आरोप अजूनही होत आहे.

रामदास आठवलेंच्या कॉँग्रेसने आणि शरद पवारांनी पुरेपूर वापर करून घेतला, शेवटी खड्यासारखे बाजूला करून टाकले. परंतु आठवलेंनी राजकारण कधी गांभीर्याने घेतले नाही. आपल्याला आमदारकी खासदारकी मिळावी इथपर्यंतच त्यांचे राजकारण सीमित राहिले. परिपक्वतेचा अभाव असल्यामुळे त्यांच्या बोलण्याने लोकांची भरपूर करमणूक होत असते. शिवसेना आणि भाजपा यांचे आणि आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साम्य काय हे शोधून सापडणार नाही. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आठवले यांच्या भाषणात काहीसे साम्य सापडू शकते. बाळासाहेब हयात असताना त्यांच्या भाषणाने करमणूक होत असे. मोठमोठय़ा नेत्यांच्या नकला आणि दादा कोंडकेंप्रमाणे द्विअर्थी शब्दांचा वापर करून लोकांना हसवणे तसेच विरोधकांवर अशाच प्रकारे टीकास्त्र सोडणे ही ठाकरेशैली सर्वांची करमणूक करीत असे. त्याचप्रकारे आठवले यांचे भाषण म्हणजे शेरोशायरी आणि आयत्या वेळी केलेले शीघ्र काव्य लोकांची करमणूक करीत असते. राजकारणातले गांभीर्य आठवलेंनी कधीही दाखवले नसल्याने त्यांचे राजकारण अधिकाधिक भरकटत चालले असून, आता ते अधिकच हास्यास्पद दिसू लागले आहे. त्यामुळे अनेकदा शिवसेना नेत्यांकडून अथवा दै. 'सामना'मधून त्यांची चूक दाखवून दिली जाते. लोकांना खिळवून ठेवण्यासाठी विनोद, किस्से, कोट्या, टोले प्रतिटोले यांचा भाषणात वापर केला जातो, पण असंबद्ध, निर्थक आणि तर्क विसंगत बोलल्याने लोकांची थोडावेळ करमणूक होते, पण एकंदर प्रकार हास्यास्पद असल्याची प्रतिक्रियाही उमटते. राजकारणात विदूषकांची काही कमी नाही. परंतु राजकारणाचे भान आणि वास्तवाची जाण ठेवून करमणूक केली जाते. बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्याकडे विनोदी नेते म्हणून पाहिले जाते. मात्र लालूप्रसाद हे उच्च शिक्षित आणि प्रतिभावान राजकारणी आहेत. विरोधकांशी दोनहात करताना त्यांच्या बुद्धिचातुर्याची चुणूक दिसून येते. 'हमारा चारा घोटाला कानोंसे सुना, पर भाजपा के बंगारू का आखोंसे देखा' असे नेमके वक्तव्य करून विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. मनोरंजनाबरोबरच महत्त्वाच्या मुद्दय़ांवर ते वाद-विवाद करू शकतात. आठवलेंच्या कोणत्याच विधानाला कोणी गांभीर्याने घेत नाहीत. याचे कारण त्यांच्या भूमिकांमध्ये सातत्य राहिलेले नाही. त्यांचे सल्लागार अविनाश महातेकर आणि अर्जुन डांगळे यांचा सल्ला त्यांनी कधी ऐकला नसावा, अथवा त्यांनाच आठवलेंच्या आदेशाने चालावे लागत असावे. त्यामुळे त्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग साहित्य निर्मितीसाठी केलेला बरा.

आता प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली असून त्यात तेवीस पक्ष संघटनांना सहभागी केले असल्याचे जाहीर केले आहे. आंबेडकरांच्या आघाडीची प्रत्येक पक्षात चर्चा होऊ लागली आहे. त्या आघाडीच्या फायद्या तोट्याची गणिते मांडली जात आहेत. आज जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये शोषित, वंचितांचे प्रश्न जटील होत असताना भांडवलदारधार्जिण्या राजकीय पक्षांच्या विरोधात सर्व उपेक्षित समाज घटकांची एकजूट करून समविचारी पक्ष संघटनांनी समान धोरण निश्‍चित करण्याची गरज आहे.

आंबेडकरांनी पुढाकार घेऊन गोरगरीब, दलित, आदिवासी, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, कामगार या सर्वांच्या हित रक्षणासाठी ही आघाडी आहे. तिचा पाया भक्कम करून या सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी आपण सज्ज असल्याचा विश्‍वास त्यांना द्यावा लागले. तरच राजकीय तडजोडीच्या आरोपातून त्यांची सुटका होऊ शकेल आणि महाआघाडीचा एक सर्मथ राजकीय पर्याय ते देऊ शकतील. जागतिकीकरणाने गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत अशी दरी निर्माण झालेली असताना वैचारिक दिवाळखोरीतून युत्या, महायुत्या करण्यापेक्षा समविचारी पक्षांच्या महाआघाडीची अधिक गरज आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP