Monday, November 28, 2011

सगळेच बेजबाबदार, अराजकाला जबाबदार

राजकीय नेते असो अथवा प्रशासकीय अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी शिवसेना आणि मनसेनेचे कार्यकर्ते जर त्यांच्या तोंडाला डांबर फासून त्यांच्यावर हल्ले करीत असतील तर त्यांच्या या झुंडशाहीलाही आळा घालावा लागेल. शरद पवारांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे पुढे सरसावले ही चांगली गोष्ट आहे परंतु नेत्यांना मारणे जसे निषेधार्ह आहे तसेच अधिका-यांना मारणेही अयोग्य आहे.


देशात गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे,राजकारणी कोटय़वधी रुपये कमावतात आणि आपल्याला काही नाही अशी भावना वाढू लागली आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि सरकारची धोरणे याबाबत लोकांमध्ये प्रचंड क्षोभ निर्माण झाला आहे, त्या क्षोभाला हिंसक वळण लावण्याचे आणि देशाला अराजकाकडे नेण्याचे काम ‘टीम अण्णा’सारख्या बोलघेवडय़ा लोकांनी हाती घेतले आहे. सर्व राजकीय नेते भ्रष्ट आहेत असा समज करून घेणारा आणि तो समज पसरविणारा पांढरपेशी साळसूदपणा वाढत्या असहिष्णुतेला कारण ठरणार आहे. नेत्यांच्या अतिउत्साही समर्थकांमुळे नेते अडचणीत येत आहेत, समाज ज्यांच्याकडे आशेने पाहतो अशा अण्णा हजारेंसारख्या अनेक समाजसेवकांचाही तोल सुटत चालला आहे. राजकीय अराजकाला आमंत्रण देणारी परिस्थिती उद्भवत आहे, वास्तवाचे भान उरलेले नाही त्यामुळे राजकारणी म्हणजे भ्रष्टाचारी, अशी प्रतिमा निर्माण होत असताना याचा प्रतिवाद करण्याचे नैतिक बळ उरलेले नाही,त्यातून क्षोभ वाढत आहे. या परिस्थितीला राजकीय नेते, त्यांचे अविवेकी समर्थक, कथित समाजसेवक आणि पांढरपेशी ज्यांना सिव्हिल सोसायटी म्हटले जाते असे सगळे बेजबाबदार घटक जबाबदार आहेत.


सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन जीवनाचे प्रश्न सुटत नसल्याने आणि शासन - प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला असल्यामुळे राजकारण्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचे, क्वचित चप्पल किवा बूट फेकण्याचे अथवा प्रसंगी गोळ्या झाडण्याचेही प्रकार घडले असतील परंतु राजकीय नेत्यासमोर येऊन त्याच्या तोंडावर थप्पड मारण्याचा प्रकार स्वातंत्र्यानंतर प्रथमच घडला असेल. गेली 50 वर्षे राजकारणात कार्यरत असणा-या शरद पवारांसारख्या संयमी आणि प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या नेत्यावर झालेल्या या हल्ल्याचा लोकशाहीवर निष्ठा असणा-याच नव्हे तर एकाधिकारशाही मानणा-या अशा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे.

अण्णांसारख्या समाजसेवकाचे प्राण वाचावे याकरिता जी एकजूट संसदेने दाखविली होती तीच एकजूट पवारांवरील हल्ल्याचा निषेध करताना दाखविली. त्याचबरोबर या हल्ल्याचा निषेध करण्याकरिता अवघा महाराष्ट्र पवारांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. या सर्वानी सुसंस्कृतपणा आणि राजकीय शहाणपणाचे दर्शन घडविले हे लोकशाहीतच घडू शकते.

आशिया खंडातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात राजकीय सामाजिक आंदोलनादरम्यान जाळपोळ,दगडफेकीसारखे हिंसक प्रकार अपवादाने घडत असतीलही परंतु संसदीय मार्गाने विरोध करण्याची परंपरा आपण जपली आहे. परंतु हिंसक प्रवृत्तीला खतपाणी घालून या देशाच्या संविधानाला हादरे देण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. भारतीय संविधानाला आव्हान देणा-या अण्णा हजारेंना महाराष्ट्रातील सरकारने नव्हे तर संसदेनेदेखील एवढे महत्त्व दिले की प्रति गांधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. याचा पुरेपूर फायदा उठवत प्रसारमाध्यमांनी त्यांना महात्मा करून टाकले,आता या तथाकथित महात्म्याचे पितळ उघडे पडू लागले आहे. लोकशाहीला सुरुंग लावण्याची मनोवृत्ती असलेल्या या बेजबाबदार लोकांनी हरविंदरसिंगसारख्या माथेफिरू तरुणाला मदत केली आहे.

राजकीय नेते असो अथवा प्रशासकीय अधिकारी त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि अकार्यक्षमतेविरुद्ध आवाज उठविण्यासाठी शिवसेना आणि मनसेनेचे कार्यकर्ते जर त्यांच्या तोंडाला डांबर फासून त्यांच्यावर हल्ले करीत असतील तर त्यांच्या या झुंडशाहीलाही आळा घालावा लागेल. शरद पवारांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय पुढे सरसावले ही चांगली गोष्ट आहे परंतु नेत्यांना मारणे जसे निषेधार्ह आहे तसेच अधिकाऱ्यांना मारणेही अयोग्य आहे एवढे तारतम्य ठेवले जात नाही. शरद पवारांनी एवढा हल्ला होऊन जे संयमाचे दर्शन घडवले आणि लोकशाही बळकट होण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले तसेच संसद आणि महाराष्ट्र यांनी त्यांच्या राजकीय योगदानाची जाणीव ठेवून त्यांना संपूर्ण समर्थन दिले त्यामुळे त्यांची राजकीय उंची वाढली हे खरेच मात्र याबरोबरच त्यांची जबाबदारीही वाढली आहे. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा आणि त्यामुळे असलेली अपरिहार्यता यामुळे त्यांना सर्वपक्षीय मैत्री जपावी लागली त्याचे प्रत्यंतर या निमित्ताने घडले. यापुढील राजकीय वाटचालीत त्यांनी गोरगरीब जनसामान्यांचा विश्वास मिळवून राजकारण्यांप्रति असलेला क्षोभ कमी करण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP