Monday, September 15, 2014

मुंडेंच्या वारसदाराला सीएम करणार का?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच सरकार स्थापनेची उत्सुकता वाढू लागली. पुढील महिन्याच्या १५ तारखेला मतदान होऊन १९ तारखेला लगेच निकाल लागणार असल्याने या राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? याची स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. प्रत्येकानेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उडी मारून धावण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि तो मीच होणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. 


केंद्राप्रमाणे राज्यात सत्ताबदल होणार असून भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी प्रथम क्रमांकावर होते आणि पक्षातूनही त्यांच्या नावाला अनुकूलता होती; पण मुंडेंच्या अकाली निधनानंतर त्यांच्या नावाचा प्रश्नच उरला नसल्याने राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दुसर्‍या फळीतील देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांचीही नावे पुढे आली. अनुभव नसलेल्या तरुणांची नावे शर्यतीत आल्यामुळे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे पुढे आले आणि त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. त्यांनी स्वत:च आवाज दिला असल्यामुळे शिवसेनेच्या इतर नेत्यांना गप्प बसावे लागले आहे. वडिलांच्या अकाली निधनाचे दु:ख पचवून धैर्याने आणि आत्मविश्‍वासाने कामाला लागलेल्या भाजपाच्या आमदार पंकजा मुंडेदेखील आता शर्यतीत उतरल्या आहेत. त्यामुळे राज्यात खरोखर युतीचे सरकार आले तर मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता अधिक वाढणार हे निश्‍चित.

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पंकजांनी सिंदखेडराजा या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळापासून संघर्ष यात्रा सुरू केली आहे. या संघर्ष यात्रेदरम्यान आघाडी सरकारचा पंचनामा केला जात असून, मुंडेंप्रमाणेच पंकजांच्या संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मुंडेंच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याची ताकद असलेले नेतृत्व पंकजांनी दाखवले आहे. बहुजन वर्गातल्या राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये मुंडेंच्या जागी पंकजांनाच मुख्यमंत्री करावे ही भावना जोर धरू लागली आहे. कदाचित ही लोकभावना लक्षात घेऊनच विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले असावे. भाजपाचा बहुजन चेहरा असलेले गोपीनाथ मुंडे अत्यंत धाडशी, कर्तव्यदक्ष, कर्तृत्ववान असे लोकनेते होते. त्यांच्या वारसदाराला भाजपाने मुख्यमंत्री केले तर सर्व बहुजन वर्गाला त्याचा आनंदच होईल, असा मतप्रवाह आहे. भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार गोपीनाथ मुंडेच होते; परंतु त्यांच्या अकाली निधनाने कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कार्यकर्त्यांनी पंकजांच्या रूपात आपल्या नेत्याला पाहिले आहे. बहुजन वर्ग भाजपाकडे वळवण्यात मुंडे यांना मोठे यश आले होते. मुंडेंच्या बहुजन चेहर्‍याकडे पाहूनच मोठय़ा प्रमाणात ओबीसी वर्ग भाजपामध्ये सामील झाला आहे. त्यामुळे मुंडेंच्या वारसदाराला भाजपा मुख्यमंत्री करणार का? या प्रश्नावर चर्चा होऊ लागली आहे. भाजपाने विनोद तावडेंच्या मुखातून केलेल्या घोषणेमागे नेमके काय राजकारण आहे? केवळ बहुजन समाज भाजपामागे खंबीरपणे उभा राहावा यासाठी ही खेळी आहे का, हे आताच समजणार नाह, मात्र निवडणुकीनंतर समजेल. मुंडेंचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते, ते स्वप्न पंकजांच्या रूपाने पूर्ण व्हावे, अशी बहुजन वर्गातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपाच्या विस्तारासाठी मुंडेंनी जीवाचे रान केले. त्याचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांना मिळू शकेल.

मुंडे यांच्या जाण्यामुळे महायुतीतदेखील तणाव निर्माण झाला आहे. मुंडे हे महायुतीतील घटक पक्षांचे आधारस्तंभ होते. त्यांच्याकडे पाहूनच घटक पक्ष महायुतीत समाविष्ट झाले होते. जे नेते भाजपासमवेत येण्यास तयार झाले, त्यांना आपला आधार गेल्यासारखे वाटले. आणखी मोठय़ा संख्येने जे लोक भाजपामध्ये येणार होते, ते थांबले. जे आले ते सैरभैर झाले. आपण ज्याच्याकडे पाहून भाजपामध्ये आलो तोच नसल्याने आपल्याकडे कोण लक्ष देईल? असा प्रश्न त्यांना पडला. भाजपाच्या वतीने जर पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या तर कार्यकर्त्यांना नेता मिळणार आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. भाजपाने केवळ मतांसाठी त्यांचे नाव पुढे करू नये तर त्यांचे नाव शेवटपर्यंत टिकवून ठेवावे, तरच बहुजन समाज व सर्व ओबीसी समाज भाजपाला भरभरून मतदान करू शकेल. पंकजांना भाजपाने खरोखरच मुख्यमंत्री करावे म्हणजे भाजपा हा केवळ उच्चवर्गीयांचा नव्हे तर सर्वसमावेशक पक्ष म्हणून पुढे येईल आणि विरोधकांना या पक्षावर टीका करता येणार नाही. सर्वसमावेशक पक्ष असा समज दृढ होईल. लोकसभा निवडणुकीत मुंडेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून भाजपाला भरभरून मते देण्यात आली होती. ज्या बहुजन वर्गाने ही मते दिली आहेत, त्यांची मुंडेंच्या वारसदाराला मुख्यमंत्री करावे, अशी इच्छा आहे. हे त्यांनी संघर्ष यात्रेच्या यशाने दाखवून दिले आहे. भाजपाने केवळ घोषणा करू नये तर वरिष्ठ नेत्यांनी पंकजांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पंकजांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली, असे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कोरले जाईल. म्हणूनच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने तशी घोषणा केल्यास अधिक बळकटी येईल, अन्यथा निवडणूक जिंकण्यासाठी फसवी घोषणा केली, अशी भाजपाची संभावना केली जाईल. भाजपाची घोषणा खरी की फसवी, हे येत्या काही दिवसांत दिसून येईलच. मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली खरी; पण दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निवडीची लगबग सुरू झाली आहे. शिवसेना-भाजपा व इतर घटक पक्षांची महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नाही. प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतील, याची बोलणी अजून संपलेली नाहीत. गेले महिनाभर या पक्षांचा घोळ चालू आहे. आघाडी आणि महायुती या दोघांनाही आपापले सहकारी पक्ष सोबतीला हवे आहेत. युती आणि आघाडी कायम राखणेही सर्वांना हवे आहे. कोणताही एक पक्ष बाहेर पडला तर काय परिणाम होतील, याची सर्वपक्षीय नेत्यांना जाणीव आहे. म्हणून प्रत्येकाला सहकारी हवा आहे. परंतु, जागावाटपामध्ये जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील यासाठी दबावतंत्र चालले आहे. शेवटी सत्ता सर्वांनाच हवी आहे. ज्या पक्षाच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे युती आणि आघाडी दोघांचेही सूत्र आहे. त्यासाठी आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर जास्त आमदार निवडून येतील, यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP