Monday, April 8, 2013

कॉँग्रेसचे जनताजनार्दन चांदूरकर..



मुख्यमंत्री चव्हाण, मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष चांदूरकर आणि महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व पाहता निवडणुकीच्या राजकारणात ते कसा काय प्रभाव पाडतील, हा प्रश्नच आहे. हे तीनही नेते कॉँग्रेससाठी उपयोगाचे नाहीत तर त्यांना आणले कशासाठी?सव्वाशे वर्षांची परंपरा आणि राजकारणाचा सर्वाधिक अनुभव असलेल्या कॉँग्रेसने अशी माणसे मोक्याच्या ठिकाणी कशासाठी बसवली आहेत.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या तरी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कॉँग्रेस पक्षाला अध्यक्ष निवडता येत नव्हता. कोणत्याही राजकीय पक्षात अध्यक्ष निवडीवरून राजकारण होत असते. पक्षातील मतभेद उफाळून वर येत असतात. तरी देखील निवडणूक प्रक्रियेचे नाटक वठवून अध्यक्षाची निवड होत असते. कॉँग्रेसही त्याला अपवाद नाही. गेले सुमारे दीड वर्ष मुंबई कॉँग्रेसला अध्यक्ष नसल्याने पक्षाचे काम ठप्प झाले होते. मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागला आणि मुंबई कॉँग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला. अखेर कॉँग्रेसने माजी आमदार अँड़ प्रा. जनार्दन चांदूरकर यांची मुंबई कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. चांदूरकरांचे नाव चर्चेत असले तरी आघाडीवर नव्हते. खा. एकनाथराव गायकवाड, आ. भाई जगताप, मधू चव्हाण, चंद्रकांत हांडोरे यांच्या नावाची चर्चा होती. दोन निवडणूकांची जबाबदारी पेलणारा नेता अध्यक्षपदी निवडला जाईल, असे वाटत असताना मवाळ व्यक्तिमत्त्वाचे चांदूरकर यांचे नाव आले आणि सर्वांना आश्‍चर्य वाटले. चांदूरकर हे तीन वेळा आमदार राहिले, उच्च विद्याविभूषित, मास्टर ऑफ लॉ, इंग्रजीचे प्राध्यापक राहिलेले, भारतीय राज्य घटनेचा गाढा अभ्यास असलेले, इंग्रजी-मराठी-हिंदीवर प्रभूत्व असलेले, फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव असलेले, राजकारणात चांगली प्रतिमा असलेले, वादग्रस्त नसलेले, कोणत्याही गटातटाचे नसलेले, सर्व गटातटांशी चांगले संबंध असलेले कॉँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ख्याती आहे. 

मुंबई कॉँग्रेसला मराठी अध्यक्ष मिळावा, अशी तेथील कार्यकर्त्यांची इच्छा होती. चांदूरकरांच्या रूपाने मराठी आणि दलित अध्यक्ष लाभला आहे. त्यांच्या नियुक्तीने कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश गेला असला तरी गटातटात विखुरलेल्या पक्षाचे संघटन करण्याची आणि पक्षात चैतन्य निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि चांदूरकर दोघेही आक्रमक नसल्याने जनताजनार्दनाला कसे आकर्षित करून घेतील हा प्रश्न विचारला जात आहे. 

मुंबई विभागीय कॉँग्रेस ही अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराने कॉँग्रेसचा खजिना कायम भरलेला ठेवला आहे. कोणत्याही राज्याची निवडणूक असो, ती लढवण्यासाठी मुंबई कॉँग्रेसवर पक्षाची मोठी भिस्त असते. त्याकरिता मुंबई कॉँग्रेसचा अध्यक्ष तेवढाच प्रभावी आणि उद्योग जगतात वजन असलेला हवा असतो. स.का. पाटलांपासून रजनी पटेल, मुरली देवरा, गुरुदास कामत आणि कृपाशंकर सिंहापर्यंत कोणीही कॉँग्रेसची तिजोरी खाली होऊ दिली नाही. दिवसेंदिवस निवडणुका महाग होत चालल्या आहेत. निवडणूक आचारसंहितेने खर्चावर र्मयादा आणली असली तरी, निवडणुकांमध्ये करोडोंचा चुराडा होतो. हे आता उघड गुपीत आहे. जिल्हा परिषदांच्या निवडुकांसाठी प्रत्येक उमेदवाराला पाच ते वीस कोटी रुपये खर्च येतो. तर विधानसभा आणि लोकसभेचा खर्च कमीतकमी पंचवीस कोटींपासून सुरू होतो तो पन्नास कोटींपर्यंत जातो अशी चर्चा आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करत असतात. केवळ पक्षाचा अध्यक्षच नव्हे. तर प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री यांच्यावर निधी जमवण्याची जबाबदारी आलेली असते. कॉँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली होती. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, ए.आर. अंतुले, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुखांपर्यंत सर्वांना नवी दिल्लीतील तिजोरीकडे लक्ष द्यावे लागत होते. 

राजकारणातल्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये पक्षाचा खजिना आणि त्याचबरोबर पक्षाचा प्रभावी नेता महत्त्वाचा ठरत असतो. अशा वेळी निधी गोळा करण्याची ताकद असलेला आणि विरोधकांशी आक्रमक पद्धतीने चारहात करण्याची सिद्धता असलेल्या नेत्याची गरज असते. मुख्यमंत्री चव्हाण, मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष चांदूरकर आणि महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व पाहता निवडणुकीच्या राजकारणात ते कसा काय प्रभाव पाडतील हा प्रश्नच आहे. हे तिनही नेते कॉँग्रेससाठी उपयोगाचे नाहीत तर त्यांना आणले कशासाठी? सव्वाशे वर्षांची परंपरा आणि राजकारणाचा सर्वाधिक अनुभव असलेल्या कॉँग्रेसने अशी माणसे मोक्याच्या ठिकाणी कशासाठी बसविली आहेत. मुख्यमंत्री चव्हाण हे भ्रष्टाचाराने पोखरलेल्या प्रशासनाची साफसफाई करण्यासाठी आणि लोकप्रिनिधींना शिस्त लावण्यासाठी दिल्लीहून पाठविण्यात आले आहेत. ते काहीच काम करत नाहीत, फायली काढत नाहीत, कामच करत नसल्याने भ्रष्टाचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी चर्चा आमदार करू लागले आहेत. 

सत्ताधारी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे आमदार मुख्यमंत्र्यांविरोधात आवाज उठवू लागले आहेत विधिमंडळातही मुख्यमंत्र्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला जात आहे; पण मुख्यमंत्र्यांना हटवण्याच्या हालचाली थंडावल्या आहेत. हे मुख्यमंत्री परत गेले तर नारायण राणे मुख्यमंत्री होतील या भावनेने राणेंच्या दालनात आमदारांचा राबता वाढू लागला आहे; परंतु चुकीच्या फाईलवर सही करणार नाही आणि लोकप्रतिनिधींचे गैरव्यवहारांचे काम कदापि करणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी धरलेला ठेका कायम असल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अद्यापि त्यांना हलविलेले नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील. अशी चिन्हे दिसत आहेत. 


मुंबई कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी आलेले चांदूरकर हे वादविवाद जिंकून देऊ शकतात; पण निवडणूक कशी जिंकतील तसेच माणिकराव ठाकरे यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे सूत अद्यापि जमलेले नाही. विरोधकांशी दोन हात करण्यापेक्षा समजूतीने वागून कौशल्याने त्यांचा पत्ता कट करण्याचा स्वभाव असलेल्या ठाकरेंचा पत्ता कट करणे कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींना अद्यापि जमलेले नाही. मुख्यमंत्री चव्हाण हे स्वच्छ प्रतिमा घेऊन लोकांसमोर जातील; पण काम कोणते दाखवतील? प्रा. चांदूरकर हे वादग्रस्त नव्हे विद्वान आहेत; पण पक्षनिधी कोठून आणतील? केवळ भ्रष्टाचाराला विरोध असलेले आणि वादग्रस्त नसलेले नेते जनताजनार्दनाला आकर्षित करतील, असे कॉँग्रेस श्रेष्ठींना वाटते काय? असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP