Monday, December 23, 2013

देवयानीला दलित कार्ड ठरवताहेत..!


भारत-अमेरिका संबंधावर प्रकाश टाकणारे आणि सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारे देवयानी खोब्रागडे अटक प्रकरण गंभीर वळण घेत असताना देवयानीला जातीपातीच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवण्याचा आणि दलित कार्डमधून तिचा राजकारणासाठी वापर करण्याचा संकुचित आणि पोरकट प्रकार घडू लागला आहे. 

महासत्तेची मस्ती असलेल्या अमेरिकेने जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा भारतीयांना अवमानित केले आहे. अमेरिकेवर हल्ला झाला तेव्हा भारतीयांनाही दाढी काढून जावे लागत होते. दाढी असेल तो मुसलमान अशा संशयावरून लोकांना अपमानित करण्याचा रानटी आणि उद्दामपणा दाखवून अमेरिका सौदी अरेबियाच्या रांगेत जाऊन बसली आहे. सौदी अरेबियात गुन्हेगारांना जशी शिक्षा देतात तशी वर्तणूक त्या देशाने देवयानीला दिली आहे. 

अमेरिकेतील भारताच्या वकिलातीमध्ये उच्च पदस्थ राजनैतिक अधिकारी असलेल्या देवयानीने मोलकरणीला अमेरिकन कामगार कायद्यानुसार वेतन दिले नाही म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर मुलीला शाळेत पोहोचविण्यासाठी ती गेली असता रस्त्यातच तिला बेड्या ठोकल्या, तिला अटक केली, तिची शारीरिक चाचणी घेतली आणि नशेबाज चरसी, गुंड, वेश्या यांच्यासोबत तिला कोठडीत ठेवण्यात आले. याची अर्थातच भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली. भारताने अमेरिकेच्या या मग्रुरीविरुद्ध कठोर भूमिका घेऊन त्या देशाने माफी मागावी, अशी मागणी केली. देशात सर्वत्र या प्रकाराचा निषेध करण्यात आला. अमेरिकन शिष्टमंडळांना भेटी नाकारण्यात आल्या. संपूर्ण देश देवयानीच्या मागे उभा राहिला. जात, पात, धर्मभेद असा कसालाही किंतु न ठेवता सर्वांनी हा राष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या प्रश्न समजून देवयानीच्या मागे ताकद उभी केली. ताकदीच्या बळावर जर एकादा देश मग ती बलाढय़ अमेरिका का असेना भारताला नमविण्याचा प्रय▪करत असेल तर भारत झुकणार नाही, असे ठणकावून सांगण्याची हिंमत भारताने दाखविली. तुमची मग्रुरी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. कोणत्याही देशाच्या परराष्ट्र सेवेतील राजनैतिक अधिकार्‍यावर कारवाई करण्यापूर्वी त्या देशाच्या परराष्ट्र सचिवांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेता येतो. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या दंडेलशाहीबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. देवयानीने खरोखर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर तिच्यावर नियमानुसार व्हायची ती कारवाई होईल; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांचे संबंध ताणले जाण्याइतपत हे प्रकरण मोठे आहे. भारतीय उच्च पदस्थ अधिकारी महिलेचा अपमान, देशाची प्रतिष्ठा, अमेरिकेची मग्रुरी, त्यावरून दोन देशांमध्ये वरिष्ठ पातळीवर सुरू असलेली चर्चा याकडे वैचारिक प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून बघण्याऐवजी देवयानी दलित असल्यामुळे तिला अशी वागणूक देण्यात आली, असे वक्तव्य करणे कितपत बरोबर आहे? तसेच देवयानीसाठी बराक ओबामांना जाऊन भेटतो असे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगणे आणि देवयानीचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आपण उपोषणाला बसतो, असे जाहीर करणे हा सगळा काय प्रकार आहे? देवयानीच्या कर्तृत्वाला छोटे करून टाकण्याच्या हा प्रकार नव्हे काय? देवयानीने परराष्ट्र सेवेत उच्च पदस्थ राजनैतिक अधिकारी म्हणून अत्यंत जोखमीची कामगिरी कौशल्याने पार पाडली आहे. पाकिस्तान, इटली, र्जमनी आणि अमेरिका या देशांत तिने धडाडीने आपल्या देशासंबंधीच्या जबाबदार्‍या अत्यंत कर्तव्यदक्ष पद्धतीने पार पाडल्या आहेत. पाकिस्तानसारख्या देशाशी संवेदनशील असे आपले संबंध असताना आणि अतिरेक्यांचा त्रास असताना तीन वर्षांची आपली मुदत पूर्ण झाल्याशिवाय येथून जाणार नाही, असा बाणेदारपणा देवयानीने दाखवला आणि तिच्या कामाची देशानेही दखल घेतली आहे. अशा देवयानीला जातीपातीमध्ये अडकवणे कितपत योग्य आहे?

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सर्व जाती धर्मांना राजकारणात समान स्थान देण्याची घोषणा केली आणि त्यानुसार पिढय़ान् पिढय़ा दलितांवर अत्याचार करणार्‍या ब्राह्मणांनाही राजकारणात सोबत घेतले. ज्या राज्यात बंदुकीच्या धाकावर राज्य चालते असे बोलले जाते त्या उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद मायावतींनी भूषविले आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाही राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून आपले कर्तृत्व आणि प्रशासकीय ताकद दाखवली. त्या इंदिरा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविण्याची राजकीय मुत्सद्देगिरी मायावतींनी दाखविली. अशा मायावतींनी एका महाशक्ती असलेल्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या देवयानीला दलित संबोधून तिचे कर्तृत्व दुर्लक्षित करणे चुकीचे आहे. 'जात नाही ती जात' याचा नवा अनुभव मात्र देवयानी प्रकरणाने दिला आहे, तोसुद्धा दलित नेत्यांनी हे विशेष. देवयानीला दलित घोषित करून तिचे कर्तृत्व झाकाळून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. दलित समाजात जन्माला आलेल्या देवयानीबद्दल या समाजाला अभिमान असणे समजू शकते. तिला बेड्या घातल्या, अवमानित केले, शारीरिक चाचणी घेतली यामुळे समाजातून अधिक तीव्र प्रतिक्रिया उमटणे समजू शकते. या समाजाने आत्मसन्मानासाठी केलेला संघर्ष सर्वज्ञात आहे. परंतु देशाचे सरकार या प्रकरणाबाबत गंभीर असताना रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष यापेक्षा कोणती मोठी कामगिरी बजावणार आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्तृत्वाच्या जोरावर संघर्षाची लढाई लढवली. जन्माने कोणी मोठा किंवा छोटा होत नाही, कर्माने होतो हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून दाखवून दिले. 

कल्पना चावलाने जसे अंतराळात शहीद होऊन आपल्या विद्वतेचा आणि कामगिरीचा ठसा उमटवला तसा कर्तृत्वाचा ठसा उमटवत असलेल्या देवयानीला जातीचे लेबल लावून काही दलित नेते संकुचितपणाचे दर्शन घडवत असतील तर याला काय म्हणावे? देवयानीच्या पाठीशी केंद्र सरकार आणि जनता खंबीरपणे उभी असताना जातीयवाद्यांच्या कळपात गेलेले आठवलेंसारखे रिपब्लिकन नेते देवयानीचा दलित कार्ड म्हणून राजकारणासाठी उपयोग करत आहेत. देवयानीसाठी आपण राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटणार असल्याची वल्गना करून त्यांनी आपल्याच हाताने आपली पाठ थोपटून घेतली आहे.

महाराष्ट्र प्रशासनामध्ये उत्तम कामगिरीचा ठसा उमटविणारे, नेहमी चर्चेत असलेले नवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांची देवयानी ही मुलगी असल्यामुळे तिच्याशी अमेरिकेत झालेल्या वर्तनाबद्दल त्यांच्या भावना अधिक तीव्र असणे समजू शकते. परंतु देवयानीवरील गुन्हा मागे घेतला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी देणे आश्‍चर्यकारक आहे. डॉ. आंबेडकरांचे सच्चे अनुयायी असल्याचा अभिमान बाळगून आंबेडकरी चळवळीशी इमान राखणार्‍या खोब्रागडेंनी महात्मा गांधींसारखी उपोषणाची भाषा करणे त्यांना शोभत नाही, अशी केविलवाणी भाषा करण्याची त्यांना गरज नव्हती. त्यांच्यासारख्या सनदी अधिकार्‍यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्याचबरोबर पत्रकार परिषदेत जाऊन आठवलेंना जाहीर धन्यवाद दिल्यामुळे खोब्रागडेंच्या या कृतीला राजकारणाचा वास येत असल्याची प्रतिक्रिया उमटली. देवयानी ही भारताचे अमेरिकेत प्रतिनिधित्व करून दोन देशांतील राजनैतिक व्यवहार सांभाळणारी वरिष्ठ अधिकारी आहे. त्याचबरोबर शोषित, वंचित समाज तसेच अत्याचारग्रस्त महिलावर्ग यांच्या अन्यायाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचा फोडण्याचे कामदेखील तिने वेळोवेळी केले आहे. अशा प्रगल्भ व्यक्तीला केवळ जातीच्या चौकटीत बसवून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार योग्य नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP