Monday, November 18, 2013

नाही मनोहर तरी..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा राहणे साहजिक आहे. बाळासाहेबांचा करिश्मा आणि त्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव यामुळे संघटना मजबूत झाली होती. मित्रपक्ष भाजपाच्या सहकार्याने का होईना, पण महाराष्ट्रात प्रथमच विरोधी पक्षाचे सरकार आणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. बाळासाहेबांसारखा वैयक्तिक प्रभाव शिवसेनेच्या अन्य कोणत्याही नेत्यांमध्ये नसल्यामुळे एकचालकानुवर्ती असलेली शिवसेना भविष्यकाळात टिकून राहू शकेल का? असा प्रश्न पडतो. बाळासाहेबांची आक्रमकता, परखडपणा आणि ठाकरी भाषा हे गुण राज यांच्यामध्ये असल्यामुळे शिवसैनिक आणि मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग मनसेकडे आकर्षित झाला. त्यामुळे शिवसेनेची घसरण होत राहिली, ती रोखण्याची ताकद उद्धव यांच्या शांत मवाळ व्यक्तिमत्त्वात नाही. ठोकशाहीवर उभ्या असलेल्या शिवसेनेचा कायापालट होऊन ती सत्तेनंतर लोकशाही पद्धतीनुसार टिकविण्याचा प्रय▪फारसा यशस्वी झाला आहे, असे दिसत नाही.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २४ ऑक्टोबर २0१२ रोजी दसरा मेळाव्यात चित्रफितीद्वारे शिवसैनिकांना संदेश दिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना नेहमीप्रमाणे शिवसैनिकांशी संवाद साधणे शक्य नव्हते. बाळासाहेब खूपच थकले होते, बोलतानाही त्यांना धाप लागत होती. बाळासाहेबांचे थकलेले शब्द ऐकून शिवसैनिक दु:खी झाले. बाळासाहेबांचा अंतकाळ जवळ आल्याची सर्वांना जाणीव झाली होती. बाळासाहेबांचे हे अखेरचे भाषण होते. त्यानंतर त्यांचे दर्शन घडले नाही. प्रकृती बिघडत गेली आणि १७ नोव्हेंबर २0१२ रोजी त्यांचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ आली. एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया उमटली. त्याचबरोबर बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे काय होणार, त्यांची शिवसेना टिकेल का, बाळासाहेबांनी दिलेली शक्ती शिवसैनिकांना पुन्हा मिळू शकेल का, की शिवसेनेची आणखी पडझड होईल, एकूणच शिवसेनेचे भवितव्य काय? असे नाना प्रश्न शिवसैनिकांच्या आणि तमाम मराठी माणसांच्या मनात उभे राहिले. खरे तर शिवसेनेचे भवितव्य काय असेल, याची जाणीव बाळासाहेबांना त्यांच्या हयातीतच झाली होती. म्हणूनच त्यांनी संघटना फु टल्याबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून वेगळी चूल मांडली, याचे त्यांना अतिव दु:ख झाले होते. उद्धव-राज यांनी एकत्र यावे, असे त्यांना मनोमन वाटत होते. पण वारसा हक्काने शिवसेनेवर आपलाच हक्क असल्याच्या अविर्भावात वावरणार्‍या उद्धव ठाकरे यांनी प्रभावी नेत्यांचे खच्चीकरण कसे होईल यावर विशेष लक्ष दिले आणि एक-एक मोहरे गळून पडले. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून काढता पाय घेतला. त्या वेळीच शिवसेनेला किती मोठे खिंडार पडले आहे हे दिसून आले. घरातील ज्येष्ठ, वृद्ध माणसांकडे जसे दुर्लक्ष केले जाते तोच प्रकार बाळासाहेबांबाबतही घडत होता, अशी कुजबूज नेते आणि शिवसैनिकांमध्ये होती, त्या वेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव यांचा ताबा 'मातोश्री'वर ऊठबस असलेल्या चौकडीने घेतला असल्याची चर्चाही खुलेआम केली जात होती. शेवटच्या काळात बाळासाहेबांना काही कारणास्तव आयत्या वेळी पुढे आणले जायचे, पण निर्णय आधीच घेतले जात असायचे.

बाळासाहेब निर्णय घेऊ शकत नव्हते. शिवसेना नेते सुभाष देसाई अनेकदा अंतर्गत चर्चेत बाळासाहेबांचे विचार मांडण्याचा प्रय▪करीत, संजय राऊत हे अप्रत्यक्षपणे, पण सावधानता बाळगून बाळासाहेबांची मते मांडायचे, मात्र उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि अर्थातच उद्धव यांचे 'होम मिनिस्टर' यांची मान्यता मिळू शकत नव्हती. त्यामुळे देसाई आणि राऊत त्यांच्या हो त हो मिसळू लागले. याला कारणेही तशीच घडली. आमदार रवींद्र वायकर यांना पुढे करून सुभाष देसाई यांचा पत्ता कट करण्याचा प्रय▪झाला. रामदास कदम आणि देसाई यांच्यातूनही विस्तव जात नव्हता; परंतु आता देसाई यांचा जोर वाढलेला दिसतो आहे. रामदास कदम आणि दिवाकर रावते यांचेही मतभेद जगजाहीर आहेत. शिवसेनेत सारे काही आलबेल आहे, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यापासून पहिल्या फळीतील शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे स्थान प्रत्येक जाहीर सभेत बाळासाहेबांच्या शेजारी असायचे. त्यांनी बाळासाहेबांना कायम साथ दिली होती, पण चौकडीने त्यांनाही बाजूला सारले.

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने विधायक कामाच्या जोरावर आपल्या पडझड झालेल्या तटबंदीची डागडुजी केली आणि तटबंदी मजबूत करण्याचा प्रय▪केला, असे झालेले नाही. राज यांच्या मनसेने तटबंदी पुरती उद्ध्वस्त करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. मनसेने शिवसेनेच्या मतांमध्ये उभी फूट पाडून शिवसेनेचे खच्चीकरण सुरू केले आहे. मात्र उद्धव-राज यांचे मतभेद असले तरी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसेल तेथे शिवसेनेची मते त्यांचा मित्र पक्ष भाजपाला मिळण्याऐवजी मनसेला मिळतात आणि शिवसेना व मनसे यांचे उमेदवार असतील तेथे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होऊन तिसर्‍याचा म्हणजे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा लाभ होतो. फेब्रुवारी २0१२ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन:श्‍च सत्ता मिळविली असली तरीही त्यांच्या जागा केवळ ७५ आल्या. आधीच्या संख्याबळापेक्षा २७ ने कमी झाल्या. त्याचबरोबर मनसेच्या जागा ७ वरून २८ झाल्या. यावरून २0१४ च्या निवडणुकीत काय परिस्थिती होऊ शकेल याचा अंदाज येऊ शकतो. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तत्पर असल्याचा अनुभवही महाराष्ट्राने घेतला आहे.

शिवसेनेने मतांचे होणारे विभाजन टाळून मते टिकविण्यासाठी शिवसैनिकांना ठोस कार्यक्रम दिला आहे, असे दिसत नाही. मुंबईत त्यांनी मनपाची सत्ता कशीबशी राखली, पण रस्त्यांवरचे खड्डे त्यांना बुजवता आले नाहीत. खड्डे पाडणार्‍या एकाही ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकता आले नाही. विधानसभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्यातील सिंचनाचा प्रश्न लावून धरला, पण शिवसेनेने हा महत्त्वाचा मुद्दा उचलला नाही. भाजपाचे फडणवीस-तावडे यांनी बैलगाडीभर पुरावे आणले, पण शिवसेना हातगाडीभर पुरावेही देऊ शकली नाही. सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी हाती घेतले, पण शिवसेनेला आवाज उठविता आला नाही. महालक्ष्मी रेसकार्सवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा डाव असल्याचे प्रकरणही शिवसेनेने सोडून दिले. कधी नरेंद्र मोदींवर टीका करायची, तर कधी त्यांना उचलून धरायचे, किती तरी महत्त्वाचे प्रश्न सोडून द्यायचे आणि भलतेच प्रश्न उचलायचे. मतांच्या विभाजनावर आणखी हातोडा मारण्याचे काम होऊ लागले आहे. त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य काय हे आगामी निवडणुकीत अधोरेखित होईलच. शिवसेना फॉर्मात असताना ती आहे मनोहर तरी.. पण विधायक कार्य करावे, विध्वंसक असू नये, असे सर्वांना वाटत होते.

त्यातही मनोहर जोशी हे उद्योगात रस असलेले नेते असल्यामुळे त्यांचाही लाभ सेनेला घेता आला असता, पण जोशींनाच लाभ झाला. आता जोशी दुरावले आणि शिवसेनेची अवस्थादेखील नाही मनोहर तरी..! अशी झाली असली तरी बाळासाहेब मात्र मराठी माणसाच्या कायम स्मरणात राहतील

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP