Thursday, April 30, 2009

मायावतींच्या हत्तीवर राज्यातील दलित नाराज


29 April, 2009

दलित - मुस्लिम मतदारांवर भिस्त असलेल्या बहुजन समाज पक्षाने एकाही दलिताला उमेदवारी दिली नसल्याने      मुंबईतील आंबेडकरवाद्या मध्ये तीव्र संताप खदखदत आहे.

दलित - मुस्लिमांच्या मतदारांवर भिस्त असलेल्या बहुजन समाज पक्षाने एकाही दलिताला उमेदवारी दिली नसल्याने मुंबईतील आंबेडकरवाद्यांमध्ये तीव्र संताप खदखदत असून मतपेटीतून आपला हिसका ते बसपला दाखविण्याच्या तयारीत आहेत. बसपाच्या उमेदवारांचा काँग्रेस पक्षाला फटका बसेल, अशी हवा निर्माण केली जात असली तरी त्याचा कोणताही परिणाम परंपरागत मतांवर होणार नाही, असे चित्र मंगळवारी, प्रचाराच्या समारोपाच्या दिवशी स्पष्ट झाले.

बसपने मोठा गाजावाजा करीत महाराष्ट्रात ‘हत्ती’ घुसवण्याचा प्रयत्न केला. सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग उत्तर प्रदेशात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातही तोच प्रयोग सुरू केला. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील सहा जागांवर त्यांनी उमेदवार दिले. मात्र ज्या दलित समाजाला केंद्रबिंदू मानून पक्षाची वाटचाल सुरू आहे, त्या समाजातील एकालाही मुंबईत उमेदवारी दिली नसल्याने दलित मतदारांत कमालीची नाराजी असून आम्ही काय केवळ मुस्लिम-ब्राह्मणांचा प्रचार करायचा काय, असा सवाल वस्त्यावस्तींतील तरुण विचारत आहेत. ज्या समाजाच्या विरोधात चळवळ उभी राहिली त्याच समाजाच्या पालख्या पुन्हा वाहव्या लागणार असतील तर मग राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाच मतदान केलेले बरे, अशी भावना या समाजात पसरली आहे. त्यामुळे बसपचा हत्ती मुंबईत चालणार नाही, असे चित्र आहे.

‘बसपचा जोर’ असल्याची हवा पसरली असली तरी महाराष्ट्रातील दलित- मुस्लिमांची पारंपरिक मते कायम काँग्रेसलाच मिळाली आहेत. श्रीकृष्ण आयोग, मुस्लिम संघटनांची आवाहने वा मौलवींचे फतवे यांचा काहीही परिणाम न होता ही पारंपरिक मते मिळतात. यंदा अन्य राज्यांतून आलेल्या मुस्लिमांची मते बसप- सपकडे जातील, पण त्यांचे विभाजन होईल. दक्षिण मुंबईत बसपचे शेख मोहम्मद अली यांनी जोरदार प्रचार केला; त्यांच्या समोर आव्हान होते समाजवादी पक्षाचे सय्यद अतहर अली यांचे. दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना बसप वा सपचे आव्हान नाही. बसपचे प्रवीण बर्वे यांच्याकडे मुस्लिम आणि दलित मते वळण्याची शक्यता नसल्याने गायकवाड यांचा मार्ग मोकळा दिसत आहे.

ईशान्य मुंबईत बसपने अशोक सिंग यांना उमेदवारी दिली, तेथील मुस्लिमांची पारंपरिक काँग्रेसी मते असून आजवर ही मते अन्य पक्षाला मिळालेली नाहीत. उत्तर-मध्य मुंबईमध्ये उत्तर भारतीय मुस्लिमांचा थोडाफार पाठिंबा बसपचे भाईजान यांना मिळण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघातील मुस्लिमांची पारंपरिक मते कायम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील दत्त यांच्या मागे राहिली आहेत; ती प्रिया दत्त यांच्याही पारडय़ात पडतील. उत्तर-पश्चिम मुंबईत सपाचे अबू आसीम आझमी यांनी जोर लावला, पण येथे मतांचे धृवीकरण झाले असून उत्तर भारतीय वगळता दलित-मुस्लिमांची मते काँग्रेसचे गुरुदास कामत यांच्या बाजूने संघटित झाली आहेत. उत्तर मुंबईत काँग्रेसचे संजय निरुपम यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली असून उत्तर भारतीयांचा कल त्यांच्याच बाजूने असल्याने बसपाचे लखमेंद्र खुराणा यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे निरुपम हे नाईक यांच्यासाठी दे धक्का ठरण्याचीच शक्यता दिसत आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP