Monday, June 22, 2015

देवेंद्रजी, आप भी देखो.. आगे होता है क्या?

देवेंद्रजी, आप भी देखो.. आगे होता है क्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर असलेल्या संबंधाचा फायदा घेऊन फडणवीसांना रोखण्याचाही पवारांचा प्रय▪असू शकतो. पारदश्री राज्यकारभाराची हमी देणारे फडणवीस राजकीय कारणास्तव कचखाऊ धोरण स्वीकारणार का? उद्या महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेशी फाटले, तर राष्ट्रवादीच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ त्यांच्यावर येईल का?राही भिडेमहाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात चांगलेच रंग भरू लागले आहेत. गेल्या सप्ताहात मातब्बरांच्या फिल्मी संवादफेकीने चांगलीच सनसनाटी निर्माण केली. भुजबळांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या कथानकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारण्याचा प्रय▪केला. या कथानकाचे आपणच नायक आहोत, अशा आविर्भावात 'आगे आगे देखो होता है क्या' अशी डायलॉगबाजी त्यांनी केली. मात्र, राजकारणातील महानायक असलेले शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे क्लायमॅक्समध्ये एण्ट्री घेत आपले मौनव्रत सोडले आणि आता आम्हीपण तुरुंगात जाण्याची वाट पाहत आहोत, असा उपरोधिक टोला लगावत मुख्यमंत्र्यांच्या डायलॉगमधील हवा काढून घेतली. अशा प्रकारचे वक्तव्य करून पवारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच 'आप भी देखो आगे होता है क्या' असाच गर्भित इशारा दिला आहे.

'संपत्तीसम्राट' छगन भुजबळ हे तेलगीप्रकरण आणि महाराष्ट्र सदन घोटाळा या प्रकरणांमुळे चांगलेच वादग्रस्त बनले होते. त्यातच आता त्यांचे संपत्तीप्रकरण बाहेर आल्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या विविध मालमत्तांवर छापे घालून मालमत्तांचा तपशील जाहीर केला. भुजबळ कुटुंबीयांची डोळे दीपवणारी मालमत्ता उघड होताच आपल्या बदनामीचे हे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांविरुद्ध राजकीय आकसाने कारवाई करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करताना 'आगे आगे देखो होता है क्या' असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली, त्यामुळे भुजबळ यांच्यानंतर कोण हा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाचा रोख पवार कुटुंबीयांकडे असल्याची भाकिते करण्यात आली. महाराष्ट्रात अर्मयाद संपत्ती असलेले एकटे भुजबळच नाहीत. असे अनेक राजकारणी आणि उद्योगपती या राज्यात असून त्यांची कायदेशीर व बेकायदेशीर संपत्ती एकत्र केली, तर महाराष्ट्रावर असलेले लाखो रुपयांचे कर्ज एका फटक्यात फिटेल; पण महाराष्ट्राचे काय व्हायचे ते होऊ द्या. आपल्या सात पिढय़ा श्रीमंतीत लोळल्या पाहिजेत, अशी असुरी महत्त्वाकांक्षा वाढीस लागली आहे. ज्यांच्याविरुद्ध तक्रारी झाल्या त्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून, या प्रकरणांचीच चर्चा होत आहे. भुजबळ प्रकरणाने इतर अनेकांची प्रकरणे बाहेर येतील की काय, याची धास्ती घेतलेले लोक अस्वस्थ झाले आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते असून ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमे, तसेच सोशल मीडियावर जी चिखलफेक सुरू झाली त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया द्यावी, अशी सर्वांची अपेक्षा होती; परंतु महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत व्यस्त असलेल्या पवारांनी त्यावर भाष्य करण्याचे टाळले होते; पण भुजबळांच्या मालमत्तेची चर्चा जशी वेगाने होऊ लागली, तसतशी राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता वाढू लागली. भुजबळांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पवारांनी मौन सोडले. फडणवीस सरकार आणि मीडियावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने केली जात असून उद्या आम्हालाही तुरुंगात टाकतील, त्याचीच वाट पाहत आहोत, अशी संतप्त पण उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. भुजबळांनी जे मिळवले आहे ते स्वकष्टाने मिळवले असल्याची पुष्टी जोडून भुजबळांची पाठराखण केली. त्यानंतर राजकीय वतरुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले.

पवार म्हणतात त्याप्रमाणे भुजबळांनी जे स्वकष्टाने कमावले ते कमाविण्याचे बळ नक्कीच भुजबळांच्या भुजांमध्ये आहे, त्यामुळे 'स्वकष्टाने' कमाविलेल्या संपत्तीबद्दल अशा निष्ठावान नेत्यांना सरकारने टार्गेट का करावे? भुजबळांसारख्या कर्तृत्ववान, धाडसी, दूरदृष्टी असलेल्या नेत्यावर हल्लाबोल करून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा उद्योग सरकारने का करावा? अशा कर्तृत्व, नेतृत्वगुणसंपन्न नेत्याला तुरुंगात पाठवण्याआधी आम्हालाच पाठवा, असे उपरोधिक वक्तव्य पवारांनी केले. पवारांचा हा रुद्रावतार पाहून बिचारे देवेंद्र फडणवीस भांबावले असावेत. त्यांनी 'शरद पवारांवर कोणतेही गुन्हे नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच नाही,' असा खुलासा त्वरित केला. मात्र, पवारांनी पाठराखण केल्यामुळे भुजबळांना चांगलाच दिलासा मिळाला. आठवडाभर त्यांची झोप उडाली होती, पवारांच्या वक्तव्यानंतर मात्र एक दिवस तरी त्यांना झोप लागली असणार. 

खरेतर भुजबळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात नऊ प्रकरणे प्रलंबित असून, त्यापैकी केवळ तीन प्रकरणांतच गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयानेही चौकशी दोन महिन्यांच्या मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अशावेळी न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करीत भुजबळांना क्लीन चिट देणारे जाहीर वक्तव्य शरद पवार कसे काय करू शकतात? भुजबळांच्या मालमत्तेविषयी एवढा बभ्रा का झाला, याचा निकाल न्यायालय करणार आहे. सर्वसामान्य माणसांना एक घर घेण्यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागते, आयुष्यभर कर्ज फेडावे लागते; पण एका खोलीत राहणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांनी २0 वर्षांत डझनावर सदनिका खरेदी केल्या, बंगले बांधले, परदेशात गुंतवणुकीद्वारे, हवालाद्वारे आर्थिक उलाढाल केली त्याची चर्चा होणारच. सत्तांध नेते मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पीत असतात, लोक आपल्याकडे पाहात आहेत, याचे त्यांना भान नसते. त्यातच शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन सत्तेत आलेले नेते पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत पुन्हा त्यांचे नाव घेत नाहीत. शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा उदोउदो करीत काँग्रेससोबत सत्ता संपादन केलेल्या भुजबळांवर ही वेळ का यावी? भुजबळांनी सर्वसामान्यांचे डोळे विस्फारतील अशी जी माया जमवली आहे, तिचे पवारांना भलेही कौतुक वाटत असेल; परंतु सामान्य माणसांच्या मनात नेत्यांबद्दल घृणा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. राजकाणाचा दर्जा घसरला असून, मंत्री तुरुंगात जाऊ लागले आहेत. मागील काँग्रेसने सरकारने के. राजा, कलमाडी, कनिमोझी आदी मंत्र्यांना तुरुंगात टाकले होते. आग असल्याशिवाय धूर निघणार नाही, एवढे तरी शरद पवारांसारख्या धूर्त नेत्याने जाणले असेलच. आपले राजकीय वजन आताच खर्च केले, तर भुजबळांच्या मागे आणखी मोठी रांग लागणार नाही, असा विचार करूनच त्यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. यापूर्वी तेलगी प्रकरणी भुजबळांवर एवढा हल्लाबोल झाला की, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शेवटी प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर चौकशीअंती त्यांना 'क्लीन चिट' मिळाली. या वेळी अंमलबजावणी संचालनालय नेमके काय करणार हे लवकरच दिसून येईल.

शिवसेनेची युती नसल्यामुळे फडणवीस सरकार स्थापन होताना त्या वेळी शिवसेना सत्तेपासून दूर असल्यामुळे पवारांच्या बाहेरून पाठिंब्याची मदत झाली. उद्या कदाचित महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपा युती तुटली, तर फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडाकडे पाहण्याशिवाय पर्याय उरणार नाही. सरकार टिकवायचे असेल, तर पवारांची गरज लागणारच आहे. त्यामुळे जास्त गडबड करू नका, असे पवारांनी अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. याकडे काणाडोळा करू नका, असेही पवारांनी अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. त्यामुळे फडणवीस यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाईचा जो बडगा उचलला आहे, त्याला चाप लावण्याचा प्रय▪शरद पवार करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर असलेल्या संबंधाचा फायदा घेऊन फडणवीसांना रोखण्याचाही पवारांचा प्रय▪असू शकतो. पारदश्री राज्यकारभाराची हमी देणारे फडणवीस राजकीय कारणास्तव कचखाऊ धोरण स्वीकारणार का? उद्या महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेशी फाटले, तर राष्ट्रवादीच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ त्यांच्यावर येईल का? तसे झाले तर सगळेच एका माळेचे मणी हा समज दृढ होईल. सत्तेत येताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणार्‍या फडणवीसांसह भाजपाच्या सर्व नेत्यांसमोर हे आव्हान आहे. त्यामुळे दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या आणि महाराष्ट्रापुढे सत्य येऊ द्या!


http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=6/22/2015%2012:00:00%20AM&queryed=12&a=6&b=106725 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP