Tuesday, September 30, 2014

सत्तेसाठी वाट्टेल ते..!

महाराष्ट्रात सत्तेचे स्वयंवर होणार आहे. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सत्ता वरणार कुणाला, कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजे -राजवाड्यांच्या काळात स्वयंवरासाठी जमलेल्यांवर लाह्यांचा वर्षाव होत असे. आज सर्वपक्षीय उमेदवार ऐकमेकांवर शिव्यांची लाखोली वाहत स्वयंवराच्या प्रतीक्षेत आहेत. स्वयंवराची तयारी सुरू झाली आहे. सत्ता मिळवणार कोण याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण झाले आहे..


युती फिसकटली आणि आघाडी बिघडली असा प्रकार निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडला. मतदानाला काही दिवसांचा अवधी उरला असताना युती आणि आघाडीची बिघाडी झाली आणि आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या राजकारण्यांची चांगलीच सटकली. त्यामुळे शनिवार, २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राजकारण्यांच्या कोलांट्यांचा खेळ राज्यात सुरू झाला. ज्या पक्षामुळे सत्तेचा मनसोक्त उपभोग घेतला त्या पक्षाच्या तिकिटावर विजय मिळणार नाही, असे दिसताच आयुष्यभर टीका केलेल्या पक्षात लगेच उडी मारण्याचे प्रकार घडले. कोण कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात जात आहे, याचा अंदाज येत नव्हता. असे काही घडेल असे वाटत नसताना तसे घडल्याचे वास्तव समोर आले. आजकाल राजकारण्यांमध्ये तत्त्व, निष्ठा, संयम, त्याग असे काही उरलेले नाही. कोण कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. धर्मनिरपेक्षतेचा वर्षानुवर्षे उदो उदो करणारे हिंदुत्ववाद्यांच्या कळपात सहजपणे दाखल झाले, तर हिंदुत्वाची भगवी पताका खांद्यावर घेतलेले धर्मनिरपेक्ष पक्षांकडे वळले. निवडणुकीत प्रचंड पैसा ओतून आमदारकी मिळवण्यासाठी अहमहमिका लागली आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी १५ वर्षे सत्तेवर होती तोपर्यंत मंत्री आणि आमदारांनी सत्तेचा मनसोक्त उपभोग घेतला. मात्र केंद्रामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आल्याबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादी बॅकफूटवर गेले असल्याचे दिसताच मंत्री आणि आमदारही शिवसेना-भाजपामध्ये गेल्याचे अघटित या राज्यात घडू लागले. राष्ट्रवादीचे राज्यमंत्री उदय सामंत व संजय सावकारे या दोघांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश मिळवला आणि शिवसेनेने त्यांना निवडणुकीत तिकिटेही दिली. उदय सामंत हे आदल्या दिवशी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटून गेले आणि दुसर्‍या दिवशी शिवसेनेत जाऊन दाखल झाले. या प्रकाराने आश्‍चर्यचकित झालेल्या तटकरेंना कपाळावर हात मारून घेण्यापलीकडे काही उरले नाही. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोक युतीमध्ये प्रवेश करू लागले होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर वेग आणखी वाढला. शिवसेना-भाजपा आणि घटक पक्षांच्या महायुतीचे सरकार येणार, अशी सर्वांनाच खात्री वाटू लागली. त्यानंतर जागांच्या वाटाघाटीसाठी पुढचे पाऊल पडले आणि तिढा वाढत गेला.

वाटाघाटींचा नंबर गेम सुरू झाला आणि दोघांनाही एकमेकांचे प्रस्ताव मान्य होईनात. शेवटी शिवसेना-भाजपाची गेल्या २५ वर्षांची युती तुटली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या त्रिमूर्तींनी जे घडवले होते, ते विद्यमान नेत्यांनी बिघडवले. खरे तर जागावाटपाचा तिढा सुटणे अशक्य झाले होते; पण पोपट मेला हे जाहीर करायचे बाकी होते. तो सोपस्कार भाजपाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उरकला. रबर खूप ताणल्यामुळे तो तुटला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कस्पटाप्रमाणे आम्हाला समजत असाल तर वर्मावर घाव घातल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आपला बाणेदारपणा दाखवला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली. राज्याच्या पुढील राजकारणाचा वेध घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी ठेवायची की नाही याचा विचार सुरू केला होता आणि जणू काही युती तुटण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रवादीने भाजपापाठोपाठ काँग्रेसशी काडीमोड घेत असल्याचे जाहीर केले. सरकारमध्ये १५ वर्षे जो बेबनाव वाढत गेला त्याची परिणती अखेर फुटीत झाली. इतके दिवस चुपचाप असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आपली ब्ल्यू प्रिंट घेऊन रिंगणात उतरली. केवळ तोडफोडची भाषा केली, तर पुढची पिढी आपल्याला मान्य करणार नाही याची जाणीव झाली. राणा भीमदेवी थाटात बोलणारे राज ठाकरे समजदारीची आणि विधायक कामाची भाषा करू लागले. प्रत्येक पक्ष स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवत असल्यामुळे प्रत्येकाला २८८ उमेदवार मिळेनासे झाले असून आयाराम-गयारामांचे चांगलेच फावले आहे. उमेदवारांची आयात-निर्यात करण्याचे प्रकार निर्लज्जपणे घडत असल्याचे सगळा महाराष्ट्र पाहात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युती यांच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे किती भले झाले? गरिबी किती हटली? शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या का? बेरोजगारीचा प्रश्न मिटला का? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. उलट युत्या, आघाड्या म्हणजे सत्तेसाठी असलेले साटेलोटे होते, हेच खरे. भ्रष्टाचार वाढला, महागाई वाढली, पण सर्वसामान्यांच्या जीवनमानात वाढ झाली नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला. उलट नेत्यांच्या संपत्तीत अनेक पटींनी वाढ झाली. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता सत्तेसाठी हपापलेला आहे, याचे विदारक दर्शन घडत आहे.

शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यामध्ये जागावाटपापेक्षा मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती, हेही लपून राहिलेले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी वर्षानुवर्षांचा घरोबा मोडणारे नेते आणि सत्तेसाठी कोणत्याही पक्षात उडी मारणारे कार्यकर्ते पाहिले की, महाराष्ट्र कुठे चालला आहे याची कल्पना येते. कोणताही पक्ष अथवा कार्यकर्ते पाच वर्षे थांबायला तयार नाहीत. प्रत्येकाला झटपट सत्ता आणि झटपट पैसा हवा आहे. आता फास्टचा जमाना आहे. लोकांना खाण्याच्या पदार्थांपासून सर्व काही झटपट हवे आहे. पूर्वीच्या काळी २५-३0 वर्षे कार्यकर्ते पक्षासाठी खपत होते. तेव्हा कुठे नगरसेवक, आमदार, खासदार होत होते. आज-उद्यावर आलेल्या निवडणुकीकडे पाहिले, तर प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी उदयास आली आहे. प्रत्येक पक्षाला बंडखोरीची झळ बसत आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपाला सत्ता मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त करून तिथे इनकमिंग जोरात सुरू झाले आहे. साधनशुचितेच्या बाता मारणार्‍या भाजपाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांना पावन करून घेतले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सरकारविरोधी जनमताचा फटका बसणार असल्यामुळे या पक्षातून आऊटगोइंग सुरू झाले. कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळो, जिकडे खोबरं तिकडे चांगभलं, अशी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची भावना झाल्यामुळे इकडून तिकडून सगळीकडून कोलांटउड्या सुरू झाल्या. जनहितासाठी काम करत असल्याचा मुखवटा असला तरी सत्तापद, पैसा, प्रतिष्ठा, स्वहित व भविष्यकालीन वाटचाल याचाच अधिक विचार केला जात आहे. त्यामुळे जनहितापेक्षा स्वहित महत्त्वाचे ठरले आहे. कोण किती पाण्यात हे निवडणुकीनंतर दिसेलच. याचे कारण योग्य उमेदवारालाच लोक निवडून देतील याबाबत शंका नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP