Monday, April 29, 2013

निवडणुकीत शरद पवारांची सत्त्वपरीक्षा

मागील लोकसभा निवडणुकीआधी शेतकर्‍यांना हजारो कोटींचे पॅकेज दिले. सवलती दिल्या पण मतांमध्ये परावर्तीत झाले नाही. या वेळी ऐन दुष्काळातही मागेल त्याला मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. पण कुठेच चैतन्य दिसत नाही. त्या तुलनेत शांतपणे बसलेल्या काँग्रेसचा आलेख राष्ट्रवादीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे काँग्रेसला मागे सारून राष्ट्रवादीला पुढे नेण्याची सत्त्वपरीक्षा पवारांना या वेळी द्यावी लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे खासदार निवडून आले नाहीत तर तिसर्‍या, चौथ्या आघाडीचे प्रयोग करणार कसे.


लोकसभेच्या आगामी निवडणुका वेळेवरच होतील, असा काँग्रेस पक्षाचा विश्‍वास आहे, तसे या पक्षाच्या नेत्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. परंतु विरोधी पक्षांनी विशेषत: भारतीय जनता पक्षाने आणि सत्ताधारी कॉँग्रेसप्रणीत पुरोगामी लोकशाही आघाडीतील काही घटक पक्षांनी आणि पाठीराख्यांनी मुदतपूर्व निवडणुकांचा डंका पिटला आहे. निवडणुका मुदत पूर्ण होण्याआधी होवोत किंवा वेळेवर, पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी मात्र सुरू केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने बाजी मारली असून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी गेल्याच सप्ताहात बैठक बोलावली होती. तर काँग्रेस पक्षानेही पुणे येथे पक्षाच्या शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आहेत. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भांडणतंटे होऊ लागले आहेत. पाणी मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे राज्यकर्त्यांसमोर निवडणुकीचे आव्हान उभे ठाकले आहे. 

अन्य पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याला कारणेही तशीच घडली आहेत. पक्षातल्या अर्धा डझन मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे ठपके ठेवण्यात आले आहेत. कुठे कॅगच्या अहवालात ताशेरे, तर कुठे न्यायालयात ठपके, याबरोबरच उर्मट आणि उद्धट बोलण्यावरून विरोधकांनी सोडलेले टीकास्त्र, तिसरीकडे भरीसभर म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणार्‍या शरद पवार सर्मथक लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा दाखल झालेला गुन्हा, मुंबई-ठाणे, पुण्यातील अनेक अनधिकृत बांधकामांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा असलेला वरदहस्त आणि पक्षांतर्गत कुरबुरी अशा अनेक नकारात्मक बाजू उघड झालेल्या असल्याने पक्षसंघटन आणि पक्षाला लोकांचे सर्मथन मिळविण्याची जबाबदारी शरद पवारांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला रुळावर आणण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे प्रथम मंत्र्यांचीच झाडाझडती घेण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. गेल्या अनेक बैठकांमधून मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि मंत्र्यांना कानपिचक्या देण्यात आल्या; पण फारशी सुधारणा झालेली दिसली नाही.

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी आपण यापुढे निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले असले तरी या वेळची निवडणूक जिंकून दिल्लीच्या राजकारणात ते अधिक सक्रिय होतील, हे सांगण्याला ज्योतिषाची गरज नाही. गेली अनेक वर्षे दिल्लीच्या तख्ताकडे त्यांचे आणि त्यांच्या सर्मथकांचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठी माणूस दिल्लीच्या सिंहासनावर बसावा असे कोणाला वाटणार नाही. शरद पवार हे एक नाव आणि सोनियांच्या कृपेवर अवलंबून असलेले सुशीलकुमार शिंदेंचे नाव, ही दोन नावे महाराष्ट्रात चर्चिली जात आहेत. तिसरे नाव घ्यावे असा ताकदवान नेता महाराष्ट्रात दिसत नाही.

शरद पवारांना या वेळी शेवटचा प्रय▪करायचा आहे. तिसर्‍या आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रथम स्वत:ची तटबंदी भक्कम करावी लागेल. स्वत:सह एकूण नऊ खासदारांच्या जोरावर निकराच्या लढाईत यश मिळविणे सोपे नाही, म्हणूनच निवडून येण्याची क्षमता असलेल्या मंत्री आणि आमदारांना लोकसभा निवडणुकीला उभे करायचे, असा पवारांचा विचार दिसत आहे. त्यामुळे आपला इथला विश्‍वास आणि ताकदवान फौज दिल्लीत पाठविण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्या दृष्टीने ज्येष्ठ मंत्र्यांशी बैठकीत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. नऊ खासदारांच्या संख्येत यंदा वाढ होणार की नाही, या कळीच्या प्रश्नाला उत्तर देणार कोण? मुळात जे खासदार निवडून आले त्यांनी आपला मतदारसंघ चांगल्या पद्धतीने पुन्हा निवडून येण्याच्या ईर्षेने बांधला आहे किंवा नाही, हा प्रश्नच आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला यंदा अनुकूल वातावरण आहे, असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. पुणे शहरात काँग्रेसचे वादग्रस्त खासदार सुरेश कलमाडी निवडून येऊ शकणार नाहीत, असे मानून त्यांना तिकीट मिळणारच नाही, असे काँग्रेस पक्षात ठामपणे बोलले जात आहे. त्यातूनच इच्छुकांची भली मोठी यादी पुढे आली आहे. परंतु काँग्रेसला कलमाडींमुळे वातावरण अनुकूल नसल्याने काँग्रेसने जागावाटपात राष्ट्रवादीला ही जागा द्यावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रवादीला वातावरण अनुकूल आहे, असे समजायचे कसे, हा प्रश्नच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशी मुसंडी मारली की, भल्या भल्यांची बोबडीच वळली. शिवसेनेतून फुटून आलेल्या मनसेची ताकद ती काय, असे तुच्छतेने बोलणार्‍यांना लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातून ७५ हजार मते घेऊन मनसेने चांगलीच चपराक मारली. तर पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसे दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवून थेट विरोधी पक्षनेतेपदावर जाऊन बसली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चा असा प्रभाव वाढविला की, राज ठाकरे यांच्या बरोबरीने अजितदादांची क्रेझ वाढली. पण दादा इंदापूरला वेडेवाकडे बोलले काय अन् त्याची महाराष्ट्रात इतकी उलटसुलट चर्चा झाली की, दादांची प्रतिमा काळवंडून टाकण्याचा पुरेपूर प्रय▪झाला. त्या दिवसापासून त्यांचा एकही जाहीर कार्यक्रम पुण्यात झाला नाही. एके दिवशी शरद पवारच त्यांना व्यासपीठावर घेऊन येतील आणि कामाला लावतील, असे दिसेल. राष्ट्रवादीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने राष्ट्रवादीची मते मनसे खाईल की काय? अशा चर्चेने जोर धरला आहे.

पुण्याप्रमाणे अन्य मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला अंतर्गत मतभेद आणि तिकिटेच्छुकांची स्पर्धा यावर मात करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सगळेच आपापल्या ठिकाणी राजे असल्यामुळे कोणाला देणार आणि कोणाला डावलणार हा पवारांसमोर प्रश्न आहे. मागील लोकसभा निवडणुकीआधी शेतकर्‍यांना हजारो कोटींचे पॅकेज दिले. सवलती दिल्या पण मतांमध्ये परावर्तीत झाले नाही. या वेळी ऐन दुष्काळातही मागेल त्याला 

मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. पण कुठेच चैतन्य दिसत नाही. त्या तुलनेत शांतपणे बसलेल्या काँग्रेसचा आलेख राष्ट्रवादीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे काँग्रेसला मागे सारून राष्ट्रवादीला पुढे नेण्याची सत्त्वपरीक्षा पवारांना या वेळी द्यावी लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे खासदार निवडून आले नाहीत तर तिसर्‍या, चौथ्या आघाडीचे प्रयोग करणार कसे?

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP