Monday, April 6, 2009

बुडत्याचा पाय खोलात

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकीकडे रंग भरू लागलेला असताना, दुसरीकडे शिवसेना-भाजपमध्ये मात्र दरबारी राजकारण आणि बारभाईंचे कारस्थान रंगू लागले आहे. अशा राजकारणात सर्वसामान्य माणसाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थान नसते, पक्षाचा जनाधार तुटू लागतो. अशी शिवसेना-भाजप युतीची आज परिस्थिती असून, बुडत्याचा पाय खोलात जात असल्याने पक्षाचे लोकनेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये नेते व कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जात असल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकीकडे रंग भरू लागलेला असताना, दुसरीकडे शिवसेना-भाजपमध्ये मात्र दरबारी राजकारण आणि बारभाईंचे कारस्थान रंगू लागले आहे. अशा राजकारणात सर्वसामान्य माणसाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थान नसते, पक्षाचा जनाधार तुटू लागतो. अशी शिवसेना-भाजप युतीची आज परिस्थिती असून, बुडत्याचा पाय खोलात जात असल्याने पक्षाचे लोकनेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये नेते व कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जात असल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत.
 
कमळ चिखलात उगवते, पण फुलताना पाकळय़ांवर चिखल घेऊन उगवत नाही. प्रत्यक्ष कमळाचे असे हे सुस्वरूप. पण भाजपच्या कमळाचे रूप काही निराळेच रंग दाखवीत आहे! निवडणूक जसजशी जवळ येत चालली, तसतसे भाजपचे कमळ, पाकळय़ांवर चिखल घेऊनच उगवू लागले आहे. पाकळय़ांवरचा हा चिखल वेगवेगळय़ा प्रकारांचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मालेगाव प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग, पुरोहित आदींनी कमळाच्या पाकळय़ा बरबटून टाकल्या आहेत, वरुणने तर चिखलाचे शिंतोडे सर्वदूर उडवले आहेत. या प्रकारांनी दहशतवादाचा भगवा चेहरा अधिक प्रकर्षाने समोर आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा चेहरा प्रफुल्लित कमळासारखा प्रसन्न असल्यामुळे त्यांचा चेहरा पाहून जेवढी मते भाजपला मिळणे शक्य होती, तेवढी मिळाली. यापुढील काळात तेवढी मते मिळू शकणार नाहीत आणि काही मित्र जोडले, तरी सत्ता मिळू शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. पण अटलजींच्या कुटुंबवत्सल अस्सल चेहऱ्याच्या जागी लालकृष्ण अडवाणींचा अट्टलचेहरा भाजपने जनतेसमोर केल्यामुळे तिथेच पूर्वीची मते अर्धी झाली आहेत. अट्टलचेहरा पाहून मते मिळणार कशी? अट्टल हा शब्द व्यक्तीचे गुणविशेष दाखवणारा नाही, हे वेगळे सांगायला नको. अशा या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणा-या म्होरक्याच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात बारभाईंचे कारस्थान रंगले नाही तरच नवल.
 
पक्षाची तथाकथित साधनशूचिता बाजूला सारून जसवंतसिंग निवडणूक प्रचारात थेट पैसेच वाटताना रंगेहाथ पडकले गेले. दुसरीकडे सुषमा स्वराज एक बोलत आहेत, तर अरुण जेटलींचा आवाजच बंद होईल अशा घटना घडत आहेत. तिसरीकडे राजनाथसिंहांची मनमानी सुरूच आहे. केंद्रात अशी सुंदोपसुंदी सुरू असताना राज्यात मुंडे, गडकरी, तावडे तीन तिघाडे काम बिघाडेअशी प्रदेश भाजपची अवस्था झाली आहे. गोपीनाथ मुंडेंना बाजूला सारून नितीन गडकरी आणि विनोद तावडे राज्यातला भाजप चालवू लागले आहेत. काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले, पण भाजपच्या पाच जागांवरचा गुंता गडकरी-तावडे सोडवू शकले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते वाट सापडेल तिकडे धावत सुटले आहेत.
 
शिववडाफेम शिवसेनेचे यापेक्षा वेगळे चाललेले नाही. उलट तिथल्या दरबारी राजकारणाची तटबंदी अधिक कडेकोट होऊ लागली आहे. ऐननिवडणुकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दरबारी कानडाआळवीत बसले आहेत. असा दरबारी कानडाराग आळवीत बसणे म्हणजे रोम जळत असताना निरो फिडल वाजवीत असल्यासारखेच आहे. दरबारी कानडाआळवीत असताना दोन-चार श्रोते असावे लागतात, तसे श्रोते मिलिंद नार्वेकर, नीलम गो-हे, विनायक राऊत आणि सुभाष देसाईंच्या रूपात उद्धव ठाकरेंना गवसले आहेत. माना डोलावणारे आणि कार्यकर्त्यांशी मनमानीपणे वागणारे हे कारस्थानी आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेणारे उद्धव ठकरे सर्वसामान्य शिवसैनिकांवर किती अन्याय करीत आहेत, कार्यकर्त्यांची कशी कुचंबणा होत आहे, हे आता लोकांना समजून चुकले आहे. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याची मुभा कोणालाच मिळत नाही. मोठमोठे नेते त्यांच्या भेटीसाठी तिष्ठत राहिले, तरी त्यांची भेट होत नाही. बाळासाहेबांना दुरूनसुद्धा पाहू दिले जात नाही. नेत्यांची ही अवस्था, तर सामान्य शिवसैनिकांची काय कथा? सर्व जण उपेक्षेचे धनी होत चालले आहेत.
 
हे झाले त्या त्या पक्षाचे, पण शिवसेना-भाजप युतीमध्ये परिस्थिती वेगळी नाही. हे दोन पक्ष नावापुरतेचे एकमेकांचे मित्रउरले आहेत. मित्र कसले? भाजपच्या महाराष्ट्रातल्या नव्हे; तर राष्ट्रीय नेत्यांनाही उद्धव ठाकरेंना भेटता येत नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या बरोबरीने विलेपाल्र्याच्या विनायक राऊतांची भर पडली आहे. कार्याध्यक्षाला राजसिंहासनावर बसवून हे दोघे मातोश्रीवरून राजशकट चालवीत आहेत. नीलम गो-हेंचे त्यांना उपदेशाचे डोस आणि सुभाष देसाई होय बाअसला प्रकार तिथे चालत आहे. शिवसेनेसाठी हाडाची काडे करणारे मनोहरपंत जोशी, दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके यांच्यासारखे ज्येष्ठ त्यांच्या खिजगणतीतच नाहीत, तिथे मित्रपक्षाच्या नेत्यांना विचारतो कोण? उद्धव आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये विस्तव जात नाही. निवडणुकीचे ढोल-ताशे मतदारसंघांमध्ये वाजू लागले आहेत. पण युतीच्या नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असल्याचेच दिसत आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या रामदास कामत यांचा तर वडाच करून टाकला आहे. पक्षाच्या कोणत्याही कामात त्यांना कोणी विचारत नाही.

आणखी एक मजेशीर प्रकार सर्वाना पाहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कधी युद्ध न केलेले संजय सध्या धृतराष्ट्राला महाभारत सांगत आहेत. कर्ण आपलाच आहे, हे बिंबवण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. संजय उवाचआले की, कर्ण कोण, हे आपोआपच समजेल. सगळी हयात ज्यांनी राजकारण-समाजकारणात घालवली, त्यांना जणू आपण चार युक्तीच्या गोष्टीच सांगत आहोत, असा त्यांचा आविर्भाव असतो. पण राज्यात निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सरशी होईल, तेव्हा साहेबांनी आपल्यालाच कात्रजचा घाट दाखवला, असे पुटपुटत बसण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही आणि मातोश्रीगडाचे दरवाजेही बंद झालेले असतील.


केवळ शिववडय़ाचे मिशन असून भागत नाही. राजकीय पक्षाला राज्याच्या आणि देशाच्या विकासाचे व्हिजन असावे लागते. ही विकासाची दृष्टी मंदिर वही बनायेंगेयासारख्या भावना भडकवणाऱ्या घोषणांनी येणार नाही किंवा हिरव्या रंगाचा द्वेष करून मालेगावात बॉम्बस्फोट घडवल्याने तर अजिबात येणार नाही.


देशापुढील समस्या साध्वी, पुरोहित, वरुणचा कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करून सुटणार नाहीत, याचे भान युतीच्या नेत्यांनी ठेवलेले नाही. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. संपूर्ण जग एका वेगळय़ा आर्थिक विवंचनेत असताना, हिंदुत्वाचा मुद्दा तीव्र करून पाकिस्तानच्या अतिरेकी मार्गाने जायचे, हे देशाला घातक आहे. या अतिरेकी शक्तींचा मतदारच बंदोबस्त करतील.
     

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP