Friday, March 27, 2015

खेकडा प्रवृत्तीने केला काँग्रेसचा र्‍हास


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आत्मचिंतन करून, चुका दुरुस्त करून जोरात कामाला लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु ज्या तरुण नेतृत्वाच्या खांद्यावर ही जबाबदारी आली होती,ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक अज्ञातवासात निघून गेले. ते सुट्टीवर गेल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फेरबदल करण्यात आले. प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण आणि मुंबई प्रदेश अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली. हे दोघे जण कार्यकर्त्यांचे मनोबल कसे वाढवू शकतील, हे येत्या काही काळात दिसून येईलच;परंतु चव्हाण-निरुपम यांच्या नियुक्तीने काँग्रेस पक्षात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेस जिवंत ठेवायची कशी? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे.



लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन पक्षात कमालीची मरगळ आली, कार्यकर्त्यांचे मनोबल खचले, अनेकांनी पक्ष बदल केले, कित्येक जणांनी पक्षाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. अखेर पक्षश्रेष्ठींना नियुक्त्यांचा मुहूर्त सापडला. नियुक्त्या जाहीर होताच असंतोष उफाळून आला. पहिली आक्रमक प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नोंदवली आणि बंडाचा पवित्रा घेऊन प्रसारमाध्यमांकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली. राणे हे पुन:श्‍च बंड करणार असे दिसताच काँग्रेससह राणेंच्या भवितव्याची चर्चा रंगू लागली. मात्र राणेंनी तूर्तास तलवार म्यान करून ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधून काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजू सातव हे दोनच खासदार निवडून गेले असल्याने माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार असलेल्या अशोक चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली, तर केवळ बिहारमधील हिंदी भाषिक असलेले, बोलण्यामध्ये पोपट असलेले संजय निरुपम यांचा सुमारे चार लाख मतांनी पराभव होऊनही त्यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष नेमण्यात आले. या दोघांच्या नियुक्त्या करताना कोणते निकष लावले? ज्या निकषावर नियुक्त्या झाल्या, त्या करताना पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना विश्‍वासात घेतले नाही, ज्येष्ठ नेत्यांशी विचारविनिमय केला नाही, अशी ओरड होऊ लागली आहे. वास्तविक पाहता काँग्रेसची स्थिती डबघाईला आलेली असताना ती सावरायची असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला प्रभावी आणि आक्रमक तसेच कार्यक्षम आणि लोकप्रिय असलेल्या नेत्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर राणे हे निकष पूर्ण करणारे नेते निश्‍चितपणे आहेत. मात्र सहनशिलतेचा अभाव आणि सारासार विचार न करता प्रतिक्रियात्मक स्वभाव कायम त्यांच्या नियुक्तीआड आलेला आहे. काँग्रेस पक्षाने आणि विशेषत: काँग्रेसमधील निष्ठावंतांनी राणेंना कायम विरोध केला आहे, तो याच कारणास्तव. राणे यांचा तीव्र आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या पठडीत बसणारा नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसमधील सर्व गटातटांना बरोबर घेऊन पक्षविस्तारावर ते लक्ष केंद्रित करतील, अशी खात्री नेत्यांना वाटत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत राणेंचा झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी तर लागलाच; पण हाच निकाल पक्षातील त्यांच्या नियुक्तीविरोधात गेला. त्यांचे चिरंजीव नीतेश राणे हे कोकणात नरेंद्र मोदींची लाट आलेली असतानाही विजयी झाले, त्यामुळे 'गड आला पण सिंह गेला' अशी राणेंची अवस्था झाली. खरे तर सिंधुदुर्गवर असलेला प्रभाव आणि वर्चस्व राणेंना टिकवता आले नाही, असा पक्षश्रेष्ठींचा झालेला समजही राणेंच्या विरोधात गेला आहे. खरे तर सिंधुदुर्गात राणे निवडून येऊ नयेत यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे आणि काँग्रेसमधील राणे विरोधक छुपेपणाने कार्यरत असल्यामुळे त्यांचा प्रभाव झाला हे सर्वश्रुत आहे. अशोक चव्हाण मात्र मोदी लाटेतही लोकसभेत विजयी झाले. त्यामुळे त्यांची नियुक्ती करणे पक्षाला सोपे झाले, असा साधा हिशोब काँग्रेस पक्षाने केलेला दिसतो.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांची प्रतिमा 'मिस्टर क्लीन' अशी झाली होती; परंतु स्वत: निवडून येण्यासाठी त्यांना आपल्या मतदारसंघात अधिक काळ अडकून पडण्याची वेळ आली. शेवटच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेस कारभारासंबंधी केलेल्या जाहिराती हास्यास्पद ठरल्या. मोदी लाटेत या जाहिराती आणि काँग्रेसचा प्रचार वाहून गेला. पृथ्वीराज बाबांना लोकनेता अशी प्रतिमा तयार करता आली नाही. त्याचा काँग्रेसला फटका बसला. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद अथवा प्रदेशाध्यक्षपद यापैकी एकही पद मिळू शकले नाही. विरोधी पक्षनेतेपद माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात आले. नारायण राणे हे शिवसेनेतून आले असल्यामुळे त्यांना प्रमुख पद देण्यास विरोध; परंतु काँग्रेसमधून शिवसेनेबरोबर गेलेले, पुन्हा स्वगृही परतलेले आणि नंतर मोदी लाटेने प्रभावित झालेले, पक्षात फूट पाडून भाजपात जाण्याच्या तयारीत असलेले विखे-पाटील त्यांना मात्र विरोध नाही. मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष करावयाचा असेल तर तो मूळचा काँग्रेसचाच असला पाहिजे;परंतु संजय निरुपम हे मूळचे शिवसेनेचे असून त्यांनी नंतर पक्षबदल केलेला असतानाही त्यांना मुंबईचे अध्यक्ष करण्यात आले, असे हे अजब तर्कशास्त्र काँग्रेस पक्षातच पाहावयास मिळते. राणे हे प्रमुख पदाची महत्त्वाकांक्षा असलेले नेते असून त्यांची ही महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही;परंतू मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी काँग्रेसशी उघड बंड केले आणि स्वत:चे निलंबन ओढवून घेतले. त्या वेळी राणेंना काँग्रेस कळलीच नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय वतरुळात उमटली होती. ते जेव्हा पुन:श्‍च पक्षात कार्यरत झाले, तेव्हा मात्र त्यांचे क्रमांक दोनचे महसूल मंत्री जाऊन त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचे उद्योग मंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासून राणेंचे पक्षातील महत्त्व कमी होत गेले. ते आजतागायत कायम राहिले.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदुरकर हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. काँग्रेस पक्षाची बाजू भक्कमपणे मांडतानाच काँग्रेसचा प्रमुख शत्रू असलेल्या भाजपावर हल्लाबोल करण्यात ते आघाडीवर असत; परंतु त्यांच्या कार्यकाळात त्यांना मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी अजिबात सहकार्य केले नाही. उलट त्यांचे पाय खेचण्याचा प्रय▪होत राहिला. माणिकराव ठाकरे आणि जनार्दन चांदुरकर यांना बदलले असले तरी प्रभारी मोहन प्रकाश यांना कधी बदलणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मोहन प्रकाश यांच्याएवढा निष्क्रिय प्रभारी आजपर्यंत कधीही काँग्रेसला लाभला नव्हता. त्यामुळे त्यांना दिल्लीला परत बोलावून घ्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

अशोक चव्हाण यांनी नांदेडचा गड राखला असला तरी त्यांच्यावर आदर्श घोटाळा आणि पेड न्यूजचा आरोप असून त्यासंबंधी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. शिवसेना-भाजपाने आदर्श घोटाळ्याचा एवढा प्रचार केला आहे की सर्वसामान्य माणसेदेखील चव्हाणांचे नाव येताच 'आदर्श घोटाळा' अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एवढा हा घोटाळा जनमानसावर रुजवण्यात शिवसेना-भाजपाला यश आले आहे. त्यांची नियुक्ती होताच दुसर्‍या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने आदर्श घोटाळ्यातून नाव वगळण्याचा त्यांचा अर्ज फेटाळून लावला, त्यामुळे घोटाळ्याची टांगती तलवार डोक्यावर ठेवून चव्हाणांना पक्षकार्य करावे लागणार आहे. काँग्रेस जगवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावावे लागणार आहे, यासाठी ते कशी रणनीती आखतात, हे लवकरच दिसून येईल. मात्र काँग्रेस नेत्यांची खेकड्याप्रमाणे एकमेकांचे पाय खेचत राहण्याची प्रवृत्ती असल्यामुळे काँग्रेसचा र्‍हास होऊ लागला आहे. सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेला, स्वातंत्र्यलढा यशस्वी केलेला आणि सुमारे साठ वर्षे देशावर राज्य केलेला काँग्रेस पक्ष रसातळाला जाऊ लागला असून लोकशाही राज्य व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदही मिळवू शकत नाही, ही पक्षासाठी लांच्छनास्पद बाब आहे. खेकड्यांच्या या दुनियेत राणेंचे भवितव्य काय असेल? शिवसेना-भाजपामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना जागा नाही आणि काँग्रेसमध्ये त्यांची प्रचंड कोंडी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये शांत बसून जे जे होईल ते पाहात बसण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. काँग्रेसच काँग्रेसचा शत्रू असल्याचे सिद्ध झाले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP