
महाराष्ट्रातील राजकारणात
सहकारसम्राट, उद्योगसम्राट, साखरसम्राट, शिक्षणसम्राट यांची काही कमी
नाही. त्यात आता क्रिकेटसम्राटांची भर पडू लागली आहे. सर्व राजकीय
पक्षांमधील जो तो नेता क्रिकेटसम्राट होण्यासाठी धडपड करू लागला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राजकीय
खेळय़ा करण्यात तरबेज असल्यामुळे त्यांना खेळाचे कोणतेही क्षेत्र वज्र्य
नाही. राजकारणातील खेळय़ांप्रमाणे सर्व खेळ क्षेत्रांमध्ये ते लिलया वावरत
असतात. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्ये रस घेणे समजू शकते; पण आज जो तो नेता
उठतो आणि क्रीडा क्षेत्रातील संघटना ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा करतो. सर्व क्षेत्रांत राजकारणी असलेच पाहिजेत, असा अट्टाहास ते
करू लागले आहेत. खो-खो, कबड्डी, कुस्ती यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त
क्रिकेटप्रेम वाढू लागले आहे. क्रिकेटएवढा पैसा अन्य खेळांमध्ये नसल्यामुळे
त्या खेळांना दुय्यम स्थान दिले जात आहे. कोणतेही क्षेत्र सर्वसामान्य
क्रीडाप्रेमींसाठी मोकळे सोडायचे नाही, या निर्धाराने राजकारण्यांचा
सर्वत्र संचार होऊ लागला आहे. भरपूर पैसा कमावण्याचा सोपा मार्ग
क्रिकेटच्या मैदानातून जात असल्यामुळे या लोकांनी क्रिकेट संघटना ताब्यात
घेण्याचा चंग बांधला आहे. क्रिकेट सेवा हीच जणू काही जनसेवा आणि
क्रिकेटप्रेम हे राष्ट्रप्रेम असल्याच्या थाटात राजकारणी वावरू लागले आहेत.
Read more...