Wednesday, April 29, 2009

राज-उद्धवच्या साठमारीत कॉंग्रेसशी सरशी

28 April, 2009

मागील लोकसभा निवडणुकीत मुंब ईतील सहापैकी पाच जागा जिंक णा-या काँग्रेस चा पंजा या निवडणुकीतही बाजी मारेल का, याचीच उत्कंठा राजकीय गोटात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी पाच जागा जिंकणा-या काँग्रेसचा पंजा या निवडणुकीतही बाजी मारेल का, याचीच उत्कंठा राजकीय गोटात आहे. मनसेचा शिरकाव मोठय़ा प्रमाणावर झाल्याने यंदा परिस्थिती बदलली आहे. मात्र,शिवसेना-मनसेमध्ये सुरू झालेल्या साठमारीचा फायदा काँग्रेसलाच होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या मनसेने जिंकण्यापेक्षा शिवसेना व भाजपचे उमेदवार
पाडण्यावर अधिक भर दिला आहे. राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचा प्रतिसाद पाहून शिवसेनेनेही गल्लीबोळांत
प्रचार सुरू करून गर्दी जमवण्याचा प्रयत्न चालवला आहे. दोघांनीही मराठी मतांचा अनुनय सुरू केल्यामुळे मराठी मतांचे विभाजन होणार असून काँग्रेसला मात्र त्यांची पारंपरिक मराठी मते मिळणारच आहेत.

मराठी अस्मिता, स्थानिक मराठी तरुणांना नोक-या, मुंबईत वाढणारे लोंढे हे शिवसेनेनेचे हक्काचे मुद्दे राज ठाकरे यांनी मांडल्यामुळे शिवसेनेच्या सभांना होणारी गर्दी मनसेकडे वळली आहे. शिवसेनेच्या सभांची गर्दी रोडावली असून पारंपरिक मतदार असलेल्या प्रौढ आणि वृद्धांना मारून मुटकून आणले जात आहे.

एकेकाळी छगन भुजबळांना मात देणारे बाळा नांदगावकर मनसेच्या वतीने मैदानात आहेत. त्यांना
शिवसेनेची कार्यपद्धती माहीत असल्यामुळे शिवसेना उमेदवार मोहन रावले यांच्या नाकी नऊ आले आहेत.

माझगाव, शिवडी, लालबाग, गिरगाव,कुलाब्यातील मराठी भागात मनसेने जोर लावल्याने शिवसेना उमेदवाराला मोठा फटका बसेल. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात दादर, नेहरूनगर, कुर्ला, चेंबूरच्या मराठी पट्ट्यात शिवसेनेची चलती असणा-या भागात मनसेचा झेंडा फडकू लागला आहे. येथे मनसेच्या श्वेता परुळकर उभ्या आहेत. शिवसेनेचे उमेदवार सुरेश गंभीर यांची ओळख केवळ माहीमपुरतीच आहे. या सर्व परिस्थितीचा लाभ काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनाच होईल.

उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात मनसेने शालिनी ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे आडनावाचा त्यांना लाभ होत असून शिवसेनेचा परंपरागत मतदार मोठ्या प्रमाणात मनसेच्या मागे उभा राहिला आहे. ईशान्य मुंबईतही किरीट सोमय्या यांची मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांनी  दमछाक केली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांना होईल. उत्तर मुंबईत मनसेचे सरचिटणीस  शिरीष पारकर मैदानात उतरल्यामुळे भाजपचे राम नाईक यांची झोप उडाली आहे. तर उत्तर-मध्य मुंबईत शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांच्या स्नुषा शिल्पा सरपोतदार मनसेच्यावतीने रिंगणात आहेत, त्याचा फटका भाजपच्या महेश जेठमलानी यांनाच बसणार आहे.अखेरच्या टप्प्यात मुंबईत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आघाडीच देशाला आर्थिकदृष्टय़ा स्थिर आणि मजबूत सरकार देऊ शकते, असा मतदारांना विश्वास देण्यात ते यशस्वी झाले आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP