Monday, July 21, 2014

नारायण राणेंच्या बंडाचे काय होणार?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम महिनाभराचा अवधी उरलेला असताना सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आणि राजकीय वातावरण तापले. गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त येऊ लागले. भुजबळांनी या वृत्ताचा इन्कार केला, मात्र आपल्या सर्मथकांची फौज शिवसेनेत पाठवून दिली. पुढे-मागे काय होईल, हे काळ ठरवेल; परंतु बंडाच्या पवित्र्यात असलेल्या भुजबळांचे नाव आपोआप मागे पडले, याला कारणही तसेच घडले. 


कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बंडाचे निशाण फडकवून एकच खळबळ उडवून दिली. शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये आलेले आणि नंतर शरद पवारांसमवेत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेलेले भुजबळ चांगलेच काँग्रेसी झाले; परंतु राणे काँग्रेसमध्ये येऊनही अद्यापि शांत झालेले नाहीत, त्यांचा आक्रमक स्वभाव त्यांना शांत बसू देत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली खरी; पण राजीनामा देऊन ते भाजपामध्ये जातील अशी शक्यता वर्तवणारी वृत्ते येताच उद्धव ठाकरे संतप्त झाले. राणेंना भाजपात घेऊ नका, असे जाहीरपणे सांगून त्यांनी राणेंचा रोष ओढवून घेतला. मुख्यमंत्र्यांवर आणि पक्षश्रेष्ठींवर तुटून पडण्याऐवजी राणे-ठाकरे यांच्यातच जुंपली. त्यामुळे राणेंच्या बंडाचे काय होणार, यावर आता उलट-सुलट चर्चा होऊ लागली असून आज सोमवारीच ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

अत्यंत आक्रमक, खंबीर, कार्यक्षम, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असे नेतृत्वगुण असूनही आपल्या गुणांचे चीज होत नसल्याची खंत राणेंना बोचत असल्याने त्यांचा आक्रमक स्वभाव अधूनमधून उफाळून येतो, भावनेचा उद्रेक होतो, मनात खदखदत असलेले सगळे राग बाहेर येतात आणि मग परिणामांची क्षिती न बाळगता जाहीरपणे बंड होते. राणे यांचा असा स्वभाव असल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी शिवसेनेच्या पठडीत वाढलेले राणे काँग्रेस पक्षात रमणार कसे? कॉँग्रेसच्या महासागरात व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असलेल्या, तसेच संयम आणि सहनशीलतेचा अभाव असलेल्या राणेंचे काय होणार, असे प्रश्न चर्चेत आले होते. शेवटी व्हायचे तेच झाले, लाचारी पत्करून, मन मारून, संयम ठेवून, पक्षश्रेष्ठींवर आणि मुख्यमंत्र्यांवर निष्ठा ठेवणे, मनाविरुद्ध घडत असलेले उघड्या डोळय़ांनी पाहणे राणेंना जमले नाही. काँग्रेसने सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे दिलेले आश्‍वासन पाळले नाही, असे राणेंचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता राजकारणात संयम, सहनशीलता तर हवीच; पण अनेकदा स्वभावाला मुरड घालणेही गरजेचे असते. सिंधुदुर्गात नीलेश राणे यांचा पराभव राणेंच्या जिव्हारी लागला आहे. ज्या कोकणासाठी आपण अहोरात्र कष्ट केले, तेथील माणसांनीच आपला विश्‍वासघात केला, या समजुतीने ते दुखावले आहेत. निवडणुकीच्या राजकारणात सर्वांनाच कधीना कधी पराभवाला सामोरे जावे लागते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले विलासराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम, विजयसिंह मोहिते-पाटील, बाळासाहेब विखे-पाटील यांच्यासारखे दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले; परंतु त्यांनी बंड केले नाही. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस निष्ठावंत आणि शरद पवार यांच्या गटबाजीतून कॉँग्रेसवाले एकमेकांसमोर उभे राहिले आणि मोठमोठे दिग्गज त्या वेळी निवडणुकीत पराभूत झाले. विलासराव देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीत बंड करण्याचा प्रय▪केला, तेव्हा अध्र्या मताने ते पराभूत झाले. मात्र बिघडलेले वातावरण सामंजस्याने सुधारण्यावर त्यांनी भर दिला आणि पुन्हा विजयी झाले. राणे यांनी आघाडी सरकारच्या आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन राजीनाम देत असल्याचे सूचित केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घेतलेली भूमिकाही लपून राहिलेली नाही. गेल्या गुरुवारी राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार, अशी घोषणा करताच अनेक प्रकारची वृत्ते आणि वावड्या सुरू झाल्या. ते भाजपामध्ये जाणार की वेगळी चूल मांडणार इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या. त्यातूनच राणे आणि शिवसेनेत भांडण सुरू झाले.

काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांविरुद्ध बंड करणारे राणे हे पहिलेच मंत्री नाहीत, यापूर्वीदेखील अशी बंडे झालेली आहेत. इंदिरा गांधींनी बाबासाहेब भोसलेंना मुख्यमंत्री केले तेव्हा त्यांच्याविरुद्ध सहकारी आमदारांनी बंड केले होते. भोसलेंचे वक्तृत्व अतिशय चांगले होते आणि त्यांच्या प्रतिक्रियादेखील मार्मिक आणि गमतीदार असायच्या. त्यांच्याविरुद्धचे बंड जेव्हा शमले, तेव्हा 'बंडोबा थंडोबा झाले' अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली होती. तेव्हा पासून बंडोबा थंडोबा झाले हा वाक्प्रचार राजकारणात रूढ झाला. राजीव गांधी पंतप्रधान असताना मुख्यमंत्रीपदी असलेल्या शरद पवारांविरुद्ध त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी बंड केले होते. रामराव आदिक, जवाहरलाल दर्डा, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आदींनी केलेल्या बंडाला बॅ. ए. आर. अंतुले आणि तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचाही आशीर्वाद होता; पण पवारांनी दिल्लीत जाऊन राजीव गांधींची भेट घेतली आणि आगामी निवडणुकांची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. तेव्हा पक्षश्रेष्ठी त्यांना अनुकूल झाले आणि बंड शमले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आणि पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव चर्चेत येताच पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या पवारांनी बंड केले. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा काढून त्यांच्याविरुद्ध बंड केले आणि स्वत:च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. प्रत्येक राजकीय पक्षात बंडे होतच असतात, तशी बंडाची परंपरा काँग्रेस पक्षातही आहे. अर्थात पक्षांतर्गत बंडामुळे कॉँग्रेस पक्षाचेही खच्चीकरण होत गेले, हेही तितकेच खरे; पण नारायण राणेंच्या बंडात असलेली आक्रमक भाषा या बंडखोरांनी केली नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २६ नोव्हेंबर २00८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, तेव्हा राणेंना मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा निर्माण झाली होती; परंतु अशोक चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि राणे संतापले. अशोक चव्हाणांसह कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींवर ते तुटून पडले आणि निलंबन ओढवून घेतले. निलंबन काळात अन्यत्र जाण्याच्या अनेक शक्यतांचा विचार केला; परंतु कुठेही आश्‍वासक परिस्थिती नसल्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहिले. निलंबनाचा कालावधी संपला तेव्हा त्यांना कमी महत्त्वाचे उद्योग खाते देण्यात आले आणि राणेंची नाराजी वाढू लागली. काँग्रेस पक्ष आपल्या क्षमतेचा उपयोग करून घेत नसल्याची खंत त्यांना वाटत आहे. पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक हरलो, आता विधानसभेतही पराभवाची नामुष्की येईल या विचाराने ते अस्वस्थ झाले आहेत; पण करायचे काय? शिवसेनेशी युती असेपर्यंत भाजपात प्रवेशाची खात्री नाही. अन्य छोट्या पक्षांची महाराष्ट्रात ताकद उरलेली नाही. त्यामुळे पक्षात राहून विरोधकांची भूमिका बजावण्याची संधी सोडायची नाही अथवा मुख्यमंत्री विरोधकांना एकत्र करून दबाव गट निर्माण करायचा, याव्यतिरिक्त दुसरा पर्याय दिसत नाही.

राणेंनी २00५ साली कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना कार्यप्रमुखपदी बसलेल्या उद्धव ठाकरेंचे वाभाडे काढले. शिवसेनेचे खच्चीकरण होत गेले. उद्धव ठाकरेंवरचा शिवसैनिकांचा विश्‍वास कमी होऊ लागला, त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. मात्र, मोदींच्या प्रभावाचा फायदा शिवसेनेला झाला आणि उद्धव ठाकरे राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी आले. युतीचे खच्चीकरण झाल्याशिवाय कॉँग्रेस पुढे येऊ शकत नाही त्यामुळे राणे हे ठाकरेंवर हल्लाबोल करत आहेत. एकीकडे युतीचे आव्हान आणि दुसरीकडे पक्षात अन्याय अशा कोंडीत सापडलेल्या राणेंचा भावनिक उद्रेक झाला आहे. कोकणात राणे विरुद्ध शिवसेना असे वादंग माजले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याची क्षमता असलेल्या नेत्याने जास्तीत जास्त संयम ठेवून लोकांना आपलेसे केले पाहिजे. आज लोकांना विशषेत: तरुणांना विकासाची भाषा समजते. एकमेकांची उणीदुणी काढण्याची भाषा आवडत नाही. कोकणात जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी नेता म्हणून कोणाकडे पाहायचे? असा प्रश्न विचारला जात आहे. राणेंच्या बंडाचे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP