Monday, April 1, 2013

सुरेशदादांच्या जामिनासाठी टाहो..


करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले सुरेश कलमाडी, ए. राजा, कन्नीमोळी यांच्यासारखे मंत्री तुरुंगातून बाहेर येतात आणि सुरेश जैन हे बहिणीच्या अंत्यसंस्काराला बाहेर येऊ शकत नाहीत, याची खंत त्यांचे अनेक नातेवाईक बोलून दाखवत होते. सुरेशदादा दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना हवी ती शिक्षा द्या; पण किमान जामिनावर सोडा. त्यांना जामिनावर सोडल्यावर महाराष्ट्रात राहू देऊ नका. दुसर्‍या राज्यात पाठवा; पण त्यांना सोडा!



समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला आव्हान देऊन हजारेंनाच बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडलेले जळगावचे आमदार सुरेशदादा जैन भ्रष्टचार प्रकरणातच शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेले नाही आणि त्यांना अद्यापि जामीनही मिळालेला नाही. मंत्री आणि आमदारांवर भ्रष्टाचाराची सतत टांगती तलवार ठेवणार्‍या अण्णांना आव्हान देण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती; परंतु सुरेशदादा जैन यांनी अण्णांच्या भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांमधील कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचार उघड करून एकच खळबळ उडवून दिली होती. जळगाव जिल्हा बॅँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी जैन यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून अण्णा आझाद मैदानात उपोषणाला बसले होते, तर अण्णांवर भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई होत नाही म्हणून त्या वेळी मंत्री असलेले सुरेशदादा हेही उपोषणाला बसले होते. अण्णा-दादा यांच्यातील हा अभूतपूर्व सामना महाराष्ट्रातील जनतेच्या औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय बनला होता. सुरेशदादा जैन हे अत्यंत परखड, स्पष्टवक्ते आणि विधायक कार्याची दृष्टी असलेले जळगावचे सर्वेसर्वा आहेत, हजारेंना आव्हान देणारे चारित्र्यसंपन्न व नैतिक धैर्य असलेले नेते आहेत. असे चित्र त्या वेळी प्रसारमाध्यमांनी रंगवले होते; परंतु पुढील काळात राजकीय वैमनस्य वाढत गेले, स्पष्टवक्तेपणा नडला, अनेकजण दुखावले गेले, स्वपक्षीय नेते, मंत्री, कार्यकर्ते दूर गेले कोणी पाठीराखे उरले नाहीत. एकप्रकारे नियतीच्या दुष्टचक्रात अडकले गेले, अटकेतून सुटका नाही अशा विचित्र कोंडीत सुरेश जैन सापडले आहेत. त्यांना आपल्या सख्ख्या धाकट्या भावाच्या आणि बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. कारण न्यायालयाने परवानगी दिली नाही. हे शल्य त्यांचे कुटुंबीय व आप्तस्वकियांना बोचत आहे. त्यामुळेच कोणत्याही गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना जामीन मिळत आहे, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावूनही संजय दत्तला माफी देण्यासाठी देशभरातून आवाज उठवला जात आहे. मग सुरेशदादांनाच जामीन का नको? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सत्ता हाती आली की, तिचा योग्य वापर होईलच, असे नाही. सत्तेचा अर्मयाद वापर करण्याकडे राजकारण्यांचा कल वाढतो आणि मग अनेकदा हातून बेकायदेशीर कृत्य घडू शकते; पण सत्तेच्या धुंदीत तारतम्य राहत नाही. सत्ताधारी राजकारण्यांच्या हातून जे घडले त्याचा पंचनामा विरोधकांकडून केला जातो आणि मग कोर्ट-कचेर्‍या होतात. काहींना राजकीय पाठबळ मिळते, काहींना मिळत नाही. सर्व बाजूंनी प्रतारणा होत राहते आणि स्वत:सह सर्व कुटुंबाला मानसिक यातना भोगाव्या लागतात. 

लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या सुविद्य पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांचे गेल्या सप्ताहात २३ मार्च रोजी निधन झाले, त्या सुरेश जैन यांच्या धाकट्या भगिनी होत्या. त्या अत्यवस्थ असताना तासाभरासाठी रुग्णालयात जाऊन भेटण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली होती; परंतु अंत्यसंस्कारासाठी परवानगी मिळू शकली नाही. तसेच त्यांना अद्यापि जामीन मिळाला नाही, याची चर्चा श्रद्धांजली सभेच्या ठिकाणी होत होती. अण्णा हजारे यांनी आरोप केलेले डॉ. पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन या दोघांनी सार्वजनिक जीवनात हयात घालवली, समाजसेवा केली; पण सेवेचे चीज झाले नाही, असा चर्चेचा सूर होता. या देशात राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सतत होत आहेत; पण सर्वांना सारखा न्याय मिळू शकत नाही. कारण बर्‍याच प्रकरणात पोलीस खात्यातूनच पक्ष:पातीपणा होतो. पोलिसांवर राजकीय दबाव असतो, त्याचा फटका बसतो. जैन यांच्यासारखा स्पष्टवक्तेपणा त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. शरद पवारांना बघून घेईन, अजित पवारांना बघून घेईन, राष्ट्रवादीला संपवून टाकीन, याला बघून घेईन, त्याला बघून घेईन, असे बोलणेही घातक ठरते. अशा बोलण्यामुळे प्रकरण चिघळू शकते. हे खरे असले तरी करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले सुरेश कलमाडी, ए. राजा, कन्नीमोळी यांच्यासारखे मंत्री तुरुंगातून बाहेर येतात आणि सुरेश जैन हे बहिणीच्या अंत्यसंस्काराला बाहेर येऊ शकत नाहीत, याची खंत त्यांचे अनेक नातेवाईक बोलून दाखवत होते. सुरेशदादा दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना हवी ती शिक्षा द्या; पण किमान जामिनावर सोडा. त्यांना जामिनावर सोडल्यावर महाराष्ट्रात राहू देऊ नका. दुसर्‍या राज्यात पाठवा; पण त्यांना सोडा! त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, आणखी अंत पाहू नका, त्यांना जामीन द्या, असा आर्त टाहो त्यांच्या जळगावातील सर्मथक व निकटवर्तीयांनी फोडला होता. 

अभिनेता संजय दत्त याने बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्याबद्दल सर्वोच्च न्यायलयाने त्याला दिलेली पाच वर्षांची शिक्षा माफ करावी, यासाठी देशभरातील अनेक मोठे नेते आणि नामवंत व्यक्तींकडून आवाज उठवला जात आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीने मागणी लावून धरली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी संजूबाबाच्या शिक्षा माफीची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एक आरोपी झैबुन्नीस्सा हिने देखील शिक्षा माफीची मागणी केली. या दोघांची शिक्षा माफ होईल किंवा नाही, हे न्यायालयावर अवलंबून आहे; परंतु त्यांच्याबद्दल जसा सहानुभूतीने विचार केला जात आहे तसा इतर आरोपींबाबत केला जात नाही. वेगवेगळय़ा स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकलेल्या आणि विविध भ्रष्टाचार प्रकरणांत गुंतलेल्या आरोपींना जामीन मिळतो. कोणाची शिक्षा देखील माफ होते. देश आणि राज्य भ्रष्टाचारमुक्त होण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही; पण संपूर्ण व्यवस्थेलाच भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. 


लोकप्रतिनिधींपासून मुख्यमंत्री व पंतप्रधानांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. काही मोठे मासे अडकतात, काही जामिनावर सुटतात, काही सहिसलामत सुटतात, तर काही कायद्याच्या फासात अडकतात. सत्तेचा अर्मयाद वापर झाला की, त्याची फळे देखील भोगावी लागतात. याचे भान ठेवले जात नाही. राजकारण्यांना सात पिढय़ांसाठी कमवून ठेवायचे असते, परिणामांची तमा बाळगली जात नाही. अनेकांकडून हा प्रमाद घडत असतो. कायद्याच्या कचाट्यात सापडले की विरोधकही पुरेपूर फायदा घेतात, कुटुंबावर मानसिक आघात होतात. मुलेबाळे, पत्नी, बहीण-भाऊ, आईवडील सर्वजण हवालदिल होतात, न्यायदेवतेकडे सुटकेसाठी याचना करतात. सुरेश जैन यांच्याबाबत नेमके हेच घडले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP