Monday, October 8, 2012

व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनकारांचा शोध

मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी रांगेत उभे राहून प्रवेशद्वारापाशी असलेल्या कार्यालयातून प्रवेशपत्रिका घ्यावी लागते. मगच प्रवेश मिळतो असा सर्वसाधारण सामान्य माणसांचा समज आहे. किंबहुना लोकांना ही माहिती आहे पण हे काही खरे नाही. असेलच तर अर्धसत्य आहे. 

तुमच्याकडे सरकारची राजमुद्रा असलेले ओळखपत्र असेल, मग ते दारू पिण्याचे परमिट का असेना तुम्हाला मंत्रालयात प्रवेश मिळू शकतो! याचा अर्थ असा नव्हे की, प्रवेश पत्रिकेसाठी रांगेत उभे राहण्याऐवजी दारू, परमीट घेऊन यावे. पण मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी काही महाभाग या परमिटचा असाही उपयोग करू शकतात, अनेकांनी केलेला आहे. दारू परवाना मिळवणे सोपे तर आहेच पण त्यासाठी डॉक्टरांनी तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला दारू घेण्याची आवश्यकता असल्याची, तुम्हाला दारू जवळ बाळगण्याची आणि प्रवासात बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता असल्याचे शिफारस पत्र दिले की दारू परवाना मिळू शकतो. त्यामुळे दारू पिणे शरीराला साधक आहे की, बाधक असा प्रश्न उभा राहू शकतो. पण डॉक्टरांना कोण चॅलेंज करणार? आणि असा परवाना असेल तर दारू पिण्यापासून परवानाधारकाला कोण रोखणार? 'तंबाखू सेवनाने कर्करोग होतो अशा पाटय़ा सिगारेटच्या दुकानांवर, पान तंबाखूच्या टपरीवर देखील लावल्या जातात. पण त्याकडे दुर्लक्ष करून किंवा ते वाचत वाचत सिगारेटचे झुरके मारणारे आणि तंबाखूचा बार लावणारे यांची संख्या काही कमी नाही. सरकार तरी काय करणार? अशा प्रवृत्तींना आळा घालणार तरी कसे? गणेशोत्सवासारखा धार्मिक उत्सव असेल त्या दरम्यान विशषेत: अनंत चतुर्दशी असेल किंवा महात्मा गांधींची जयंती असेल त्यावेळी दारू विक्रीला बंदी केली जाते पण पिणार्‍यांचे काही बिघडत नाही. त्यांना काळय़ा बाजारात हवी तेवढी दारू मिळू शकते. अनंत चतुर्दशीला दारू पिऊन मिरवणुकीत नाचणारे आणि धांगडधिंगा घालणार्‍यांची कमी नाही. त्यांना रोखणार कोण? 'देशी दारूचे सरकार मान्यता प्राप्त दुकान' असे फलक लावलेली दुकाने जर ठिकठिकाणी पाहायला मिळत असतील तर दोष द्यायचा कोणाला? दारू आणि अमली पदार्थ सेवनाच्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या 'चिल्लर पार्टय़ाना क्लब आणि हॉटेल्स उपलब्ध करून देणार्‍यांची संख्या कमी नाही. 

आरोग्याला अपायकारक असलेल्या दारूला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण दारूबंदी करून टाकण्याचा निर्णय घेतला; परंतु संपूर्ण दारूबंदी करणे शक्य नसल्याने सरकारने दारूबंदीच्या निर्णयाची चर्चा थांबवली. स्वातंर्त्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींच्या तत्त्वप्रणालीचा प्रभाव असलेल्या सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला होता, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशानेदेखील 1920 झाली दारूबंदीचा निर्णय घेतला होता; परंतु अमेरिकन सरकारचा हा निर्णय अयशस्वी ठरला, अखेर 12 वर्षानी 1932 साली त्यांना दारूबंदीचा निर्णय रद्द करावा लागला. जगभर दारूचा महापूर वाहत असताना एखाद्या देशाने केलेली दारूबंदी रोखणे केवळ अशक्य होते. स्वातंर्त्य मिळण्यापूर्वी मद्यसेवन करण्यावरून महात्मा गांधी आणि पंडित मोतीलाल नेहरू यांच्यामध्ये मतभेद झाले होते. जगातल्या अनेक नेत्यांनी आणि विद्वानांनी दारूबंदीला विरोध केला होता. दारू पिण्याला विरोध नाही पण पिण्याचा अतिरेक करण्याला विरोध होता. हिंदू, ºिश्चन, मुस्लीम या धर्मानी मद्यसेवन निषिद्ध मानलेले नाही. 

देशात वाढत चाललेली व्यसनाधिनता हा सर्वाच्या चिंतेचा विषय बनली आहे. व्यसन हे केवळ दारूचेच नव्हे, तर तंबाखू, गुटखा, चरस, गांजा, ब्राऊन शूगर मॉर्फिन, इत्यादी अनेक पदार्थाचे सेवन यांचेही व्यसन लोकांना लागले आहे. व्यसनांच्या आहारी तरुण पिढी जाऊ लागली आहे, व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी दारूबंदी करण्याचा प्रयत्न करून पहिला त्यासाठी कायदाही केला. पण दारूबंदीचा प्रयोग सपशेल फसला आहे. उलट एकीकडे उत्पन्न वाढीसाठी मद्य उत्पादन करण्यास मान्यता द्यायची, अल्कोहल सेवनाचे परवाने द्यायचे, देशी दारूची सरकारमान्य दुकाने थाटायची, बियर बार सुरू करायचे आणि दुसरीकडे दारूबंदीचा किंवा व्यसनमुक्तीचा प्रचार करायचा असा विरोधाभास सरकारी धोरणात दिसून येतो आहे.

महराष्ट्रात लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, शेतीला पाणी मिळत नाही, वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मात्र कोकाकोला पेप्सीप्रमाणे देशी दारू आणि वाइनचा राज्यात महापूर आला आहे. करोडो रुपयांचे सिंचन प्रकल्प सुरू करण्यात आले, पण सिंचनाखालील जमिनीचे प्रमाण 16 टक्क्यांच्या पुढे सरकले नाही, अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत असून, प्रकल्पांच्या किमती वाढत गेल्या, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत गेली असून, महाराष्ट्राचे वाळवंट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिण्यासाठी पाणी नाही आणि दारू मुबलक मिळत आहे, अशी परिस्थिती आहे. 

सिंचन प्रकल्प उभारण्याची जबाबदारी असलेले जलसंपदा खाते आहे राष्ट्रवादीकडे, दारूचे परमिट देण्याची आणि वाईन प्रकल्पांना मान्यता देणारे खातेही राष्ट्रवादीकडे आणि सामाजिक न्याय विभागांर्तगत असलेले दारूबंदी प्रचार कार्य हे खाते आहे कॉँग्रेस पक्षाकडे. सरकारने महसूल वाढीसाठी वाईन उद्योग वाढवण्यावर भर दिला आणि विरोधकांच्या टीकेचा धूर कमी करण्यासाठी 'दारूबंदी प्रचार कार्य' हे नाव वगळून 'व्यसनमुक्ती' असे नामकरण करण्यात आले. सरकारमान्यतेने सुरू असलेल्या देशीदारू दुकानांनी राज्यात व्यसनाधिनता वाढवली असून, या व्यसनाधिनतेला आळा घालण्याची जबाबदारी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. महात्मा गांधी जयंतीचे निमित्तसाधून त्यांनी व्यसनमुक्ती मोहिम राबवण्याचे काम सुरू केले आहे. 2 व 3 ऑक्टोबर रोजी पुणे येथे दोन दिवसांचे राज्यस्तरिय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. व्यसनमुक्तीच्या कार्याला जीवन समर्पित केलेले 'मुक्तांगण' संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांनी संमेलनाध्यक्ष या नात्याने संमेलनाला मोठी उंची प्राप्त करून दिली होती. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सिंधुताई सपकाळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, सचिन अहिर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी झपाटय़ाने व्यसनाधिनतेकडे जाणार्‍या समाजाबद्दल चिंता व्यक्त केली. हर्षवर्धन पाटील यांनी व्यसनमुक्ती चळवळ लोकचळवळ झाली पाहिजे असे मत मांडले, तर न्या. धर्माधिकारी आणि डॉ. अवचट यांनी चंगळवादामुळे व्यसने वाढली असल्याची टीका केली. पूर्वी दारूबंदीच्या निर्णयामुळे हातभट्टीवाल्यांचे उखळ पांढरे होत असे. हातभट्टीचा धंदा तेजीत चालत असे, आज जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणाने सगळीच क्षेत्रे खुली झाली, खाजगीकरणातून उद्योग वाढू लागले तसा वाईन उद्योगही वाढत गेला लोकांच्या हातात पैसा आला, चंगळवाद वाढला. या चंगळवादाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा चेहरामोहरा बदलून गेला. कुटुंब संस्था, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांनी तरुण मुलामुलींवर संस्कार करायचे असतात, ही संस्कृतीच लयाला जात असल्याचे उघडय़ा डोळय़ांनी बघण्याची वेळ आली. जागतिकीकरणाने जग जवळ आणले, हे विश्व एक खेडे बनले. पण जीवन जगण्याच्या जाणिवा बोथट झाल्या. मुंबई-पुण्याबद्दल सांगायचे तर पूर्वी महाराष्ट्रातील लोक मुंबईचे अनुकरण करत असायचे, पुणेही त्याला अपवाद नव्हते; परंतु आज मुंबई-पुण्याची तुलना करायची तर पुण्याने मुंबईवर मात केली आहे, असे म्हणावे लागेल. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये आयटीपार्क, सॉफ्टवेअर कंपन्या, कॉलसेंटर्स यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पैसा आला. परदेशातून आणि परप्रांतातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर कोणाचे बंधन नाही. कमविणार्‍या आई-वडिलांनी शाळेत जाणार्‍या मुलांनाही पैसे देण्याची सवय लावली. त्यामुळे पुण्याचे शैक्षणिक वातावरण बदलले आणि 'चिल्लर पाटर्य़ा' आणि 'रेव्ह' पार्टय़ाचे पेव 

फुटले. वसतिगृहांमध्ये राहणार्‍या विद्यार्थिनी रात्री दारू पिऊन जात असल्याची अनेक उदाहरणे ऐकायला मिळत आहेत. रॅगिंग वाढले आहे. चिल्लर पाटर्य़ा वाढल्या आहेत. मुलांचा उनाडपणा वाढल्याने भाडय़ाने घर घेऊन राहणार्‍या विद्यार्थ्यांचा रहिवाशांना त्रास होत आहे. पोलिसांत त्यांच्या तक्रारी दिल्या जात आहेत. याउलट मुंबई हे सर्वसमावेशक घाम गाळून समृद्ध झालेले शहर आहे. तिथे सगळेच आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही, पुण्याचा आजवरचा लौकिक कमी करण्याचा प्रताप मोकाट सुटलेले विद्यार्थी करत आहेत. त्यांना आवर घालण्याचे काम शिक्षक आणि पालकांना करावे लागणार आहे. धर्म कोणताही असो तो सदाचार, सुविचार, पाविर्त्य, चार्त्यि, नितीमत्ता यांची शिकवण देतो पण, व्यवहारात त्यांचे पालन होईलच असे नाही, जागतिकीकरणाच्या रेटय़ात दारूचा महापूर रोखता येणार नाही. पण व्यसनमुक्तीची चळवळ राबवून व्यसनाला आळा घालता येऊ शकेल. सामाजिक संस्था आणि धर्माधिकार्‍यांसारखे अधिकारी, व्यक्ती यांनी लोकचळवळीची हाक दिली आहे. तिला समाजातून समर्थन मिळणे जसे गरजेचे आहे, तसे सरकारनेही भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. उपमुख्यमंत्रीपदी आणि अर्थमंत्री असताना अजितदादा पवार यांनी गुटखा बंदी केली. मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसह कोणीही व्यसने करू नयेत, असे त्यांनी नेहमीच बजावलेले आहे. कसलेही व्यसन नसलेले सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे हे व्यसनमुक्तीची चळवळ अधिक गतीमान करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी ब्रॅण्ड अँम्बेसेडर म्हणून त्यांनी अभिनेता नाना पाटेकर यांना आमंत्रित केले होते. पण नानाने आपल्या परखड स्वभावानुसार आपणच पीत असल्याने अँम्बेसेडर होऊ शकत नाही, असे सांगितले. त्यांनतर आमीर खानला पाचारण करण्यात आले, गेल्या सप्ताहात सिंधुताई सपकाळ असल्याचे जाहीर केले. सरकारने प्रबोधनकारांचा शोध सुरू केला आहे. प्रयत्न केले तर अर्धे यश मिळेलच.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP