Monday, December 17, 2012

ऐन थंडीत पत्रिकांचा होलीकोत्सव!


देशभर गाजत असलेले केंद्रातील विविध विभागांचे घोटाळे त्यात महाराष्ट्रातील कथित घोटाळ्यांची भर यामुळे राजकारण्यांची विश्वासार्हता पार ढासळून गेली आहे. राज्यातील आदर्श घोटाळा चांगलाच वाजला, गाजला. आता सिंचन घोटाळा वाजतोय, गाजतोय. आदर्श घोटाळ्यात राजकारणी आणि अधिकारी गुंतले असल्याने सर्वत्र खळबळ उडाली. अनेक सनदी अधिकारी गजाआड गेले असल्याची दृश्ये वाहिन्यांवर दाखवली जात होती. त्यामुळे प्रशासनात मरगळ आली. प्रकरण न्यायालयात पल्रंबित आहे. सध्या गाजत असलेल्या सिंचन घोटाळ्याचा रोख अनेक वर्षे जलसंपदा विभाग सांभाळणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असल्यामुळे या प्रकरणाला चांगलाच राजकीय रंग आला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केल्यामुळे सर्वजण श्वेतपत्रिकेच्या प्रतीक्षेत होते. श्वेतपत्रिका प्रकाशित होताच विरोधक आक्रमक झाले. कारण त्या घोटाळा झाल्याच्या खुणा कुठेच दिसल्या नाहीत. अजित पवारांना क्लीन चिट मिळाली होती. टीकेचा रोख आपल्यावरच असल्यामुळे अजित पवार पुरते वैतागले होते. वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर अजित पवारांची बदनामी सुरू झाली होती. काका-बाबांची साथही मिळेना. कोणी समजूनही घेईना. अखेर त्यांनी काकांनाच विचारले, 'राजीनामा देतोय.' काका म्हणाले, 'पूर्ण विचारांती निर्णय घे.' काकांनी रोखले नाही तेव्हाच अजित पवारांनी ओळखले, काकांनाही राजीनामा हवा आहे. मग देऊन टाकला राजीनामा! मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी राजीनामा तत्काळ स्वीकारला आणि राज्यपालांकडे पाठवून दिला. एकूण 72 दिवस अजित पवार सत्तेबाहेर होते; पण त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले होते. पायाला भिंगरी लावल्यागत राज्यभर कार्यक्रम घेत फिरत होते. कधी कधी भाषणात तोल जायचा, 'बघून घेईन', 'करून दाखवेन', 'योग्यवेळी बोलेन', 'अधिवेशनात दाखवतो' असे वक्तव्य करून आपल्या कार्यकत्र्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. सिंचनाची श्वेतपत्रिका सरकारने प्रकाशित केली आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. एकमेकांच्या पत्रिकांना आव्हान देत आमने-सामने उभ्या ठाकल्या. कोण खरे, कोण खोटे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ऐन थंडीत वातावरण गरमागरम झाले खरे पण सत्य समोर येईल का, या विषयी शंका वाटू लागली.

क्लीन चिट मिळताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिनखात्याचे मंत्री म्हणून उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. विरोधी शिवसेना, भाजपा, मनसे या सर्वानी त्यांच्याविरुद्ध रान उठविण्यास सुरुवात केली. त्यानंतर गोंधळ वाढला. श्वेतपत्रिकेला उत्तर म्हणून भाजपाने काळीपत्रिका प्रसिद्ध केली. काळ्या पत्रिकेला राष्ट्रवादीच्या 'सत्यमेव जयते' पत्रिकेने प्रत्युत्तर दिले, तर 'सत्यमेव..' पत्रिकेच्या प्रत्युत्तराला भाजपाने 'सत्यावर घाव' असे प्रत्युत्तर दिले. 'सत्यमेव जयते' प्रसिद्ध होण्याआधीच त्यातील तपशील भाजपाला समजला होता. त्यामुळे प्रत्युत्तर आधी आणि प्रत्युत्तर नंतर असा प्रकार घडला. पत्रिकांचे युद्ध सुरू असल्याची वृत्ते नागपुरातून येऊ लागली. हे खरेच युद्ध आहे की आतून कीर्तन, वरून तमाशा आहे हे यथावकाश समजून येईलच; पण या पत्रिकांचा ऐन थंडीत होलीकोत्सव रंगला असल्याने लोकांची करमणूक होऊ लागली आहे. राजकारण्यांनी उरलीसुरली विश्वासार्हताही गमावली असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यापासून टोळीयुद्धाचे प्रमाण वाढले होते. पूर्वी गुंड टोळ्य़ांमध्ये मारामार्‍या होत; पण राजकारण्यांचा वरदहस्त मिळाला आणि गुंडांचे सरकारदरबारी वजन वाढले. तेव्हापासून किरकोळ मारामार्‍या किंवा एखाददुसरा खून करण्याचे सोडून रणांगणावर एकमेकांना आव्हाने देणे सुरू केले. मारामार्‍यांचे रूपांतर युद्धात झाले. त्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. टोळीयुद्धामध्ये कोणकोणाचा प्रतिस्पर्धी हे समजते तरी, पण पत्रिका युद्धात तसे सहजासहजी समजणे कठीण आहे. टोळीयुद्धाशी पत्रिका युद्धाची तुलना करणे राजकारण्यांना रुचणार नाही. तेव्हा पत्रिकांची तुलना शिधापत्रिकांशी करायला हरकत नसावी. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाने निघालेली श्वेतपत्रिका म्हणजे पांढरी शिधापत्रिका आहे. पांढर्‍या शिधापत्रिकेवर काही मिळत नाही. काही मिळाले नाही तरी चालते. कारण ही शिधापत्रिका 'नरो वा कुंजरो वा' आहे. उच्चवर्गीय आहे. तेल, साखर, केरोसीन मिळावे अशी अपेक्षा नाही; पण तिचे अस्तित्व मात्र कायम आहे. तिची खास ओळख आहे. दुसरी शिधापत्रिका आहे तांबडी. तिच्यावर केरोसीन तेल मिळते. राष्ट्रवादीला त्याचीच गरज आहे असे वाटते, अन्यथा पेटवापेटवी करणार कशी? तिसरी पत्रिका आहे पिवळ्या रंगाची. दारिद्रय़रेषेखाली असणार्‍यांची, त्यांची मागणी सतत वाढत असते आणि मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करावा लागतो. विरोधी बाकावर असलेल्या शिवसेना-भाजपा युतीला मागणी तसा अतिरिक्त पुरवठा मुख्यमंत्र्यांच्या श्वेतपत्रिकेने पुरवला आहे. श्वेतपत्रिकेत अजित पवारांना ठरल्याप्रमाणे क्लीन चिट मिळाली आहे. आर्थिक पहाणी अहवालात 0.01 टक्का सिंचन झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यावरून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यांचे अनुभवाचे चार शब्द ऐकून मुख्यमंत्री गंभीर बनले, सरकारची चूक झालेली आहे. ती सुधारली पाहिजे. त्याआधी श्वेतपत्रिका काढण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी करून टाकली होती. विधिमंडळाच्या मुंबईतील अमृतमहोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधान सभागृहात आर्थिक पाहणी अहवालावरून घेतलेल्या आक्षेपाला सविस्तर उत्तर दिले होते आणि विरोधकांचे समाधानही झाले होते. श्वेतपत्रिकेने मात्र सिंचन 5 टक्क्यांनी वाढल्याचे दाखवले. त्यावर आर. आर. पाटलांनी आर्थिक पाहणी अहवालात प्रिटिंग मिस्टेक झाली असल्याचे सांगून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आर. आर. पाटलांची पोपटपंची तत्काळ थांबवली. ते म्हणाले, मुख्यमंर्त्यांनी ही प्रिंटिंग मिस्टेक आहे असे जाहीर करावे. मग आम्ही मान्य करू.' मुख्यमंर्त्यांनी त्यावर भाष्य केलेले नाही. सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळा झालेला नाही. निधीअभावी प्रकल्प रखडल्याचा तपशील देण्यात आला आहे. शासन, प्रशासन आणि कंत्राटदार यांची युती होऊन वशिलेबाजी अथवा कंत्राटांच्या वाढीव किमती असले अभद्र प्रकार कुठे झाल्याची शंकाही व्यक्त केलेली नाही. विरोधी पक्षाने नेमके यावर बोट ठेवून अजित पवार आणि राष्ट्रवादीला घेरले. असताना मुख्यमंत्री आणि काँग्रेस मजा पाहत आहेत. 


विरोधकांच्या हाती कोलित देऊन राष्ट्रवादीला जेरीस आणण्याचे काम श्वेतपत्रिकेने बिनभोभाटपणे केले आहे. शिवसेनेने या वेळी कमाल केली. सरकारवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करून आपल्यावरचा विश्वास गमावला. आपल्या हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार घडला. विधानसभेत संख्याबळ भाजपापेक्षाही कमी असताना आणि मनसेचा या ठरावाला विरोध असताना अविश्वास ठराव आणून स्वत:चे हसे करून घेतले. सिंचन घोटाळ्याचा प्रश्न न्यायालयात गेला आहे, तिथेच अंतिम निर्णय लागणार आहे. पण यानिमित्ताने आपले राजकीय आसन मजबूत करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांनी आरंभला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आक्रमकपणे पक्षविस्ताराचे काम सुरू केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत राहू इच्छित नसलेल्यांना राष्ट्रवादीचा मार्ग आवडू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी विस्तार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. याआधी ज्येष्ठत्वाचा मान राखत मातोश्री आणि बारामती ही दोन सत्ता केंद्रे मानली जात. आता सत्तेचा लंबक बारामतीकडे झुकू लागला आहे. त्यात पृथ्वीराज बाबा काँग्रेसची जागा निर्माण करतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

श्वेतपत्रिका असो की काळीपत्रिका, सत्यपत्रिका असो की असत्यपत्रिका लोकांचा राजकारण्यांवर विश्वास नाही. 'दूध का दूध, पानी का पानी' करून दाखवण्याचे सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्ती राजकारण्यांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे लोक न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहेत. विरोधकांनी 'सत्यपत्रिके'ची होळी केली तशी सत्ताधार्‍यांनी 'असत्यपत्रिके'ची केली असती तरी चालले असते. लोकांची अधिक करमणूक झाली असती! विश्वास कोणावर ठेवायचा, कोणाच्या आकडेवारीवर ठेवायचा या विषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. पत्रिकांच्या होळीवर राजकारणाची पोळी भाजण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP