Monday, February 17, 2014

दलित पँथर संघर्षावर नवा प्रकाशझोत

मृत्यूशी झुंज देणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महाकवी आणि दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ दवाखान्याच्या खोलीत तटस्थपणे पँथरच्या संघर्षाचे विश्लेषण करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर एका महिन्याच्या आतच शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत झाले. भाष्य प्रकाशनचे महेश भारतीय, नामदेव ढसाळांच्या पत्नी कवयित्री मल्लिका अमरशेख तसेच ढसाळांचे पँथरचे सहकारी व जिवलग मित्र साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी निर्धाराने हे पुस्तक प्रयत्नपूर्वक वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशित केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल. या पुस्तकाने दलित पँथरच्या संघर्षावर नवा प्रकाशझोत तर टाकला आहेच; पण त्याचबरोबर पँथरच्या संघर्षाचे वास्तवही जगासमोर आणले आहे.

बॉम्बे हॉस्पिटलच्या ९0९ क्रमांकाच्या खोलीत नामदेव ढसाळ नावाच्या एका झंझावाताने दलित पँथरच्या संघर्षावर नवा प्रकाश टाकण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. जवळपास तीस वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या आजाराने त्रस्त असलेल्या नामदेवला शेवटच्या काळात आतड्याच्या कर्करोगाचा सामना करण्याची वेळ आली. त्यावरील उपचाराच्या जीवघेण्या वेदना, प्रकृतीतील चढउतार, कधी आयसीयूमध्ये तर कधी खोलीत उपचार, कॅन्सरच्या रूपात साक्षात मृत्यू समोर उभा ठाकलेला. मृत्यूशी झुंज देत असताना चेहरा मात्र शांत, स्वस्थ, मृत्यूची चिंता नाही की कसले भय नाही; पण मनात हलकल्लोळ माजलेला असावा.. दलित पँथरच्या चळवळीचा वणवा पेटलेला असावा आणि त्यातूनच 'दलित पँथर - एक संघर्ष' या पुस्तकाची निर्मिती झाली असावी. शोषित, पीडित, अन्याय-अत्याचारग्रस्तांना आजही आपली, जवळची वाटणारी दलित पँथर पुन्हा उभी राहावी असे वाटते. या भावनेला अधिक बळ मिळावे, अशी पँथरची चर्चा ढसाळांनी अखेरचा श्‍वास घेतानाही सुरू ठेवली आहे.

दलित पँथरची स्थापना, पँथरचा संघर्ष, पँथरमधील फूट यावर अनेकांनी अनेकदा लिखाण केले आहे. अर्जुन डांगळे, राजा ढाले, ज. वि. पवार, शरणकुमार लिंबाळे तसेच पँथरला लांबून पाहणारे, ज्यांचा पँथरशी संबंध नाही असे, राजकारण माहीत नसलेले अशा अनेकांनी दलित पँथर आणि तिची फूट यावर लेख लिहिले. नामदेवनेही तात्त्विक आणि वैचारिक मुद्दय़ांवर पँथरसंबंधी अनेकदा विवेचन केले; पण दलित पँथरच्या स्थापनेतील प्रमुख संस्थापक या नात्याने पँथरमधील संघर्षावर सर्वात शेवटी लिहिण्याचे त्यांनी ठरवले होते. ते काम त्यांनी अखेरच्या दिवसांत पूर्ण केले आहे. मृत्यू समोर दिसत असताना माणसे चिंता आणि भयाने मेल्यासारखी होतात; पण नामदेव आणि सामान्य माणसांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर होते. नामदेवचे व्यक्तिमत्त्व अलौकीक होते. १९७२ ते ७५ या तीन वर्षांच्या पहिल्या टप्प्यात नामदेवने घेतलेली झेप अतुलनीय होती. पँथरची स्थापना, महाराष्ट्रात पँथरने निर्माण केलेला दबदबा, शोषणाविरुद्ध, शोषितांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध चवताळून उठलेली पँथर, त्या धगधगत्या असंतोषातून पेटून उठलेली नामदेवची विद्रोही कविता होती. एकीकडे जातीभेदाने उपेक्षित ठेवलेल्या समाजाच्या वेदना ओकणारे महाकाव्य निर्माण होत असताना मार्क्‍स, लेनिन, स्टॅलिन, माओ, हेगल, फिडेल कॅस्ट्रो, आंबेडकरी चळवळ, कम्युनिस्ट चळवळ, समाजवादी आणि कामगार चळवळी, पँथरचा आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद याबरोबरच डॉ. आंबेडकरांचे सखोल चिंतन, त्यांची वैचारिक उंची यांच्या तुलनेत कोण कुठे आहे, अमेरिका, रशिया, फ्रान्स यांच्यामधील क्रांत्या कशा झाल्या, त्यांची परिस्थिती, त्यांची तत्त्वप्रणाली, जगभरातील जातीय,वर्गीय वांशिक ताणतणाव याबरोबरच आंबेडकरांच्या भूमिकेतून हिंदू धर्माची आजची समीक्षा, बुद्ध आणि त्याचा धम्म, राहुल सांकृत्यायन, देशाचे राजकारण, महाराष्ट्राचे राजकारण, त्यांचा इतिहास, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्रांती या सगळ्यांचा अभ्यास करत समाजाला त्यांची ओळख करून देण्याचे कार्य नामदेव ढसाळांनी केले आहे. प्रचंड अभ्यास, दांडगा उत्साह, कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे बळ या व्यक्तिमत्त्वात होते. जातीविरहित, वर्गविरहित समाज निर्माण करण्याचे स्वप्न नामदेवने पाहिले होते. त्यासाठी आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद एकत्र चालले पाहिजे, असे मत त्याने सखोल अभ्यासाअंती बनवले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रणालीला पूरक असलेले महात्मा जोतिबा फुले, कार्ल मार्क्‍स, माओ, लेनिन, लोहिया यांना त्यांनी अस्पृश्य मानले नाही, असे डांगळे यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच म्हटले आहे.

दलितांवरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दलित पँथरची स्थापना झाली. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांचे व्यक्तिमत्त्व भिन्न असल्यामुळे दलित पँथरच्या स्थापनेतच फुटीची बीजे असल्याचे नंतर स्पष्ट झाले. ढसाळ क्रांतिकारक विचारांचे, बंडखोर, वर्गसंघर्षाला जातीय संघर्षाची जोड देऊन क्रांतिकारी मार्गाने परिवर्तन करण्याची त्यांची भूमिका तर ढाले यांचा कल संसदीय लोकशाहीक.डे आंबेडकरांची विचारप्रणाली आणि बुद्ध धर्माच्या प्रचारातून जातीनिर्मूलन यावर त्यांचा कटाक्ष होता. ढसाळ हे आंबेडकरवादाच्या बुरख्याखाली मार्क्‍सवादाचा प्रचार करत असल्याचा ढाले आरोप करायचे तर ढसाळांच्या मते सुधारणावाद की आक्रमक क्रांती हा मतभेदांचा प्रमुख मुद्दा होता. आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्‍सवाद हा नंतरचा मुद्दा होता. त्यात नंतर आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप झाले. नामदेव ढसाळांची हकालपट्टी ढालेंनी करण्याचाही प्रकार झाला, दोघांना एकत्र आणण्याचे प्रय▪झाले; पण ते असफल ठरले. हा सगळा इतिहास सर्वपरिचित आहे. मात्र ढसाळांवर ढाले यांनी मार्क्‍सवादाच्या प्रचाराचा जो आरोप केला, त्याला ढसाळांनी या पुस्तकात सर्मपक उत्तर दिले आहे.

'डॉ. आंबेडकरांच्या विचार सिद्धांतानेच जाती प्रथेचे निर्मूलन होईल, ही माझी धारणा काल होती, ती आजही तशीच आहे. ढालेंना ही माझी भूमिका माहीत असूनही त्यांना पँथरचे सर्वेसर्वा व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी माझा काटा काढण्याचे काम चालू ठेवले होते. याच ढाले यांना वकील म्हणून सुनील दिघे चालायचे, बॅरिस्टर चारी, अँड़ जयंत गडकरी, कमलाकर सामंत, अँड़ जयंत प्रधान हे साम्यवादी वकील चालायचे, साम्यवाद्यांची आर्थिक मदत चालायची, असे ढाले म्हणायचे. आमची पँथर नक्षलवाद्यांपेक्षा जास्त जहाल आणि क्रांतिकारक आहे. मग माशी कुठे शिंकली? ढालेंचे बोलविते धनी तथाकथित समाजवादीच होते, असेही त्यांनी म्हटले आहे. कम्युनिस्ट चळवळीने आंबेडकरी चळवळीला कधीही समजून घेतले नाही. आंबेडकरांचे स्वप्न होते जातीविरहित, वर्गविरहित समाजनिर्मिती करण्याचे, जाती प्रथा नष्ट करून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे. याविषयक आंबेडकरांना त्यांनी कधी समजूनच घेतले नाही,' असे मत त्यांनी मांडले आहे.

वरळीतील दंगलीनंतर ढालेंच्या डोक्यात हवा शिरली आणि त्याने पँथरमध्ये सवतासुभा निर्माण करण्याचे मनोरथ रचले. फाटाफुटीसाठी भगवान बुद्धांनाही हिंदू देवतांप्रमाणे पाण्यात टाकले. त्यांना जर कम्युनिस्टांबद्दल एवढी अँलर्जी होती तर त्याने आमच्या संघटनेत यायला नको होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधींनी आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि साम्राज्यवादी अमेरिकेच्या राज्यकर्त्यांविरुद्ध उघडपणाने घेतलेली भूमिका आवडली असल्याचे तसेच देशांतर्गत सावकारशाहीपासून सर्वसामान्यांची सुटका होण्यासाठी केलेली कारवाई, काळाबाजारवाले स्मगलर्स, माफिया, आर्थिक गुन्हेगारांना दाखवलेली तुरुंगाची हवा, अराजकवाद्यांचा केलेला बंदोबस्त, संस्थानिकांचे तनखे देणे बंद करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण आदी धोरणांमुळे इंदिरा गांधींना तसेच आणीबाणीला पाठिंबा दिल्याचे ढसाळांनी नमूद केले आहे.

दलित पँथरच्या स्थापनेपासून घडलेल्या घटनांचा आढावा घेत आपल्यावरील आरोपांना खोडून काढत, तत्कालीन राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करत, फुटीच्या कारणांचा शोध घेत नामदेव ढसाळांनी दलित पँथरमधील संघर्षाचे वास्तव समोर आणले आहे. पँथरच्या चाहत्यांना, पँथरचे आकर्षण असणार्‍या तरुणांना डोळसपणे पँथरकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन ढसाळांनी दिला आहे, हे निश्‍चित!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP