Monday, September 22, 2014

सर्वांनाच व्हायचंय नंबर वन!

विधानसभा निवडणुकांचे नगारे जोरजोरात वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ सात दिवसांचा अवधी उरला असून युती-आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे इच्छुकांचा रक्तदाब वाढू लागला आहे आणि कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. हा तिढा सुटत नसेल तर स्वबळावर जागा लढवा, असा दबाव कार्यकर्ते वाढवू लागले आहेत.


भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्‍याने कार्यकर्त्यांमध्ये भलतेच चैतन्य निर्माण झाले. पुणे येथे झालेल्या त्यांच्या कार्यक्रमातच भाजपा कार्यकर्त्यांनी 'युती तोडा, स्वबळावर लढा', अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांचा हा जोश आणि उल्हासित मूड पाहून शहा यांनीदेखील 'भाजपाला मतदान करा, भाजपाचे सरकार आणा,' अशी घोषणा केली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे मन राखत त्यांनी जाणीवपूर्वक शिवसेना अथवा महायुतीचा नामोल्लेख टाळून शिवसेनेला जो संदेश द्यायचा होता तो दिला. इकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना १५१ जागा लढवणार असून भाजपाला ११९ पेक्षा एकही जास्त जागा मिळणार नाही, यायचे तर या, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही वेगळी परिस्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे १४४ जागा त्यांना मिळणार नाहीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर २00९ साली विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या १२४ जागा वाढवून घेतल्याशिवाय आघाडी होऊ शकणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी तसे सांगून टाकले आहे. युती असो अथवा आघाडी त्यांच्या चार प्रमुख पक्षांना अधिक जागा मिळवून नंबर वन व्हायचे आहे. प्रत्येकाचा डोळा राज्याच्या सिंहासनाकडे असून, खरी लढाई मुख्यमंत्रीपदासाठीच सुरू झाली आहे.

शिवसेना-भाजपा या दोन पक्षांची युती सुमारे २५ वर्षांपासून आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी गेल्या १५ वर्षांपासून कायम आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने कायम मोठय़ा भावाची भूमिका बजावली असून भाजपानेही त्यांना तो मान दिला आहे. पण केंद्रातील यशामुळे हुरळून गेलेल्या भाजपा नेत्यांच्या स्वप्नांनी गगनभरारी घेतली असून, त्यांना राज्यातही मोठय़ा भावाच्या भूमिकेत यायचे आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाच्या झालेल्या घसरणीने शिवसेनेचे मनोबल वाढवले आहे. भाजपापेक्षा अधिक जागा मिळवून राज्याचे मुख्यमंत्रीपद खेचून आणायचे, असा निर्धार शिवसेनेने केला आहे, तर शिवसेनेचे खच्चीकरण करून आपणच सिंहासनावर बसायचे, अशी स्वप्ने भाजपाला दिवसाढवळय़ा पडू लागली आहेत. मात्र मोदींची लोकप्रियता घसरणीला लागली असताना आज उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी तडजोडीची भूमिका घेऊनही भाजपाचा ताठरपणा जात नसल्याने भाजपापेक्षा शिवसेनेला अधिक अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या राजकारणात काँग्रेस कायम मोठय़ा भावाच्या भूमिकेत असून राष्ट्रवादीनेदेखील काँग्रेसची ही भूमिका मान्य केली आहे. त्यामुळेच २00४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त मिळूनदेखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला नाही. त्याबदल्यात अधिक खाती मात्र पदरात पाडून घेतली. या वेळी २00४ सालची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. अर्थात अजित पवार यांची स्वत: मुख्यमंत्री बनण्याची इच्छा लपून राहिली नसली तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची खरोखर इच्छा आहे की नाही, याची चविष्ट चर्चा राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये रंगत असते, ही गोष्ट निराळी. पण या वेळी मात्र अधिक जागांसाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला ताणून धरले आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या असल्याची पुष्टी जोडली जात आहे.

काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे स्वबळावर लढावे, असा सूर काँग्रेसमधून लावला जात आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी असो अथवा नसो, काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळतीलच, असा आत्मविश्‍वास या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले तर त्याचा काँग्रेसला तोटा होऊ शकतो, म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची 'एकला चलो रे' ही भूमिका राजकीय रंगमंचावर रंगू लागली आहे.

महाराष्ट्रात युती आणि आघाडीमध्ये जागावाटपावरून जे राजकारण रंगले आहे, त्यामुळे लोकांची चांगलीच करमणूक होऊ लागली आहे. या निवडणुकीत राजकारणाचे ध्रुवीकरण झाले तर निवडणुकीतील समीकरणे बदलण्याचा जास्त संभव आहे. या परिस्थितीत प्रत्येक मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या इच्छुकांचे धाबे दणाणले असून, नेत्यांच्या अहंकारामुळे इच्छुकांना तिकिटे मिळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मित्र पक्षसोबत नसेल तर सत्तेपासून दुरावण्याची भीतीसुद्धा वाटू लागली आहे. कोणत्याही एका पक्षाची स्वत:च्या ताकदीवर सरकार स्थापन करण्याची क्षमता नसल्याचे आजवरच्या निवडणुकांनी सिद्ध केले आहे. हे वास्तव समोर असल्यामुळे प्रत्येक पक्षाला आपापल्या मित्र पक्षाच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागला आहे. परंतु सध्या युती, आघाडीतील सर्व चार प्रमुख पक्षांमध्ये जी तणातणी सुरू आहे, त्यावरून सर्व पक्षांनी स्वबळावर लढून आपापली ताकद अजमावून पाहावी म्हणजे कोणत्या पक्षाला किती जनसर्मथन आहे, हे दिसून येईल. मात्र स्वबळावर लढण्याची हिंमत अद्याप कोणी केलेली नाही. 'तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' असा अनुभव जनतेने प्रत्येक निवडणुकीत घेतला आहे. क्रमांक एकच्या जागा मिळवून सत्तेसाठी आतूर झालेल्या पक्षांनी जागावाटपाचा जो घोळ घातला आहे, तो पाहता युती असो अथवा आघाडी त्यांची सत्ता आली तर कसे वागतील याची कल्पनाच केलेली बरी. मुळात युती आणि आघाडीचे जमले तरी त्यांच्यातील भांडणे कायम घटस्फोटापर्यंत येऊन धडकत असतात. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपा युती यांचा हा घरोबा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचा म्हणजेच कायदेशीर बंधनाऐवजी एकमेकांच्या सोयीसाठी केलेला घरोबा असल्याचा अनुभव कार्यकर्ते घेऊ लागले आहेत.

काँग्रेसच्या कारभाराला आणि गटातटाच्या राजकारणाला कंटाळून १९९५ साली लोकांनी शिवसेना-भाजपा युतीच्या हातात सत्ता दिली; परंतु त्या संधीचा युतीला योग्य उपयोग करून घेता आला नाही आणि अल्पावधीत सत्ता गमावण्याची वेळ आली. त्यामुळे 'दगडापेक्षा वीट मऊ' या न्यायाने लोकांनी १५ वर्षे आघाडीच्या हाती सत्ता दिली. १५ वर्षांंच्या दीर्घ कालावधीनंतर सत्तेची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना ती घालवू नये, या विचाराने त्यांची युती व्हावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. वास्तविक पाहता जागांसाठी भांडण्याऐवजी युतीने घटकपक्षांना सन्मानाने सोबत ठेवण्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. येत्या एक-दोन दिवसांत चारही प्रमुख पक्ष नेमकी काय भूमिका घेतात, हे स्पष्ट होईलच.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP