Monday, October 27, 2014

बुरसटलेल्या मनाचीही साफसफाई करा!


संपूर्ण देशभर दीपावलीचा आनंदोत्सव साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात एका दलित कुटुंबातील आईवडील आणि त्यांच्या एकुलत्या एका मुलाची हत्या केली जाते. हे हत्याकांड इतक्या निर्घृणपणे घडवण्यात आले की, १९ वर्षांच्या कोवळ्या मुलाचे तुकडे तुकडे करण्यात आले. तिन्ही प्रेते विहिरीत फेकून देण्यात आली. मानवी शरीराचे असे तुकडे केलेले पाहून कोणत्याही माणसाच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हे क्रौर्य पाहून कोणाही सहृदय माणसाची मान शरमेने खाली जाईल.


नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार या देशात आल्याबरोबर मोदींनी पहिले कार्य कोणते हाती घेतले असेल तर ते या देशाची स्वच्छता करण्याचे. आपला भारत देश हा इंग्लंड अमेरिकेसारखा स्वच्छ लखलखीत व्हावा, यासाठी महात्मा गांधी जयंतीपासून त्यांनी सफाई अभियान सुरू केले. स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाईचा संदेश देशभर पोहचवला. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत आहे, रोगराई पसरत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी हे स्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छता ठेवून स्वत:चे आरोग्य चांगले राखावे, याकरिता मोदींनी जाहीरपणे साबणाने स्वच्छ हात धुण्याचा संदेशही दिला; पण बुरसटलेली मने स्वच्छ करण्याचे काम करणार कोण? जातीय विद्वेषाने पछाडलेल्या, बुरसटलेल्या मनाची साफसफाई करण्याची मोहीम मोदी हाती घेणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे.

हिंदुत्व आणि जातीयतेचं नातं घट्ट असून त्यावर जालीम उपाय करणे कोणालाही शक्य झालेले नाही. हिंदुत्वाला गौणत्व देऊन विकासाच्या मुद्दय़ावर देशात परिवर्तन घडवण्याचे आश्‍वासन मोदींनी दिले आहे. हे परिवर्तन केवळ भौतिक सुखासाठी असेल तर शारीरिक आरोग्य, सोयीसुविधा मिळतील; पण मानसिक अवस्था बदलू शकणार नाही. महिलांवरील वाढते अत्याचार, बलात्कार, दलितांवरील वाढते हल्ले, जातीय विद्वेषातून होणारे अन्याय, अत्याचार, जातीय दंगली, दिवसाढवळ्या होणारे खून, मागासवर्गीय अधिकारी-कर्मचार्‍यांवर होणारे अन्याय, विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय व पक्षपातीपणा, शासकीय सेवाभर्तीमधील अन्याय असे सामाजिक स्वास्थ्य नष्ट करणारे घाणीचे साम्राज्य महाराष्ट्रासह देशभर पसरले आहे. त्याची साफसफाई करण्यासाठी मोदी सरकार आणि महाराष्ट्रात येऊ घातलेले भाजपा सरकार काय करणार आहे?

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, राज्याला पुरोगामीत्वाची प्रतिमा मिळवून देणारे महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान करण्याचा प्रमाद या समाजात घडत आहे. जातीय विद्वेष एका टोकाला जाऊन पोहोचला आहे, नव्हे सामाजिक सुधारणांच्या मोहिमा चालवूनही जातीय द्वेष कमी झालेला नाही, जातीय मानसिकता कायम असल्याचे दलित हत्याकांडांनी सिद्ध करून दाखवले आहे. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांची नावे घेऊन दलित मागासवर्गीयांची मते मिळवणार्‍या राजकारण्यांनी, आजवरच्या सत्ताधार्‍यांनी, अण्णा हजारेंसह सामाजिक संघटना चालवणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांनी, दलित अत्याचारविरोधी कायदे करणार्‍या विधिज्ञांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केले असते तर आज या परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा दिसली असती. अनुसूचित जाती जमाती, अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती तसेच जिल्हादंडाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील समित्या यांच्या बैठका घेण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष, विधिमंडळात आश्‍वासने देऊनही विशेष न्यायालये आणि विशेष वकिलांची नियुक्ती करण्याबाबत दुर्लक्ष, कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत दुर्लक्ष आणि अत्याचार होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडेही हेतुपुरस्सर दुर्लक्ष यामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे. सोनई येथे वाल्मिकी समाजातील तीन तरुणांची प्रेमप्रकरणातून खांडोळी करण्यात आली, खर्डा येथे नितीन आगे या दलित शाळकरी मुलाचा सवर्ण मुलीशी प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून खून करण्यात आला, जवखेडे येथे नुकतेच झालेले तिहेरी हत्याकांड देखील अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंगळावर जाण्याइतकी प्रगती झाली; पण सवर्ण मुलीशी दलित मुलांचे प्रेमप्रकरण सहन होऊच शकत नाही. त्यातून ही हत्याकांडे घडत आहेत, हे विशेष.

सरकारमधील भ्रष्टाचार, समाजातील व्यसनासारख्या अनिष्ट सवयी याविरुद्ध आवाज उठवून समाजस्वास्थ्य टिकवण्याच्या वल्गना करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आपल्याच जिल्ह्यात घडत असलेल्या हत्याकांडाबद्दल 'ब्र' देखील काढत नाहीत हे आश्‍चर्यकारक आहे. दलितांवर अत्याचाराची घटना घडली की, रिपब्लिकन पक्ष संघटनांचे नेते त्या गावांना जाऊन भेटी देतात, संताप व्यक्त करतात, परंतु सर्व पक्ष संघटना एकजुटीने रस्त्यावर उतरून दबाव निर्माण करत नाहीत, एका आवाजात निषेध करत नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जातीय विद्वेषातून दलितांचे हत्याकांड झाले की, दलितांच्या पक्षसंघटनांनीच रस्त्यावर उतरायचे, समाजातील इतर जातीय घटकांना त्याबाबत संवेदनाच नाही असे दिसते. आपल्या पुरोगामी राज्य म्हणवणार्‍या महाराष्ट्रात मागासवर्गातील माणसांचे जातीय द्वेषातून तुकडे तुकडे केले जातात, त्या घटनेबद्दल इतरांना काहीच कसे वाटत नाही. माणुसकीच्या भावनेने या प्रकरणाकडे पाहिले जात नाही, याचेच आश्‍चर्य वाटते. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आपल्या आजूबाजूला घडत असताना राज्यातील सर्वपक्षीय नेते घटनास्थळी गेले आणि समाजप्रबोधनाचे चार शब्द तेथे ऐकवले, असे कधी घडले नाही.

दलित कुटुंबातील मुले उच्च शिक्षण घेतात, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात हे तथाकथित उच्च जातींच्या लोकांना आणि स्थानिय नेत्यांनाही सहन होत नाही. दलितांनी जोहार मायबाप म्हणून आपल्या पायरीने राहावे, स्वाभिमान बाळगू नये, ही वरच्या जातींमधील मानसिकता अद्यापि कायम असल्यामुळेच हे दलित हत्याकांडांचे प्रकार वाढत चालले आहे. बुरसटलेल्या मानसिकतेची साफसफाई करण्यासाठी मोदी सरकारने एखादी साफसफाई मोहीम सुरू करावी, लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आखावेत, स्वत: मोदींनी या हत्याकांडांचा जाहीर निषेध करावा, रेडिओ, टीव्हीवर या विषयाचे प्रबोधनपर भाषण देण्यासाठी एक दिवस राखून ठेवावा, येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी भाषण देऊन देशभर मानसिकतेच्या साफसफाईचा संदेश द्यावा. तरच खर्‍या अर्थाने परिवर्तन होईल; अन्यथा भाजपा सरकार आल्याबरोबर बुरसटलेल्या मानसिकतेचे मनोबल अधिक वाढवण्याचे जे काम हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केले आहे. त्यामुळे जातीय तेढ तीव्र स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP