Sunday, April 26, 2009

युतीचे नेते मुद्द्यावरून गुद्द्यावर

सिंधुदुर्गात राणे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या संजय राऊतांना मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. पण नेते होण्याची खुमखुमी इतकी की, राणे यांच्याबरोबर मनमोहन सिंग आणि शरद पवारांवरदेखील ते घसरले.


मुंबई-ठाण्यामध्ये प्रचाराचा तोफखाना धडधडू लागला आहे. मुद्दे संपले की माणसे गुद्दय़ांवर येतात. त्यांचा तोल जातो आणि काहीही बरळू लागतात. प्रचारात शिवीगाळ आणि गलिच्छ, अश्लाघ्य भाषा वापरण्यापर्यंत त्यांची मजल जाते. अशा राजकारण्यांची संख्या वाढू लागली आहे. दुसरीकडे मुद्दे नाहीत आणि आरोपांतही तथ्य नाही, असे सप्रमाण सिद्ध करूनही खोटे बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे तथ्यहीन आरोप करण्यात मोठमोठे नेतेही मागे नाहीत. राजकारणातला हा खोटारडेपणा शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये ठासून भरला असल्याचे गेल्या काही दिवसांत प्रकर्षाने पुढे आले आहे.
 
युतीच्या आरोपांना सडेतोड जबाब देऊन काँग्रेस नेत्यांनी या नेत्यांचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. त्यामुळे प्रचाराचे मुद्देच नाहीत, म्हणून विरोधासाठी विरोध, एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. मुंबई-ठाण्यातील दहा मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी मतदान होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. युतीच्या नेत्यांचा आक्रस्ताळेपणाही वाढू लागला आहे.

शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी तर पुरती चव्हाटय़ावर आली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि मी मुंबईकर हे दोन्ही मुद्दे राजकीय सोयीनुसार वापरले आणि सोडून दिले, तसेच मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा, यासाठी शरद पवारांना पाठिंबा दिला आणि नंतर काढून घेतला. त्यांच्या या धरसोडपणाबद्दल त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे मातोश्रीच्या दिवाणखान्यात बसून काथ्याकूट करणा-या चौकडीतही अस्वस्थता पसरली आहे. आता उद्धव ठाकरेंकडे दहशतवादाशिवाय दुसरा मुद्दा नाही. हा मुद्दा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून नरेंद्र मोदींपर्यंत आणि यशवंत सिन्हांपासून  विनोद तावडेंपर्यंत सर्वानी लावून धरला आहे.

वास्तविक पाहता काँग्रेस नेत्यांनी या मुद्दय़ातली हवा काढून टाकली आहे. वाजपेयी सरकारमध्ये अडवाणी गृहमंत्री असताना दहशतवादी संसदेपर्यंत पोहोचले होते, त्याचे काय? या प्रश्नाचे उत्तर युतीच्या नेत्यांकडे नाही. अडवाणी गृहमंत्री असताना कंदाहार विमान अपहरण प्रकरणी खतरनाक अतिरेक्यांची सुटका करून त्यांना कंदाहारला सुखरूप पोहोचवले; परंतु या प्रकरणी आपल्याला काहीच माहीत नव्हते, असे सांगणारे अडवाणी खोटे बोलत आहेत, असा गौप्यस्फोट त्यांच्याच सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले भाजप नेते जसवंतसिंह यांनी केला आहे.
 
रथयात्रा काढून बाबरी पाडण्याचे दुष्कृत्य करण्यापर्यंत आणि त्यानंतर गृहमंत्रीपदापर्यंतचा अडवाणींचा प्रवास पूर्णत: विरोधाभासाने भरलेला आहे. संसदेवरील हल्ला आणि कंदाहार प्रकरणी तर त्यांच्या गृहमंत्रीपदाचे मोठे अपयश आहे, असे असूनही त्यांच्या प्रचारात दहशतवाद आहेच. रथयात्रा काढून आणि बाबरी पाडून सामाजिक शांतता आणि सलोखा धोक्यात आणणारे आणि खतरनाक अतिरेक्यांना सोडून देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणारे अडवाणी हे देशाचे पंतप्रधान कसे होणार? पण युतीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील अडवाणीच पंतप्रधान, असा मंत्र जाहीरपणे जपत आहेत.

मराठी माणूस पंतप्रधानपदी बसवण्यास निघालेल्या उद्धव ठाकरेंचे जागावाटपाच्या वेळी भाजपने नाक दाबले आणि तोंड उघडले, तेव्हा त्यातून अडवाणीच पंतप्रधान असे शब्द बाहेर पडले. या धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेची आणि ठाकरेंची उरलीसुरली विश्वासार्हता निघून गेली आहे. त्यांना राज ठाकरेंच्या रूपाने पर्याय मिळतो का, याची चाचपणी सध्या लोक करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांना गर्दी होत असली, तरी ही गर्दी मतांमध्ये कितपत परावर्तित होईल, याबाबत शंका आहे. पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनाही अशीच गर्दी व्हायची; पण सत्तेत येण्यास ३५ वर्षे लागली. सत्तासुद्धा भाजपशी भागीदारी करून आली. यापुढे सत्ता मिळणे अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
 
प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंनी अत्यंत खालची पातळी गाठली. बाळासाहेबांचा आव आणण्याचा व त्यांची परखड शैली वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला; पण जमले नाही. बाळासाहेबांची भाषा वापरण्याचा प्रयत्न केला; पण परिणाम उलटाच झाला. उद्धव यांनी थेट पंतप्रधानांबद्दलच अपशब्द वापरले आणि गोत्यात आले. अत्यंत सज्जन माणूस अशी प्रतिमा असलेल्या मनमोहन सिंगांबद्दल त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपण्णी केली. जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोललेले लोकांना आवडत नाही.
 
शिवसेनेत मोठे नेते असल्याचा आव आणणा-या संजय राऊत यांनी प्रचारात अत्यंत गलिच्छ भाषा वापरली म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ठाण्यातील नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री नारायण राणे या नेत्यांबद्दल त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली, त्यांचा आघाडीच्या नेत्यांसह श्रोत्यांनीही निषेध नोंदवला. राऊत हे शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत; पण नेते होण्यासाठी सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणा-या या व्यक्तीला पत्रकार कोण म्हणेल? शिवराळ भाषेत जनसमुदायाला संबोधित करून पत्रकारितेच्या क्षेत्राला काळिमा फासणारा हा तथाकथित संपादक, पत्रकार कसा होणार आणि नेता तरी कसा होणार?

सिंधुदुर्गात राणे यांच्यावर बेछूट आरोप करणा-या राऊतांना मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. पण नेते होण्याची खुमखुमी इतकी की, राणे यांच्याबरोबर मनमोहन सिंग आणि शरद पवारांवरदेखील ते घसरले. दिल्लीत सकाळ-संध्याकाळ शरद पवारांच्या दारात पडलेल्या राऊतांचा त्यांच्याबद्दल बोलतानाही तोल गेला. हे अध्र्या हळकुंडाने पिवळे होणारे कथित नेतेच शिवसेनेला रसातळाला घेऊन जाणार आहेत.

मोठय़ा नेत्यांना शिवीगाळ करणारे नेते ज्या शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाण्यात गेले होते, ते उमेदवार विजय चौगुले हे खून, बलात्कार, अपहरण प्रकरणांत अडकले आहेत. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरातून निवडून आलेल्या उच्चशिक्षित आनंद परांजपेंना डावलून गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या चौगुलेंना उभे करण्यात आले आहे. यावरूनच शिवसेनेची पातळी किती घसरली आहे, हेच दिसून येत आहे. ना नेत्यांना पातळी ना नेत्यांच्या पिलावळीला. असल्या लोकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्याबद्दल गलिच्छ भाषा वापरावी, हे आश्चर्यकारक आहे. डॉ. मनमोहन सिंग यांची विश्वासार्हता कुठे अन् अडवाणींची कुठे? अडवाणींची विश्वासार्हता केव्हाच संपली असून, गोबेल्स नीतीचा ते उत्कृष्ट नमुना ठरले आहेत. मनमोहन सिंगांची त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. मनमोहन सिंग हे अत्यंत विश्वासू, पारदर्शी आणि सज्जन गृहस्थ आहेत, अशी त्यांची प्रतिमा आहे. जागतिक मंदी असताना त्यांनी देशावर आर्थिक संकट येऊ दिले नाही. याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनादेखील भारताची स्तुती करावी लागली. पण खोटे बोल पण रेटून.. अशा वृत्तीच्या नेत्यांना लोकच धडा शिकवतील.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP