Monday, March 24, 2014

शवंतराव चव्हाण अखेर एका झंझावाताची..?

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवनावरील चित्रपट दाखवला जात असेल, तर त्याचा संबंध निवडणुकीच्या प्रचारासाठी असल्याचा ठपका येऊ शकतो. नेमके हेच 'यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची' या चित्रपटाबाबत घडले आहे. 


 राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र केला जातो. त्या चव्हाणांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती शरद पवार अध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने करावी, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अर्थसाहाय्य द्यावे, हा निव्वळ योगायोग आहे असे कसे म्हणता येईल? गेली अनेक वर्षे या चित्रपटाचे काम सुरू होते; पण त्याच्या प्रदर्शनाला नेमका निवडणुकीचा मुहूर्त सापडला, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली, ही गोष्ट निराळी. या चित्रपटात अनेक त्रुटी असल्याचे मत जाणकार, विद्वान, अभ्यासक, मान्यवर मंडळींनी व्यक्त केले आहे. नेत्याचा जीवनपट मांडताना तो परिपूर्ण असेल असे नाही, ते काम प्रचंड आहेच; पण सत्य सांगितले पाहिजे. त्या नेत्याच्या राजकीय जीवनाची जडणघडण दाखवताना त्याच्या निर्णयांमध्ये असलेल्या त्रुटी देखील दाखवल्या पाहिजेत. त्यांच्या चुकीच्या निर्णयांचे कसे दूरगामी परिणाम होऊ शकतात, हे दाखवले तर ते भावी पिढीला मार्गदर्शक होऊ शकते. व्यक्तिमत्त्वाचे केवळ उदात्तीकरण केले असल्याने या चित्रपटावर टीका झाली आणि पुरोगामी विचारांचे

डॉ. जब्बार पटेल हे सिद्धहस्त दिग्दर्शक असताना त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असा सूरही उमटू लागला. असे असले तरी यशवंतरावांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उभे करण्याचा यशस्वी प्रय▪त्यांनी निश्‍चितपणे केला आहे. यशवंरावांचे हिमालयाएवढे कर्तृत्व, संपन्न व्यक्तिमत्त्व आणि कुशल नेतृत्व तसेच त्यांच्या गुणांवगुणांचे विश्लेषण अडीच-तीन तासांच्या चित्रपटात मांडणे, ही खरे तर तारेवरची कसरतच; पण जब्बार पटेलांनी आपल्या सहकार्‍यांसह ती सर्मथपणे पेलली आहे. मात्र, त्याचबरोबर आणीबाणीच्या काळातील यशवंरावांची भूमिका, पुलोद सरकार पाडण्याबद्दलची त्यांची भूमिका, विदर्भ मराठवाड्याबाबत असलेली त्यांची मते या वरील टीकाटिप्पणी तसेच महाराष्ट्राच्या विकासाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय याचा लोकांच्या मनावर ठसेल असा संक्षिप्त आढावा अथवा काही हृद्य प्रसंग दिले असते तर यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रकर्षाने भावले असते; परंतु यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे उदात्तीकरण आणि शरद पवारांना हवे तसे यशवंतराव उभे करण्याच्या नादात वस्तुस्थितीकडे डोळेझाक किंवा वास्तवाचा विपर्यास केला असल्याची शंका आल्याशिवाय राहत नाही. यशवंतरावांनी आणीबाणीत इंदिरा गांधींची साथ दिली. इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीबद्दल अप्रियता असल्याने त्यांच्याशी न बोलता काही निर्णय घेण्यात आले. त्याचा त्यांना पुढील काळात फटकाही बसला. मात्र, इंदिरा गांधींना जनतेचा कौल मिळाल्यानंतर त्यांच्यासोबत राहण्याचे यशवंतरावांनी ठरवले. त्या काळात इंदिरा गांधींनी त्यांना डावलले तरी देखील अपमान गिळून आणि हितचिंतकांचा सल्ला टाळून इंदिरा गांधींबरोबर ते राहिले आणि स्वत:ची घुसमट करून घेतली. हा त्यांचा निर्णय राजकीयदृष्ट्या योग्य होता का, याचे विवेचन दिसले नाही. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला उतरती कळा लागली. एका वैभवशाली राजकीय जीवनाची शोकांतिका झाली, त्याचे यथायोग्य चित्रण चित्रपटात आले नाही.

मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून शरद पवारांनी जे पुलोद सरकार आणले. (पुरोगामी लोकशाही दल) त्याबाबत यशवंतराव आणि वसंतदादा यांच्या भूमिकांची तर्कशुद्ध मांडणी झालेली नाही. त्यामुळे इतिहास बदलण्याचातर हा प्रय▪नाही, अशी चर्चा राजकीय वतरुळात होऊ लागली. शरद पवारांनी 'वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला' असे या घटनेचे वर्णन बड्या बड्या संपादकांनी आणि राजकीय विश्लेषकांनी केले होते, ज्यामुळे शरद पवारांच्या पांढर्‍याशुभ्र सदर्‍यावर काळा डाग उमटला होता, तो डॉ. जब्बार पटेल यांनी व्यवस्थितरीत्या पुसून काढला आहे. काही संपादकांनी त्यासंदर्भातील भूमिका नंतरच्या काळात बदलल्या हेही तितकेच खरे. यशवंतरावांचा वसंतदादांचे सरकार पाडण्यासाठी पवारांना पाठिंबा होता. १९७८ साली आणीबाणीनंतर महाराष्ट्रात रेड्डी कॉँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त सरकार आले होते. या सरकारचे मुख्यमंत्री रेड्डी कॉँग्रेसचे वसंतदादा आणि उपमुख्यमंत्री इंदिरा कॉँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे होते. वसंतदादांना उपमुख्यमंत्री तिरपुडे कामच करू देत नव्हते, स्वत:च सगळे निर्णय घेत होते, त्यांच्या आक्रमकपणामुळे वसंतदादाही हतबल झाले होते. मात्र, तिरपुडेंना थोपवण्याचे काम वसंतदादांना करता आले नाही. त्यामुळे आपले सरकार पडावे असे वसंतदादांना वाटत होते; परंतु जनसंघाचा समावेश असलेल्या जनता पक्षाबरोबर जाणे त्यांना योग्य वाटत नव्हते. तसे त्यांनी पवारांना सांगितले देखील होते. त्या वेळी केंद्रामध्ये इंदिरा कॉँग्रेसच्या पाठिंब्याने आलेले पंतप्रधान चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आलेले होते. त्यामध्ये यशवंतराव हे उपपंतप्रधान झाले होते. केंद्रातील जनता पक्षाच्या सरकारला अनुकूल होईल असे राज्यातील जनता पक्षाच्या साहाय्याने सरकार आणण्याचा घाट पवारांनी घातला होता. यशवंतरावांचा यासाठी पवारांना पाठिंबा होता; पण वसंतदादांची जनता पक्षाबरोबर जाण्याची तयारी नव्हती. वसंतदादांचा जर स्वत:चे सरकार पाडायला पाठिंबा होता तर त्यांनी पवारांच्या खेळीची कल्पना देण्याकरिता यशवंतरावांशी संपर्क साधण्याचा प्रय▪का केला होता? वसंतदादांचा संपर्क होऊ नाही याची दक्षता यशवंतरावांनी घेतली होती. कारण त्यांचा पवारांना पाठिंबा होता आणि पवारांनी दादांना अंधारात ठेवले होते. या प्रकारामुळे यशवंतराव व वसंतदादा यांचे संबंध दुरावले आणि १९८0च्या निवडणुकीत कराडमधून यशवंतरावांविरुद्ध शालिनीताईंनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत यशवंतराव थोड्या मतांनी निवडून आले; पण ताईंनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती. तत्पूर्वी, अनेक राजकीय घडामोडी होऊन अखेर इंदिरा गांधींचा विजय झाला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी पवारांचे पुलोद सरकार पाडण्याचे पहिले काम केले. त्यामुळे चित्रपटामध्ये वसंतदादांना आपले सरकार पाडायचे होते, असे दाखवण्याचा जो प्रय▪झाला, त्यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासंबंधी यशवंतरावांनी फारशी आस्था दाखवली नाही. त्यामुळे या भागाच्या अनुशेषाबरोबरच लोकांचा असंतोष वाढला गेला असल्याची टीका केली जात होती. मागास भागांच्या विकासाचा अनुशेष वाढण्याला तेथील स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याची यशवंतरावांची भावना होती. त्याचा उल्लेखही दिसला नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन केले त्यात आचार्य अत्रेंची रोखठोक भूमिका दाखवताना अत्र्यांवर अन्याय झाला आहे. त्यांनी मोठमोठय़ा नेत्यांवर टीकेचे आसुड ओढले खरे; परंतु प्रसंगी त्यांच्या गुणांचा गौरवही केला आहे. तसा यशवंतरावांचाही केला. मात्र, चित्रपटाने अत्रे हे यशवंतरावांचे शत्रूच होते, असा समज करून दिला आहे. यशवंतरावांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा देण्यासाठी जे निर्णय घेतले त्याचा आढावा शाहिरांच्या पोवाड्यातून घेण्यात आला असल्याने त्याचा विशेष प्रभाव जाणवत नाही. महाराष्ट्रात फार काळ न थांबता चित्रपट आपल्याला थेट दिल्लीत घेऊन जातो. अर्थात यशवंतरावांचे बालपण, त्यांच्यावर आई विठाबाई यांनी केलेले संस्कार त्यांच्या पत्नी वेणूबाई यांची त्यांना असलेली साथ, हळूवार नातेसंबंध असे मन हेलावून टाकणारे काही प्रसंग नक्कीच आहेत.

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आगळावेगळा ठसा उमटवणारे, धोरणी, मुरब्बी, तत्त्वनिष्ठ राजकारणी, समंजस, संवेदनशील, चारित्र्यसंपन्न, कुटुंबवत्सल नेते, साहित्य कलासंस्कृती यांचे अभ्यासक आणि मुख्यत्वे महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे द्रष्टे लोकनेते असलेले यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री अशी महत्त्वाची खाती जबाबदारीने सांभाळणारे कर्तृत्ववान नेते यशवंतराव चव्हाण. आजचे राजकीय व सामाजिक नेते आणि कार्यकर्ते तसेच तरुण पिढी यांच्यासमोर आदर्श आणि आजच्या राजकारणातील बजबजपुरीमध्ये चांगला मार्गदर्शक अशी यशवंतरावांची प्रतिमा उभी करण्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यशस्वी झाले आहेत. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या लोकनेत्याचा जीवनपट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचे अत्यंत कठीण काम त्यांनी पार पाडले आहे. अभिनेते अशोक लोखंडे यांनी यशवंतराव हुबेहुब उभे केले आहेत. देशाच्या राजकारणात आलेल्या एका झंझावाताची अखेर, ही मनाला चटका लावून जाणारी होती, हे वास्तव चित्रपटात दिसले नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP