Monday, March 3, 2014

जिंकले तर हीरो, नाही तर..!

नाशिकच्या राजकारणातून भुजबळांचा अथवा त्यांचे पुतणे विद्यमान खासदार समीर भुजबळ यांचा पत्ता कट करण्याचा आणि दोघांचेही खच्चीकरण करण्याचा प्रय▪दिसत असल्याने भुजबळांच्या उमेदवारीवरून नाराजी वाढली आहे. अर्थात मागील निवडणुकीत मनसे उमेदवाराने समीर भुजबळ यांची चांगलीच दमछाक केली होती. राष्ट्रवादीचा एकही आमदार नसलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळांना देखील निवडणूक कठीण आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असून त्यापूर्वीच नेत्यांचे प्रचार दौरे आणि उमेदवारी यादी जाहीर होऊ लागले आहेत. काँग्रेस वगळता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपली पहिली यादी घोषित केली असल्याने अनेक इच्छुकांची नाराजी तसेच या पक्षातून त्या पक्षात पळापळ सुरू झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युती यांच्या एकगठ्ठा मतांमध्ये काही छोट्या पक्षांनी घुसखोरी केली असल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना आणि नाराजांना आपल्या पक्षात सामावून घेण्याकडे कल वाढत आहे. मत विभागणी होऊन युतीला फटका बसू नये, याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रय▪युतीच्या नेत्यांनी केला असून युतीचा विस्तार 'महायुती'त झाला आहे. रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष, राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांना त्यांच्या कुवतीप्रमाणे जागाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या यादीने पक्षात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली असून उमेदवारी मिळालेले आणि न मिळालेले अनेक जण नाराज झाले आहेत. अंतिम याद्या जाहीर होईपर्यंत नाराज कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी राहण्याची शक्यता दिसत आहे. उमेदवारी देण्यामध्ये बरेच राजकारण दडले असून जिंकले तर हीरो आणि नाही जिंकले तर झीरो झाले तरी चालतील. अशा प्रकारची व्यूहरचना अनेकांबाबत केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी आपापल्या मतदारसंघात ताकदवान असलेले, निवडून येण्याची सर्वक्षमता असलेले तसेच मतदारांवर प्रभाव पाडू शकणारे राज्यातील प्रभावी मंत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जातील. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केले होते; परंतु एकाही मंत्र्याची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी नाही. पवारांचा आदेश धुडकावून त्यांना स्पष्ट नकार देणार्‍यांची राष्ट्रवादीत कमी नाही. आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या २२ जागांपैकी १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून पवारांच्या गळाला केवळ छगन भुजबळ हे एकच मंत्री लागले आहेत. दुसरे विजयसिंह मोहिते-पाटील हे माजी मंत्री आहेत. महाराष्ट्रात चौथ्यांदा आघाडीची सत्ता आली तर मंत्रिपद कायम राहील. अथवा मिळवता येईल. ही खात्री असल्याने मंत्री होण्यातच सर्वांना रस आहे. आपले मंत्रिपद शाबूत राखण्यासाठी पवारांचे केंद्रात हात बळकट करण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही. मात्र त्याचबरोबर त्यांना लोकसभा लढवण्याचा आत्मविश्‍वासही नसावा. मंत्री राज्याचे असले तरीही स्वत:च्या मतदारसंघाबाहेर लक्ष देण्याला कोणी फारसे महत्त्व देत नाही. राज्य बाजूलाच राहिले, जिल्ह्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. मतदारसंघाचा विकास एवढाच ध्यास असल्याने विधान सभेत निवडून येणे कठीण नाही. राज्यातली सत्ता सोडून दिल्लीत खासदार होण्यात मतलब नाही, अशी सर्वांची धारणा दिसते. तसेच निवडून आलो तर हीरो नाही तर झीरो होण्याची कोणाचीच तयारी नाही. उमेदवारी देण्या-घेण्यावरून सध्या चांगलेच नाट्य रंगू लागले आहे.

विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना लोकसभेचे तिकीट देऊन त्यांचा पत्ता कट करण्याचा अजितदादांचा विचार होता; परंतु या दोघांनी चांगली खेळी करून दादांचे मनसुबे हाणून पाडले. वळसे-पाटील यांना शिरूरमधून उभे करण्याचा बेत हाणून पाडताना त्यांनी आपल्याच भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांना उमेदवारीसाठी पुढे केले. तर जयंत पाटील यांनी हातकणंगलेची जागा लढवण्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लप्पाअण्णा आवाडे हेच सक्षम उमेदवार असल्याने त्यांच उमेदवारी द्यावी, असे सांगत लोकसभेतून काढता पाय घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना तेथील विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात आवाडेंसारखा दुसरा तगडा उमेदवार नाही हे पटले असून राष्ट्रवादीने त्यांची ही जागा काँग्रेसला देऊन त्या बदल्यात रायगडची जागा मागितली आहे. काँग्रेसने आवाडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रायगडची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्याचे घाटत असले तरी तटकरेंची केंद्रात जाण्याची इच्छा असेल असे दिसत नाही. नाशिक प्रमाणे रायगडमध्ये उमेदवारीवरून वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवारांचा आग्रह झाला तर भुजबळ यांच्या जोडीला तटकरे जाऊन बसतील.

छगन भुजबळ यांना लोकसभा उमेदवारी देऊन त्यांचा महाराष्ट्रातून पत्ता केला जात असल्याची चर्चा नाशिकभर पसरली आणि भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या सर्मथकांनी उघडपणे या उमेदवारीला विरोध केला. गेल्या शनिवारी येवल्यात रास्ता रोको, येवला बंद असे आंदोलन सुरू करण्यात आले असून पदाधिकार्‍यांनी राजीनामे ही दिले आहेत. भुजबळांनाच दिल्ली का? असा त्यांचा सर्मथकांचा एकूण सूर दिसत आहे. नाशिकच्या राजकारणातून भुजबळांचा अथवा त्यांचे पुतणे विद्यमान खासदार समीर भुजबळ यांचा पत्ता कट करण्याचा आणि दोघांचेही खच्चीकरण करण्याचा प्रय▪दिसत असल्याने भुजबळांच्या उमेदवारीवरून नाराजी वाढली आहे. अर्थात मागील निवडणुकीत मनसे उमेदवाराने समीर भुजबळ यांची चांगलीच धमछाक केली होती. राष्ट्रवादीचा एकही आमदार नसलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळांना देखील निवडणूक कठीण आहे.

शरद पवार यांनी राज्यसभेवर जाऊन स्वत:ची आणि कन्या सुप्रिया सुळे दोघांची जागा सुरक्षित केली आहे. मंत्र्यांना दिल्लीत पाठवून समीर यांना खाली बसवले तसे सुप्रियाला खाली बसवून स्वत: बारामतीतून लढायचे, अशी स्वत:पासून सुरुवात केली असती तर नाराजी वाढली नसती. त्यांच्या माढा मतदारसंघात अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी द्यायला हवी होती. रणजीतसिंह हे तरुण असून गेल्या वेळी राज्यसभेवर खासदार असल्यामुळे दिल्लीत कामाचा त्यांना अनुभव देखील आहे. समीर आणि रणजीत या दोन्ही संसदेचा अनुभव असलेल्या तरुणांना उमेदवारी नाकारून ज्येष्ठांना संसदेत पाठवण्यामागे राज्यात त्यांना मंत्रिपदे नको, अशी भूमिका घेतलेली दिसते. विजयसिंहांची निवडून येण्याची क्षमता असली तरी त्यांना पक्षांतर्गत विरोधकांचा त्रास अधिक आहे. त्यातच गृहकलह चव्हाट्यावर आला असून त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या बंडखोरीचे आव्हान त्यांच्या समोर उभी राहिले आहे. निवडणूक लढवायची तर पूर्ण ताकदीने या निर्धाराने मोहिते-पाटील उतरतील आणि आपला विजय निश्‍चित करतील, असा विश्‍वास त्यांच्या सर्मथकांना आहे.

आघाडीमध्ये उमेदवारीवरून वाद-विवाद सुरू असले तरीही महायुतीतही सारे काही आलबेल नाही. पुण्याची जागा गिरीष बापट यांना की गोपीनाथ मुंडे सर्मथक अनिल शिरोळे यांना हे अद्यापि निश्‍चित झालेले नाही. या दोन नावांबरोबरच सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनाही भाजपाने उमेदवारीची ऑफर दिली आहे. भटकरांनी तयारी दर्शवली तर दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होतो का तेच पहायचे. अंतिम याद्या आल्या नंतरच चित्र स्पष्ट होईल.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP