Monday, October 15, 2012

मुंडेंना बनवलंय 'लगान'चे आमिर खान

'लगान' चित्रपटात ब्रिटिशांच्या क्रिकेट टीमविरुद्ध मॅच जिंकण्याच्या ईर्षेने आमिर खानने स्वत:ची टीम तयार करून मॅच जिंकण्याची आणि मॅन ऑफ द मॅच होण्याची ज्याप्रमाणे जबाबदारी पार पाडली त्याच प्रमाणे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि व लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांना जबाबदारी पार पाडायची आहे. 
महाराष्ट्रात 2014 मध्ये होणार्‍या आगामी निवडणुका मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय भाजपाला घ्यावा लागला आहे. शिवसेना-भाजपा युतीमध्ये एकवाक्यता नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये वादंग सुरू आहे. भाजपामध्ये गटबाजी, शिवसेनेत गोंधळाची स्थिती, राष्ट्रवादीत गृहकलह आणि कॉँग्रेसमध्ये मरगळ अशा राजकीय परिस्थितीत प्रत्येक पक्षाला आपले घर सावरण्याबरोबरच मित्रपक्षांवर कुरघोडी आणि विरोधी पक्षांवर मात करण्यासाठी रणनीती ठरवावी लागत आहे. अशा राजकीय परिस्थितीत गुरफटलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नांची तीव्रता जाणवत नाही. देशातील सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने केलेल्या प्रगतीचे गोडवे गात आहेत. जनक्षोभ वाढत चालला असून सरकारविरोधी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी सरसावलेल्या भाजपाने महाराष्ट्राची सूत्रे मुंडेंच्या हाती दिली आहेत. 



राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेले पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि महाराष्ट्रातील राजकारणात आपला दबदबा कायम ठेवणारे गोपीनाथ मुंडे हे खरे तर एकमेकांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी. पण गडकरींना मुंडेंवरच जबाबदारी देणे भाग पडले. प्रमोद महाजनांच्या निधनानंतर मुंडेंना बाजूला सारणारा, त्यांची राजकीय कोंडी करू पाहणारा, त्यांचे पाय खेचणारा भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष इतके दिवस महाराष्ट्रासाठी नेत्यांचा शोध घेत होता. पण म्हणतात ना 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' असाच प्रकार होता. अखेर 1995 साली आपल्या झंझावाती प्रचाराने सत्ताधार्‍यांची विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची दमछाक करणार्‍या आणि भाजपाला कधी नव्हे एवढे यश मिळवून देणार्‍या मुंडेंच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढविण्याची घोषणा करावी लागली. 1995 साली भाजपाला मिळालेले यश आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मिळवलेले यश यामुळे महाराष्ट्रात युतीची सत्ता येऊ शकली. त्यानंतर झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपाची पीछेहाट झाली. अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या भाजपा नेत्यांमध्ये सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्याचे नैतिक बळही उरले नाही. त्यामुळे कुंपणावर बसलेले अनेक आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते भाजपा सोडून गेले.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेली लोकनेत्याची जागा कोण भरून काढणार, हा प्रश्न कॉँग्रेसला पडला आहे. लोकांच्या मनाची पकड घेणारे, त्यांना खिळवून ठेवणारे आणि कॉँग्रेसच्या बाजूने मतदान वळविणारे, पक्ष मजबूत करण्याची ताकद असणारे तडाखेबंद भाषण ही विलासरावांची खासियत होती. आपल्या आवेशपूर्ण वक्तृत्वाने विरोधकांना घायाळ करणार्‍या विलासरावांची कमी कॉँग्रेस पक्षाला निश्चितच जाणवेल. मात्र त्यांच्याच सारखे सक्षम नेतृत्व आणि प्रभावी वक्तृत्व असलेले मुंडे भाजपाच्या प्रचाराची धुरा वाहणार असल्यामुळे भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सत्ताधार्‍यांविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. कॉँग्रेसने बहुधा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. राहणार की जाणार अशा वृत्तांना वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे भरपूर प्रसिद्धी देत होते, पण काही घडत नसल्याने चर्चा बंद झाली आहे. सत्ताधारी गोटातून नेतृत्वबदलाचे संकेत दिले जातात. अनेकदा तशा पुडय़ा सोडल्या जातात. पण त्याचा प्रशासनावर, सरकारवर विपरीत परिणाम होतो, याचा विचार केला जात नाही. 'राहणार की जाणार' अशी संभ्रमावस्था सरकारचे काम ठप्प करणारी असते, याचे भान ठेवले जात नाही. नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागले की, प्रशासन काम करीत नाहीत. सत्ताधारी नेते बेजार आणि अधिकारी मुजोर अशी परिस्थिती निर्माण होते. सध्या तरी या चर्चेला पूर्णविराम मिळालेला दिसतो. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना कॉँग्रेसचा मुख्य शत्रू हा शिवसेना, भाजपा अथवा मनसे नसून राष्ट्रवादी हाच असल्याची चर्चा कांॅग्रेसमध्ये होत असते. सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचे मान्य करून मुख्यमंर्त्यांनी थेट राष्ट्रवादीलाच आव्हान दिले आहे, तर कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निवडणुका स्वबळावरच लढण्याचे सूतोवाच केले आहे. हा कॉँग्रेसचा दबावतंत्राचाच भाग असेलही, पण आपल्या स्पष्टवक्ता आणि परखड स्वभावानुसार उक्ती आणि कृती करणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना डावपेच किंवा दबावतंत्र मान्य नाही. आघाडीचा धर्म पाळून शिवसेना-भाजपाला नामोहरम केले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंर्त्यांना दिलेल्या आव्हानाला राणे यांनी तत्काळ प्रतिआव्हान दिले. तर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी राजीनामा देऊन सरकारसमोर पेच निर्माण केला असता, राष्ट्रवादीच्या मंर्त्यांप्रमाणे कॉँग्रेसचे मंत्रीही गोंधळून गेले होते, काय प्रतिक्रिया द्यावी हे मुख्यमंर्त्यांनाही समजेनासे झाले होते. कारण राजीनामा एवढय़ा जलदगतीने समोर येऊन आदळला की सगळे सुन्न होऊन गेले होते. अशा वेळी नारायण राणेंनी पुढाकार घेऊन कॉँग्रेसची भूमिका निश्चित केली आणि प्रतिक्रिया न देताच सर्वानी संयम बाळगण्याची सूचना केली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असूनही मुख्यमंत्री चव्हाण यांना पूर्ण ताकद देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे राणेंनी ठरविलेले दिसते. मात्र राणेंना अद्याप न्याय मिळालेला नाही. कॉँग्रेसकडून सगळे सुरळीत असल्याचे दर्शविण्यात येत असले तरी केंद्रातील कॉँग्रेसचे घोटाळे आणि राज्यातील राष्ट्रवादीचे घोटाळे पाहता मुंडेंच्या प्रचाराला धार आणण्याइतपत मालमसाला त्यांच्या हातात नक्कीच आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या 'मिस्टर क्लिन' प्रतिमेचा कॉँग्रेसने अद्याप प्रचार सुरू केलेला नाही. मुख्यमंर्त्यांनी प्रशासनाची केलेली साफसफाई आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी घेतलेले कठोर निर्णय लोकांसमोर आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या मिस्टर क्लिन प्रतिमेचा फायदा कॉँग्रेसने उठवला नाही तर मुंडेंना मैदान मोकळे मिळेल. 



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या काका-पुतण्याचे आजकाल जे संबंध दिसतात ते पाहता मुंडेंना वातावरण अनुकूल होऊ शकेल, अशी चिन्हे दिसत आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी राज ठाकरे यांची जी जवळीक झाली त्यामुळे मनसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून घरी घेऊन जातात, स्वत: गाडी चालवतात, त्यानंतर ते 'मातोश्री' वर बाळासाहेबांच्या भेटीला जातात. यामुळे राज यांच्याबरोबर आपण शिवसेना सोडली ही चूक झाली का? असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. दोन भाऊ एकत्र आले, बाळासाहेबांनी त्यांचे मनोमीलन घडवून आणले तर आपले काय होणार? अशी चिंता त्यांना वाटत आहे. राज यांनी प्रस्थापितांविरुद्ध उभे राहिले पाहिजे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेना-भाजपा हेदेखील प्रस्थापित पक्ष आहेत. या सर्वाच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन उभे राहिले, तर राज यांना लोकांचा प्रतिसाद मिळू शकेल. कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, तृणमूल कॉँग्रेस यासारखे पक्ष लोकांचे प्रश्न घेऊन उभे राहिले तेव्हाच त्यांना सत्ता मिळविता आली, राज ठाकरे रोज उठून 'मातोश्री'वर गेले तर मनसेचे काय व्हायचे. राज यांच्या 'मातोश्री' भेटीने उद्धव ठाकरे मात्र खूश आहेत. मनसैनिकांना अनुकूल करण्याचे त्यांचे काम फत्ते झाले आहे. राज ठाकरे यांनी 'मातोश्री' भेटीची तत्परता दाखविल्याने बाळासाहेबांची डोकेदुखी कमी झाली आहे आणि उद्धव यांचा तापही उतरला आहे, अर्थात यामुळे राज ठाकरेंना मात्र ताप होण्याची शक्यता आहे. याउलट अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शरद पवारांची डोकेदुखी वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गेल्या सप्ताहात बडोदा येथे पार पडले. या अधिवेशनाला अजितदादांनी मारलेली दांडी हा चर्चेचा विषय ठरला. आदल्या दिवशी सर्किट हाऊसवर बैठका घेणारे, दुसर्‍या दिवशी तापाने आजारी पडणारे आणि तिसर्‍या दिवशी मुंबईत दोन कार्यक्रम घेऊन चौथ्या दिवशी नांदेड मनपा निवडणूक प्रचाराला जाणारे अजितदादा यांना राष्ट्रवादीच्या अधिवेशनादिवशीच ताप कसा आला, यावरून शंकाकुशंका घेण्यात आल्या. नेते असले म्हणून काय झाले? माणसाला ताप येऊ शकतो. पण अजितदादांबाबत असे झाले आहे की, ते शिंकले तरी बातमी होऊ लागली आहे. अर्थात त्यांचा ताप राजकीय नसला, खराच असला तरी त्यांचा कोणी राजकारणासाठी वापर करू शकतो. दादांच्या अनुपस्थितीत ताईंचे महत्त्व भलतेच वाढले. अजितदादा मुख्यमंत्री झालेले आवडेल म्हणणार्‍या सुप्रियाताईंनी महिला मुख्यमंत्री होऊ शकते असे विधान करून राष्ट्रवादीत पुनश्च अस्वस्थता निर्माण केली. 



बाळासाहेबांच्या पुतण्याने डोकेदुखी कमी केली वर शरद पवारांच्या पुतण्याने त्यांची डोकेदुखी वाढवली. गृहकलहातून बाहेर पडलेले राज ठाकरे गृहकलह नसल्याचे दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत. तर गृहकलह असल्याचे चित्र पत्रकार रंगवत असल्याचे पवार कुटुंबीय सांगत असले तरी दादा-ताईंच्या वर्तनाने गृहकलह अधिक गडद होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या राजकीय परिस्थितीत गोपीनाथ मुंडे हे 'लगान' चे आमिर खान होऊ शकतील. भाजपाला पाण्यात पाहणार्‍या कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ते मागे सारतील, असे भाजपाला वाटत असले तरी मुंडेंना मात्र फार मोठी तयारी करावी लागेल, टीम पार्टनर असलेली शिवसेना दुबळी असल्याने ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरलेल्या मुंडेंना फास्ट बॉल, मीडियम बॉल आणि स्पिनरलाही सामोरे जावे लागेल, सहकारी खेळाडूंवर अवलंबून चालणार नाही. स्वत:ची विकेट पडू न देता, राखून ठेवावी लागेल. क्रीझवर शेवटपर्यंत थांबावे लागेल आणि बॅटिंग संपल्यावर ओपनिंग बॉलर म्हणूनही त्यांनाच उतरावे लागेल. शेवटच्या निर्णायक ओव्हरही त्यांनाच टाकाव्या लागतील आणि मॅन ऑफ द मॅच होण्याचे लक्ष्य गाठावे लागेल. या निवडणुकीत पुनश्च एकवार त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. मुंडेंप्रमाणे कॉँग्रेसची भिस्त नारायण राणेंवर, तर राष्ट्रवादीची अजितदादांवर आहे. पण सत्तास्थापनेची वेळ आली तर मुंडे, राणे आणि अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील. का, की दुसरेच कोणी आणून बसवले जातील, अशी शक्यता नाकारता येणार नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP