Monday, November 4, 2013

दिवाळीची निराळीच आतषबाजी!


देशभर दिवाळीची धूम सुरू आहे. दिव्यांच्या रोषणाईबरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीने अवघा आसमंत प्रकाशमान झाला आहे. शुक्रवारी सेन्सेक्सने विक्रमी उसळी मारून रेकॉर्डब्रेक केला असताना रविवारच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी फटाक्यांनी उच्चांक गाठला. इकडे राजकारणात खास 'लक्ष्मीपूजन' आणि एका पाठोपाठ होणारे शाब्दिक स्फोट यामुळे वातावरण गरमागरम झाले आहे.

सर्वसामान्य जनतेला दिवाळीतले लक्ष्मीपूजन करण्याकरिता ओढाताण करावी लागत असताना, राजकारण्यांवर मात्र धनाची देवता लक्ष्मी कायम प्रसन्न असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक प्रचाराला प्रत्त्युत्तर देण्यास काँग्रेस नेते सज्ज झाले आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रचंड मोठय़ा सभा, या सभांसाठी लागणारा बेफाट खर्च आणि मोदींनी काँग्रेसवर चढवलेला हल्ला, याचा काँग्रेस नेत्यांनी समाचार घेण्याचे ठरवले आहे. लक्ष्मीपूजन नव्हे तर लक्ष्मीदर्शन हा शब्द राजकारणांमध्ये लोकप्रिय झालेला असून लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय राजकारण करताच येत नाही, हा समज दृढ झाला आहे. एकीकडे लक्ष्मीदर्शन आणि दुसरीकडे देशात आणि राज्यात होणारे शाब्दिक स्फोट यामुळे दिवाळीला वेगळीच रंगत आली आहे.

आता हेच पाहा ना, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, देशाच्या आर्थिक स्थितीबाबत मोदींच्या अनेक गैरसमजुती असून त्यांनी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलू नये. गैरसमजुती दूर कराव्या, आर्थिक स्थितीचे ज्ञान करून घ्यावे, अभ्यास करावा मगच बोलावे. दिग्विजय सिंग यांनी तर मोदींवर लक्ष्मी प्रसन्न झाली असून सभांवर पैशाचा वर्षाव होत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. मोदींच्या पंचतारांकित सभांसाठी पैसे कोठून आणले जात आहेत? सभास्थळी एलसीडी स्क्रीन, व्हिडिओ मॉनिटरिंग, त्याचबरोबर हजारोंच्या संख्येत लोक आणण्यासाठी गाड्यांचा आणि पैशांचा वारेमाप वापर, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मोदींनी मात्र या आरोपाकडे दुर्लक्ष केले असून आरोपांचे खंडन केलेले नाही. खरे पाहता जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसा काँग्रेसलादेखील असाच पैसा खर्च करावा लागेल, हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही. निवडणुका जिल्हा परिषदेच्या असो, महापालिकेच्या असो अथवा विधानसभा व लोकसभेच्या असोत पैशाशिवाय निवडणूक लढवणे कठीण झाले आहे. काँग्रेस पक्षाकडे एक हजार कोटी रुपये असून भाजपाकडे साडेसातशे ते आठशे कोटी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांकडे असलेल्या पैशांपैकी ७0 ते ८0 टक्के पैसा कोठून आला, एवढा मोठा पैसा दिला कोणी, याची मात्र या पक्षांकडे माहिती नाही. ज्यांनी निवडणुकीत लक्ष्मीदर्शन घडवले त्यांच्याच जागा जास्त येऊ शकतात, याबाबत शंका उरलेली नाही. किंबहुना निवडणुकीतील तिकीट देण्यासाठी पैसा हा एकमेव निकष असल्याचे मानले जात आहे. ज्याच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे आहेत, त्याच उमेदवाराला तिकीट दिले जात आहे. लक्ष्मीदर्शन घडवणार्‍या उमेदवाराला आपली जागा जिंकून आणणे सोपे असल्यामुळे त्याच्या पक्षाच्या जागा वाढत आहेत. कम्युनिस्ट पक्षाची त्यांच्याजवळ लक्ष्मी नसल्याने अवस्था दयनीय असून त्यांच्या जागा वाढणे कठीण झाले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनीदेखील लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च झाल्याचे जाहीरपणे सांगितले होते. यापुढील काळात मुंडेंना सोळा कोटी म्हणजेच दुप्पट जास्त खर्च करावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली आहे. असे म्हणतात की, राजकीय नेते लक्ष्मीदर्शनाशिवाय कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन होऊ देत नाही. लक्ष्मीदर्शन घडवले की, केवळ नेत्याचे दर्शनच नव्हे तर तिकीटदेखील मिळू शकते.

निवडणुकीचे तिकीट मिळण्याआधी कार्यकर्त्यांना आपल्या नावाची प्रसिद्धी करणे भाग असते. त्यासाठी सणासुदींचा आणि उत्सवांचा पुरेपूर उपयोग करून घेतला जात आहे. वसुबारस असो, दिवाळी पहाट असो की, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी असो या सर्व सणांचा आणि उत्सवांचा राजकारण्यांनी जणू ताबाच घेतला आहे. वेगवेगळे प्रायोजक शोधून उत्सव साजरे करण्यासाठी स्पर्धा वाढू लागली आहे.

दिवाळी सुरू होण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात शाब्दिक स्फोटाने चांगलेच रंग भरले. राज्याचे गृहमंत्री आर. आर. आबा पाटील हे त्यांच्या प्रामाणिकपणा आणि साधेपणाबद्दल सर्व परिचित आहेत. राज्यातील सर्वसामान्य माणसांनाही ते आपलेच प्रतिनिधी आहेत, असे वाटते. जाहीर सभांमधूनच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील सर्वसामान्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आबांनी सतत सुरू ठेवले आहे. गेल्या सप्ताहातील मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात वीज कापली जात असल्याचा ज्वलंत मुद्दा उपस्थित केला. आदिवासींना आपण वीज देऊ शकत नाही, अंधारात राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी हातात शस्त्र घेतले आणि नक्षलवादी झाले तर काय बिघडले, त्यांना दोष देणार कसा, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. त्यांच्या या प्रश्नाची त्यांच्याच पक्षाच्या उपमुख्यमंत्री अजितदादांसह काही मंत्र्यांनी खिल्ली उडवली. आदिवासींच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या विजेबाबत मंत्र्यांची बेपर्वाई पाहून आबा चांगलेच वैतागले आणि त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. हा विषय चेष्टेचा नाही. तुम्ही माझी चेष्टा करत आहात, उद्या मतदार तुमची चेष्टा केल्याशिवाय राहणार नाही, असे खडे बोल आबांनी दस्तुरखुद्द अजितदादांनाच सुनावले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे ऊर्जामंत्री असून त्यांनीच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने त्यांच्यावर वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी चांगलेच टीकास्र सोडले. अजितदादा हे त्यांच्या परखडपणाबद्दल प्रसिद्ध असून अनेकदा त्यांचा तोल गेलेला असल्याने ते अडचणीत आले आहेत; परंतु गेल्या सप्ताहात जालन्यातील एका सभेत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांवर होणार्‍या बलात्कार-अत्याचारासंदर्भात बलात्कार्‍यांवर खरमरीत शब्दात आसूड ओढले, काही आक्षेपार्ह शब्द वापरले. या शब्दांबाबत मात्र जनतेने त्यांना नक्कीच माफ केले असेल. कारण दादा अतिशय पोटतिडकीने बोलले असून त्याबाबत त्यांची भावना योग्यच होती, अशी प्रतिक्रिया उमटली.

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. वास्तविक पाहता जागावाटपाबाबत जाहीरपणे वक्तव्य करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसवर दबाव तंत्राचा वापर सुरू केला. शरद पवारांनी निवडणुकीत काँग्रेससोबतच राहणार, असे सांगून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांना मात्र तिसर्‍या आघाडीच्या व्यासपीठावर पाठवून दिले, तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला सर्व पर्याय खुले असल्याचे विधान करून तिसरी आघाडी अथवा भाजपा कोणत्याही आघाडीत आपण सहभागी होऊ शकतो, असे सूचित केले. शरद पवारांचे राजकारण फक्त त्यांना स्वत:लाच कळते. त्यांच्या मनात काय चालले आहे, हे दुसर्‍या कुणलाच कळू शकत नाही. अशा प्रकारे गुगली टाकून झाल्यानंतर अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, असे तुणतुणे नेत्यांनी सुरू ठेवले आहे. दिवाळीच्या धामधुमीत राजकारणात होणार्‍या या हसवाफसवीच्या आतषबाजीने लोकांची करमणूक मात्र होत आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP