Thursday, October 16, 2014

पोस्टर लय भारी, रिकामी तिकीट बारी!


विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. ठिकठिकाणी प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. पोस्टर्स, होर्डिंग्ज, वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयसुरू आहे. भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे अशा स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचा धुमाकूळ महाराष्ट्रभर सुरू आहे. या सर्व पक्षांच्या पोस्टर बॉईजना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. 
 
राज्यात ६0-६५ टक्के मतदान झाले तर हे मतदान सर्व पाच प्रमुख पक्ष आणि इतर लहान पक्ष व अपक्ष उमेदवारांमध्ये विभागले जाणार असल्याने क्रमांक एकच्या जागा मिळवणारा पक्ष सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीत असेलच, याची खात्री कोणत्याही पक्षाला वाटत नसावी. यामुळे पोस्टर्सबाजी लय भारी; पण रिकामी तिकिटाची बारी. कोणा एकाच्याच खिडकीवर तुफान गर्दी झाली आहे, असे चित्र दिसण्याची शक्यता नाही. कोणत्याही एका पक्षासाठी मतदानाची भली मोठी रांग लागून त्याचा सिनेमा हाऊसफुल्ल होईल, अशी स्थिती दिसत नाही.

देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र राज्याची सत्ता मिळवणे, ही प्रत्येक पक्षाची महत्त्वाकांक्षा बनली आणि राज्यभर प्रचाराच्या तोफा धडधडू लागल्या. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे हीरो होते. त्यांच्या अत्याधुनिक प्रचार यंत्रणेने राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद निर्माण केली होती. मोदींएवढा प्रभावी नेता देशात दुसरा नाही, असे मत बनवण्यामध्ये भाजपा यशस्वी झाला आणि मोदी पंतप्रधान बनले. मोदी हीरो आणि त्यांना शिवसेना-भाजपा युतीची साथ यामुळे सर्व हिंदुत्ववादी आणि कुंपणावर असलेली मते यांचा एकत्रितपणे परिणाम होऊन महाराष्ट्रात युतीला न भुतो न भविष्यती असे यश मिळाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा दारुण पराभव झाला. युतीला मिळालेले हे यश केवळ मोदींमुळेच मिळाले, असा भाजपाचा समज असल्यामुळे महाराष्ट्राची सत्ता हाती घेण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. त्यातून युती तुटली; परंतु मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच देशात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेससह समाजवादी, राष्ट्रीय जनता दल अशा भाजपेतर पक्षांना ३३ पैकी तब्बल २१ जागा मिळाल्या. यावरून लोकसभेचा कौल अन्य निवडणुकांमध्ये मिळेलच, याची शाश्‍वती देता येत नाही. स्वबळावर निवडणूक लढवूनही भाजपाचीच सत्ता येईल, असा प्रचार सुरू झाला असला तरीही भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना-मनसेसह राष्ट्रवादीनेही जोर लावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना आणि मनसे यांनीदेखील भाजपावर तोफ डागून नरेंद्र मोदींना टार्गेट केले आहे. नरेंद्र मोदींचा उजवा हात असलेले भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य करण्यात आले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अफझलखानाची फौज महाराष्ट्राचे तुकडे पाडायला आली असल्याचा आरोप मोदी व अमित शहा यांच्यावर केला आहे. त्यावर अमित शहांनी शिवसेनेला उंदराची उपमा देताच, शिवसैनिकांची वाघनखे कोथळा बाहेर काढतील, असा मूहतोड जवाब ठाकरेंनी दिला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्याने शिवसैनिकांमध्ये भलताच जोश चढला. तर त्यांची री ओढत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी गर्जना केली. राज ठाकरे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याही भाषणांना चांगलीच धार आली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे उद्धव यांचे कणखर नेतृत्व उभे राहिले असल्याचा विश्‍वास शिवसैनिकांना वाटू लागला आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा जनमानसात रुजवण्याचा प्रयसुरू केला असून प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमधून लोकांच्या शंकाकुशंकांना सर्मपक उत्तरे देत मुख्यमंत्र्यांनी जनमत आकर्षित करण्याचा प्रयनिश्‍चितपणे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर मलीन करण्याचा सर्वतोपरी प्रयसुरू असून त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मराठा समाजासह अन्य घटकही बरोबर राहतील, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर मतदारांवर कोणाचा सर्वाधिक प्रभाव पडला आहे, लोकसभेप्रमाणे याही वेळी मोदींना खरोखर प्रतिसाद मिळेल का, याविषयी संदिग्धता आहे. ज्या मोदींना लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच सोशल मीडियाने भाजपाच्या जाहिरातींची चांगलीच खिल्ली उडवून मोदींना टार्गेट करायला मागे-पुढे पाहिले नाही. यावरून मोदींचा लोकसभा निवडणुकीतील लोकप्रियतेचा आलेख खाली घसरला असल्याचे सिद्ध होत आहे. भाजपावगळता अन्य सर्व पक्षांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लोकांसमोर आहेत; परंतु मोदींना ज्याप्रमाणे पंतप्रधानपदाचे उमेवार म्हणून घोषित करण्यात आले होते, तसा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपाने समोर आणलेला नाही. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री कोण हा संभ्रम अखेरपर्यंत कायम राहिला आहे. भाजपाचे सरकार आले तर पंतप्रधानपदाबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देखील मोदीच सांभाळणार की काय, न कळे! महाराष्ट्राचा ढोबळ मानाने अंदाज घेतला तर सर्वच राजकीय पक्षांची ताकद विखुरली असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, कोकण या पट्टय़ामध्ये विधानसभेच्या ७८ जागा असून येथे क्रमांक एकवर शिवसेना, दोनवर काँग्रेस, क्रमांक तीन भाजप आणि चार राष्ट्रवादी अशी स्थिती आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना-भाजपाचा क्रमांक लागत आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना या पक्षांची ताकद वाढली असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात शिवसेना आणि काँग्रेस तर विदर्भात भाजपाची ताकद चांगली असून त्यांना काँग्रेसचे आव्हान आहे. त्यामुळे भाजपा हा स्वबळावर सत्ता मिळवेल, अशी परिस्थिती दिसत नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येतील, अशीही चर्चा होऊ लागली आहे. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने विधानसभा त्रिशंकू होईल, अशी चिन्हे आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP