Wednesday, February 18, 2015

भांड्याला भांडं, खणखणाट, आदळआपट

नरेंद्र मोदींचा प्रभाव अजूनही कायम असल्यामुळे भाजपाला विजय मिळत असून आगामी काळात काँग्रेस पक्ष नाममात्र राहणार आहे आणि भाजपाचीच चलती होणार आहे, हे चाणाक्ष व धूर्त राजकारणी असलेल्या शरद पवारांनी ओळखले आहे़



१५ वर्षांनंतर मिळालेल्या हिंदुत्ववादी पक्षाच्या सरकारला स्थैर्य लाभावे, याकरिता शिवसेनेने तळ्यात­मळ्यात असलेली भूमिका सोडून दिली आणि ती सत्तेत सहभागी झाली.त्याआधीच शिवसेनेतील मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना सत्तेची स्वप्ने पडू लागली, दबाव वाढला, मग वाटाघाटी झाल्या़ शिवसेनेचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला़ सुरुवातीस सत्तेतला अर्धा वाटा मिळावा, ही ताठर भूमिका काहीशी मवाळ झाली़ भाजपालाही शिवसेनेचा सहभाग हवाच होता़ राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला असल्यामुळे आणि भाजपाने तो नाकारला नसल्यामुळे या पक्षावर चांगलीच टीका सुरूझाली होती़ ही टीका टाळण्यासाठी शिवसेनेला सत्तेत सहभागी करण्याची त्या पक्षाचीही गरज होती़ अर्थात जागांचे गणित मांडून शिवसेनेला कमी जागा असल्यामुळे कमी मंत्रीपदे देण्यात आली़ केंद्रात दोन मंत्रीपदांची अपेक्षा असताना एकच मंत्रीपद देण्यात आले़ थोडक्यात शिवसेनेची सत्ता आपल्या अटींवर आणि मर्जीवर राहील, अशा तोºयात भाजपा नेते वावरू लागले़ मुळात प्रादेशिक पक्ष नकोच, ही भाजपाची नीती असल्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण होईल आणि भाजपाचा प्रभाव वाढेल, अशीच एकंदर वर्तणूक दिसू लागली़ त्यातच मुंबई, ठाणे, औरंगाबाद या महत्त्वाच्या आणि मोठ्या महापालिकांवर असलेला शिवसेनेचा प्रभाव कमी करण्याचा भाजपाचा इरादाही स्पष्ट दिसू लागला आणि मग भांड्याला भांडे लागू लागले़ आदळआपट सुरू झाली़ भांड्यांचा खणखणाट वाढू लागला़ तू तू मैं मैं होऊ लागले.सत्ताधारी युतीमध्ये घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली़ शिवसेना चांगलीच आक्रमक बनली़ आमच्या इलाक्यात अतिक्रमण कराल तर खबरदार, असा इशाराच जणू शिवसेनेने दिला़ एकप्रकारे सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे़ याचाच दुसरा अर्थ असा की, काँग्रेस­राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांची भूमिका शिवसेनाच निभावत असून या दोन पक्षांना बाजूला सारण्यात आले आहे़ शिवसेना एवढ्या आक्रमक पद्धतीने सरकारवर टीकास्त्र सोडत आहे की, काँग्रेस­राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकच खच्चीकरण होत आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस अधूनमधून एखाद्या उसासारख्या प्रश्नावर आवाज तरी उठवित आहे; परंतु काँग्रेसमध्ये त्राण उरले नाही, अशी या पक्षाची अवस्था झाली आहे़ एवढी मरगळ या पक्षात आली आहे़
शिवसेना­भाजपामध्ये कुरबुरी वाढल्याच्या अनेक घटना अलीकडे घडल्या आहेत़ महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांवर, एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापर्यंत शिवसेनेची मजल गेली़ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तर निवडणूक काळापासूनच टीकास्त्र सोडले जात आहे़ शिवसेनेला बाजूला ठेवून शतप्रतिशत भाजपा करण्याचा नारा निवडणुकीपूर्वी अमित शहांनी दिला होता़ महानगरपालिका निवडणुकांना अद्यापि अवधी असताना भाजपाने पाय पसरायला सुरुवात केली असल्याने शिवसेनेचे पित्त खवळले़ त्यामुळे मरिन लाइन्सच्या क्वीन्स नेकलेसचा प्रश्न असो अथवा कार पार्किंगचे दर वाढवण्याचा प्रस्ताव असो, शिवसेनेने भाजपावर थेट टीकास्त्र सोडले़ विदर्भातील शेतकºयांच्या आत्महत्या सत्ताबदलानंतरही थांबू शकत नसल्यामुळेदेखील शिवसेनेने सरकारवर, प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला़ ‘सामना’च्या अग्रलेखातूनच मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले़ त्याआधी राज्यात गुन्हेगारी वाढत असून मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते असल्यामुळे त्यांनी कायदा व सुव्यवस्था सुधारावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कान टोचले आहेत़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेना सामान्य माणसांच्या हितासाठी सरकावर पहिला वार करेल, अशी गर्जना केली़ भाजपाकडून योग्य वागणूक मिळत नाही, ही अपेक्षा फोल ठरल्यामुळे तसेच केंद्रात व राज्यातही सत्तेत योग्य वाटा मिळाला नसल्यामुळे  शिवसेनेचा जीव सत्तेत रमत नसल्याचे दिसत असले, तरी इच्छापूर्ती होत नसल्यामुळे भाजपासमोर आव्हाने उभी केली जात आहेत़ सत्तेत सहभागी होताना त्या वाटाघाटी, तडजोडी आणि खलबते झाली असतील, मात्र भाजपाने आपला शब्द पाळला नसल्यामुळेच शिवसेना आक्रमक रूप धारण करत असावी, असे दिसत आहे़
भाजपा­शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या; परंतु शेवटी सत्तेसाठी त्यांना एकत्र यावे लागले़ अशीच परिस्थिती १९९९ साली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबाबत झाली होती़ शरद पवारांनी काँग्रेसमधून फुटून जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली़ एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या आणि शेवटी सत्तेसाठी पुन:श्च गळ्यात गळे घातले़ त्यांच्यामध्येदेखील सतत कुरबुरी होतच होत्या; परंतु सत्तेसाठी पंधरा वर्षे एकत्र राहिले़ त्याच धर्तीवर शिवसेना­भाजपा हे  दोन्ही पक्ष १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यामुळे एकत्र आले आहेत़ राजकारणात पक्षाची तत्त्वप्रणाली गुंडाळून सत्तेसाठी जवळ येणे काही गैर राहिलेले नाही़ शेवटी राजकारण सत्तेसाठीच करायचे असते, हा समज दृढ झाला आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची पुरती बदनामी केली होती़ बदनामीचा हा डाव पुसून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाशी सलगी करण्यासाठी आतुर झाला होता़ त्यामुळेच भाजपाने न मागता त्यांनी बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला़ विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होत आहे. अनेक राज्यांत भाजपाची सरकारे येत आहेत, नरेंद्र मोदींचा प्रभाव अजूनही कायम असल्यामुळे भाजपाला विजय मिळत असून आगामी काळात काँग्रेस पक्ष नाममात्र राहणार आहे आणि भाजपाचीच चलती होणार आहे, हे चाणाक्ष व धूर्त राजकारणी असलेल्या शरद पवारांनी ओळखले आहे़ त्यामुळेच त्यांनी भाजपाला बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला होता़ देशातील राजकारणाची दिशा अचूक ओळखण्याचे कसब पवारांनी आत्मसात केले आहे़ त्यामुळे ‘एक चाल आणि चार घायाळ’ अशी त्यांची खेळी यशस्वी झाली आहे़ बाहेरून पाठिंब्यामुळे शिवसेना­काँग्रेस अस्वस्थ, तर भाजपा संभ्रमात अशी अवस्था त्यांनी करून टाकली होती़ गेली २५ वर्षे भाजपाचा मित्र पक्ष राहिलेल्या शिवसेनेला बाजूला सारणे, सत्ताकारणावर अप्रत्यक्षपणे आपले वर्चस्व ठेवणे, ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांचे संरक्षण करणे, असा चौफेर लाभदायक विचार त्यापाठी होता़
 आजकाल कार्यकर्त्याला सत्तेचे व लाभाचे पद असल्याशिवाय तो टिकत नाही, हे वास्तव असल्यामुळे पक्षफुटीचा धोका टाळता येणार नाही़ या विचाराने सरकारमध्ये सामील होण्याचा फायदेशीर मार्ग शिवसेनेने स्वीकारला़ शिवसेना २५ वर्षे भाजपाबरोबर मोठ्या भावाच्या भूमिकेत होता; परंतु आता भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असून शिवसेनेला हळूहळू संपवेल की काय, अशी भीती या पक्षाला वाटत आहे़ मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो, तसे शिवसेनेचे होईल की काय? त्यामुळे शिवसेनेने वाघनखे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे़ स्वतंत्र विदर्भ होऊ देणार नाही, बेळगाव महाराष्ट्रात आणून दाखवू, मुंबई महाराष्ट्रापासून कदापि तोडू देणार नाही, अशा गर्जना करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेच्या डरकाळ्या फोडल्या जात आहेत़ याचे कारण प्रादेशिक अस्मितेवरच शिवसेना टिकून आहे़


जाता जाता...

निम्हणांचा काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’

पुण्यामधील काँग्रेसचे माजी आमदार
 विनायक निम्हण यांनी घर वापसी करून काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे़ खरे तर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून नारायण राणेंसमवेत काँग्रेसमध्ये आलेले निम्हण हे मनाने आणि कृतीने शिवसैनिकच राहिले होते़ ते काँग्रेसशी कधी एकरूप झालेच नाहीत़ मूळचे शिवसैनिक असल्यामुळे काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ केला, असे ते अभिमानाने सांगत आहेत़ अर्थात काँग्रेसने मंत्री केले असते, तर कदाचित त्यांचे काहीसे मतपरिवर्तन झाले असते; परंतु काँग्रेसने राणेंचेच महत्त्व कमी करून त्यांना बाजूला सारले. तेथे निम्हणांना मंत्रीपद देणार कुठून?  या वेळी मोदी लाटेत तर निम्हणांचा पराभवच झाला असल्याने पुन्हा स्वगृही परतण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही़ शिवसेनेत येताच त्यांच्यातला दबलेला शिवसैनिक बाहेर आला असून रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा त्यांनी सुरू केली आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP