Monday, September 23, 2013

राजकारण्यांना व्हायचंय क्रिकेटसम्राट!

महाराष्ट्रातील राजकारणात सहकारसम्राट, उद्योगसम्राट, साखरसम्राट, शिक्षणसम्राट यांची काही कमी नाही. त्यात आता क्रिकेटसम्राटांची भर पडू लागली आहे. सर्व राजकीय पक्षांमधील जो तो नेता क्रिकेटसम्राट होण्यासाठी धडपड करू लागला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राजकीय खेळय़ा करण्यात तरबेज असल्यामुळे त्यांना खेळाचे कोणतेही क्षेत्र वज्र्य नाही. राजकारणातील खेळय़ांप्रमाणे सर्व खेळ क्षेत्रांमध्ये ते लिलया वावरत असतात. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्ये रस घेणे समजू शकते; पण आज जो तो नेता उठतो आणि क्रीडा क्षेत्रातील संघटना ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. सर्व क्षेत्रांत राजकारणी असलेच पाहिजेत, असा अट्टाहास ते करू लागले आहेत. खो-खो, कबड्डी, कुस्ती यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त क्रिकेटप्रेम वाढू लागले आहे. क्रिकेटएवढा पैसा अन्य खेळांमध्ये नसल्यामुळे त्या खेळांना दुय्यम स्थान दिले जात आहे. कोणतेही क्षेत्र सर्वसामान्य क्रीडाप्रेमींसाठी मोकळे सोडायचे नाही, या निर्धाराने राजकारण्यांचा सर्वत्र संचार होऊ लागला आहे. भरपूर पैसा कमावण्याचा सोपा मार्ग क्रिकेटच्या मैदानातून जात असल्यामुळे या लोकांनी क्रिकेट संघटना ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. क्रिकेट सेवा हीच जणू काही जनसेवा आणि क्रिकेटप्रेम हे राष्ट्रप्रेम असल्याच्या थाटात राजकारणी वावरू लागले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) पुढील महिन्यात होणारी द्वैवार्षिक निवडणूक ही मिनी विधानसभा निवडणूक आहे की काय, असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांचे लहान-मोठे नेते पायाला पॅड बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोणत्याही निवडणुकीत प्रमुख पदावर दावा असलेल्या उमेदवाराची निवडणूक ही औत्सुक्याचा विषय ठरत असते. त्याप्रमाणे एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूकदेखील उत्सुकता शिगेला पोहचवणारी रंगतदार निवडणूक होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए), भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीए) या मंडळांचे अध्यक्षपद भूषवलेले शरद पवार हे यंदा एमसीएच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे राहणार आहेत. खरे तर आयसीएचे अध्यक्षपद भूषवलेल्या पवारांनी एमसीएची निवडणूक लढवणे कितपत बरोबर आहे? पण राजकारणात आणि खेळात सर्व काही क्षम्य असते, असे म्हणावे लागेल. शरद पवारांसोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणूक लढवण्याची शक्यता असून चौरंगी लढत अटीतटीची होईल, याबाबत शंका नाही. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपण निवडणुकीत केवळ मतदान करणार आहोत, असे कितीही म्हटले असले तरी ऐनवेळी ते निवडणूक लढवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात नुकतेच जे 'लकवा-रुसवा' नाट्य घडले त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी चांगलीच गुगली टाकली आहे; अन्यथा माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्यत्व स्वीकारण्याचे प्रयोजन त्यांना नव्हते. अमाप पैसा आणि अफाट प्रसिद्धी असलेल्या क्रिकेटच्या व्यवस्थापन संघटनेचा ताबा घेण्यासाठी राजकारण्यांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे; परंतु पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे नसलेले मुख्यमंत्री यात आले कसे? त्यांना ज्यांनी कोणी घोड्यावर बसवले असेल त्यांना दाद द्यावी लागेल. याचे कारण मुख्यमंत्री निवडणुकीसाठी घोड्यावर बसल्यामुळे भल्याभल्यांना झटका बसला असण्याची शक्यता आहे. कदाचित शरद पवारांचा 'गेम' करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत उतरवले असून त्यांच्यामागे पवार विरोधकांची ताकद उभी केली जाऊ शकते. सध्यातरी शरद पवारांचे पारडे जड दिसत आहे.

क्रिकेट संघटना आणि क्रिकेट क्लब यांच्यासाठी क्रीडा संकुले, जमिनी आणि सोयीसवलती मिळवून घेण्यासाठी मुख्यमंत्री असलेच पाहिजेत. मागे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्यांनीही माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्यत्व घेतले होते. ते अध्यक्षपदी आल्यानंतर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एमसीएला मोठा भूखंड दिला होता. आता तिथे पंचतारांकित क्लब उभा आहे. एमसीए आणि त्याच्या अखत्यारीत असलेले क्रिकेट क्लब यांना क्रीडा संकुलासाठी लागणारे मोक्याचे भूखंड सवलतीच्या दरात मिळवून देण्याचे कार्य सत्ताधारी पार पाडीत असल्यामुळे त्यांनाच असोसिएशनमध्ये सहभागी करून घेण्याची तत्परता दाखवली जात आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत आणि औद्योगिक शहरात जागांचे भाव गगनाला भिडले असताना मोक्याचे भूखंड या संघटनांना दिले जात आहेत. क्रीडा क्षेत्राच्या संवर्धनासाठी क्रीडा संकुले जरूर उभी राहावीत; पण मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणारे क्रीडापटूही निर्माण व्हावेत. महाराष्ट्रातील क्रिकेट संघटनांमध्ये राजकारणाचा शिरकाव नव्हता तेव्हा क्रिकेट कसोटी सामने खेळणार्‍या अनेक नामवंत क्रिकेटवीरांनी मैदान गाजवले होते. विजय र्मचंट, विजय हजारे, रमाकांत आचरेकर, चंदू बोर्डे, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर यांच्यासारखे क्रिकेटपटू होते; परंतु आज सचिन तेंडुलकर वगळता कोणाचेच नाव पटकन घेता येत नाही. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले; पण ते एमसीएच्या निवडणुकीत उतरले नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांचा क्रिकेट संघटनांना पाठिंबा मिळत असे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मनोहर जोशी एमसीएचे अध्यक्ष झाले. शिवसेना वाढवण्यासाठी आणि शिवसेनेला जगभर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एमसीएचा भरपूर वापर करण्यात आला. भारत-पाक सामन्याला विरोध म्हणून धावपट्टीवर डांबर टाकण्याचा प्रकार शिवसेनेकडून घडला होता. तरुणांमध्ये शिवसेनेबद्दल आत्मीयता निर्माण करण्यात त्याचा उपयोग झाला. शरद पवार जेव्हा कॉँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस स्थापन केली आणि शिवसेनेच्या धर्तीवर तरुणांमध्ये पक्षाची लोकप्रियता वाढवण्याचा प्रय▪केला. पुढे सगळा व्यवहार लक्षात घेऊन आणि काळाची पावले ओळखून त्यांनी क्रिकेटच्या राजकारणात उडी घेतली.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे, सुभाष देसाईच नव्हे तर मिलिंद नार्वेकर आणि आदित्य ठाकरेही एमसीएच्या निवडणुकीत उतरले आहेत. आजोबांनी राजकारणाचे धडे दिले; पण नातवाला एमसीएच्या राजकारणाची गोडी लावण्यात आली आहे. भाजपाच्या मुंडेंपासून आशिष शेलार आणि मनसेच्या राज ठाकरेंपासून नितीन सरदेसाई यांच्यापर्यंत सर्व लहानथोर अशा सगळय़ांनाच एमसीएचे आकर्षण वाटू लागले आहे. आयपीएलमधील करोडोंचा भ्रष्टाचार बाहेर आल्यामुळे क्रिकेटच्या व्यवहारापासून सावध राहण्याऐवजी तिथे राजकारण्यांची गर्दी वाढत आहे.

गेली १५-२0 वर्षे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ताबा राजकारण्यांच्या हातात आहे. एवढय़ा वर्षांत किती नवीन क्रिकेटपटू तयार झाले, याचा आढावा घेतला असता फारसे काही हाती लागत नाही. असोसिएशनसह सर्व क्रिकेट क्लब जणू काही राजकारणी आणि उद्योगपतींसाठीच निर्माण झाले आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य माणूस कुठेच दिसत नाही. श्रीमंत राजकारणी, उद्योगपती आणि झगमगीत दुनियेतील सिनेमावाले यांना वनडे क्रिकेट, ट्वेण्टी-२0, आयपीएलचे सोहळे याबद्दल विशेष आकर्षण असून चंगळवादाला अधिक खतपाणी घालण्याचे उद्योग त्यांच्याकडून होत आहेत. महामुंबई पदवीधर सभा या संघटनेचे प्रमुख डॉ. तुषार जगताप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एमसीएमध्ये आरक्षणाची अनोखी मागणी केली आहे.

भारतीय राज्यघटनेनुसार महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती-जमातींसाठी, तसेच अन्य मागासवर्गीय व अल्पसंख्याकांसाठी जे आरक्षण दिले आहे ते एमसीएमध्ये देखील द्यावे, अशी ही मागणी आहे. एमसीएमध्ये राजकारणी सहभागी झाले खरे; पण दोन चांगले क्रिकेटपटू तयार करण्याची क्षमता या संघटनेमध्ये राहिलेली नाही. तळागाळातील लोकांना क्रिकेटपटू बनण्याची संधी दिली जात नाही. महाराष्ट्रात कितीतरी गुणवान खेळाडू आहेत. त्यांना संधी देणारे एमसीएमध्ये कोणी नाही. या निवडणुकीत सहभागी होणार्‍या राजकारण्यांनी सर्वसामान्यांना संधी देण्याची भूमिका घेतली पाहिजे क्रिकेटमध्ये नैतिकता उरलेली नाही. यापूर्वी सामन्यांमध्ये मुंबईचे क्रिकेटपटू सर्वाधिक असायचे. मात्र आता एमसीएला राजकारण्यांची लागण झाल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेटमध्ये मागे पडले आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP