Monday, April 20, 2009

डॉ. आंबेडकरांवर भाजपचे बेगडी प्रेम

अनेक धर्म, पंथ, असंख्य जाती-पोटजाती असलेल्या या देशात विविधतेत एकात्मता साधण्याचा यशस्वी प्रयत्न काँग्रेसने केला. डॉ. आंबेडकरांनी सर्वधर्मसमभावाच्या विचाराचे अधिष्ठान ज्या भारतीय राज्यघटनेला दिले आहे, त्याच घटनेचे संपूर्ण पुनर्विलोकन करून घटनेचा ढाचा बदलण्याचा डाव भाजपने टाकला होता.



लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर जसजसा वाढू लागला, तसतसा आरोप-प्रत्यारोपांचा ताळतंत्रही सुटू लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी तर कमाल केली आहे. संपूर्ण देश आश्चर्याने थक्क होईल, अशी विधाने त्यांनी केली आणि ती त्यांच्यावरच बूमरँग होऊन त्यांना नामुष्की पत्करावी लागली. काँग्रेस पक्षाविरुद्ध दहशतवाद हा मुद्दा करून त्यांनी स्वत:चे हसे करून घेतले त्याचबरोबरकाँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला असे हास्यास्पद विधान केले. याचा काँग्रेसने असा रोखठोक प्रतिवाद केला की, भाजपला अक्षरश: बॅकफूटवर जाणे भाग पडले. काँग्रेसने त्यांचे दोन्ही मुद्दे असे खोडून काढले की, भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे अवसान गळाले. भाजपचा एकही नेता त्यांची बाजू मांडण्यासाठी पुढे सरसावला नाही.
 
भाजपने मुंबई आणि देशात इतरत्र झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निवडणूक मुद्दा करण्याचे ठरविले; पण कंदहार विमान अपहरण प्रकरणी तत्कालीन भाजप सरकारने जी अक्षम्य चूक केली तसेच ते सत्तेत असताना अतिरेक्यांनी थेट संसदेवरच कसा हल्ला चढविला, या घटनांचा बिनतोड समाचार काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, पी. चिदंबरम या नेत्यांनी घेतला आणि भाजपवाल्यांना निरुत्तर करून टाकले. कंदहार विमान अपहरण प्रकरण झाले, तेव्हा खतरनाक दहशतवाद्यांची भाजप सरकारने सुटका केली. त्या अतिरेक्यांना सोडण्याचेच नव्हे, तर पैसे देण्याचेही मान्य करण्यात आले होते.

अतिरेक्यांसह पैशाच्या बॅगा घेऊन खुद्द परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह तिकडे गेले होते. काँग्रेसवर दहशतवादाच्या मुद्दय़ावरून तोफ डागणाऱ्यांनीच अतिरेक्यांना सोय-या-पाहुण्यांप्रमाणे वागणूक दिली होती. त्यामुळे दहशतवादावर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला आहे. ज्या अडवाणींनी व भाजपने दहशतवादाचा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला, ते अडवाणी गृहमंत्री असताना, अतिरेक्यांनी संसदेपर्यंत पोहोचण्याची हिंमत केली होती, हे या देशातली जनता विसरलेली नाही. दहशतवादावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा भाजपचा हेतू सफल होऊ शकत नाही. खरे तर, दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असून, या प्रश्नाने जगभर उग्र स्वरूप धारण केले आहे. त्याचा एकत्रित मुकाबला करण्याची गरज असताना, आरोप-प्रत्यारोप करणेच मुळात चुकीचे आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे निमित्त साधून अडवाणींनी त्यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. निवडणूक प्रचारात आपल्या प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जातात, हल्ले-प्रतिहल्ले चढवले जातात, एकमेकांचे चारित्र्यहनन केले जाते; पण या दरम्यान नेतेच जर खोटारडेपणाची भाषा वापरत असतील, तर त्यांनाच त्याचा फटका बसतो. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, या पक्षांनी धर्म व जातीयवाद्यांना दूर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेना युतीवर सतत टीकास्त्र सोडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारप्रणालीचा अवलंब करीत सर्वधर्मसमभावाचे धोरण या पक्षांनी अवलंबिले आहे. हिंदुत्वाची भूमिका घेऊन भारताला हिंदू राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप-शिवसेनेवर त्यांनी कडाडून हल्ला चढविला आहे. अशा हिंदुत्ववाद्यांना ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उमाळा यावा यासारखी हास्यास्पद गोष्ट दुसरी नाही.
 
अनेक धर्म, पंथ, असंख्य जाती-पोटजाती असलेल्या या देशात विविधतेत एकात्मता साधण्याचा यशस्वी प्रयत्न काँग्रेसने केला. डॉ. आंबेडकरांनी सर्वधर्मसमभावाच्या विचाराचे अधिष्ठान ज्या भारतीय राज्यघटनेला दिले आहे, त्याच घटनेचे संपूर्ण पुनर्विलोकन करून घटनेचा ढाचा बदलण्याचा डाव ज्या भाजपने टाकला होता, तो काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्षतावादी पक्षांनी यशस्वी होऊ दिला नाही. ज्या हिंदुत्ववादी शक्तींनी डॉ. आंबेडकरांना कधी मानलेच नाही आणि त्यांच्या हिंदुत्ववादाला डॉ. आंबेडकरांनी कायम तीव्र विरोधच केला, त्या बाबासाहेबांचे नाव भाजपवाले आता निवडणुकीसाठी वापरत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना घटना-समितीत स्थान मिळू नये, अशी योजना करून नेहरूंनी त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास नेहरू तयार नव्हते. महात्मा गांधीजींनी नेहरूंना सांगितले- त्यांना मंत्रिमंडळात घ्या, तेव्हा नेहरूंचा चेहरा काय झाला असेल, याची कल्पनाच केलेली बरी.. असे वक्तव्य अडवाणींनी केले आहे. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.
 
भाजप आणि संघ परिवाराचे बाबासाहेबांबद्दल हे जे प्रेम ऊतू चालले आहे, ते न समजण्याइतके लोक दूधखुळे नाहीत, हे अडवाणी आणि संघपरिवाराला कदाचित माहीत नसावे आणि असले, तरी त्याकडे हेतूपुरस्सरपणे कानाडोळा केला जात असावा. भाजपच्या थिंक टँकचे सदस्य असलेल्या अरुण शौरी यांनी बाबासाहेबांविरुद्ध वर्शिपिंग द फॉल्स गॉड हे पुस्तक लिहिले त्याचे बक्षीस म्हणून याच भाजपने शौरींना मंत्री केले होते, ही बाब या देशातली जनता विसरलेली नाही.

भाजपने शिवजयंती, म. फुले, डॉ. आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली नाही. संघाने तर रेशीमबागेतल्या मुख्यालयावर कधी तिरंगादेखील फडकवला नाही. या देशाचा झेंडा आणि घटना हिंदुत्ववाद्यांनी कधी मानलीच नाही. भारतीय घटनेतील तरतुदींनुसार होणा-या निवडणुका मात्र यांनी लढवल्या, त्याच आधारे ते सत्तेवर आले आणि सत्तेत येताच खायचे दात दाखवले, घटनाच बदलू म्हणाले. घटना बदलावी, असे त्यांना का वाटले? या देशात चातुर्वण्र्य आणि ब्राह्मण्यवाद आणून अडीच हजार वर्षापूर्वीचे आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करायचे आहे काय?


अडवाणींना महात्मा गांधींची महानता कळली आहे, बाबासाहेबांची महानता कळली आहे, काँग्रेसने बाबासाहेबांवर अन्याय केल्याची तीव्र जाणीव झाली आहे; पण शौरींनी लिहिलेले ..फॉल्स गॉड नाकारण्याची इच्छा मात्र झाली नाही. उलट त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. बाबासाहेबांवर काँग्रेसने अन्याय केला, असे त्यांना वाटते; पण अडवाणी आणि भाजपने केलेल्या अन्यायांची मोठी मालिकाच सर्वश्रुत आहे.

बाबासाहेबांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करून शिवसेना-भाजप निवडून येण्यासाठी कायम अप्रत्यक्ष मदत केली, त्या प्रकाश आंबेडकरांना यांनी साधे राज्यसभेवर पाठवले नाही, असे यांचे आंबेडकरांवरील बेगडी प्रेम लोकांना ठाऊक आहे. मागास जातींच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी राज्य घटनेत आरक्षणाची तरतूद केली, या आरक्षणाला उच्चवर्णीयांनी कायम विरोध केला. डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या ३४० कलमान्वये मागास आयोग नेमण्याची तरतूद केली. त्यानुसार नेमलेल्या मंडल आयोगातील ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करून याच अडवाणींनी देशभर आगडोंब उसळवला आणि राममंदिरासाठी रथयात्रा काढली, अयोध्येतील मशीद पाडली, देशात फुटीरतेची बिजे रोवली. बाबासाहेबांची जातीअंताची लढाई अशा लोकांना कधी समजणार नाही. ज्यांना दोन टक्केही बाबासाहेब समजले नाहीत, ते बाबासाहेबांवर अन्याय झाल्याच्या बाता करीत आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP