Monday, December 15, 2014

भाजपाने खुला केला हिंदुत्वाचा छुपा अजेंडा

नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या नावाने झंझावाती प्रचार करून लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवून दिले आणि 'अच्छे दिन आये' असे म्हणत भाजपाचा वारू चौखूर उधळू लागला. देशामध्ये प्रथमच असे अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर इतके दिवस छुपा असलेला हिंदुत्वाचा अजेंडा खुला होऊ लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदुत्ववादी संघटना दहा तोंडांनी हिंदुत्वाच्या अजेंड्याचे सूतोवाच करत असतात. त्यावर जनमानसांतील प्रतिक्रिया आजमावून तो अजेंडा पुढे रेटला जातो. 

गोबेल्स नीतीने लोकांच्या माथी मारण्यात येणारे विचार आता मोदींच्या मुखातून देशपातळीवर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले जात असल्याने आरएसएसला व्यापक अवकाश प्राप्त झाले आहे. बहुमत मिळाल्यामुळे मनोबल वाढले असून या पक्षाचे हरयाणाचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्र्यांपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हिंदुत्वाचे गोडवे गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या सर्वधर्मसमभावाच्या मार्गदर्शक तत्त्वाला हरताळ फासून भारतीयांवर हिंदुत्व लादण्याचा हा प्रकार उघडपणे अमलात आणला जात आहे. देशाची धुरा वाहणार्‍या मोदींनीच याची सुरुवात केली असल्यामुळे मंत्री असलेल्या साध्वी निरंजनदेवी आणि ज्येष्ठ मंत्री सुषमा स्वराज या तरी मागे कशा राहतील? जे नेते सत्तेच्या केंद्रभागी आहेत, अशाच नेत्यांनी त्यांचा अजेंडा समोर ठेवण्यास सुरुवात केली आहे. आपण जी विधाने करतो त्याला शास्त्रीय आधार आहे की नाही, ज्या राज्यघटनेतील कायद्यानुसार सत्ता मिळाली, त्या घटनेची पायमल्ली तर होत नाही याचा सारासार विचारही केला जात नाही.

मोदींनी सत्तेवर येताच भारतीय इतिहास संशोधन परिषदेवर कट्टर हिंदुत्ववादी सुदर्शन राव यांची नियुक्ती करून इतिहासाचे भगवीकरण करण्याचा संदेशच जणू दिला. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये लव्ह जिहादचा नारा देऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हिंदू-मुस्लीम अशी उभी फूट पाडण्याचा प्रय▪केला. 'आप का खून क्यौ नहीं खौलता' अशी आक्रमक भाषा केली होती. तेथील अखिलेश सिंह सरकारने कल्याणकारी योजनांमध्ये मुस्लिमांसाठी २0 टक्के आरक्षण ठेवल्यामुळे अमित शहांनी 'महेश का हक महम्मद को क्यों' असा सवाल उपस्थित केला. बिहारमधील भाजपाचे खासदार गिरीराज सिंग यांनी 'मोदींच्या टीकाकारांनी पाकिस्तानात जावे' असे वक्तव्य ऐन निवडणुकीत करून हिंदू अजेंड्याचा प्रत्यय दिला, तर मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी शाळांमध्ये गुजरातप्रमाणे तिथी भोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यमंत्री निरंजनदेवी यांनी, तर रामाला मानणारे 'रामजादे' आणि न मानणारे 'हरामजादे' असे प्रक्षोभक विधान केले. त्यावर मोदींना स्पष्टीकरण देऊन माघार घ्यावी लागली. सध्या संघाच्या आदेशाने बजरंग दलातर्फे देशभर धर्मांतराचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यानंतर मुंबईतील हरकिसनदास या खाजगी रुग्णालयाचे उद््घाटन करताना महाभारताचा हवाला देत कर्णाची उत्पत्ती ही टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानाने झाल्याचे सांगून त्या काळी जैविक शास्त्र प्रगत होते, तसेच प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून श्रीगणेशाच्या मानवी देहावर हत्तीचे मुंडके जोडण्यात आले होते. यावरून प्लास्टिक सर्जरीची कलाही अवगत होती, असा गौरव केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नवृत्त शिक्षक दीनानाथ बात्रा यांच्या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत विमानातून प्रवास करण्याचा पहिला मान श्रीरामांना मिळाला असल्याने विमान बनवण्याची कलाही त्याकाळी अवगत होती, असे त्यांनी नमूद केले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी पुराणातील कथांची तुलना अत्याधुनिक विज्ञानाशी करावी याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वात वादग्रस्त आणि खळबळजनक वक्तव्य करून हिंदुत्वाचा अजेंडा अधिक उघडपणे अधोरेखित केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भगवद्गीता भेट दिल्याचा उल्लेख एका जाहीर सभेत करून, भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळेल, असे आश्‍वासन दिले. त्यावर हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी गीतेचे महत्त्व संविधानाएवढेच असल्याचे, तर शिवसेनेचे अनंत गीते यांनी भगवद्गीतेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे वक्तव्य केले. संसदेमध्ये प्रचंड गदारोळ होऊन स्वराज यांना सारवासारव करावी लागली. अशाप्रकारचे विचार व्यक्त करण्याची स्वराज यांची पहिलीच वेळ नाही, यापूर्वी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर आपण केशवपन करू, असे प्रतिगामी वक्तव्य त्यांनी केले होते. सर्वधर्मसमभावाचे तत्त्व अंगीकारलेल्या आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ संविधान हाच आहे. कोणत्याही धर्मग्रंथाला अशी मान्यता देऊ नये, असे सांगत बसपाच्या अध्यक्षा मायावती, तृणमूल काँग्रेसच्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्वराज यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हिंदूधर्मशास्त्रांसह भगवद्गीतेने चातुर्वण्र्य, विषमता आणि जातीयतेचा पुरस्कार केल्यामुळे संपूर्ण भारत देशात उच्च, नीच भावना पसरली. या धर्माचे अनुयायीदेखील एकसंध राहिले नाहीत असा इतिहास आहे. मात्र भगवद्गीतेला तमाम हिंदुधर्मीयांनी प्रमाण धर्मग्रंथ मानून, त्यातील चमत्कारिक, आधिदैविक व गूढ, आध्यात्मिक तत्त्वज्ञानाविषयी आदरभाव बाळगला आहे. त्यामुळे या ग्रंथाची वैज्ञानिक मापदंडाने निर्भय व प्रामाणिक चिकित्सा आणि समीक्षा होऊ शकत नाही.

भगवद्गीतेमध्ये नवनवीन काल्पनिक शब्दांची आरास मांडून, असिद्ध पारमार्थिक तत्त्वांचे लेपन करून, अनाकलनीय विशेषणांची पेरणी करून गीतेला भक्तिभावाने शरणागत होताना लेखकांची जणू स्पर्धाच लागलेली दिसून येते, असे मत 'गीता तत्त्वज्ञानाची उलटतपासणी' या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात लेखक शशिकांत हुमणे यांनी मांडले आहे. गीतेची महानता जनमानसावर बिंबवण्याचा प्रय▪गेली हजार-दीड हजार वर्षे अखंडितपणे केला जात आहे, हे सुषमा स्वराज यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. भगवद्गीता आणि त्यावरील भाष्य यांच्यावर असंख्य ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्‍वरांनीदेखील ज्ञानेश्‍वरीमध्ये गीतेवर भाष्य करताना चातुर्वण्र्य आणि जातीयतेला मान्यताच दिली आहे. सती जाणार्‍या स्त्रियांचा गौरव, तर वांझ, विधवा स्त्रियांविषयी तुच्छता वर्तवली आहे. वर्णव्यवस्था आणि चातुर्वण्र्य व्यवस्था भगवंतानेच निर्माण केली असल्याचे गीतेत म्हटले आहे. विश्‍वाच्या निर्मात्याने चातुर्वण्र्य व्यवस्था आणि उपेक्षित स्त्रियांना भारतातच का निर्माण केले, याचे उत्तर हिंदू धर्ममार्तण्ड आणि भगवद्गीतेच्या भाष्यकारांकडे नाही. आत्मा, परमात्मा, परमेश्‍वर, कर्मकांड, पुनर्जन्म यांच्या भाकडकथांनी लोकांना एकप्रकारच्या भ्रमात आणि मोहात टाकले आहे. आजच्या वैज्ञानिक युगातदेखील माणसे यामुळे संमोहित झाली असून भावनिक राजकारणाला प्रतिसाद देत आहेत. हिंदूधर्माने ज्यांच्या आयुष्यात कायम अंधार केला होता त्या शोषित, उपेक्षित, दलित, पीडित, वंचित समाजाला संविधानाने सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून दिले. त्यामुळे संविधान हाच खरा राष्ट्रीय ग्रंथ असून एखाद्या धर्मग्रंथाला राष्ट्रीय गं्रथाचा दर्जा देणे हा संविधानाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी यांना भारतातील जनतेने विकासाच्या मुद्दय़ावर निवडून दिले आहे. धर्माच्या अजेंड्यावर नव्हे, याचे भान ठेवले पाहिजे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP