Monday, June 24, 2013

शुकशुकाटात शुऽकशुऽक..

धर्मनिरपेक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सोडून आठवलेंनी हिंदुत्ववाद्यांना शिवशक्ती-भीमशक्तीच्या नावाखाली जवळ केले, मात्र कधी शिवसेनेचे हिंदुत्व मान्य असल्याचे सांगत आहेत, तर दुसर्‍याच दिवशी मान्य नसल्याचा खुलासा करत आहेत. स्वत:बरोबर कार्यकर्त्यांनाही संभ्रमात टाकण्याचे काम आठवले करत असल्यामुळे आता त्यांना बडबड बंद करा, असे सांगण्याची वेळ आली आहे.

नैसर्गिक आपत्ती आली, चारधाम यात्रांवर ढगफुटी झाली, नदी नाल्यांना महापूर आले, लोक अडकले, सगळीकडे हाहाकार उडाला, लोक हवालदिल झाले, सत्ताधारी घाबरले, शासकीय यंत्रणा अपुरी पडली, सर्वांच्या नजरा उत्तराखंडवर खिळून राहिल्या; परंतु या परिस्थितीत देखील आपली राजकीय पोळी भाजून घेणार्‍यांची कमी नाही. अचानक झालेल्या ढगफुटीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशा आवेशात सरकारला धारेवर धरण्यात आले. यंत्रणा अपुरी पडल्यामुळे हे समजू शकते. पण अशा वेळी राहुल गांधी कुठे आहेत? असा पोरकट प्रश्नही विचारण्यात आला. केंद्राची सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आटापिटा सुरू झाला आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. या पक्षाची सत्तेसाठी ज्या पक्षांवर भिस्त होती. त्या महत्त्वाच्या पक्षांनी रालोआतून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) काढता पाय घेतल्यामुळे पंचाईत होऊन बसली आहे. यामुळे महाराष्ट्रात धडगत नाही असे वाटू लागल्यामुळेच भाजपाने राज ठाकरेंचा धावा सुरू केला आहे.

अटलबिहारी वाजपेयी १९९८ आणि ९९ मध्ये भाजपाप्रणीत रालोआचे पंतप्रधान झाले तेव्हा जनता दल (संयुक्त), बिजू जनता दल, तेलगू देसम, द्रमुक, अण्णाद्रमुक, तृणमुल कॉँग्रेस यांसारख्या पक्षांचे त्यांना पाठबळ लाभले होते; परंतु २00२ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या गुजरातमध्ये जातीय दंगल झाली तेव्हा डॉ. फारूख अब्दुल्लांचा जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि रामविलास पासवानांचा लोक जनशक्ती हे रालोआतून बाहेर पडले. फारूख अब्दुल्लांच्या पक्षाने जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या पराभवाचे खापर मोदींवर फोडले होते. त्यानंतर २00४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर रालोआला गळतीच लागली. २00९ मध्ये तर प्रमुख घटकपक्ष बाहेर पडले. २0१२ मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पासून चालू वर्षात नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलापर्यंत एकापाठोपाठ घटक पक्षांनी भाजपाला सोडून दिले. सत्तेचे गणित जमवण्यासाठी अनेक पक्षांची मोट बांधण्यात आली, मात्र आता ती संख्या निम्म्यावर आली आहे आणि खासदार निवडून आणू शकतील, असा एकही पक्ष भाजपाबरोबर राहिला नाही. जनाधार असलेल्या कोणाचाही आधार नसल्याने रालोआत कमालीचा शुकशुकाट झाला आहे. त्यामुळेच जनाधार असलेल्या मनसेला एकसारखे 'शुऽकशुऽक' करून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. शिवसेना-भाजपा-रिपाइं युतीमध्ये मनसेला घेतले तर किमान महाराष्ट्रात तरी सत्ता आणता येईल, असे भाजपाला वाटत आहे.

भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकसारखे शुकऽशुक करणे आणि डोळे मारणे सुरू केल्यामुळे राज ठाकरे कमालीचे वैतागले आणि त्यांनी भाजपाला 'शुकऽशुक बंद करा' असा सज्जड दमच भरला. भाजपाची खिल्ली उडवताना 'डोळे मारून मारून कमळाबाईची ललिता पवार झाली' असे आपल्या खास ठाकरे शैलीत सांगायलाही त्यांनी कमी केले नसेल. एकतर्फी प्रेमातून केलेल्या विनयभंगाला किती मोठी शिक्षा असते हे भाजपाला समजत नाही एवढे ते राजच्या प्रेमात आंधळे झाले आहेत. महायुतीची चर्चाच करायची असेल तर गांभीर्यपूर्वक प्रस्ताव देऊन त्यानंतर भेटीगाठी केल्या पाहिजेत; परंतु कधी नितीन गडकरी तर कधी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे मनसेने महायुतीत यावे, असे जाहीरपणे सांगू लागले आहेत.

फडणवीसांनी प्रदेशाध्यक्ष झाल्याबरोबर राज यांचे 'कृष्णकुंज' गाठले. प्रत्यक्षात राजकीय बोलणी झाली नसल्याचे सांगतानाच मनसे महायुतीत असेल तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सहज जिंकू, असे वक्तव्य करण्यास ते विसरले नाहीत.

कुजबुज मोहीम राबवण्यात आणि अफवांचे पीक आणण्यात भाजपाचा हात कोणी धरू शकणार नाहीत. त्यांच्या वक्तव्याची राज ठाकरेंनी दखल घेण्याआधीच काँग्रेस-राष्ट्रवादी सावध झाली आणि त्यांनी धडाधड प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेसवाले म्हणाले, मनसेची महाराष्ट्रात ताकदच नाही तर राष्ट्रवादीवाले म्हणाले, मनसेच महायुतीत खोडा घालणार आहे.

भाजपा नेत्यांनी राज ठाकरे खरोखर महायुतीमध्ये येतील का? याचा सारासार विचार केलेला दिसत नाही. कदाचित नरेंद्र मोदींच्या मध्यस्थीमुळे राज ठाकरे बरोबर येऊ शकतील, अशी आशा त्यांना वाटत असावी. नरेंद्र मोदींच्या कारभाराची राज यांनी प्रशंसा केल्यामुळे मोदी-राज संबंधांचा उपयोग करण्याचे भाजपाने ठरवले असावे. प्रत्यक्षात मोदी कार्डाचा कितपत उपयोग होईल, याबाबत शंका आहे. मोदी कार्ड महाराष्ट्रात चालत नाही हे राज यांना माहीत नाही, असे कोण म्हणेल? भाजपाने महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात देखील मोदींना आजपर्यंत फिरवलेले नाही, ही गोष्ट निराळी.

राज ठाकरेंनी शुकशुकाटामध्ये सुरू असलेली शुकऽशुक बंद करण्याचा दम भाजपाला भरला असला तरी या शुकशुकाटात आणखी एका पक्षाची बडबड सुरू झाली. हा पक्ष अर्थातच रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष असल्याचे सर्वांना माहीत आहेच. आपल्या मित्रपक्ष शिवसेनेला विचारण्याआधीच मनसेने महायुतीत यावे, असे विधान आठवलेंनी केले. शिवसेनेने पाणउतारा केल्यानंतर मनसेने महायुतीत येऊ नये, असे विधान करून त्यांनी आपले हसे करून घेतले. आठवलेंचा प्रचंड गोंधळ उडाला आहे, असे दिसते. आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करून त्यांनी स्वत:बरोबर आपल्या पक्षालाच अडचणीत आणले आहे. मुळात खरे आंबेडकरवादी असलेले नेते हिंदुत्ववाद्यांशी घरोबा करणार नाहीत. केला तरी किमान समान कार्यक्रमांवर तडजोड होऊ शकेल. सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी अशी तडजोड मायावतींनी उत्तर प्रदेशात केली आहे; परंतु धर्मनिरपेक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सोडून आठवलेंनी हिंदुत्ववाद्यांना शिवशक्ती-भीमशक्तीच्या नावाखाली जवळ केले, मात्र कधी शिवसेनेचे हिंदुत्व मान्य असल्याचे सांगत आहेत, तर दुसर्‍याच दिवशी मान्य नसल्याचा खुलासा करत आहेत. स्वत:बरोबर कार्यकर्त्यांनाही संभ्रमात टाकण्याचे काम आठवले करत असल्यामुळे आता त्यांना बडबड बंद करा, असे सांगण्याची वेळ आली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP