Monday, July 14, 2014

गजबजलेल्या वस्तीतून हलवा श्रद्धास्थळे !

भाविकांच्या तसेच नागरिकांच्या जीवाला धोका असेल आणि दहशतवाद्यांना रोखण्याचे ठोस उपाय होत नसतील तर अशी मंदिरे सुरक्षितस्थळी हलवणेच योग्य ठरेल. मंदिरांना तसेच भाविकांच्या जीवाला धोका होणार असेल तर मंदिरे सुरक्षित स्थळी हलवावीत; अन्यथा गजबजलेल्या वस्त्या हटवून मंदिरे तरी सुरक्षित करावीत. या मुद्दय़ाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.



देश-विदेशातील भाविकांची प्रचंड मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असलेली आणि दाटीवाटीच्या वस्तीत वसवलेली श्रद्धास्थाने अतिरेक्यांचे 'टार्गेट' झाली असून लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यामुळे भेडसावत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा पुरावाच परवाच्या बॉम्बस्फोटाने समोर आणला आहे. दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर उडवून देण्याच्या वारंवार धमक्या येत असल्याने मंदिराच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. मंदिराच्या शेजारीच फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाणी असल्यामुळे पोलिसांचा जागता पहारा आहेच. असा कडेकोट बंदोबस्त असताना दहशतवाद्यांनी सुरक्षाकवच भेदून दोन पोलीस ठाण्यांच्या पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटामुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले. या पूर्वी र्जमन बेकरी तसेच जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटांनी लोकांमध्ये दहशत पसरवली आणि पोलिसांची झोप उडवली होती. त्यानंतर लोकांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या अनेक उपाययोजनांच्या घोषणा करण्यात आल्या. शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु नेहमीप्रमाणे घोषणा हवेतच विरून गेल्या. पोलिसांना दहशतवाद्यांचे आव्हान पेलणे शक्य होत नसल्याचे मुंबई-पुण्याच्या बॉम्बस्फोट मालिकांनी दाखवून दिले आहे. पोलिसांवर टीका आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन याची बौद्धिके देणे आता सुरू झाले आहे. मात्र, गर्दीच्या वस्तीत वसवलेल्या तसेच लाखो भाविकांच्या जीविताला धोका निर्माण करणार्‍या या श्रद्धास्थळांसाठी नेमके काय करावे, याविषयी चिंता वाढत चालली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे खरे; पण अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी शहराच्या मध्यभागी, दाटीवाटीने उभ्या असलेल्या जुन्या निवासी इमारती, वाडे, लहान-मोठी दुकाने, शाळा-महाविद्यालयांच्या पुस्तकांची दुकाने अशी दुकानांची रेलचेल असलेला हा भाग आहे आणि अशा दाटीवाटीच्या वस्तीत उभे असलेले हे गणेश मंदिर दहशतवाद्यांनी टार्गेट केले आहे. यावर तोडगा काढायचा कसा? मंदिर येथून गावाबाहेर हलवायचा विचार कोणी बोलून दाखवला तर लगेच भावना दुखावल्याची ओरड सुरू व्हायची. जीव गमावण्यापेक्षा मंदिरच कमी वर्दळीच्या भागाकडे किंवा शहराबाहेर हलवले तर? असा विचार कोणाच्या मनात आला नसेलच, असे म्हणता येणार नाही. किमान मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांना जीव वाचवण्यासाठी कठोर उपाययोजना व्हावी, असेही वाटले असेल; पण बोलून दाखवणार कोण व कसे? हाच प्रश्न आहे. मंदिरांना सुरक्षितता देण्यास जर पोलीस यंत्रणा कमी पडत असेल, तर मंदिरच सुरक्षित ठिकाणी हलवली तर बरे होईल? शेवटी श्रद्धा ही समोर दिसत असलेल्या तसेच मनात, हृदयात साठवून ठेवलेल्या मूर्तीवर असते, ती स्थळावर नसते हे मानले पाहिजे. मंदिर हलवायचे नसेल तर वस्ती हलवावी लागेल. वस्ती हलवायची असेल तर राहती घरे, वाडे, दुकाने सर्वांनाच हलवावे लागेल. 

मंदिरांना सुरक्षितता देणे, उत्सवांवर आणि लोकांच्या उत्साहावर नियंत्रणे ठेवणे तसेच पर्यायाने लोकांना त्यांच्या सुरक्षेची हमी देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण नागरिकांची देखील कर्तव्ये आहेत. सुरक्षेचा हक्क हवा असेल तर कर्तव्याचे पालनही झाले पाहिजे. एखाद्या पोलीस अधिकार्‍याने लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना सुरू केल्या तर भावना दुखावल्या म्हणून त्या योजनाच हाणून पाडणार्‍या सर्वपक्षीय नेत्यांची या देशात कमी नाही. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, नेत्यांच्या जयंत्या, दहीहंडी यांचा राजकारणासाठी वापर करणार्‍यांची कशी स्पर्धा लागलेली असते याचा अनुभव आपण घेत आहोतच. गुलाबराव पोळ हे पुणे शहराचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी नवरात्रोत्सवातील तोरण मिरवणुका बंद करण्याचा धाडसी निर्णय अमलात आणला. तो निर्णय किती योग्य होता, याचे आता कौतुक केले जात आहे. नवरात्रोत्सवात देवीचे तोरण बांधण्यासाठी शक्तिप्रदर्शने होऊ लागली, गुंडगिरी वाढू लागली. त्यातून संघटित गुन्हेगारी निर्माण झाली. पुण्यात बोडके-मारणे यांच्यासारख्या टोळय़ा यातूनच तयार झाल्या. त्यावर कठोर उपाय योजना करून संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम गुलाबराव पोळ यांनी केले. 

विक्रम बोके हे पुणे शहराचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी धाडसी उपक्रम हाती घेवून तो यशस्वीही केला. सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सव झाल्यानंतर मूर्ती वाड्यात, अंगणात, बाहेरच्या मोकळय़ा जागेत, झाकून ठेवायचे. नव्वदच्या दशकात एका मंडळाने छोटे जाळीचे मंदिर बनवून त्यात गणेशमूर्ती ठेवली. त्यानंतर चौकाचौकांतील अनेक गणेश मंडळांनी त्याचे अनुकरण करून ठिकठिकाणी गणपतींना जाळय़ा लावल्या. या तात्पुरत्या मंदिरांचे कायमस्वरूपाच्या मंदिरांमध्ये रूपांतर झाले तर रस्त्यांवर आरत्या सुरू होतील. त्यातून काही राजकीय मंडळी शक्तिप्रदर्शन करू लागतील व त्याचे पर्यवसान चांगले होणार नाही, या दूरदृष्टीने विक्रम बोके यांनी मंदिरांना जाळ्या बसविण्याचा प्रय▪मोडून काढला होता. परंतु त्यांच्या बदलीनंतर सर्वांनी पुन्हा एकजुटीने जाळ्या बसविण्याचा कार्यक्रम पार पाडला !

मंदिरे सुरक्षितस्थळी असतील तर लोकांनाही सुरक्षित वाटू शकेल; पण दगडूशेठ हलवाई गणपतीला कितीही सुरक्षा दिली तरी ती कमीच पडणार आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या अनेक मंदिरांभोवती वस्ती तयार झाली; पण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आधीपासून असलेल्या भरवस्तीत उभारण्यात आले. सुरक्षेच्या उपाययोजनेमध्ये आगीपासून बचावासाठी अग्निशमन दलाची आवश्यकताही नमूद करण्यात आलेली आहे; पण दगडूशेठ हलवाई गणपतीला अग्निशमन यंत्रणा देण्यासाठी जागाच उरलेली नाही. याचे कारण या गणपतीला प्रसिद्धी मिळू लागली तेव्हाच शेजारीच असलेला अग्निशमन विभाग पंधरा वर्षांपूर्वी तेथून हलवण्यात आला आणि ही जागा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टला देण्यात आली. हे ठिकाण आता अत्यंत संवेदनशील बनले आहे. संवेदनशील ठिकाणाजवळ आग विझविण्याचा बंब आवश्यक असेल तर त्याच्यासाठी जागाही असली पाहिजे; पण जागा ट्रस्टला दिलेली असल्याने ती रिकामी करून द्यावी, असे सांगण्याची हिंमत पोलीस अथवा अन्य कोणी करू शकणार नाही. कोणी केल्यास लगेच भावना दुखावण्याचा मुद्दा 'आ' वासून उभा राहील. 

पुणे शहरातील कसबा पेठ येथील पेशवेकालीन गणपती हे ग्रामदैवत आहे. हा गणपती तसेच तांबडी जोगेश्‍वरी गणपती, तुळशीबाग, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा हे सर्व मानाचे गणपती भरवस्तीत असले तरी एका बाजूला आहेत. मंडईच्या गणपतीचे मंदिरही मंडई मंडळाने रस्त्याचा कडेला मंदिर उभारून उत्तम पायंडा पाडला आहे. एवढेच काय पुणे शहराबाहेर केतकावळे येथे दक्षिणेतील बालाजी मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तशीच शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराची प्रतिकृती शिरगाव येथे उभारण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी भाविकांची भरपूर गर्दी होत असते. गावाच्या बाहेर आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असेल तर ही मंदिरे अधिक सुरक्षित ठेवता येऊ शकतात. वर्दळीच्या वस्तीत खरोखरच मंदिरे असावीत का, यावर विचारविनिमय होणे आवश्यक आहे. विशेषत: पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आणि मुंबई लालबागचा राजा यांच्यासारखे 'नवसाला पावणारे' असे मार्केटिंग झालेले गणपती जेथे आहेत तेथे जाणार्‍या भाविकांच्या तसेच नागरिकांच्या जीवाला धोका असेल आणि दहशतवाद्यांना रोखण्याचे ठोस उपाय होत नसतील तर अशी मंदिरे सुरक्षितस्थळी हलवणेच योग्य ठरेल. मंदिरांना तसेच भाविकांच्या जीवाला धोका होणार असेल तर मंदिरे सुरक्षित स्थळी हलवावीत; अन्यथा गजबजलेल्या वस्त्या हटवून मंदिरे तरी सुरक्षित करावीत. या मुद्दय़ाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP