Monday, November 11, 2013

सत्ताधारी आघाडीत मुख्यमंत्र्यांची सरशी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली. 'आदर्श'घोटाळ्याने राज्याची प्रतिष्ठा धोक्यात आल्यामुळे स्वच्छ प्रतिमा, शिस्त व अभ्यासू वृत्ती असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना येथे पाठवण्यात आले. दिल्लीच्या वातावरणात रुळलेल्या मुख्यमंत्र्यांचा सुरुवातीचा बराच वेळ काम समजून घेण्यात गेला, अभ्यासाने आकलन होत गेले आणि मुख्यमंत्र्यांनी कामाला सुरुवात केली. 


राजकीय आणि प्रशासकीय या दोन्ही पातळ्यांवर आपल्या कामाचा ठसा उमटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्नशस्वी झाला असून बड्याबड्या नेत्यांना आणि मंत्र्यांना त्यांनी बॅकफूटवर पाठवले आहे. स्वच्छ प्रतिमा आणि पारदश्री कारभार यांचे नैतिक बळ असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पैसा आणि मनगटशाहीच्या जोरावर आपले राजकीय बळ वाढवणार्‍यांना असे धक्के दिले की, मनोबल खचून त्यांचा आवाजच बंद झाला आहे. सर्वात मोठी गोची राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. या मित्रपक्षाला काबूत ठेवण्याबरोबरच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले असल्याने मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचे त्यांनी टाळले आहे. पायाभूत सुविधांच्या योजनांना गती देतानाच राजकारणी, अधिकारी आणि बिल्डर-कंत्राटदारांची अभद्र युती आणि त्यातून आलेली मनमानी मोडून काढण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आली. जत, माणसह पंधरा दुष्काळी तालुक्यांमध्ये सिमेंट बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवले आणि दुष्काळी भाग सुजलाम्-सुफलाम करण्याचा मार्ग सुकर झाला. ही उपाययोजना यशस्वी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत सिंचन आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी नियोजनाचा अभाव असल्याने अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. सिंचनाचे लहान-मोठे, मध्यम अनेक प्रकल्प रखडले, त्यांच्या किमती दुप्पट-तिप्पट वाढल्या, करोडो रुपये त्यात अडकून पडले. सुमारे सत्तर हजार कोटी उभे केल्याशिवाय ही कामे पूर्ण होणे कठीण झाले आहे. मात्र पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवण्याचा निर्धार करून मुख्यमंत्र्यांनी सिमेंटचे लहान बंधारे बांधण्यास सुरुवात केली. दुष्काळी भागात दुथडी भरून वाहणारे नाले पाहून लोकांची मने हरखून गेली. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोणत्याही तालुक्यातून उभे राहिले तरी प्रचंड बहुमताने हमखास निवडून येऊ शकतील, असे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस १९९९ साली स्थापन झाल्यापासून काँग्रेससोबत सत्ता उपभोगीत आहे. सोनिया गांधींचा विदेशीचा मुद्दा आणि घराणेशाही हे दोन्ही मुद्दे सत्तेत सहभागी झाल्याने आपोआप निकाली निघाले असून राष्ट्रवादीने आपला सवतासुभा कायम ठेवला आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांनी सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादीशी जमवून घेतले होते; परंतु पृथ्वीराज बाबांनी राष्ट्रवादीला थेट आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करून स्वत:बरोबर काँग्रेसची प्रतिमादेखील वाढवली. राष्ट्रवादीच्या दिग्गजांबद्दल जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्यामुळे मैदानात स्वतंत्रपणे लढून त्यांच्याशी दोन हात करण्याचीही गरज पडली नाही. गाजावाजा न करताच त्यांना उघडे पाडण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी पार पाडला आहे. 'मिस्टर क्लीन' मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढवल्या जाणार असून राष्ट्रवादीला विरोधी पक्षांचा नव्हे, आधी काँग्रेसचा मुकबला करावा लागणार असल्याने दोन-दोन अध्यक्ष नेमावे लागले आहेत. हे दोन अध्यक्ष भास्करराव जाधव आणि जितेंद्र आव्हाड म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादांचे सख्खे भाऊ शोभतील असेच आहेत. पृथ्वीराजबाबा दिल्लीत राहिले असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे राजकारण काय समजणार, असे राष्ट्रवादीत खुलेआम बोलले जात होते. एवढेच नव्हेतर दस्तुरखुद्द शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांना कराडला जाणारा रस्ता सोडून दुसरे काही माहीत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून आपल्याला राजकारण चांगलेच समजत असल्याचे तसेच राजकीय फासे टाकण्यात आपणही तरबेज असल्याचे दाखवून दिले आहे.

स्वच्छ प्रतिमा आणि पारदश्री कारभार या जनसामान्यांना भावणार्‍या गुणांनी आपला प्रभाव वाढवत मुख्यमंत्री चव्हाण यांनी बाजी मारली आहे. भरधाव वेगाने चाललेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ब्रेक लावण्याचे आणि चेक बंधारे बांधून राष्ट्रवादीवर चेक ठेवण्याचे काम करून बाबांनी काँग्रेसचे वजन वाढवले आहे. फायलींचे ढिगारे, निर्णयांची दिरंगाई, लोकांना भेटण्याची उदासीनता या टीकेला कसलेही उत्तर न देता धीम्या गतीने कारभार चालवणार्‍या मुख्यमंत्र्यांची अखेर सरशी झाली आहे. प्रशासकीय आणि राजकीय भूमिका योग्यरीतीने पेलून त्यांनी भल्याभल्यांना चक्रावून सोडले आहे. मुख्यमंत्री भेटत नाहीत, आमदार, खासदार, लोकप्रनिधींची कामे करत नाहीत. मतदारसंघ टिकवायचा कसा, अशा तक्रारी करत मुख्यमंत्र्यांविरुद्ध गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोळ्या ठोकणार्‍यांचे आवाज कमालीचे क्षीण झाले आहेत. मुख्यमंत्री हे वैयक्तिक कामांना महत्त्व देत नाहीत. लोकप्रतिनिधींनी आणलेली कंत्राटदारांचे कामे करत नाहीत. आमक्यालाच कंत्राट द्या, असे म्हणणार्‍यांच्या मागणीला प्रतिसाद देत नाहीत. लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या बढत्या-बदल्यांच्या कामाला महत्त्व देत नाहीत. थोडक्यात कोणाचे व्यक्तिगत इंटरेस्ट असलेले काम मुख्यमंत्री करत नाहीत. केवळ सार्वजनिक हिताच्या कामाला प्राधान्य देत आहेत, असा संदेश महाराष्ट्रला देण्यात ते यशस्वी झाले आहेत. मुख्यमंत्री कामेच करत नाहीत, ते केवळ अभ्यास करत आहेत. त्यांचा अभ्यास पूर्ण होणार केव्हा हेही माहीत नाही, अशी खिल्ली उडवली जात होती; पण कासवाच्या धीम्या गतीने वाटचाल करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षांर्तगत आणि अन्य पक्षातील विरोधकांवर मात केली आहे.

मुख्यमंत्रीपदी तीन वर्षे कारभार करत असताना पृथ्वीराज बाबांनी सर्वसामान्य जनतेला काय दिले, जनहिताच्या कोणत्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला हे प्रकर्षाने जाणवत नसले तरी त्यांनी ज्या योजना तयार केल्या, जे निर्णय घेतले आणि प्रशासनाची घडी नीट बसवण्याकरता जी मेहनत घेतली, नियमबाह्य कामे करण्यावर निर्बंध आणले. त्यामुळे तात्काळ लाभ दिसत नसले तरी दीर्घकालीन कायमस्वरूपी लाभ मिळू शकेल, या दृष्टीने त्यांनी नियोजन केले आहे. सिंचन, पिण्याचे पाणी, वीज आणि सर्वसामान्यांच्या घरांचा प्रश्न यांना प्राधान्य देऊन प्रशासनाला शिस्त लावण्याकरता केलेले नियम याचा निश्‍चितपणे फायदा होऊ शकेल, असे काम त्यांनी करून ठेवले आहे. राज्यातील मुंबई-पुण्यासह मुख्य शहरांमध्ये असलेले मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या खिशात घालायचे, पर्यावरणाची पर्वा न करता टेकड्याही विकासकांना देऊन टाकायच्या, त्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांकाचे नियम धाब्यावर बसवायचे, या प्रकारांना मुख्यमंत्र्यांनी आळा घातला असल्याने मित्रपक्षाचा रोष ओढवून घेतला आहे; पण जे-जे आक्षेपार्ह आहे, ज्याच्याबद्दल जनतेच्या मनात राग आहे, अशा बाबींना त्यांनी बिनदिक्कतपणे चाप लावला आहे. केंद्र आणि राज्यातील बड्याबड्या नेत्यांनी बिल्डरांसाठी केलेल्या शिफारशींना त्यांनी अनेकदा वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. राजकारणी आणि बिल्डरांची मनमानी थांबवली असल्याने अधिकार्‍यांनाही परस्पर चपराक बसली आहे. दुष्काळात टँकर लॉबी सक्रिय होऊन कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असे, मात्र या वेळी विहिरींऐवजी सिंथेटिक टाक्यांमध्ये पाणी साठवल्यामुळे गैरव्यवहार करणे कठीण बनले. पाण्याचे योग्य नियोजन करून एकप्रकारे विरोधकांनाच पाणी पाजण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी ठेवली आहे. कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींचे पाठबळ मुख्यमंत्र्यांना लाभले असून त्यांनी आपल्या कामाने स्वत:चे स्थान भक्कम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी होईल, यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आगामी निवडणुका मुख्यमंत्री चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली होत असून या वेळीदेखील काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळतील, असे चित्र दिसत आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP