Monday, December 31, 2012

आगामी वर्ष काँग्रेस-शिवसेनेला धक्कादायक, राष्ट्रवादीला आशादायक

व्यक्तिकेंद्रित सत्ताकारण आणि भरकटलेले राजकारण यांच्या कैचीत सापडलेले समाजकारण अशी गोंधळाची स्थिती असलेले 2012 साल संपले. जेव्हा सर्वत्र गोंधळ उडालेला असतो, राज्यकत्र्यांचे भान सुटलेले असते, कायद्याचा वचक राहिलेला नसतो, पोलिसांची भीती वाटत नसते तेव्हा समाजात बेदरकारपणा आणि मनमानीपणा वाढत असतो त्यातूनच दुष्प्रवृत्ती जन्माला येतात. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत असे वातावरण पाहायला मिळत असल्याने या देशात अराजक निर्माण होईल की काय? अशी शंका वाटते. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अशीच काहीशी गोंधळलेली असून व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांचा प्रभाव दिसून येत नाही.


महिलांसाठी आशेचा किरण वर्ष सरताना दिल्लीमधे एका 23 वर्षाच्या तरुणीवर चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी अत्याचार करून तिला बाहेर फेकून दिले. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. दिल्लीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आंदोलन केले. क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या बलात्कार प्रकरणाबद्दल सर्व स्तरातून क्रोध, संताप, उद्वेग व्यक्त केला जात असून बलात्कार्‍यांना भरचौकात त्वरित फाशी देण्याची मागणी केली जात आहे. जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच असून तेथील उद्रेक पाहता जंतर-मंतर हे इजिप्तचा ताहरीर चौक होईल की काय, अशी शंका वाटत आहे. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर आणि बलात्कारी तरुणीची प्रकृती अधिक खालावत गेल्यानंतर महिलांवरील बलात्कार, अत्याचाराच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलदगती न्यायालयात ही बलात्कार प्रकरणे नेण्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षाध्यक्षा आणि संयुक्त लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्यालाही मुली असून आंदोलकांच्या भावना आपण समजू शकतो. तुम्ही शांतता पाळा असे भावनिक आवाहन केले.
राजधानी दिल्लीत घडलेल्या या क्रौर्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली. पीडित मुलीची प्राणज्योत मालवली असली तरीही मनामनात मशाली पेटल्या आहेत. देशभरातून एकापाठोपाठ एक महिलांवरील अत्याचार व बलात्काराची वृत्ते येऊ लागली आहे. या प्रकरणांना वाचा फुटू लागली आहे. तसे पाहता गेल्या काही वर्षामध्ये बलात्कारांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. पुरोगामी महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. अल्पवयीन मुलींवर, तरुणींवर बलात्कार, गतिमंद मुलींवर बलात्कार, नातेवाईकांनीच नव्हे तर बापाने आणि भावाने केलेला बलात्कार, बलात्कार करून खून केल्याची प्रकरणे अशी हजारो प्रकरणे आतापर्यंत उघड झाली आहेत. त्यात नोंद न झालेली आणखी तेवढीच प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे 2020 साली भारत देश महासत्ता बनणार असल्याच्या घोषणा होत असताना दुसरीकडे लोकसंख्येत 50 टक्के असलेल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारचा कसोटीचा काळ सुरू झाला आहे. 2013 मध्ये ठोस उपाययोजना करून आरोपींना कठोर शासन झाल्याचे दिसले नाही तर सत्ताधार्‍यांना 2014 साल कठीण जाईल, यात शंका नाही. सरकारवर दबाव वाढत असल्याने निर्णय घेणे अपरिहार्य ठरले असून महिलांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.
राजकारणात आशा-निराशा
सरलेल्या वर्षात महाराष्ट्राने अनेक नेते आणि अभिनेते तसेच समाजातील महत्त्वाच्या प्रसिद्ध व्यक्ती गमावल्या आहेत. त्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुख या दोन नेत्यांचा समावेश आहे. गेली 45 वर्षे एकहाती शिवसेना चालवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही आणि पक्षातील नेत्यांच्या कुरबुरी वाढू लागल्या आहेत. त्या कुरबुरी पाहता शिवसेनेमध्ये बंडाचा झेंडा कधी इभा राहील, याचा नेम नाही. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचे पिल्लू सोडून दिले आणि संजय राऊत यांनी ते उचलून धरले. त्यासाठी शिवसैनिकांच्या भावना भडकावून आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी सारासार विचार करून स्मारकाच्या आंदोलकांना पाठिंबा दिला नाही. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना स्मारकाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. स्मारकाचे श्रेय मिळविण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा झाली. मात्र एक महिना होण्याच्या आतच घोषणा हवेत विरल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख हे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांची प्रशासनावर आणि पक्षावर पूर्ण पकड होती. त्यामुळे तुल्यबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेस पक्षाने चांगलेच आव्हान दिले होते. कॉंग्रेसचे वर्चस्व राहील यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत होते. विलासरावांनंतर आजमितीस कॉंग्रेस पक्षाची परिस्थिती गोंधळाची आहे. मुंबईसारख्या देशाचे आर्थिक केंद्र आणि महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र असलेल्या महानगरात कॉंग्रेस पक्षाला अद्याप अध्यक्ष मिळालेला नाही. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे प्रदेश कॉंग्रेससह मुंबई काँग्रेसही चालवत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही अध्यक्ष मिळत नव्हता. अखेर खासदार संजय पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यांच्या नावालाही राष्ट्रवादीमधून प्रचंड विरोध झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची 2011 मध्ये असलेली 'मिस्टर क्लिन' प्रतिमा 2012 मध्ये कायम राहिली आहे. त्यांनी लोकप्रतिनिधींची व्यक्तिगत कामे करायची नाहीत, असा अलिखित नियम केल्यामुळे कार्यकत्र्यांमध्ये पसरलेली नाराजीदेखील कायम आहे. आदर्श प्रकरणी दुधाने तोंड भाजल्याने ताक फुंकून पिण्याची वेळ पृथ्वीबाबांवर आली. हे जरी खरे असले तरी लोकप्रतिनिधींची आमदार, खासदारांची कामे झाल्याशिवाय कार्यकर्ते उभे राहू शकणार नाहीत आणि निवडणुकाही लढवता येणार नाहीत, असे सर्रास बोलले जात आहे. व्यक्तिगत कामे नाही आणि सार्वजनिक कामेही होत नाहीत, असे मंर्त्यांचे म्हणणे आहेत. दुसरीकडे मुख्यमंर्त्यांनी केलेल्या कामांची प्रसिद्धीही होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रभर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा बोलबोला झाला आहे, असे चित्र दिसत नाही. पक्षातील दुसरे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या हेतूने शिवसेनेतून आणण्यात आले. परंतु त्यांचे महत्त्व वाढविण्याऐवजी त्यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. महसूल खाते काढून उद्योगासारखे कमी महत्त्वाचे खाते त्यांना देण्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले आणि एरवी प्रत्येक बाबीवर आपले मत नोंदविणारे आणि प्रतिक्रिया व्यक्त करणारे राणे सध्या शांत बसले आहेत. खर्‍या अर्थाने कॉंग्रेसी झाले आहेत. मात्र पक्षाला त्यांचा उपयोग करून घेता आलेला नाही. आज काल ते सल्लागाराच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. प्रदेश काँग्रेसने नुकताच कॉंग्रेसचा 127 वा वर्धापन दिन साजरा केला, पण या वर्धापनदिनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सव्वाशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षात पूर्णत: मरगळ आली असल्याचे दिसत आहे. नवीन वर्षात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना पक्षावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्यथा राष्ट्रवादीचे उत्साहमूर्ती तसेच पक्ष आणि सरकार दोहोंवर सारखी पकड असलेले अजितदादा अधिक सक्रिय झाले असून कॉंग्रेसवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने कामाला लागले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसल्यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये अस्वस्थता असून मनसेप्रमुख राज ठाकरे अद्याप कोषातून बाहेर आलेले नाहीत. नववर्षात नवा उत्साह घेऊन ते बाहेर पडतील, अशी मनसैनिकांची अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदींच्या विजयाने तात्पुरता उत्साह दिसत असला तरी विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडूनही लोकांना अपेक्षित कामगिरी झालेली नाही. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते सक्रिय दिसत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रमुख पक्षांमध्ये सहभागी होत आहेत, महायुतीत असलेले रामदास आठवले एकटेच महाराष्ट्रभर फिरून लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाचा प्रश्न तीव्र बनत चालला आहे. महिलांच्या अत्याचाराची प्रकरणे वाढू लागली आहेत. पण विरोधी पक्षाने एक साधा मोर्चाही 
काढलेला नाही. पाण्याचे राजकारण करणारे सत्ताधारी, जनतेला पाणी देणार कधी? असा प्रश्न लोक करू लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करीत असून मंत्रिमंडळ बैठकीत एकमेकांवर करीत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची वृत्ते हेतुपुरस्सर पसरवली जात आहेत. ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी मंत्रालयात बसून कॉन्फरन्सिंग करण्याऐवजी नवीन वर्षात दुष्काळग्रस्त भागात जाऊन परिस्थिती पाहण्याचा स्टंट तरी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP