Saturday, March 28, 2015

काँग्रेस-शिवसेनामुक्त महाराष्ट्र अभियान

राष्ट्रवादी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष राज्याला काँग्रेसमुक्त करण्यासाठी एकत्र आले आहेत,
असे या दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी राष्ट्रवादीला जवळ
करण्याचे धोरण हा पहिला टप्पा असला, तरी प्रादेशिक पक्ष संपवणे हा दुसरा टप्पा आहे़
भाजपाला काँग्रेससह शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा असून प्रादेशिक पक्ष संपवण्याची भीष्म
प्रतिज्ञा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच केली आहे...



राज्यात अनेक प्रकारची अभियाने सुरू
असतात़ त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत
अभियान चांगलेच वाजले-गाजले़ आता महाराष्ट्रात
काँग्रेस-शिवसेनामुक्त महाराष्ट्र हे अभियान सुरू असून
ते पूर्ण करण्याचा विडा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने
उचलला आहे़ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख
यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठ नेत्याला सभापतीपदावरून दूर
करण्यासाठी महाराष्ट्रात जे राजकारण घडले त्यामुळे राजकीय
वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे़ राष्ट्रवादी
काँग्रेसने देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव आणला असता
भाजपाने थेट, तर शिवसेनेने तटस्थ राहून ठरावाला छुपे
समर्थन दिले़ त्यामुळे देशमुखांवर पायउतार होण्याची वेळ
आली़ हा अविश्वास ठराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या
उमेदवाराची सभापतीपदी बिनविरोध निवड पाहता राष्ट्रवादी
आणि भाजपा उघडपणे एकत्र आले असून शिवसेनेलाही
त्यांच्यासोबत फरफटत जावे लागले असल्याचे चित्र समोर
आले आहे़ या तिन्ही पक्षांचे वर्तन पाहून सर्वकाही सत्तेसाठी
हा समज दृढ झाला आहे़ देशमुख हे जुन्या पिढीतील
काँग्रेसचे निष्ठावान राजकारणी होते़ त्यांच्यासारख्या ज्येष्ठ
नेत्याला असे अपमानित करून पदावरून घालवण्यात आले़
यावरून राजकारण कोणत्या स्तराला जाऊन पोहोचले आहे,
याची कल्पना येऊ शकते़
मतदारराजाला गृहित धरून उज्ज्वल भविष्याची स्वप्ने
दाखवत निवडणुका लढवायच्या, प्रत्यक्षात व्यक्तिगत
स्वार्थाचे राजकारण करत राहायचे़ ‘आम’ जनता नेत्यांची
ही बनवाबनवी पाहत असून त्यांचा भ्रमनिरास होत चालला
आहे़ तत्त्वहीन राजकारण करणाºयांना जनता त्यांची जागा
कशी दाखवून देते, याचा वस्तुपाठ दिल्लीतील आम जनतेने
दिला आहे़ दिल्लीतील जनतेने काँग्रेस आणि भारतीय जनता
पक्ष या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवून आम आदमी
पक्षाला भरभरून मते दिलीआणि विक्रमी बहुमताने अरविंद
केजरीवाल यांचे सरकार आणले़ सर्व नीतिमूल्ये आणि
पक्षाची तत्त्वप्रणाली धाब्यावर बसवून राज्याचा गाडा हाकणारे
कारभारी आणि विरोधक यांची अभद्र युती विधिमंडळात
झाली असल्याचे लोकांना कळून चुकले आहे़
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी
एकमेकांवर आगपाखड करणारे जेव्हा निवडणुकीनंतर एकत्र
येतात, एकमेकांचे पराकोटीचे विरोधक असलेले गळ्यात
गळे घालतात, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो़
राजकारणाची रेघ कधी सरळ नसते़ तिला कधी तिरकस
वळण द्यावे लागते, तर कधी आडवळणाने जावे लागते़ हे
खरे असले तरी राजकारण करताना समान धागा पकडावा
लागतो़ सत्ता हाच समान धागा मानून सतत सत्तेत अथवा
सत्तेच्या जवळ राहू पाहणाºया राष्ट्रवादीसारख्या पक्षाला
आज अनुकूल परिस्थिती लाभली आहे़ सरकार स्थापन
करण्यासाठी कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत नसेल आणि
त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असेल, तर मात्र बळी तो
कानपिळी या न्यायाने साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण
करणारा ताकदवान पक्ष सतत कुरघोडीच्या प्रयत्नात असतो़
हाच प्रयोग राष्ट्रवादीने सुरू ठेवला आहे़ भाजपाला पूर्ण
बहुमत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससारख्या केवळ सत्तेसाठी
जन्मलेल्या पक्षाला आयती संधी मिळाली आणि
या पक्षाने सर्वप्रथम भाजपाला बिनशर्त
पाठिंबा दिला. राष्ट्रवादीने ही जी खेळी
केली, त्यामुळे राजकारणाची पुढील
दिशा आणि बदलती समीकरणे
याची झलक दिसून आली़ ‘पार्टी
वुइथ डिफरन्स’ असा दावा करणाºया
भाजपानेही राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा
घेतला़ मात्र, त्यामुळे भाजपावर
टीकेचा भडिमार झाला़ ज्या पक्षाने राष्ट्रवादी
काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल करून राष्ट्रवादी नव्हे
भ्रष्टवादी पार्टी असा जाहीर आरोप केला होता, त्याचे
सोयीस्कर विस्मरण या पक्षाला झाले आहे; परंतु पूर्ण
बहुमत देऊन महाराष्ट्रातील जनतेने युतीच्या बाजूने कौल
दिला असल्याने अखेर शिवसेनेशी युती करण्यात आली.
शिवसेनेच्या पाठिंब्याने सरकार स्थिर झाले खरे, मात्र
राष्ट्रवादीशी असलेली छुपी मैत्री कायम राहिली़ अविश्वास
ठराव आणि सभापतींची निवड या वेळी झालेल्या राजकारणाने
ती उघड झाली़ अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ४०
मतांचा कोटा पूर्ण करण्यास राष्ट्रवादीला भाजपाने मतदान
करून मैत्री घट्ट असल्याची जाहीर कबुलीच दिली़ अर्थात
भाजपा-राष्ट्रवादीची ही मैत्री उघड करण्याची यशस्वी
खेळी काँग्रेसने केली, हेही तितकेच खरे़ विधान परिषदेत
सर्वाधिक २८ सदस्य संख्या असल्यामुळे राष्ट्रवादीने विरोधी
पक्षनेतेपदावर हक्क सांगून विरोधी पक्षनेतेपद
मिळवले आणि याच बळावर सभापतीपदही
राष्ट्रवादीला हवे होते; परंतु काँग्रेसने
उपसभापतीपद दिले तरच देशमुख
राजीनामा देतील, असे जाहीर करून
राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न
केला़ तरीदेखील बहुमत असल्याने
सभापतीपदावर आपलाच हक्क
आहे, असे मानून कोणतीही तडजोड
स्वीकारण्यास राष्ट्रवादीने नकार दिला.
भाजपाचा पाठिंबा असल्यामुळेच देशमुखांवर अविश्वास
ठराव आणून काँग्रेसला काटशह दिला़ राष्ट्रवादीचे रामराजे
नाईक-निंबाळकर हे सभापतीपदी विराजमान झाले़ त्यांची
निवड बिनविरोध झाली असली, तरी ती होण्याआधीदेखील
चांगलेच राजकारण घडले़ सर्वच प्रमुख पक्षांनी आपले
उमेदवार रिंगणात उतरवले़ शिवसेनेच्या नीलम गोºहे,
तसेच शिवसेनेच्या जवळ असलेले अपक्ष श्रीकांत देशपांडे
आणि काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी उमेदवारी अर्ज भरला़
मात्र, स्वतंत्रपणे लढून यापैकी कोणीही निवडून येतील,
असे त्यांचे संख्याबळ नसल्याने या सर्वांना उमेदवारी मागे
घेण्याशिवाय पर्याय नव्हता़ भाजपा-राष्ट्रवादीची मैत्री
अविश्वास ठरावाने उघड तर झाली; पण सरकारमध्ये
सहभागी असलेल्या शिवसेनेचे काय? भाजपा हा पक्ष
शिवसेनेला मित्र मानतो की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला;
पण एका रात्रीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाशी
सल्लामसलत करून तोडगा काढला आणि आश्चर्य म्हणजे
शिवसेनेने उमेदवारी मागे घेतली़ शिवसेनेने उमेदवारी मागे
घेताना भाजपाशी सामंजस्य करार केले असल्याची शक्यता
नाकारता येत नाही़ वांद्रे येथे शिवसेनेचे आमदार बाळा
सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांच्या पत्नीला
पोटनिवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले असून भाजपाने
पाठिंबा द्यावा, उपसभापतीपद द्यावे, तसेच चांगली खाती
आणि राज्यमंत्र्यांना अधिकार मिळावेत, अशा मागण्या
मान्य करून घेतल्या असाव्यात; परंतु भाजपा-राष्ट्रवादी
यांच्या साटेलोट्यामध्ये उपसभापतीपद भाजपाला मिळेल,
असे आधीच ठरले असल्याचे समजते़शिवसेनेने
सभापतीपदासाठी जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतली
असली, तरी कुरबुरी कमी होतील, असे समजण्याचे कारण
नाही़ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २०१७मध्ये असून
तोपर्यंत युतीचे सरकार कसेबसे तग धरेल़ त्यानंतर सरकार
स्थिर राहीलच, याची खात्री देता येत नाही़ सरकार केवळ
आकड्याने स्थिर राहणार नाही, युतीचा धर्म पाळला तरच
राहू शकेल़ शिवसेनेने जर काडीमोड घेतला तर राष्ट्रवादीशी
असलेली मैत्री भाजपाला सरकार स्थिर ठेवण्यासाठी ऐनवेळी
उपयोगी ठरू शकते़
राष्ट्रवादी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष राज्याला
काँग्रेसमुक्त करण्यासाठी एकत्र आले आहेत, असे या दोन्ही
पक्षांनी जाहीर केले आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी
राष्ट्रवादीला जवळ करण्याचे धोरण हा पहिला टप्पा असला,
तरी प्रादेशिक पक्ष संपवणे हा दुसरा टप्पा आहे़ भाजपाला
काँग्रेससह शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा असून प्रादेशिक
पक्ष संपवण्याची भीष्मप्रतिज्ञा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित
शहा यांनीच केली आहे़ स्वबळावर निवडून येण्याची ताकद
निर्माण झाल्यानंतर प्रादेशिक पक्षांना बाजूला फेकून देण्याची
भाजपाची रणनीती स्पष्ट झालेली आहे़ त्यातूनच राष्ट्रीय
समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी
संघटना या राज्यातील प्रादेशिक पक्षांना सत्तेत वाटा देण्यात
आला नाही़ राष्ट्रवादीला सध्या जवळ केले असले, तरी
ही मैत्री कायमस्वरूपी राहील, याची शाश्वती नाही. याचे
कारण राष्ट्रवादी हादेखील एक प्रादेशिक पक्ष आहे़ याची
जाणीव असल्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी
थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच जमवून घेतले आहे़
पवार आणि मोदी यांच्यात भांडवलदारांची जवळीक हा
समान धागा असल्याने त्यांची मैत्री वाढली आहे़ या दोन
पक्षांचे सूत जमल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला
सारण्यासाठी त्यांनी हातमिळवणी केली असल्याचे स्पष्ट
दिसत आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP