Monday, December 29, 2014

नवे वर्ष, नवी स्वप्ने, नवा उन्माद

देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव करून भारतीय जनता पक्षाचे सरकार विराजमान झाले. जनतेला विकासाची नवी स्वप्ने दाखवून गेल्या ६५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणण्यात नरेंद्र मोदींना यश आले. काँग्रेसच्या गांधी-नेहरू घराण्यांनी कायम सत्ता हातात ठेवून घराणेशाहीचा ठपका ओढवून घेतला. या घराणेशाहीचा तसेच काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घराघरांत पोहचवून मोदींनी काँग्रेसला पुरते लोळवले. 


सरलेले वर्ष हे काँग्रेससाठी अत्यंत वाईट वर्ष ठरले. या वर्षात केंद्रात आणि राज्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जेमतेम ४४ खासदार येऊ शकले, तर राज्यातील ४८ जागांपैकी केवळ दोन जागा काँग्रेसने जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी केवळ ४२ जागा जिंकता आल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. काँग्रेसची १२५ वर्षांची परंपरा, मोठमोठय़ा नेत्यांची परंपरा, प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव याचा मोदींच्या झंझावाती प्रचारापुढे निभाव लागला नाही. काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा एवढा गवगवा आजवर कोणीही केला नसेल. वेगवेगळ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरकारे जाऊन त्या ठिकाणी भाजपाची सरकारे विराजमान झाली आहेत. काँग्रेसच्या राज्यकारभाराविरुद्ध जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्रातही १५ वर्षांचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार येथील जनतेने हद्दपार केले.

नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत विकासाची भुरळ पाडली आणि प्रथमच पूर्ण बहुमताचे भारतीय जनता पक्षाचे सरकार आणले. केंद्रात भाजपा सरकार येताच देशातील हिंदुत्ववादी संघटनांनी उचल खाल्ली असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी निर्माण केलेला हा उन्माद देशात परिवर्तन घडवण्याच्या विचारांनी प्रेरित झाला असून देशातील वातावरण बदलण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारांतही मोदींनी फक्त विकासासाठी भाजपाला मते देण्याचे आवाहन केले. लोकांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला असल्याने लोकांचा विश्‍वास सार्थ करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. लोकांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती करण्याच्या दिशेने त्यांनी कोणती पावले टाकण्यास सुरुवात केली आहे, हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. मात्र हिंदुत्ववाद्यांनी जे आरंभले आहे ते मोदींच्या कारभारात अडथळा निर्माण करणारे नक्कीच आहे. काही काळ आलेली बिगर काँग्रेसी सरकारे वगळता या देशावर काँग्रेसचेच अधिराज्य राहिले होते. सरलेल्या वर्षामध्ये या देशातील जनतेने काँग्रेसचा इतका दारुण पराभव केला की, या पराभवातून काँग्रेस अद्यापि सावरलेली नाही. काँग्रेस पुन्हा सावरेल अथवा न सावरेल; परंतु नरेंद्र मोदी सरकारने आपल्या कारभाराची दिशा स्पष्ट करणे आवश्यक आहे. काळा पैसा भारतात आणू, महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करू, शासकीय कामे विनाविलंब पूर्ण करू, भ्रष्टाचार समूूळ नष्ट करू, शासकीय कामामध्ये पारदर्शकता आणू, भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई करू, अशी आश्‍वासने मोदींनी आणि भाजपाने या देशातील जनतेला दिली आहेत. संपूर्ण देश पाच वर्षांत सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी भाजपाला विजयी करा, असे सांगताना मोदी आपल्या भाषणात म्हणत असत की, 'काँग्रेस को आप लोगों ने साठ साल दिये है, आप मुझे साठ महिने दीजिए, मैं आपका हर सपना पुरा करने का विश्‍वास दिलाता हूँ' मोदींच्या अशा प्रकारच्या लोकांच्या हृदयाला हात घालणार्‍या वाक्यांवर भाळून लोकांनी भरभरून मतदान केले. आता त्यांच्या परीक्षेची घडी समीप येत आहे. त्यांच्या दिल्लीतील सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत. तर भाजपाचे नवे सरकार महाराष्ट्रात येऊन दोन महिने झाले आहेत. हा काळ तसा फार मोठा नाही; परंतु दिलेल्या आश्‍वासनांची झलक तरी दिसली पाहिजे. तसे काही अद्यापि दिसलेले नाही.

महाराष्ट्रात भाजपाला ४४ वरून १२२ जागा मिळाल्या आहेत. १५ वर्षे महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेना युतीला दूर ठेवले होते.; परंतु या वेळी लोकांनी भाजपावर विशेष प्रेम दाखवले आहे. यापाठोपाठ शिवसेनेलाही स्वीकारले आहे. राज ठाकरे यांचे नवनिर्माणाचे स्वप्न जनतेने दुभंगून टाकले आहे. याच राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेला २00९ साली जनतेने स्वीकारले होते; परंतु नवनिर्माणाचा अपेक्षाभंग झाल्याने जनतेने त्यांना घरी बसवले आहे. कल्याण, डोंबिवली व नाशिकची सत्ता लोकांनी त्यांना दिली होती. जनतेला सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. हीच जनता शितावरून भाताची परीक्षा करू लागली आहे, हे मनसेच्या पराभवाने सिद्ध करून दाखवले आहे. याचा धडा भाजपानेही घेतला पाहिजे.

भाजपाचे सरकार दिल्लीमध्ये आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांना आनंदाचे पेव फुटले आहे. ते धर्मांतरबंदी कायदा आणण्याची मागणी करताना विरोधी विचारसरणीच्या पक्ष संघटनांवर जहाल टीका करत आहेत. भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्याचे आश्‍वासन दस्तुरखुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या देत आहेत. महाराष्ट्रातही नथुराम गोडसेंचे पुतळे उभारण्याची वक्तव्ये केली जात आहेत. नथुराम गोडसेंच्या चित्रपटाचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. जातीय तेढ निर्माण करणारी भाषा बोलली जात आहे. मराठा आरक्षणाला सर्मथन, तर मुस्लीम आरक्षणाला बाजूला सारण्याचा प्रयत्न, यामुळे मुस्लिमांमध्ये असंतोष पसरत आहे. हा देश धर्मनिरपेक्ष असून स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांचा पुरस्कार करणारा आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मोदी यांच्या विकासाच्या मुद्दय़ावर जनतेने मतदान केले आहे, याचे भान ठेवले जात नाही. हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबवण्याची घाई झाली आहे. हा देश संविधानातील कायद्याच्या तरतुदींवर चालतो. भगवद्गीता व तत्सम ग्रंथांना राष्ट्रीय मान्यता देणे म्हणजे केवळ मध्ययुगीन काल्पनिक बाबींचा पुरस्कार करणे होय. म्हणून भाजपाच्या धुरीणांनी जहालमतवादी वक्तव्ये करणार्‍यांना गप्प बसवणे, हेच त्यांच्या हिताचे होईल. नव्या वर्षात धार्मिक भावनांना खतपाणी घालणारी संविधानविरोधी वक्तव्ये थांबवून लोकोपयोगी, समाजहिताच्या योजना कार्यान्वित करण्याचे काम भाजपा सरकारे करतील, अशी अपेक्षा करू या.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP