Tuesday, March 3, 2015

भूसंपादनावरून काहूर; युवराज गेले सुट्टीवर


काँग्रेस­राष्ट्रवादीमध्ये असलेला हा विरोधाभास भविष्यातील यशापयशाची नांदी असल्याचे दिसत आहे़ खरे पाहता भूसंपादन कायद्याविरुद्ध या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज होती; पण त्यांच्या भूमिकाच वेगळ्या असल्यामुळे हे दोन पक्ष एकजुटीने शेतकºयांच्या बाजूने उभे राहू शकले नाहीत़



देशात भूसंपादन कायद्यावरून प्रचंड काहूर उठले आहे. संसदेच्या अधिवेशनात गदारोळ आणि बाहेर थेट अण्णा हजारेंचे आंदोलन, उद्योगाला अच्छे दिन, शेतीला बुरे दिन असे वातावरण निर्माण झाले आहे़ भारतातील तमाम जनतेला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाºयाची दिशा ओळखली असून त्यांना एक पाऊल मागे येण्याची तयारी दाखवावी लागली़ तरीदेखील जनमताचा रेटा वाढू लागला आहे़ मोदी आणि भाजपा हे संसदेतील बहुमताच्या जोरावर उद्योगपतींना देश विकू पाहत आहेत, असा समज पसरवण्यास त्यांच्या विरोधकांना चांगलेच यश आले आहे़ या कायद्याविरुद्ध सर्व राजकीय पक्ष मोदी आणि भाजपा विरोधात एकवटले आहेत़ अशा वेळी शेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि या पक्षाचे नेतृत्व युवराज राहुल गांधी करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे़ काँग्रेस अद्यापि पराभूत मानसिकतेतून बाहेर आलेली नाही़ याउलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पराभूत होऊनही सत्तेत असल्याच्या आविर्भावात वावरत आहे, हे विशेष़ 
काँग्रेस पक्ष हा तरुण उपाध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय नेत्याच्या नेतृत्वाखाली पराभवाच्या धक्क्यातून बाहेर येईल आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करेल, ही शक्यता दुरावली आहे़ स्वातंत्र्यापासून सुमारे ६० वर्षे राज्य करणाºया या पक्षाला मोदी आणि भाजपाने अशी धूळ चारली की, संसदेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतकेही खासदार त्यांना निवडून आणता आले नाहीत, अशा परिस्थितीत युवराजांनी पुढाकार घेऊन काँग्रेसचे संघटन करण्यासाठी देशासमोरील प्रश्नांवरून रान उठवायला हवे होते़; पण नेमके अशावेळी युवराज सुट्टीवर गेले असून काँग्रेसने व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती) पत्करली आहे, अशी या पक्षाची अवस्था आहे़ युवराज कुठे गेले, कोणत्या कामगिरीवर गेले, अज्ञातवासात कशासाठी गेले? कोण म्हणते उत्तराखंडात दिसले, कोण म्हणते परदेशात गेले, तर कोण म्हणते थंड हवेच्या ठिकाणी आत्मपरीक्षण आणि चिंतन करत आहेत़ हा विषय अतिशय टिंगलीचा झाला आहे़ काँग्रेस कार्यकर्तेच खाजगीत बोलताना युवराजांची टिंगल करू लागले आहेत़ वास्तविक पाहता संसदेच्या चालू अधिवेशनात भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात युवराजांनी खिंड लढवली असती तर काँग्रेस पक्षाबद्दल व भावी अध्यक्षांबद्दल सहानुभूती निर्माण झाली असती, ही संधी त्यांनी गमावली आहे़ मागील २०१२ सालामध्ये संपूर्ण देशभर भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू होते, तेव्हाही काँग्रेसचे युवराज गायब झाले होते. यातून देशवासीयांना जायचा तो संदेश गेला होता़ गेली दीड वर्षे काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत सपाटून मार खात आहे़
काँग्रेस हायकमांडने पक्षाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी काही अजब व विलक्षण प्रयोग अमलात आणण्याचे ठरवले आहे़ निवडून येण्याची शक्यता आणि धनशक्ती यांची सांगड घालण्याचा विचार सुरू आहे; परंतु त्याऐवजी सर्व पदे धनदांडग्यांनाच मिळत आहेत़ कार्यकर्त्याला मोठा करणारा पक्ष अशी प्रतिमा जनमानसात रुजवण्याऐवजी संस्थानिक पद्धतीने काम करण्याची युवराजांची हातोटी कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास करू लागली आहे़ ही पद्धती कालबाह्य झाली असून दरबारी राजकारणाला थारा नाही; पण लक्षात कोण घेतो? जनतेशी थेट संवाद साधून किंबहुना ट्विटरवरून तरी केलेली टिवटिव तरुणांना भावेल; पण युवराजांकडून तेही घडत नाही़ तरुणांची नाडी ओळखण्यात युवराज साफ अपयशी ठरले आहेत़ याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होत असून त्यांचे तारू भरकटल्यामुळे आपला तारणहार कोणी आहे की नाही? असा त्यांना प्रश्न पडला आहे़ महाराष्ट्रातील काँग्रेस निष्ठावंतांना आपल्या तलवारी म्यान करून ठेवण्याची वेळ आली आहे़ हायकमांडचा आदेश असल्याशिवाय त्यांना एखादे पत्रकही काढण्याची अथवा जाहीर विधान करण्याची अनुमती नाही, हिंमत होत नाही आणि हात चोळत बसण्यापलीकडे त्यांच्या हातात काही उरलेले नाही़ आता नशिबावर हवाला ठेवून देवच आपल्याला तारील, अशा भ्रामक आशावादावर एक­एक दिवस मोजत राज्यातील काँग्रेस नेते जगत आहेत़ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही केवळ कोणत्याही घटनेवरील प्रतिक्रियेच्या छापील पत्रावर सही करण्यापुरते उरले आहेत़ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसने दिलेल्या त्याच त्या चेहºयांना जनता कंटाळली होती, असे वक्तव्य केले होते़ अशा परिस्थितीत काँग्रेसची दुसरी फळी कसा श्वास घेणार? याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते़ पुण्यातील काँग्रेसच्या राजकारणाचे तीन परगणे झाले असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे शहर व महानगरपालिका राजकारणात पडद्यामागून अजूनही सक्रिय असलेले सुरेश कलमाडी आणि विश्वजीत कदम असे तीन तिघाडे, काम बिघाडे असल्यामुळे तेथे खासदार तर नाहीच, आठपैकी एकही आमदार निवडून आलेला नाही़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय होणार? याची चिंता कार्यकर्त्यांना लागली आहे़ बिचारे काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते तर गेली अनेक वर्षे सतरंज्या उचलण्याचेच काम करत आहेत़ आता तर त्यांना कामही उरलेले नाही़ काँग्रेस भवनात केवळ शुकशुकाट असलेला दिसतो़ 
याउलट राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंध असून कार्यकर्ते स्वत:च्या सोयीप्रमाणे राजकीय कारणास्तव फार तर भाजपाकडे जातील; पण काँग्रेसकडे जाऊ शकत नाहीत़ शरद पवारांचे राजकारण पंतप्रधान मोदी बारामतीला आल्यापासून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गळी उतरले असून सत्तेसाठी कुछ भी ही मानसिकता बनली आहे़ अवसान गळालेल्या काँग्रेस शिलेदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या सरदारांना सत्तेतील भाजपावाले अधिक जवळचे वाटू लागले आहेत़ भांडवलशाहीला पुरस्कृत करणारी दोन्ही पक्षांची भूमिका एकच असल्याने त्यांचे वर्तन एकमेकांना पूरक असेच आहे़ कोणतीही राजकीय भूमिका स्वीकारली असली तरी पक्षाचे आक्रमक आणि कार्यकर्त्यांला ताकद देण्याचे धोरण कार्यकर्त्याला बांधून ठेवू शकते़ 
मधाच्या मोहोळाभोवती मधमाश्यांची कायम गर्दी असते, मात्र मध आटला की, माश्यांची संख्याही रोडावत जाते़ सत्तेच्या सारीपाटावरील सत्तेचा खेळ काहीसा असाच असतो़ सत्ता सिंहासनावर आरुढ झालेल्या व्यक्तींच्या भोवती कायम कार्यकर्त्यांची जत्रा असते़ एरव्ही नित्यनेमाने कुर्निसात करणारे, अवतीभवती रेंगळणारे भात, नेता सत्तेतून पायउतार होताच पाठ दाखवत दबक्या पावलाने कधी पोबारा करतात, कळतही नाही़ मात्र, अजित पवार यांचा लोकांमध्ये असलेला सध्याचा वावर बघता दादा याला नक्कीच अपवाद ठरत आहेत़ सत्तेत असताना कायमच गर्दीत हरवलेले दादा सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसत आहेत़ तेव्हा दादांच्या विरोधकांनाही दादांचा टीआरपी कायम असल्याचे मान्य करावे लागते़ 
आपल्या आक्रमक व रोखठोक स्वभावाकरिता परिचित असलेल्या अजित दादांच्या कार्यक्षमतेचा अनुभव घेतलेले असंख्य कार्यकर्ते त्यांच्या फटकळ स्वभावामुळे दुरावण्यापेक्षा अधिक नजीक आले आहेत़ अजितदादा बोलतील ते ब्रह्मवाक्य असा विश्वास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत़ त्यांची प्रशासनावरील पकड इतकी प्रभावशाली होती की, त्याचा धसका सरकारी बाबूंनी घेतला होता़ ती जरब अजूनही कायम आहे़ प्रश्न सहकार विभागाचा असो अथवा ग्रामविकास विभागाचा अथवा अन्य कोणताही असो, ज्याचा सरकारशी संबंध आहे, असे प्रश्न घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांची झुंबड दादांच्या दालनात आजही उडालेली दिसते़ समस्या घेऊन येणाºयांना खोटे आश्वासन न देता योग्य असेल तिथेच टेकू देण्याचे काम दादा आजही करीत आहेत़ लालफितीच्या कारभारात कोणतेही काम अडकून पडणार नाही, याची काळजी घेत एका घावात प्रश्न निकालात काढण्याची त्यांची हातोटी लोकप्रिय झाली आहे़ भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांची गर्दी आपोआप ओसरलेली असते; परंतु अजितदादांवर आरोप होऊनही आपण सहिसलामत सुटू हा आत्मविश्वास त्यांना असल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे़ पक्षाचे ध्येयधोरण काही असले तरी कार्यकर्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याची अजितदादांची तत्परता कार्यकर्त्यांना भावली आहे़ 
काँग्रेस­राष्ट्रवादीमध्ये असलेला हा विरोधाभास भविष्यातील यशापयशाची नांदी असल्याचे दिसत आहे़ खरे पाहता भूसंपादन कायद्याविरुद्ध या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज होती; पण त्यांच्या भूमिकाच वेगळ्या असल्यामुळे हे दोन पक्ष एकजुटीने शेतकºयांच्या बाजूने उभे राहू शकले नाहीत़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP