Wednesday, February 18, 2015

ओवेसींच्या प्रभावाचा वाटा-घाटा कोणाला?

धर्माच्या नावाने राजकारण करणाºया पक्ष संघटना एकप्रकारे भारतीय संविधानालाच आव्हान देत आहेत़ ज्या संविधानाने सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली आहे़ त्या संविधानालाच शह देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे़ ओवेसी यांना आरक्षणाचा विषय मांडण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, याची दक्षता घेण्याचे कर्तव्यदेखील आहे़


आॅल इंडिया मजलिस­ए­इत्तेहादूल­मुसलमिन म्हणजेच एआयएमआयएम हा राजकीय पक्ष सध्या भलताच चर्चेत आला आहे़ या पक्षाच्या नावाचा अर्थ आॅल इंडिया कौन्सिल आॅफ दी युनियन आॅफ मुस्लीम अर्थात अखिल भारतीय मुस्लीम एकता परिषद असा असून या पक्षाने राजकारणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे़ गेल्या बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये पोलीस प्रशासनाने एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांना गोळीबार मैदानावर परिषद घेण्यास परवानगी नाकारली़ खरे तर पुणे कॅण्टोन्मेंटचे हे मैदान असून तिथे राजकीय पक्षांच्या सभांना परवानगी दिली जात नाही, त्यामुळे कॅण्टोन्मेंट बोर्डानेच परवानगी नाकारल्याने पोलिसांनाही परवानगी देता आली नाही़ मात्र, या घटनेचे राजकीय पक्षांनी चांगलेच भांडवल केले़ मुस्लीम आरक्षण परिषद आयोजित करणाºया संयोजकांनी पुणे कॅण्टोन्मेंट बोर्डाकडे परवानगी मागितली, त्याच वेळी त्यांनी नकार दिला होता; परंतु विविध संघटनांनी मिळून आयोजित केलेल्या या परिषदेला अनेक मान्यवरांसह वक्ते म्हणून ओवेसींना बोलावले असल्याने वादाची ठिणगी पडली़ ओवेसी यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार प्रक्षोभक भाषण करून हिंदूंच्या भावना भडकावतील, असे मानून शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओवेसींच्या सभेला विरोध केला़ त्याबरोबर स्थानिक शिवसैनिकांच्या अंगात बळ संचारले आणि त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन सभेला परवानगी देऊ नका, अशी मागणी केली़ त्यातून संघर्ष उभा राहिला़ हा संघर्ष उभा राहिल्यामुळे एमआयएमचे नेते ओवेसी आणि त्यांच्या पक्षाला प्रसारमाध्यमांकडून अमाप प्रसिद्धी मिळाली़ संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर या प्रकरणाची हवा निर्माण झाली आणि ओवेसींना प्रमाणाबाहेर प्रसिद्धी मिळाली़ ओवेसींनी भाजपा­शिवसेना आणि काँग्रेस या सर्व प्रमुख राजकीय पक्षांवर टीकास्त्र सोडले खरे; परंतु परिस्थितीचे भान ठेवून प्रक्षोभक भाषण टाळले़ ओवेसींकडे मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाज, विशेषत: तरुणवर्ग आकर्षित होत असून मुस्लीम समाजाची एकजूट करण्यामध्ये त्यांना चांगलेच यश येऊ लागले आहे़ खरे तर जसजसा मुस्लीम समाज ओवेसींकडे आकर्षित होत आहे, त्यांच्या प्रक्षोभक बोलण्यामुळे त्यांना अधिकाधिक समर्थन देत आहे, त्यामुळे भाजपाला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत़ काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या मुस्लिमांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे़ आपल्या क्रमांक एकच्या शत्रूला दुर्बल करून टाकण्याचे काम ओवेसींनी परस्पर केले असल्याने भाजपाला अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकताच उरलेली नाही़ काँग्रेसच्या राजवटीत प्रक्षोभक भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींचे आजोबा मौलाना अब्दुल वाहेद ओवेसी यांना १९५८ मध्ये अटक करण्यात आली होती़ अकबरुद्दीन ओवेसींना देखील २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती़ मात्र, निवडणूक काळात ओवेसी बंधूंनी अत्यंत भडकाऊ भाषणे करूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही़ वास्तविक पाहता काँग्रेसच्या सर्वधर्मसमभाव आणि सर्वसमावेशक धोरणामुळे मुस्लीम समाजाने त्यांना पाठिंबा दिला होता, मात्र भाजपाची ताकद वाढू लागली. त्याचा फायदा एमआयएमने घेण्यास सुरुवात केली़ १९८९ पासून २०१४च्या निवडणुकीपर्यंत हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी खासदार म्हणून निवडून येत आहेत़ तेलंगणा विधानसभेमध्ये त्यांचे सात आमदार असून महाराष्ट्रातही दोन आमदार निवडून आणलेच; पण त्याआधी नांदेड महानगरपालिकेमध्ये १३ जागा निवडून आणून त्यांनी आपले खाते उघडले होते़ त्याच वेळी एमआयएमची दखल राजकीय वर्तुळात गंभीरपणे घेतली गेली़ मुळातच धर्मांध प्रवृत्ती असलेल्या शक्ती धर्माच्या नावाने राजकारण करून भावना भडकवण्याचे काम करत आहेत़ त्याचा फायदा भाजपा­शिवसेना आणि एमआयएमसारख्या शक्तींना होऊ लागला आहे़ येत्या दोन वर्षांत येणाºया पुणे महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून एमआयएमला पालिकेत प्रवेश करायचा आहे़ त्यामुळे कोंढवा येथे मुस्लीमबहुल विभागात सभा घेण्यात आली़ आतापर्यंत मुस्लीम समाजाला गृहित धरणाºया काँग्रेसला धडा शिकवण्याच्या हेतूने आणि मुस्लीम व्होट बँक प्रभावित करण्यासाठी एमआयएम हा पक्ष सक्रिय झाला आहे़ या पक्षाला प्रतिसादही मिळू लागला आहे़
ओवेसी हे केवळ प्रक्षोभक भाषणच करत नाहीत, तर ते मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक मुद्द्यावर बोलून समाजाला भावनिक साद घालत आहे़ मुस्लीम समाजाला भुरळ घालून आकर्षित करणे, ही ओवेसींची राजकीय चाल असू शकते; परंतु मुस्लीम समाजाची एकंदर स्थिती पाहता आजपर्यंत काँग्रेसने देखील केवळ मतांसाठी या समाजाला वापरून घेतले़ प्रत्यक्षात त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले़ सच्चर कमिटीच्या अहवालावर असंख्य चर्चासत्रे झडली; परंतु त्यातील शिफारशींची योग्य अंमलबजावणी करण्याकडे मात्र काँग्रेसने उदासीनताच दाखवली़ त्यामुळे मुस्लिमांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून एमआयएमच्या रूपाने त्यांच्यापुढे एक पर्याय उभा राहिला आहे़
पुण्यामध्ये नेत्यांच्या जाहीर सभांना फारसा प्रतिसाद मिळत नाही; परंतु ओवेसींच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जसे मुस्लिमांविरुद्ध भडक भाषण करत होते, तसे ओवेसींचे भाषण असून ठाकरे आणि ओवेसी यांच्या मोठ्या सभा आणि भाषणे यात साधर्म्य दिसत आहे़ २०१४च्या मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने दलित मागासवर्गीय, सामाजिक व राजकीय अशा १८ संघटनांबरोबर निवडणूकपूर्व आघाडी केली होती़ त्यामुळे दलित व्होट बँकेला गळाला लावण्याचा त्यांचा मनसुबा दिसत आहे़ दलित मागासवर्गीय समदु:खी समूहांना साद घालण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे़ हैदराबादमध्ये तर त्यांनी हिंदूंनाही तिकिटे दिली होती़ ओबीसी हिंदू समाजाच्या महिला महापौरही केल्या होत्या़ महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या­ज्या भागात मुस्लीमबहुल समाज आहे तिथे यश मिळवण्याचा या पक्षाचा प्र्रयत्न राहील़  या पक्षाच्या वाढीचा भाजपा­शिवसेनेला तोटा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ याचे कारण मुस्लीम समाज हा या पक्षाचा मतदार नाही़ पुण्यातील ओवेसींच्या सभेला विरोध करून त्यानिमित्ताने आपली संघटनात्मक ताकद मजबूत करण्याचे निमित्त शिवसेनेला मिळाले आहे, हेही तितकेच खरे़ महानगरपालिका निवडणुका भाजपा­शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याने, ओवेसींना विरोध करून हिंदू मतांचे धु्रवीकरण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे़ भाजपाला स्वत:ची ताकद वाढवायची असल्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित आहे़ केंद्रात आणि राज्यांत भाजपाची सत्ता असल्याने शिवसेनेच्या कुबड्यांची गरज नाही, स्वबळावर निवडणुका जिंकायच्या आहेत़ शिवसेनेला याची जाणीव असल्यामुळे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व व स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठीच ओवेसींचे प्रकरण त्यांनी ताणून धरलेले दिसते़
शिवसेना हिंदू व्होट बँक निर्माण करण्यासाठी ओवेसींना लक्ष्य करत आहे. भाजपाने मात्र ओवेसींबाबत चकार शब्द काढलेला नाही़ मुस्लीम समाज ओवेसींकडे जेवढा जास्त आकर्षित होईल, तेवढा जास्त काँग्रेसला तोटा आणि भाजपाला फायदा होईल़  या राजकीय गणिताची जाण असल्यामुळे एकमेकांना माकडाची उपमा देऊन ओवेसी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विषय वाढवण्याचे टाळले आहे. खरे पाहता आपल्या व्होट बँकेवर डल्ला मारणाºया पक्षावर काँग्रेसने हल्ला करणे अपेक्षित आहे; परंतु काँग्रेसमध्ये एवढी मरगळ आली आहे की, त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत.
हिंदुतत्ववादी संघटना धर्माच्या नावावर समाजात अस्वस्थता निर्माण करून फूट पाडतात़ तोच प्रकार ओवेसी बंधू देखील करत आहेत़ धर्माच्या नावावर समाजामध्ये व्यक्तीद्वेष निर्माण करणारी ही विषवल्ली असून यामुळे देशाचे अधिक नुकसान होण्याचीच शक्यता आहे़ धर्माच्या नावाने राजकारण करणाºया  पक्षसंघटना एकप्रकारे भारतीय संविधानालाच आव्हान देत आहेत़ ज्या संविधानाने सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली आहे़ त्या संविधानालाच शह देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे़ ओवेसी यांना आरक्षणाचा विषय मांडण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, याची दक्षता घेण्याचे कर्तव्यदेखील आहे़ ओवेसींचे प्रक्षोभक भाषण मुस्लीम संघटन करत आहे तर मुस्लीम द्वेषाचे राजकारण करून शिवसेना­भाजपा हिंदू संघटन करत आहे़ अशा वेळी सत्ताधारी भाजपाकडून राजकीय शहाणपण आणि तारतम्य बाळगणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर देशातील सजग नागरिकांनी अशा फॅसिस्ट प्रवृत्ती बळावल्या तर त्याचे दूरगामी परिणाम किती धोकादायक असू शकतात, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP