Monday, October 29, 2012

बाळासाहेबांचे दु:ख हलके करा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची महाराष्ट्रातील जनतेला सवय झाली आहे. बाळासाहेब काय बोलणार, याची शिवसैनिकांनाच नव्हे, तर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना व कार्यकत्र्यांनाही उत्सुकता लागून राहिलेली असायची. विशेषत: सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अधिक उत्सुकता वाटत असे. सत्ताधारी नेत्यांची, पंतप्रधान, मुख्यमंत्री, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, राजकीय पक्षाचे अध्यक्ष यांची टिंगलटवाळी आणि नक्कल करून बाळासाहेबांनी दाखविली की हास्याचे एकापाठोपाठ स्फोट व्हायचे आणि शिवतीर्थावर आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण निर्माण व्हायचे.


शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची चित्रफीत पाहून तमाम शिवसैनिकांचे हृदय हेलावून गेले असेल, तमाम मराठी मनात बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण झाली असेल, असेच त्यांचे भावनिक भाषण होते. प्रकृती अस्वास्थ्य, बोलताना लागणारी धाप आणि चेहर्‍यावर जाणवणारा कमालीचा थकवा यामुळे त्यांना शिवतीर्थावर येणे शक्यच नव्हते. गेली 45 वर्षे मुंबईचे शिवाजी पार्क मैदान गाजवणारी धडधडती तोफ, शिवसैनिकांच्या मनात देश आणि महाराष्ट्र प्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणारे, आदेशाचे पालन करण्याकरिता प्रेरणा देणारे आणि हाक देताच रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करणारे शिवसेनाप्रमुखांचे तेजस्वी विचार यापुढे ऐकू येणार नाहीत. चित्रफितीच्या माध्यमाद्वारे का होईना, पण बाळासाहेब यापुढे शिवतीर्थावर दिसणार नाहीत, ही खंत मनी बाळगून शिवसैनिक शिवतीर्थावरून माघारी फिरला. याचे कारण म्हणजे न्यायालयाने शिवसेनेची ही शेवटची सभा असल्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती गेले दोन- तीन वर्षे ढासळली आहे. त्यांना दसरा मेळाव्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यातच न्यायालयाने आदेश दिला आहे. शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा आवाज बंद करण्याची ताकद कोणत्याही न्यायालयात नव्हती. पण आज या वाघाचाच आवाज क्षीण झाला आहे. शिवसेनाप्रमुखांना उदंड आयुष्य लाभो, अशी भावना प्रत्येक मराठी मनात आहे. खरे सांगायचे तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची महाराष्ट्रातील जनतेला सवय झाली आहे. बाळासाहेब काय बोलणार, याची शिवसैनिकांनाच नव्हे, तर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना व कार्यकत्र्यांनाही उत्सुकता लागून राहिलेली असायची. विशेषत: सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अधिक उत्सुकता वाटत असे. सत्ताधारी नेत्यांची, पंतप्रधान, मुख्यमंत्री, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, राजकीय पक्षाचे अध्यक्ष यांची टिंगलटवाळी आणि नक्कल करून बाळासाहेबांनी दाखविली की हास्याचे एकापाठोपाठ स्फोट व्हायचे आणि शिवतीर्थावर आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण निर्माण व्हायचे. दसरा मेळावा हा 'जय भावानी, जय शिवाजी' 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', अशा घोषणांनी दुमदुमून जायचा आणि हा राजकीय पक्षाचा मेळावाच नव्हे, तर सांस्कृतिक उत्सव असल्याचा अनुभव लोकांना मिळायचा. 

जगात तब्बल 45 वर्षे एकाच व्यक्तीच्या छत्राखाली असलेली दुसरी कोणतीही संघटना नाही, सत्तेत न जाता मैदान गाजवणारा दुसरा कोणताही नेता शोधून सापडणार नाही. उलट ज्या वेळी 1995 साली सत्ता आली त्या वेळी महाराष्ट्राच्या सत्तेत 35 वर्षे असलेल्या मराठय़ांची मक्तेदारी मोडीत काढून उपेक्षित मागासवर्गीय घटकातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुखच घेऊ शकतात. माळी, धनगर, बुरुड, मातंग, चांभार, रिक्षावाले, डमरूवाले, कामगार, मजूर अशा घटकातील लोकांना तिकिटे देऊन त्यांना निवडून आणायचे आणि मंत्री करायचे ही गोष्ट सोपी नाही. पण बाळासाहेबांनी हे करून दाखवले आहे. बाळासाहेबांनी शिवसेना ही पक्ष संघटना म्हणून कशी चालवली हे शिवसेनेचे त्या वेळचे निष्ठावंत, बाळासाहेब हेच आपले श्रद्धास्थान मानणारे आणि आजही त्यांच्याविरोधात ब्र न काढणारे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांना चांगले माहीत आहे. पण बाळासाहेबांच्या संघटनेला आजतागायत कोणी कोषाध्यक्ष नाही, हे विशेष. पक्ष कसा चालतो, मातोश्री कशी चालते असे प्रश्न विचारण्याचे कोणाचे धाडसदेखील होत नाही. एवढा बाळासाहेबांचा आदरयुक्त दरारा आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक राजकीय पक्षाची कल्पना कृतीत आणण्याचे काम बाळासाहेबांनी केले आहे. खरे तर शिवसेनेचे राजकीय पक्षात रूपांतर कधी झाले, हे कळलेच नाही. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी, स्थानिकांच्या मागण्यांसाठी अनेक सामाजिक संघटना लढत असतात, पण शिवसेनेसारखी आक्रमकता कोणत्याही संघटनेत नाही. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून खाजगी, सरकारी संस्था, बँका, एअर इंडियासारखी निम्नसरकारी कार्यालये यामध्ये नोकर्‍या मिळालेले तरुण घराघरात शिवसेनेचा प्रचार करीत असत.

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी क्वचित मुद्दय़ांवर काँग्रेसला पाठिंबा दिला असेलही, पण त्यांची काँग्रेसविरोधी भूमिका आजतागायत कायम राहिली आहे. ममता, मुलायम, माया, रामविलास पासवान यांनी कॉँग्रेसविरोधी भूमिका घेऊन प्रादेशिक पक्ष उत्तम चालविले, लोकप्रियता कमावली. पण सत्तेसाठी कॉँग्रेसशी हातमिळवणीदेखील केली, पण शिवसेनाप्रमुखांनी आपली भूमिका कधी बदलली नाही, त्यांची विरोधाची धार आजही कायम आहे. बाळासाहेबांनी मैत्रीमध्ये कधी तडजोड केली नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर गेली 22-23 वर्षे केलेली युती आजही कायम आहे. अनेक वादविवाद झाले, एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले झाले, उकाळ्या-पाकाळ्या काढल्या. पण निवडणुकीसाठी युती कायम राहिली. याच दृष्टीने 1995 साली सत्ता मिळवली. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीने धुडगूस घातला आहे. सर्वच राजकीय नेत्यांना पुत्र प्रेमाचे, पुत्री प्रेमाचे भरते आले आहे. पण अनेक नेत्यांचे पुतणे हे काकांचे वारसदार होऊ शकतील, अशी कामगिरी या पुतण्यांनी बजावली आहे. शरद पवार, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे अजित पवार, समीर भुजबळ, धनंजय मुंडे यांनी समाजकारणात चांगली कामगिरी बजावली. त्या सर्वामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांची कामगिरी अधिक उठावदार आहे. इतर पुतणे आपापल्या काकांच्या पक्षात राहूनच संघर्ष करीत आहेत. अलीकडे धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, पण राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढून काकांनाच थेट आव्हान दिले. याचे कारण बाळासाहेबांचे पुत्रप्रेम असल्याचे सर्वश्रुत आहे किंबहुना सर्वाचा तसा समज झालेला आहे. 

उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी अहोरात्र राबवलेल्या निष्ठावान नेत्यांना डावलले. त्यामुळे प्रथम छगन भुजबळ, गणेश नाईक शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर नारायण राणे आणि नंतर राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उद्धव ठाकरेंच्या गटबाजीच्या राजकारणाला आणि कार्यक्षम नेत्यांना बाजूला सारण्याच्या कार्यपद्धतीला कंटाळून हे नेते बाहेर पडले. राज ठाकरे हे शिवसेनेतूनच नव्हे, तर घरातून बाहेर पडले. राज-उद्धव आणि बाळासाहेब यांच्यामध्ये दरी निर्माण झाली असली तरी बाळासाहेबांबद्दलची आपली आत्मीयता तसूभरही कमी झालेली नाही, असे राज ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे आणि बाळासाहेब व उद्धव यांच्या आजारपणात त्यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. या दोघांशी भावनिक आणि कौटुंबिक नाते कायम असल्याचेच त्यांनी दाखवून दिले आहे. 

राज ठाकरे यांनी 'मातोश्री'वर जाऊन केव्हा तरी बाळासाहेबांना भेटणे, त्यांची आस्थेने विचारपूस करणे हे बाळासांहेबांना नक्कीच अपेक्षित नसावे. राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर पडल्याचे खरे दु:ख बाळासाहेबांना झाले आहे. शिवसेनेचे इतर नेते बाहेर पडले त्याचा त्यांना राग आला, पण राज बाहे पडल्याचे दु:ख झाले. केवळ बाळासाहेबांनाच नव्हे तर शिवसैनिकांना आणि मनसैनिकांनाही दु:ख झाले. राज ठाकरेंनी या वयात बाळासाहेबांना दु:ख द्यायला नको होते, अशी प्रतिक्रिया उमटली. त्यामुळेच उद्धव आणि राज या दोन भावांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा हे सर्वजण व्यक्त करीत असतात. बाळासाहेबांची चित्रफीत पाहताना बोलण्याचाही त्यांना त्रास होत आहे, हे दिसत होते. त्यामुळे बाळासाहेबांना जास्त दु:ख देऊ नका, राज यांच्या दूर जाण्याने बाळासाहेबांना किती दु:ख झाले असेल हे राज यांनाच चांगले माहीत असावे. ज्या बाळासाहेबांनी अंगाखांद्यावर खेळवले त्यांना आजच्या परिस्थितीत समाधान कसे मिळेल, याचा विचार राज यांच्यासह सर्वानाच करावा लागेल, त्याचे दु:ख हलके करावे लागेल. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली आणि शिवसैनिकांना आणि शिवसैनिकांच्या मनात ठसलेली शिवसेना उद्धव ठाकरे उभी करू शकले नाहीत. ती धमक राज यांच्यात आहे. आदित्य ठाकरे यांच्या हाती बाळासाहेबांनी तलवार दिली खरी, पण ही 'बालशिवाजी'च्या हातात असलेली तलवार रणांगणात अद्याप तळपली नाही, ती म्यानातच आहे. तेव्हा आता बाळासाहेबांना समाधान मिळवून देण्याची जबाबदारी राज यांच्यावर आली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP