Monday, November 25, 2013

लैंगिक शोषणाचा तहलका

समाजातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गैरवर्तणूक, अत्याचार, शोषण यांचा सबळ पुराव्यानिशी पर्दाफाश करून गैरकृत्य वेशीवर टांगणार्‍या आणि देशभर खळबळ उडवून देणार्‍या 'तहलका'कारावरच अशा प्रकारचा आरोप झाल्याचे प्रकरण सध्या गरमागरम चर्चेचे विषय बनले आहे. तहलका मासिकाच्या तरुण तेजपाल नामक संपादकाने आपल्या कार्यालयातील २३ वर्षीय महिला पत्रकारावर बलात्कार केल्याचे प्रकरण पुढे आले आणि एकच 'तहलका' माजला. महिलांवरील अन्याय-अत्याचार-बलात्काराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कालच्या रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांची सुरक्षितता, अन्याय-अत्याचार आणि माध्यमांची संवेदनशीलता यावर महिला पत्रकार संघाने आयोजित परिषदेमध्ये बरेच विचारमंथन झाले.


सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिला काम करू लागल्या आहे. सर्व स्त्री-पुरुष समानतेला, महिलांनी सर्व क्षेत्रांत भरारी मारली, त्याचबरोबर प्रगतीची नवनवी क्षेत्रे पादाक्रांत करणार्‍या महिलांवर अन्याय-अत्याचार, बलात्कार, खून यांसारख्या दुर्घटनांचे बळी ठरण्याची वेळ आली आहे. रोज सकाळचे वर्तमानपत्र हाती घेतले किंवा टीव्ही सुरू केला की, एक तरी बलात्काराची, बलात्कार करून खून केल्याची बातमी वाचायला किंवा पाहायला मिळते. दोन वर्षांच्या कोवळय़ा बालिकेपासून ते ७५ वर्षांच्या वृद्धेपर्यंत बलात्काराच्या संतापजनक घटना घडत आहेत. समाजव्यवस्थेला बाधा आणणारी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारी प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज आहे आणि हे काम वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे प्रभावीपणे करू शकतील. पत्रकारितेच्या या बौद्धिक क्षेत्रात काम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात महिला येत नव्हत्या. हळूहळू परिस्थिती बदलू लागली आणि पत्रकारिता करण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात धडाडीने आणि हिरिरीने भाग घेऊ लागल्या. अशा वेळी मुंबईच्या शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये महिला प्रेस फोटोग्राफरवर झालेला सामूहिक बलात्कार आणि आता कार्यालयातील बॉसनेच महिला पत्रकारावर केलेला कथित बलात्कार या प्रकरणांनी पत्रकारितेत जाण्याबाबत तरुण मुलींचे मनोधैर्य खच्ची होऊ शकते. व्यवसायाचा एक भाग म्हणून कर्तव्यदक्षता आणि धाडस दाखवायचे; परंतु त्यासाठी आत्मघात होऊ नये, याचेही भान ठेवायचे अशी परिस्थिती उद्भवली आहे. तरुण तेजपालचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला शिक्षा होईलच आणि ती झालीच पाहिजे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला पाठीशी घालण्याचे काम होता कामा नये.

जागतिकीकरणाच्या रेट्यात वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांतील काम अधिक आव्हानात्मक झाले आहे. कार्यालयाच्या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याबाबत असंख्य तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्याला पत्रकारिता क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. झपाट्याने बदलत जाणारी अर्थव्यवस्था, सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये होणारी स्थित्यंतरे आणि शोषित-पीडितांवरच नव्हे तर तथाकथित उपेक्षित मागास जाती-जमातींमधील सजग, सुशिक्षितांवर आणि विशेषत: सर्व स्तरांतील महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार याचे सखोल प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटलेले दिसत नाही. स्त्रीवादी भूमिका तसेच स्त्री-पुरुषांना समान पातळीवर आणण्याचा विचार झाला; परंतु स्त्रीची पारंपरिक चौकट मोडण्याचे धारिष्ट्य मात्र प्रसारमाध्यमांनी दाखवले नाही. स्त्रीचे शोषण किती आणि कशाप्रकारे होत आहे हे प्रकर्षाने दाखवले जात नाही. उलट स्वप्नरंजनात बुडालेल्या स्त्रियांचेच उदात्तीकरण केले जात आहे. स्त्रीची प्रतिमा विशिष्ट कुंपणाबाहेर जाण्याचा विचार दिसत नाही, तिच्या ज्वलंत प्रश्नांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. नवश्रीमंत, मध्यमवर्गीय तसेच उच्च जातीय स्त्रियांची मनोवृत्ती सर्वसामान्य स्त्रियांच्या तुलनेने वेगळी आणि चंगळवादी आहे. त्यांच्यातच प्रसारमाध्यमे घुटमळताना दिसत आहेत. त्याच व्यक्तिरेखा लोकांच्या मनावर बिंबवण्यात माध्यमे मश्गुल झाली आहेत. चंगळवादातील मध्यमवर्गीय पांढरपेशी मनोवृत्तीऐवजी महिलांचा संघर्ष, त्यांचे धाडस, त्यांची बंडखोरी जी संतांच्या साहित्यात दिसली, त्यांनी रोवलेल्या बिजांची रोपे शाहू-फुले-आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दिसली. त्या सर्व उपेक्षितांना मूळ प्रवाहात आणण्याची आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मानसिकता माध्यमांनी दाखवलेली नाही. स्त्री-पुरुष संबंधांबाबत सुधारित दृष्टिकोन बाळगून स्त्री ही केवळ भोगवस्तू नाही हा विचार दाखवण्याचा प्रय▪केला जात असला तरी जागतिकीकरणामुळे आलेली चंगळवादी भूमिका स्त्रीला पुन्हा पुन्हा भोगवस्तू म्हणूनच पुढे आणते आणि त्यासाठी माध्यमांचा पुरेपुर उपयोग केला जातो. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम करण्याची ताकद असलेल्या माध्यमांनीच स्त्रीच्या स्वत्व आणि सत्त्वापेक्षा तिच्या देहाला अधिक महत्त्व दिले आहे. तिचे जे चित्रण केले जात आहे त्यापेक्षा तिचे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्त्व कितीतरी मोठय़ा उंचीचे आहे; पण त्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक उंची मात्र दाखवली जात नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीने लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिला वकिलाने केली. सीबीआय अधिकार्‍यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पोलीस ठाण्यातच महिला पोलीस निरीक्षकावर बलात्कार केला. शाळेतील तसेच आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचे लैंगिक शोषण शिक्षकांकडूनच होत असलेले प्रकार उघडकीस येत आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये बॉसेसकडून महिला अधिकारी व कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये तक्रारींची दखल घेण्यासाठी अंतर्गत समिती नेमणे बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु या समित्यांचा फारसा उपयोग होत नाही. कार्यालयाबाहेरील सामाजिक कार्यकर्ते अथवा अन्य अधिकारी बाहेरील व्यक्तींची यासाठी नेमणूक केली तरच न्याय मिळण्याचीआशा करू शकतो; अन्यथा खोटेनाटे आरोप होत राहतील, सत्येचा दुरुपयोग होऊन महिलांचे लैंगिक छळ वाढत जातील. या पार्श्‍वभूमीवर समाजाचे प्रबोधन करणारे, समाजाला नैतिकतेचे धडे देणारे तसेच समाजाला योग्य दिशा देणारे पत्रकार आणि साहित्यिक यांच्याकडे आदर्श अथवा आयडॉल म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आयडॉल असण्यासाठी त्यांनी जबाबदारीने वागणे हे त्यांचे कर्तव्य ठरते आणि जबाबदारी पेलण्यासाठी इच्छा-वासना असलेल्या मनोवृत्तीला त्यांनी आवर घातला पाहिजे; परंतु या क्षेत्रातही लैंगिक शोषणाचे प्रकार घडू लागले आहेत. सिनेअभिनेत्री होण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक यांच्या वासनेच्या बळी ठरलेल्या मुलींची उदाहरणे खाजगीत बोलताना दिली जातात. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखतीसाठी जाणार्‍या मुलींनाही अशा प्रकारे लैंगिक छळाला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याची चर्चा होऊ लागली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या मुलीला 'काहीही' करण्याची तयारी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्या मुलीने तेथून पळ काढला आणि पुन्हा या क्षेत्रात यायचे नाही, असा निर्धारच केला असल्याची चर्चा पत्रकारितेच्या वतरुळात होत आहे. पत्रकारितेमध्ये करियर करण्याची महत्त्वाकांक्षा असणार्‍या मुली 'लिफ्ट' द्यायला मागे-पुढे पाहत नाहीत, अशा 'शौर्यगाथा' गाणार्‍यांचीही या क्षेत्रात कमी नाही.

पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची क्षमता आणि गुणवत्ता असूनही अनेकदा महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याची जाणीव होत असते. वृत्तपत्रांसह शेकडो वृत्तवाहिन्या माध्यम जगतात दाखल झाल्या आहेत; परंतु एका विशिष्ट वतरुळात किंवा आखून घेतलेल्या कुंपणातून बाहेर पडण्याचा कोणी फारसा प्रय▪करताना दिसत नाही. महिलांवरील अन्याय-अत्याचार, बलात्कार, खुनाच्या बातम्या देऊन सनसनाटी निर्माण केली जाते. पण बरेचदा वास्तव मांडण्याचे भान ठेवले जात नाही. स्त्रीचे व्यक्तिमत्त्व, माणूसपण आणि तिची जीवननिष्ठा अधोरेखित करणारे चित्रण होत नाही. सामाजिक समस्या, सामाजिक बांधिलकी, समाजाला मार्गदर्शन आणि प्रबोधन करणे, जनमत तयार करणे तसेच स्त्रीच्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवून तिचे वास्तववादी, तत्त्वनिष्ठ व सकारात्मक व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा प्रय▪होताना दिसत नाही. केवळ अन्याय-अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा तहलका मात्र देशभर गाजत आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP