Monday, April 15, 2013

मानेंनी ओलांडली लक्ष्मणरेषा

पहिली तक्रार होताच मानेंनी पोलीस ठाण्यात जायला हवे होते. तसे न करता त्यांनी स्वत:बद्दल संशय वाढवून ठेवला. सामाजिक भान न ठेवता त्यांनी असहाय्य महिलांशी अश्लाघ्य वर्तन करून सर्व र्मयादांचे उल्लंघन केले आहे. सार्वजनिक जीवनातील पद्मश्रीसह सर्व प्रकारचे मानसन्मान त्यांना मिळाले, पण ते लक्ष्मणरेषा विसरले. भटक्या-विमुक्त समाजातील मानेंचे जन्मगाव नेमके कुठले आहे, त्याचा पत्ता नाही. आज मात्र ते महाराष्ट्रात सगळीकडेच 'उपरा' ठरले आहेत.
 
'घरचं झालं थोडं आणि लक्ष्मणानं धाडलं घोडं' अशा अडचणीत सध्या शरद पवार सापडले आहेत. पुतणे अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांबाबत अवमानकारक भाषा वापरल्याने गदारोळ उठलेला असताना भटक्या विमुक्त समाजातील एका 'उपर्‍या' नेत्याने भटकत जाण्याऐवजी भरकटत जाणेच पसंत केले. देशाचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर त्यांच्याच सर्मथकांनी आणि निकटवर्तीयांनी अनेक अडचणी उभ्या केल्या आहेत. 

'उपरा'कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी दलित महिलांवर बलात्कार केल्याच्या तक्रारी दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी मानेंना विधान परिषदेवर सदस्य केले. त्यांच्याकडे सातार्‍यातील आश्रमशाळेची जबाबदारी दिली. पण या मानेंनी शरद पवारांसमोर सामाजिक आव्हान उभे करून ठेवले. 'घरचं झालं थोडं आणि लक्ष्मणानं धाडलं घोडं' असा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा सर्वांसमोर राहावा यासाठी शरद पवारांनी वेगवेगळय़ा मागास समाजघटकांतील नेत्यांना सत्तेची विविध पदे देऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रय▪केला. लक्ष्मण ढोबळे, रामदास आठवले, राम पंडागळे, डॉ. विजयकुमार गावीत, प्रा. जोगेंद्र कवाडे यांसारख्या नेत्यांसोबत लक्ष्मण माने यांनाही विधिमंडळात सदस्यत्व मिळाले. प्रतिकूल परिस्थितीतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सुशिक्षित आणि सुज्ञ माणसाने सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. पण तसे भान न ठेवता उलट समाज जीवनातील विकृत आणि विदारक वास्तव निराळेच असल्याचे माने यांच्यावरील गुन्ह्याने दाखवून दिले आहे. समाजाच्या उन्नत्तीसाठी डोळय़ांत अंजन घालून काम केले पाहिजे, पण मानेंच्या हातून जे दुष्कृत्य घडले ते धक्कादायक आहे. 

माने यांच्याविरुद्ध २00४-0५ साली सातार्‍यामध्ये एका कार्यक्रमात शरद पवारांकडे तक्रारी आल्या होत्या. तेव्हा भाषण न करताच ते निघून गेले होते. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातार्‍यामध्ये युवती मेळावा आणि महिला अत्याचार विरोधी मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याला प्रतिसादही चांगला मिळाला. महिलांवर अत्याचार झाला तर 'एक हात तुमचा आणि दुसरा राष्ट्रवादी'चा असेल, दोन हातांनी अत्याचार करणार्‍याला फोडून काढू, अशी ग्वाही सुळे यांनी दिली होती. आता मानेंचे काय करायचे? याचा आदेश सुळे यांनी दिला पाहिजे. 

राजकीय आणि सामाजिक जीवनात भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार बनला आहे. भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहार केला तर तो फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. भ्रष्टाचार करणारी माणसे आयुष्यातून उठतदेखील नाहीत. अशी करोडोंची भ्रष्टाचार प्रकरणे गाजत असतात. काही दिवसांनी त्याची चर्चा आपोआप बंद होते. परंतु गोरगरीब महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचा लैंगिक छळ करणे आणि त्यांच्यावर बलात्कार करणे यासारखी माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी गोष्ट नाही. मानेंना बदनाम करण्याकरिता कोणी षड्यंत्र रचले, या आरोपात तथ्य वाटत नाही. एक नव्हे तर सात महिला जेव्हा आपल्यावर अत्याचार झाला आणि बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार पोलिसांत करतात तेव्हा ते चुकीचे कसे असेल? कोणतीही स्त्री आपल्यावर बलात्कार झाला असे उगाच सांगणार नाही. प्रत्येक स्त्रीचा स्वाभिमान, तिचे सत्त्व आणि स्व:त्व याला धक्का बसला आणि ते सहन करण्यापलीकडचे असेल, तर कोणतीही स्त्री शांत बसणार नाही. तिच्यातील उद्वेग बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. मानेंच्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया दलित समाजातील आहेत. फुले-आंबेडकरी चळवळीने या स्त्रियांच्या जाणिवा अधिक जागृत केलेल्या असल्या तरी पुरुषांच्या मनमानीमुळे या स्त्रियांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सामाजिक जागृती असली तरी आर्थिक स्वावलंबनापासून ही स्त्री आजही वंचित आहे. शहरामध्ये झोपडपट्टीत राहणारी, कनिष्ठ मध्यमवर्गातील तसेच मध्यमवर्गातील स्त्री ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून तिला काबाडकष्ट करावे लागतात. दारुड्या नवर्‍याचा त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागात त्यातही खेड्यातील दलित स्त्रीची अवस्था आणखी वाईट आहे. या स्त्रीला मोलमजुरी करावी लागते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यातच गावातील धनदांडग्यांचा, गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा तिला त्रास सहन करावा लागतो. करारीपणा दाखवला तर अत्याचाराला बळी पडावे लागते आणि अगतिकता व असहाय्यता असली तर बलात्काराला सामोरे जावे लागते. उच्चवर्णियांकडून आणि कंत्राटदारांकडून गरीब स्त्रियांची पिळवणूक होत आहेच. परंतु पुरोगामी चळवळीचा बुरखा पांघरलेले पुरुषदेखील त्याच पद्धतीने वागत असतील तर त्याचा सार्वत्रिक धिक्कार झालाच पाहिजे. 

मानेंसारख्या माणसाने फुले-आंबेडकरांचे नाव घेण्याचा आणि भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. लक्ष्मण मानेने बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याचा डंका पिटवला होता. ज्या बुद्ध धम्माने अन्याय, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या मुक्तीचा मार्ग दाखविला, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले. त्या धम्माचे नाव घेण्याचाही मानेंना नैतिक अधिकार नाही. अत्याचार पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता अशी मानेंकडून अपेक्षा होती. पण त्यांनीच गोरगरीब महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. कोणतीही महिला दुसर्‍याच्या राजकारणासाठी आपली अब्रू चव्हाट्यावर मांडणार नाही. स्त्री ही केवळ कोणाची पत्नी आणि आई एवढय़ा लहान कुटुंबापुरती र्मयादित नाही. ती कोणाची तरी बहीण, मावशी, मामी, आत्या तसेच असंख्य सगेसोयरे असलेल्या मोठय़ा कुटुंबातील एक असते. या सर्वांसमोर तिची एक प्रतिमा असते. अशी स्त्री आपल्यावर बलात्कार झाला, असे जाहीरपणे सांगणार कसे. वेश्याव्यवसाय करणारी स्त्रीसुद्धा आपल्यावर बलात्कार झाला असे जाहीरपणे सांगणार नाही. तेव्हा एक नव्हे तर सात स्त्रिया खोटे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

पहिली तक्रार होताच मानेंनी पोलीस ठाण्यात जायला हवे होते. तसे न करता त्यांनी स्वत:बद्दल संशय वाढवून ठेवला. सामाजिक भान न ठेवता त्यांनी असहाय्य महिलांशी अश्लाघ्य वर्तन करून सर्व र्मयादांचे उल्लंघन केले आहे. सार्वजनिक जीवनातील पद्मश्रीसह सर्व प्रकारचे मानसन्मान त्यांना मिळाले, पण ते लक्ष्मणरेषा विसरले. भटक्या-विमुक्त समाजातील मानेंचे जन्मगाव नेमके कुठले आहे, त्याचा पत्ता नाही. आज मात्र ते महाराष्ट्रात सगळीकडेच 'उपरा' ठरले आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP