Monday, February 24, 2014

दिल्लीचा गोंधळ बरा होता!

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र ही केवळ रणधुमाळी नाही तर याला फंदफीतुरीबरोबरच गुंडगिरी आणि मारामारीचे स्वरूप आले आहे. यामुळे जो महागोंधळ निर्माण झाला आहे त्यावरून आगामी काळात राजकारण आणखी किती खालच्या पातळीवर जाणार आहे याची कल्पनाच केलेली बरी. कालचा दिल्लीतला गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राजकीय नेते मुद्दय़ावरून गुद्दय़ावर आले, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप नव्हे तर चिखलफेक करू लागले, लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या लोकसभा व राज्य सभागृहात किंवा विधिमंडळ सभागृहात पराकोटीचे बेशिस्त वर्तन करू लागले, लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या प्रश्नांपेक्षा भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देऊ लागले, पक्षांतराचे प्रमाण वाढवू लागले, सत्तेच्या जवळपास जाऊ शकणार्‍या पक्षात प्रवेश घेऊ लागले की, निवडणुका जवळ आल्या असे समजावे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून येत्या काही दिवसांतच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेची अनेक कलमे लागू केली जात असली तरी मनी आणि मसल पॉवरने शिरजोर झालेले राजकारणी सगळे आचारविचार गुंडाळून ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असलेली अस्वस्थता, सत्तेमधील संघर्ष, बंडखोरी, एक मेकांवर केल्या जाणार्‍या कुरघोड्या, उमेदवारीवरून निर्माण झालेले ताणतणाव आणि इच्छुकांची राडेबाजी, एकमेकांवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रकारच्या राजकीय खेळी असा राजकारणात प्रचंड गोंधळ उडालेला दिसत आहे.

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला शह देण्यासाठी भाजप-शिवसेना युतीने रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युतीचा विस्तार महायुतीमध्ये केला आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचीही भर पडली आहे. ही महायुती अधिक विस्तारून अतिमहायुती करण्याचा प्रय▪भाजपाने चालवला असून राज ठाकरेंच्या मनसेला सोबत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली आहे. परंतु या महायुतीचे पर्यवसान अतिमहायुतीमध्ये होण्याऐवजी महागोंधळात होण्याचीच शक्यता अधिक दिसू लागली आहे. भारतीय जनता पक्षाकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना चुचकारताना शिवसेनेला खिजवण्याचा प्रकार घडत आहे. याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या शनिवारी नाशिक येथे गोदापार्क भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि भाजपाचे नितीन गडकरी यांनी एकमेकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. तसे पाहता शिवसेना आणि भाजपाची युती २५ वर्षे जुनी असली तरीही हिंदुत्वाच्या मुद्दय़ाशिवाय अन्य कोणत्याही मुद्दय़ावर त्यांच्यात एकमत होऊ शकत नाही. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेची चलती होती. त्यामुळे भाजपाला शिवसेनेमागे फरफटत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आता शिवसेनेचे खच्चीकरण होत असताना तसेच नरेंद्र मोदींच्या उदयानंतर शिवसेनेने आपल्या मागून फरफटत यावे, असे वर्तन भाजपने सुरू केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेवर पकड बसणे कठीण दिसत आहे. बाळासाहेबांच्या पहिल्या जयंतीदिनी त्यांनी शिवसैनिकांच्या मनगटावर शिवबंधनाचा धागा बांधून आपले कुलदैवत व शिवरायांना स्मरून शिवसेनेशी इमान राखण्याची शपथ दिली. पण त्यानंतर दोनच दिवसांत मुंबईतील नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आपला विनोद घोसाळकर या नेत्याकडून छळ आणि बदनामी होत असल्याचा जाहीर आरोप केला. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे तातडीने त्यांना जाऊन भेटल्यादेखील. उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनाचा धागा चांगलाच कच्चा निघाला. म्हात्रे प्रकरणानंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाक्चौरे काँग्रेसमध्ये गेले, तर परभणीचे खासदार गणेश दुधगावकर राष्ट्रवादीच्या दिशेने निघाले. पूर्वीची शिवसेना आता राहिली नसल्यामुळे मित्रपक्ष भाजपाचाही शिवसेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

जागावाटपावरून महायुतीमध्ये महाभारत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. माढय़ाच्या जागेचा प्रश्न शरद पवार हे राज्यसभेवर गेल्यामुळे पवारांनी पुढाकार घेऊन सोडवला आहे. अनेकांचा विरोध डावलून त्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. परंतु मोहिते-पाटलांसमोर महायुतीचा उमेदवार कोण, हा प्रश्न जटील बनला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना त्यांचा उमेदवार द्यायचा आहे, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यातच रिपाइंच्या रामदास आठवलेंनी आपली मागणी पुढे रेटली आहे. या गोंधळात मोहिते-पाटलांचा विजय सोपा असल्याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. 

हातकणंगलेमधून राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती पण ही जागा काँग्रेसला कल्लप्पा आव्हाडे यांच्यासाठी द्यावी आणि त्या बदल्यात रायगडची जागा घ्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. हातकणंगलेची जागा पडली तर काँग्रेसची पडेल आणि रायगडची जागा सुनील तटकरे खेचून आणतील, अशी खेळी दिसत आहे. परंतु हा मतदारसंघ राजू शेट्टींचा असूनही त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यांना शह देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'मध्ये गेलेले पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील हे तिथून उभे राहण्याची तयारी करीत आहेत, अशी परिस्थिती राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिसू लागली आहे.

काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून महायुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या धर्तीवर कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्यासाठी देशात १५ मतदारसंघ निश्‍चित केले होते. त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि यवतमाळचा समावेश होता. पण औरंगाबादचे नाव राहुल फॉर्म्युल्यातून वगळण्याची वेळ आल्यानंतर इच्छुकांनी पक्ष निरीक्षकांसमोर आपापले ढोल बडवायला सुरुवात केली. त्यात एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत हाणामार्‍या झाल्या अंतिम यादी तयार होईपर्यंत पेशंटची संख्या किती वाढणार हेच आता पाहायचे.

आघाडी, महायुती आणि मनसे यांच्यासोबत आमआदमी पक्षाने आपला आवाज वाढविण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या गुंडगिरीला आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला आळा घालून भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचा एल्गार पुकारलेल्या 'आप'मध्ये पक्षांतर्गत असंतोष, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप यामुळे या पक्षाचे निराळेपण गळून पडले आहे. भ्रष्टाचारापासून अलिप्त असणारा, पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार चालणारा आपलाच पक्ष आहे. अशा बाता मारणार्‍यांची या देशात कमी नाही. आता भ्रष्टाचारमुक्त भारत असा बुलंद नारा देत आणि शुचिभरूतेचा आव आणत 'आप'ने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. थेट लोकसभेच्या रिंगणात उतरून सर्वात आधी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीनेच त्यांच्यातला गोंधळ उघड केला आहे. सगळय़ाच तथाकथित प्रामाणिक नेत्यांनी उणीदुणी काढून एकमेकांचा आणि आपचाही बुरखा फाडला आहे. नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी आणि पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी इच्छुकांच्या मुलाखती या फार्स असून उमेदवार दिल्लीत आधीच निश्‍चित होत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 'आप'च्या रचनेत मोठीच विसंगती आहे. उद्योगपतींचे वर्चस्व एकीकडे, प्रसिद्ध झालेल्या व्यक्ती दुसरीकडे आणि सामान्य कार्यकर्ते यामुळे सगळाच गोंधळ उडाला आहे. राष्ट्रवादीवर अंजली दमानिया आणि मयांक गांधी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे राष्ट्रवादीने 'आप'वर हल्लाबोल केला आहे. 'आप'च्या या नेत्यांना सामाजिक, राजकीय कार्यकर्ते माहीत नसल्यामुळे ते कार्यकर्त्यांना चांगली वागणूक देत नाहीत. त्यामुळे उद्योगपतीच पक्ष चालवत असल्याने आप यहाँ आये किसलिए असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले आहेत. 'आप'च्या झाडूने सर्वांची साफसफाई होण्याऐवजी सगळेच पक्ष त्यांच्याच झाडूने त्यांना साफ करायला निघाले आहेत. निवडणुकीच्या ऐन तोंडावर असा महागोंधळ सध्या महाराष्ट्रात उडाला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP