Monday, October 22, 2012

राजकारणी कितीही झाले भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ

देशात सर्वत्र घोटाळे आणि भ्रष्टाचाराची चर्चा सुरू आहे. दररोज सकाळची वृत्तपत्रे पाहिली की, किमान एका तरी राजकारण्याचा घोटाळा उघड झालेला असतो. वृत्तवाहिन्यांवर तर घोटाळय़ांची वृत्ते दिवसरात्र धडधडत असतात. आरोप, घोटाळे आणि खुलासे पाहून लोकांची चांगलीच करमणूक होऊ लागली आहे. हा देश चालवणारे लोकप्रतिनिधी घोटाळेबाज असल्याचे वातावरण निर्माण होत असल्याने भारत देशातील लोकशाहीचे काय होणार? अशी काळजी लोकप्रतिनिधींना वाटू लागली आहे.
देशाची आज मजबूत असलेली लोकशाही दुबळी होईल आणि तुटूनफूटून जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सगळेच राजकारणी मग ते सत्ताधारी असोत, विरोधी असोत अथवा कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत ते एकमेकांवर चिखलफेक करीत नाहीत, असा लोकांचा समज झाला आहे. आणि लोकांचा हा समज हजारे, केजरीवाल, दमानिया यासारख्या भंपक लोकांनी केला आहे, अशी तमाम राजकारण्यांची समजूत झाली आहे. कोणी राजकारणी म्हणतात की, सरकारमधील चुकीच्या कामाला मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री अथवा मंत्री जबाबदार नाहीत, अधिकारी जबाबदार आहेत. तर कोणी म्हणते पुरावे सिद्ध झाले, तर राजकारण सोडून देणार, लोकप्रतिनिधींनी केवळ लोकसेवा करण्याऐवजी कंपन्या काढाव्या, उद्योजक व्हावे, असेही राजकारण्यांना वाटू लागले आहे. राजकारण्यांचे असे सुस्पष्ट विचार ऐकून कोणालाही संत रामदास स्वामींच्या वचनांचे स्मरण झाले नाही तरच नवल. रामदास स्वामींची संतवाणी आहे 'ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट, तिन्ही लोकी श्रेष्ठ' आज ब्राह्मण भ्रष्ट आहे की नाही, श्रेष्ठ आहेत की नाही हा मुद्दा गौण आहे. राजकारणी मात्र खर्‍या अर्थाने 'ब्राह्मण' झाले आहेत. त्यामुळेच 'राजकारणी कितीही झाले भ्रष्ट, तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ' असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी ते जगात श्रेष्ठ आहेत, असेच अलीकडे काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर खाजगी उद्योगासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. देशातील सर्वात मोठा विरोधीपक्ष असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षावरच भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणार्‍या सामाजिक कार्यकत्र्यांनी असा ठपका ठेवल्यामुळे एकच खळबळ उडाली. भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही अस्वस्थता पसरली; पण त्यांनी पक्षाध्यक्षांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय त्यांनी घेतला नसता तरच नवल. याचे कारण सरळ आहे. संघाच्या आदेशानेच गडकरींची पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे आणि त्यांची पक्षाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती व्हावी याकरिता पक्षाच्या घटनेत दुरुस्तीही करण्यात आली, माजी पक्षाध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, त्यावेळी संघ त्यांच्या मागे उभा राहिला नाही, गडकरींना एक न्याय आणि बंगारूंना दुसराच न्याय हा केवळ बंगारू लक्ष्मण मागासवर्गीय असल्यामुळे लावण्यात आला, अशी चर्चा भाजपा कार्यकर्ते करीत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत गोध्रा हत्याकांड घडले. मोदींना क्रूरकर्मा ठरविण्यात आले. त्याची दखल इंग्लंड अमेरिकेनेदेखील घेतली; पण आता त्यांचे विकासाचे काम पाहून व्हिसा देण्यासाठी हेच देश पुढे आले आहेत. मोदी हे भ्रष्टाचारी नाहीत, त्यांना स्वत:चे कुटुंब नाही आणि नातेवाईकांनाही त्यांनी दूर ठेवले आहे, ते संघ निष्ठावंत आहेत, संघाची सेवा करून त्यांना गुजरातमध्ये भाजपा वाढवला आहे. त्यांच्यापासून दूर गेलेल्या मुस्लिमांनाही त्यांनी जवळ केले आहे. या वेळीदेखील त्यांचीच सत्ता येऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना समर्थन दिलेले नाही, त्यांची तशी प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केलेला नाही. एवढेच काय त्यांची सरसंघचालकांसोबत झालेली भेट हा चर्चेचा विषयदेखील होऊ दिला नाही. त्यामुळे संघाचा ब्राह्मणी चेहरा कायम ठेवण्याचा सरसंघचालक मोहन भागवत यांचा प्रयत्न यशस्वी होऊ लागला आहे. यापूर्वीच्या सरसंघचालकांनी संघाला सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून मोदी आणि मुंडेंसारखे नेतृत्व निर्माण झाले; पण भागवतांनी संघाला पुन्हा मूळपदावर आणले आहे.

नितीन गडकरींवर जमिनी लाटल्याचे आरोप आणि गडकरींचे खुलासे सुरू असतानाच माजी पोलीस आयुक्त वाय. पी. सिंग यांनी पवार कुटुंबीयांचे लवासा प्रकरण पु:नश्च उकरून काढले. लवासाचे नाव काढले की, पवार कुटुंबीयांच्या अंगाची लाही लाही होते, ते रागाने लालेलाल होतात, शरद पवार असोत की अजित पवार त्यांच्यावर कायम भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यामुळे आरोपांचे त्यांना काहीच वाटेनासे झाले आहे. अति झाले नि हसू आले, अशी शरद पवारांची मानसिकता बनली असावी, त्यामुळे या सर्व आरोपांचे खंडन करतानाच त्यांनी राजकारण, उद्योग, व्यवसाय, भ्रष्टाचाराचे आरोप यावर असे काही वक्तव्य केले की, 'या सगळय़ांच्या व्याख्याच बदलून टाकल्या. घोटाळय़ांच्या आरोपाने गडकरी-पवार यांचे वलय गेले, जनमानसातील प्रतिमेला धक्का बसला, आग असल्याशिवाय धूर निघू शकत नाही, अशी सर्वसाधारण भावना व्यक्त केली जात आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना 'विशेष नियोजन प्राधिकरण कायदा' मंजूर करून घेतला होता. या प्राधिकरणांतर्गत लवासाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर एकही लवासासारखे हिलस्टेशन मंजूर झाले नाही. आता पुणे जिल्ह्यातच मुळशीजवळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा हिलस्टेशनला मंजुरी दिली. त्याबाबत चर्चा का होत नाही. असो प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उपस्थित केला जात आहे.

कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून, अनेकांचे घोटाळे उघड करण्यात आले असल्याने त्यांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरविलेले दिसते. त्यातूनच गडकरी-पवार साटेलोटे असल्याची चर्चा सुरू झाली. गडकरींनी कंपन्या काढून, उद्योग सुरू करून गोर-गरीबांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला, असे संघालाच नव्हे तर पवारांनाही वाटत आहे. आणि राजकारण्यांनी उद्योग सुरू केले तर बिघडले कुठे? असे शरद पवार म्हणत आहेत. राजकीय मतभेद असले तरी उद्योगधंद्यांवर त्यांचे एकमत आहे. बिचारे आमदार देवेंद्र फडणवीस, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला हैराण करून सोडले होते; पण वरिष्ठ पातळीवरच साटेलोटे आणि उद्योगधंदा वाढीवर एकमत होत असेल, उद्योगधंदा समृद्धीसाठी करण्यात आलेल्या विशेष प्रयत्नांना एकमेकांची साथ मिळत असेल, तर खालच्या कार्यकर्त्याने बघायचे कोणाच्या तोंडाकडे, अशी त्यांची अवस्था झाली. असे म्हणतात की, संघानेच भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना सत्ताधार्‍यांवर सोडले होते आणि गडकरींवरच शेकले तेव्हा समीकरणे बदलून गेली. अशा पद्धतीचे करमणूकप्रधान नाटय़ राजकारणात घडू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर प्रबोधन केले. घोटाळे, भ्रष्टाचार, गैरकारभार असे टीकास्त्र कोणी सोडले तर त्यांना कसे प्रत्युत्तर द्यायचे याचे प्रशिक्षण त्यांनी या दोन दिवसांच्या अधिवेशनात दिले. सरकारमधील मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री अथवा मंत्री हे चुकीच्या कामाला जबाबदार नसून, कामांची जबाबदारी अधिकार्‍यांची आहे, असे त्यांनी सांगितले. आरोप झालेल्या मंर्त्यांची त्यांनी अशा प्रकारे पाठराखण केली. सरकारच्या कारभारात जो भ्रष्टाचार होतो, निर्णय घेतानाच टक्केवारीचे वाटप होते आणि मग कामाची अंमलबजावणी सुरू होते, अनेकदा निकृष्ट दर्जाचे काम होते, आपल्या मर्जीतल्या कंत्रादारांना कामे दिली जातात, राजकीय वरदहस्त असलेले कंत्राटदार मनमानी करून नफा कमवतात. कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करतात. पण या चुकीच्या कामाला नोकरशाहीवर ठपका ठेवून पवार मोकळे झाले. शेतकर्‍यांचा जाणता राजा असे बिरूद पवारांना लावण्यात आले आहे; पण आता त्यांना 'उद्योगपतींचा जाणता राजा' म्हणायला हरकत नाही. त्यांनी उद्योजक झालेल्या राजकारण्यांचीही पाठराखण केली असून, राजकारण्यांना उद्योजक होण्यासाठी उत्तेजन दिले आहे. त्यांनी राजकारण्यांपासून कोणतेही क्षेत्र वेगळे ठेवलेले नाही. राजकारण्यांनी कबड्डी, क्रिकेटपासून अलिप्त राहू नये, असे कृतीनेच दाखवून दिले आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ लोकसेवा करावी आणि समाजसेवक व्हावे असे नव्हे तर वेगवेगळय़ा क्षेत्राच्या माध्यमातून लोकसेवक व्हावे, असे आवाहन त्यांनी केलेले आहे, ही वेगळी क्षेत्रे पादाक्रांत करताना काही चुका होत असल्या तरी त्या चुकांची जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही, त्यामुळे बिचकू नका, घाबरून जाऊ नका, बेधडकपणे कामाला लागा, असा संदेश त्यांनी राष्ट्रवादी नेते, मंत्री आणि कार्यकत्र्यांना दिला आहे.

निवडणुकीसाठी पूर्वी गुन्हेगारांकडून पैसे घेतले जात असत. नंतर गुन्हेगारांना वाटले राजकारण्यांना पैसे देण्यापेक्षा आपणच का निवडणूक लढवू नये, म्हणून गुन्हेगार निवडणूक लढवू लागले आणि निवडूनही येऊ लागले. त्याचप्रमाणे उद्योजकांना परवानग्या देण्यापेक्षा आपणच का उद्योजक होऊ नये, असे राजकारण्यांना वाटू लागले आहे. यापूर्वीचा हा सगळा प्रकार पाहता आजकाल राजकारणी श्रेष्ठ आहेत, त्यांचे काहीच चुकत नाही, चुकत असेल, तर त्यांना निवडून देणार्‍या जनतेचेच हेच खरे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP